शब्द – भटके-विमुक्त (Wandering Words)

43
978

या जगात सगळ्यात जास्त भटके-विमुक्त कोण असतील, तर ते म्हणजे भाषेतील शब्द. माणसांचे समूह आदिम काळापासून स्थलांतर करत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची भाषा, त्यांचे शब्द त्यांच्यामागे, त्यांच्या पाळीव जनावरांप्रमाणे फिरत आहेत. जगभर मानवसमूह ज्या ज्या दिशांना गेले त्या त्या मार्गावर त्यांनी त्यांच्या खुणा मागे ठेवल्या आहेत. त्या खुणांमध्ये भाषा ही सगळ्यात महत्त्वाची खूण. भाषांचे आदान-प्रदान स्थलांतराच्या मार्गांवर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये होत राहिले. शिकार आणि फळे-कंदमुळे गोळा करणारे मानवसमूह मैदानी प्रदेशात स्थिरावले, शेती आणि पशुपालन करू लागले. स्थलांतरितांच्या नव्या लाटा येत राहिल्या. संस्कृतीची, भाषांची देवाणघेवाण होत राहिली. मानव समाज स्थिर झाल्यानंतर नवनव्या अवजारांचे, नवनव्या तंत्रांचे शोध लागत गेले. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागले. माणसाला शिकारी अवस्थेतील खडतर जीवनापासून थोडी मुक्ती मिळाली, कला-कौशल्ये विकसित झाली आणि साहजिकच व्यापाराला चालना मिळाली. भाषांची, शब्दांची जशी देवाणघेवाण व्यापारामुळे झाली तशी ती इतर कोठल्याही घटकामुळे झाली नसेल. विकणाऱ्यांनी ग्राहकांची आणि ग्राहकांनी व्यापाऱ्यांची भाषा जाणून घेतली. केरळचा किनारा मसाल्याच्या पदार्थांमुळे देशोदेशीच्या व्यापाऱ्यांनी गजबजलेला सोळाव्या शतकापासून होता. त्यामुळे मल्याळम शब्दांचा शिरकाव जगभरच्या भाषांमध्ये झालेला आहे. मुंबईतील गुजराती आणि मराठी माणसे धडपडत एकमेकांची भाषा बोलतात आणि चेन्नईमध्ये स्थायिक झालेले मारवाडी तमिळ अस्खलित बोलतात.

व्यापारमार्गावर झालेल्या भाषिक देवाणघेवाणीमुळे भारतीय भाषांमध्ये फारसी, अरबी, तुर्की, मंगोल, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश भाषांमधील शब्द आढळतात. इंग्रजी शब्दांबद्दल तर बोलायलाच नको. सगळ्या भारतीय भाषांमध्ये इतके इंग्रजी शब्द असतात की ती भाषा येत नसली तरी ऐकणाऱ्याला गोळाबेरीज अर्थ कळतो. मुद्दा हा आहे की जगभरच्या भाषांमध्ये आणि त्यायोगे मानव समूहांमध्ये अंतर्गत नातेसंबंध आहेत. भाषांची ही देवाणघेवाण आजच्या घटकेलाही चालू आहे. सर्वच भाषासमूहांमध्ये कोणालातरी भाषाशुद्धीची अधूनमधून उबळ येत असते. पण तो विचारच बाष्कळपणाचा आहे. वंशशुद्धी आणि भाषाशुद्धी करता येईल असे ज्या कोणाला वाटत असते ते मुर्खांच्या नंदनवनात राहतात यात शंका नाही !

हिंदीमध्ये ‘भटका’ या अर्थाने शब्द आहे ‘यायावर’. यायावरमध्ये नुसतेच भटके असण्याची भावना नाही तर विमुक्त असण्याचीही छटा आहे. जो सर्व भौतिक, भावनिक पाशांपासून मुक्त होऊन भटकत असतो तो यायावर. ‘शब्द’ हा असा यायावर आहे. तो अमूक एका भाषेतला आहे म्हणून तिथेच राहील असे नाही. तिथे राहील आणि दूरदेशीच्या इतर भाषांमध्येही जाईल. त्याचा उच्चार बदलेल, कदाचित त्याचा अर्थही बदलेल, पण तो ज्या भाषेतून आला असेल तिच्या खुणा त्याच्या अंगावर राहतीलच. एकदा मी पूर्व युरोपातल्या कोठल्यातरी भाषेतला एक सिनेमा बघत होते. पडद्यावरची चित्रे बघणे आणि पडद्यावर तळाला येणारे संवादांचे इंग्रजी भाषांतर वाचणे अशी कसरत चालली होती. तेवढ्यात माझ्या लक्षात आले, की संवादातील दोन शब्द हे वेगळ्या धाटणीने उच्चारलेले तमिळ शब्द आहेत. संवाद वाचताना मला वाटला होता तोच त्या शब्दांचा अर्थ होता. जुन्या ओळखीचे माणूस रस्त्याच्या पलीकडील तीरावर दिसले की जसा एक हलका दिलासा वाटतो तसा दिलासा वाटला त्या दिवशी.

असा हा ‘भटका-विमुक्त’ असलेला शब्द सार्वभौम आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला ग्रीक राजदूत, मॅगेस्थेनिस याने त्याच्या ‘इंडिका’ नावाच्या ग्रंथात, भारतातील समाजव्यवस्थेविषयी लिहिताना म्हटले आहे; की या समाजातले तत्त्वज्ञ, ग्रीकमध्ये फिलॉसॉफर्स म्हणतात त्या अर्थाने; संख्येने सगळ्यात कमी असले तरी त्यांचे सामाजिक स्थान सगळ्यात वरचे आहे. त्यांची विभागणी त्याने ‘ब्राखमेनेस’ आणि ‘शर्मनेस’ अशा दोन गटांमध्ये केली आहे. ते दोन गट म्हणजे म्हणजे ब्राह्मण आणि श्रमण. त्यातील पहिल्या गटातील लोकांना एकांतात राहून सखोल अभ्यास करावा लागतो. त्यांचा देव सूर्याचा किंवा अग्नीचा प्रकाश हाच आहे. ते त्या प्रकाशालाच ‘देव’ किंवा ‘शब्द’ असे म्हणतात. हा ‘शब्द’ म्हणजे सर्वसामान्य माणसे बोलतात तो शब्द नाही तर ज्या शब्दाच्या सहाय्याने ज्ञानाच्या प्रांतातील गूढ उलगडते तो शब्द. शब्दातच ईश्वर आहे म्हणून तो शब्दच ईश्वर आहे.

ऋग्वेदाची साक्ष काढायची झाली तर शब्द येतो कोठून ? तर तो ‘परमे व्योमन्’ मधून म्हणजे आकाशापलिकडच्या अवकाशातून येतो. पण माणूस स्वतः काही इतकी तप:सिद्ध म्हणजे चांगल्या अर्थाने ‘पोचलेली’ नसते, की तिला तो आकाशापलीकडच्या अवकाशातला शब्द ऐकू येईल ! शब्दात ईश्वर सामावलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र शब्द म्हणजे काही ध्वनींचा सामायिक नाद असतो. ते ध्वनी वापरून मी जो नाद करत आहे तो समोरच्या माणसाला कळायला हवा असेल, तर त्या नादाचा अर्थ अमूक एक आहे हे त्याला मान्य असायला हवे. तरच संवाद शक्य आहे. आजच्या भाषेत बोलायचे तर बोलू इच्छिणाऱ्या दोन माणसांनी ‘सेम पेज’वर असणे आवश्यक आहे. ‘कानडीने केला मराठी भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ।।’ अशी स्थिती होऊ नये असे वाटत असेल तर एकमेकांपाशी असलेल्या शब्दांविषयी आत्मियता बाळगायला हवी. तरच संवाद शक्य आहे. स्वभाषेतले, परक्या भाषेतले, परक्याहून परक्या भाषेतले असे जे काही शब्द वाट्याला आले, त्यांनी स्वभाषेला आकार दिला ते सांभाळायला हवेत. त्यांनी स्वतःच्या भावनांना, विचारांना रूप दिले. भावना, विचार प्रकट करण्याची क्षमता दिली. स्वतःच्या हाती एक शस्त्र दिले. ते प्राणपणाने जपायला हवे, वेळ पडली तर प्राणपणाने चालवायला हवे. आज शस्त्रपूजेच्या दिवशी हे इतकेच. चला सीमोल्लंघन करू या आणि सोने लुटू या.

– सुनंदा भोसेकर 9619246941 sunandabhosekar@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

43 COMMENTS

 1. खूप छान लिहिलंय सुनंदा.तुझ्या विचारांशी सहमत आहे.ग्रंथालीकडून वाडवळी शब्दकोश डिसेंबरमधे प्रसिद्ध होत आहे.जो ऑस्ट्रेलियास्थित रिचर्ड नुनीस यांनी तयार केला आहे.त्याच्या संपादनात माझा सहभाग आहे.त्याला मी प्रस्तावना लिहिली आहे.उत्तर कोकणातील मराठी भाषक ख्रिस्ती समाजात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर परदेशी भाषांचा मोठा प्रभाव त्यात पृष्ठभागावर आणलेला आहे.तो लेख तुला नंतर पाठवून देईन.त्याची पार्श्वभूमी तुझ्या लेखातून आलेली आहे.अभिनंदन आणि आभार.

 2. कितीतरी ग्रंथ मुळातूनि पारखोनि
  नवविचारांची जुळणी करोनि
  लेखन सुडौल, समृध्द म्हणौनि
  अभिनंदन स्वीकारिजे ll

 3. खूपच छान वाटलं लेख वाचून. मनात एक जीप्सी असतोच आपल्या. शब्द संस्कृतीचा आरसा असतील तर त्यात व्यक्ती म्हणून आपलंही कणभर बिंब असणारच… शब्दांच्या यायावरपणातून आपणच विहरत राहतो की! या कल्पनेनेच किती मोकळं वाटलं…

 4. सुनंदा, फारच छान सुरुवात! शब्दांचं भटके विमुक्त असणं फार छान अधोरेखित केलं आहेस. अभिनंदन आणि शुभेच्छा!

 5. नंदा,
  शब्द… तेही भटके विमुक्त? कल्पना आवडली.हेच शब्द नंतर नवीन भाषेतील शब्दांचे सहोदर होऊन राहतात.
  लेख अभ्यासपूर्ण झाला आहे.मस्त.

  • धन्यवाद विजू! नवीन भाषेत शब्द सहज रुळतात हीच तर खरी गंमत!

 6. खूप छान. सुंदर…
  माझे मित्र सांगलीचे सदानंद कदम यांनी १)कहाणी शब्दांची मराठीच्या जडणघडणीचा व २)कहाणी वाक्प्रचारांची अशी पुस्तके लिहिली आहेत. प्रकाशक मनोविकास. दुस-या पुस्तकाला २०२२ चार नरहर कुरुंदकर पुरस्कारही मिळालाय. अफलातून आहेत पुस्तकं आणि लेखक दोघे.

 7. नेहमीप्रमाणेच सुनंदापण आहे ! अभ्यासोन प्रकटलेले पण अजिबात रुक्ष बोजड नाही.

 8. शब्दांना भटके आणि विमुक्त ही लेणी चढवून त्यांचं सीमोल्लंघन दाखवणारा अभ्यासपूर्ण सुंदर विचार…फुलपाखरांसारखे हे शब्द अलगद उडून अलगद पणे दुसर्‍या भाषेत जाऊन बसतात..तिथे रेटारेटी होत नाही…ती परकी भाषाही या नवागतांना सहज सामावून घेते..

 9. अभ्यासपूर्ण आणी रंजक.खूप छान लेख सुनंदा. जर्मन भाषेत रेल्वे गाडीला Zug म्हणतात. आपल्याकडे झुक झुक गाडी हा शब्द जर्मन मधून आला असावा

 10. आपण शब्दांकडे सजगपणे पाहिले तर त्यात किती गमतीजमती आहेत ते जाणवते. काही शब्द त्या भाषेत जो अर्थ दर्शवतात त्याचा चपखल अनुवाद करता येत नाही कारण अर्थाची ती shade हे त्या भाषेचं लेण असतं. उदा. जर्मन भाषेतील Angst हा शब्द . त्याच्या जवळपास जाणारे शब्द इतर भाषेत असतील पण angst या शब्दातली कळ त्या शब्दांत नाही.
  भटके विमुक्त ही उपाधी शोभून दिसते.

  • शुभाताई, तुम्ही विस्तृत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मनापासून आभार.

 11. भाषेची घुसळण होत राहिली पाहिजे,मोडतोड होत राहिली पाहिजे त्यातूनच भाषा नव्याने घडेल,रुजेल.
  नेमकं मांडलय.

 12. सुनंदा सुरेख , माहितीपूर्ण लेख
  ह्या भटके , विमुक्त शब्दांमुळे भाषा प्रवाही झाली आणि मानव संस्कृती ही समृद्ध झाली , होत आहे .
  क्लिष्ट विषय सहजतेने लिहिताना तो रसपूर्ण ही झाला , सलाम

 13. सुनंदा तुझा लेख वाचला. तो नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण, अभ्यासू आणि वाचनीय आहे. गहन, कठीण विषय सहज, सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडण्याची तुझी शैली केवळ अप्रतिम आहे. त्यामुळे सामान्य वाचकापर्यंत तू कुठलाही अभिनिवेश न आणता सहज पोचतेस व लेखाच्या शेवटपर्यंत वाचकांची माहिती मिळवण्याची उत्सुकता व विषयातील रुची टिकून राहते. सहजच वाचक तुझ्या पुढील लिखाणाची वाट पहात रहातो.
  शब्द भटके विमुक्त असतात किंवा यायावर असतात ही संकल्पनाच प्रथम आणि नव्याने जाणवली. त्यामुळे मजा आली.
  तर पुढील लेखांची वाट पहातो आहे.

  • धन्यवाद गिरीश! तू नेहमीच चिकित्सकपणे वाचतोस.

 14. भाषेचे प्रवाहिपण अगदी सहजतेने रेखाटले आहेस सुनंदा. सोप्पं करुन सांगणं जे अवघड असतं तसा झाला आहे लेख. शब्द पर्यायाने भाषा आपल्याला जोडते तो भाव पोहोचतो आहे लेखातून.

 15. धन्यवाद निलिमा! एकत्र काम करायला मजा येणार आहे.

 16. भटके विमुक्त, यायावर शब्द ही मानवाची श्रीमंती आृहे, नाही का? किती सुंदर, साधं, सोपं लिहिलंयभाषा प्रवाही राहाते ती या भटकेपणामुळे! ही प्रक्रिया अटळ आहे. बोजड वाटणारा विषय आपलासा वाटावा, ही सुनंदाताई, तुमच्या लेखणीची किमया!

  • धन्यवाद मेधाताई! तुम्ही जानकार आहात. तुमची दाद महत्त्वाची.

 17. सुनंदा भोसेकर या भारतीय रिझर्व्ह बँकेतील माझ्या सहकारी, यांचे ‘ मोगरा फुलला ‘ या सदराखाली प्रकाशित लेख ” शब्द – भटके विमुक्त हा लेख वाचला. नवनव्या शब्दांनी भाषा कशी समृध्द होत असते याची प्रचिती या लेखातून आपल्याला होते.
  कोणकोणत्या कारणाने अन्य भाषेतील शब्दांचे आदान-प्रदान होते याचे सुंदर विवेचन या लेखात केले आहे. व्यापार उदिमाने याची सुरवात झाली तर परकीय आक्रमण आणि त्यांच्या सत्ताग्रहणाचा भाषेवर कसाकसा परिणाम झाला हे या संक्षिप्त लेखात अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण रीतीने मांडले आहे.भाषेचा अभ्यास करणार्‍या प्रत्येकांने हा लेख वाचायलाच हवा.

 18. लेख आवडला. भाषाशुद्धी वरील टिप्पणी अफलातून ! ( पण हे शाळेतल्या आपल्या शिक्षकांना कितपत रुचेल/ पचेल ?) लेखाचा शेवट सुंदर केला आहे.

  • धन्यवाद!
   शाळेतल्या शिक्षकांनाच नाही तर इतरही अनेकांना रुचणार नाही.

 19. सुनंदा, शब्दांचे प्रवाहीपण आणि भटकंतीचा स्वभाव याविषयी अतिशय नेमकेपणाने लिहिले आहे. शब्दांचे बदलते रूप पाहून आकाशाच्या बदलत्या रूपाची आठवण येते.

  • धन्यवाद सुमित्रा!
   ‘मोगरा फुलला’ साठी लेखनसहकार्य अपेक्षित आहे.

 20. सुनंदा, सुंदर लेख. खूप उशिरा वाचला मी. क्षमस्व. हल्ली मराठीत एक शब्द सर्रास वापरतात, “सर्वदूर”, मला तो खुपतो. सगळीकडे किंवा सर्वत्र असे छान शब्द असताना, हे काय? तुला किय वाटते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here