अजिंठ्यात दडलेले ऐतिहासिक रहस्य – डॉ. वॉल्टर स्पिंक (Walter Spink rewrote history of art in Ajintha Caves)

13
216

अजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत. तेरा लेण्यांमध्ये रंगचित्र रेखाटनाची सुरुवात जेमतेम झाली आहे आणि पाच लेण्यांमध्ये कुंचल्याचा एक फराटादेखील उमटलेला नाही ! असे असूनसुद्धा अजिंठा लेण्यांमध्ये जो आहे तो भित्तिचित्रांचा ठेवा प्राचीन भारताच्या सुवर्णयुगाचे अपूर्व दर्शन घडवतो. चित्रांमध्ये दिसणारे विस्तीर्णभव्य व सुशोभित वाडे आणि प्रासाद त्यांत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगणारे सुखासीन स्त्रीपुरुष अभिजनत्यांची देहबोली त्यांच्या चेहऱ्यांवरील शांतश्वस्त भावत्यांनी नेसलेली तलमउंची वस्त्रे त्यांनीच घातलेले वैविध्यपूर्ण व सुबक अलंकारओसंडून वाहणारी सुबत्तातेथील विलासी जनजीवनाचेसारे काही अचंबित करणारे आहे. त्यावरून पुढील गोष्टी ठळकपणे लक्षात येतात:

एक : ही लेणी पाचव्या शतकात कोरण्यात आली तेव्हाचे ऐश्वर्य आणि भरभराट,

दोन : संगीतनृत्यचित्रकला यांची व इतर कलाघटकांची कदर करणारा आणि अप्रतिम, सुंदर अभिव्यक्ती जोपासणारा तत्कालीन सुसंस्कृत समाज,

तीन : समाजाला सुखसमृद्धीचा मोकळेपणाने उपभोग उपलब्ध करून देणारीव्यापारउदिमाने मजबूत झालेली आर्थिक स्थिती,

चार : प्रजाजनांच्या सुखरूपतेविषयी व सुरक्षिततेबाबत जागरूक असणारी स्थिर व खंबीर राजकीय शासनव्यवस्था.

एकोणीस नंबरच्या लेण्यातील कोरीव व रंगीत सजावट

           पण अजिंठ्याला केवळ भित्तिचित्रे नव्हे तर स्थापत्य आणि शिल्पकलेचाही मोठा खजिना आहे. अजिंठा लेण्यांच्या भारतीय इतिहासातील स्थानाबद्दल आणि मूल्यांकनाबद्दल पुरातत्त्वज्ञांमध्ये दोन महत्त्वाच्या प्रश्नांवरून संभ्रम होता. ते दोन प्रश्न म्हणजे ही लेणी कोणी आणि केव्हा निर्माण केलीत्या लेण्यांच्या निर्मितीस कमीत कमी दोनशे वर्षे लागली अशी विद्वानांची अंदाजात्मक समजूत होती. अजिंठा लेण्यांचा शोध एका ब्रिटिश शिकाऱ्याला निव्वळ योगायोगाने लागला. त्याला दीडशे वर्षे उलटली तरी काही कोडी उलगडत नव्हती. बहुतेक लेणी अपूर्णावस्थेत का आहेत, मोजक्याच लेण्यांमध्ये रंगीत चित्रे का आहेत, शेकडो ठिकाणी एकावर एक चढवलेल्या बुद्धमूर्ती का आहेत, या सर्व उपक्रमामागची मूळ प्रेरणा काय अशा अनेक प्रश्नांची स्पष्टीकरणे कोणाही इतिहासतज्ञाला देता येत नव्हती. अशा परिस्थितीत प्राध्यापक डॉ. वॉल्टर स्पिंक हे कला इतिहासाशी संबंधित संशोधनासाठी नेमका विषय शोधत शोधत 1952 मध्ये अजिंठ्याला येऊन ठेपले आणि त्यांनी अजिंठा हीच त्यांची कर्मभूमी निवडून फील्डवर्कची सुरुवात केली. वॉल्टर स्पिंक यांनी त्यानंतरची सहासष्ट वर्षे त्या संशोधनास वाहून घेतले. त्यांनी त्यांचे क्रांतिकारी संशोधन सात जाडजूड ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे.

सव्वीसाव्या लेण्याच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख

स्पिंक यांनी अजिंठ्याला असलेल्या (पाच सातवाहनकालीन जुनी लेणी वगळता) सुमारे पंचवीस वाकाटककालीन लेण्यांची निर्मिती अवघ्या वीस वर्षांच्या कालावधीत झाली हे सप्रमाण आणि नेमकेपणाने सिद्ध केले आहे. त्यांनी त्याच्या समर्थनार्थ विविध युक्तिवाद मांडले आहेत. त्यामुळे अजिंठ्याबद्दलच्या पारंपरिक समजुती मुळापासून उखडल्या गेल्या आणि त्या लेणीसमूहाच्या बहुपदरी विकासाचे अनेक पैलू समोर आले. स्पिंक यांची ती मांडणी सुधारित लघु कालक्रम’ (short chronology) या नावाने जगप्रसिद्ध झाली. मात्र त्यांच्या त्या अभ्यासावर अधिकृत अशी टिप्पणी कोणा भारतीय इतिहास संशोधकाने केलेली नाही. स्पिंक हे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात भारतीय कलाइतिहास शिकवत असत. त्यांचे निधन 23 नोव्हेंबर 2019 रोजी वयाच्या एक्याण्णव्या वर्षी झाले. तोपर्यंत ते कार्यरत होते व वर्षातून दोन वेळा अजिंठ्याला येत. तो क्रम त्यांनी एकदाही चुकवला नाही. त्यांच्या गौरवार्थ कोरिया, जपान, चीन, अमेरिका या देशांतील मान्यवर विद्यापीठांनी परिसंवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांचे आयोजन वेळोवेळी केले आहे.

फारसे सजावट नसलेले लेणे क्रमांक अकराचे साधे प्रवेशद्वार

स्पिंक भारतात संशोधनाच्या उद्देशाने अजिंठ्याला प्रथम दाखल झाले होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी नेस्टा होती. त्यांचे गुरू बेन्जामिन रोलंड हे भारतीय कलाइतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सुरुवातीच्या पाश्चात्य विद्वानांपैकी एक होत. स्पिंक यांनी भारतात संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी बदामी, घारापुरी (एलिफंटा) व अजिंठा असा वेध घेतला. कर्नाटकात बदामी या ठिकाणी असलेली लेणी सहाव्या शतकात कोरण्यात आली असा शिलालेख तेथे आहे. तसेचघारापुरी लेणी आठव्या शतकात निर्माण झाली अशी समजूत विद्वानांची त्या काळी होती. परंतु शिल्पशैली शास्त्राप्रमाणे बदामीची लेणी ही घारापुरी लेण्यांच्या नंतरची असण्यास हवीत असे त्यांच्या कलाइतिहास प्रशिक्षित नजरेला जाणवले आणि त्यावरून त्यांना घारापुरी लेण्यांच्या कालनिश्चितीत दोनशे वर्षांची गफलत झाली असल्याचा संशय आला. त्यांच्या त्या शंकेला दुजोरा मिळाला अजिंठ्यापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या घटोत्कच नावाच्या लेण्यात. ते लेणे वाकाटक सम्राट हरिषेण याचा प्रमुख सचिव वराहदेव याने कोरवून घेतले अशी नोंद तेथील शिलालेखात आहे. सम्राट हरिषेण पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्य करत होता. तेथील शिल्पकला आणि अजिंठ्याची शिल्पकला तंतोतंत सारखी आहे. मग घटोत्कच येथील निर्मिती पाचव्या शतकात आणि अजिंठा येथील सातव्या शतकातहे कसे शक्य होईल?

मूर्तीला फुलांचे हार घालण्यासाठी खिळे ठोकत असत.

तो प्रश्न समजून घेण्यासाठी स्पिंक यांनी अजिंठ्याचा इंचन इंच पिंजून काढला. त्यांनी लेण्यांच्या प्रत्येक अवयवाचा कसून तपास घेतला तेव्हा त्यांना असे आढळलेकी बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्तीपासून ते रंगाच्या चुकून उडालेल्या थेंबभर शिंतोड्यापर्यंतदारे आतून बंद करण्याच्या विविध रचनांपासून खिळे (मूर्तीला फुलांचे हार घालण्यासाठी खिळे ठोकत/बसवत असत. तशी छिद्रे अजिंठ्याला अनेक मूर्तींच्या वर आहेत आणि तसे हार दाखवणारी रंगीत भित्तिचित्रेदेखील असल्यामुळे या तर्काला दुजोरा मिळतो.) ठोकण्यासाठी केलेल्या बारीक छिद्रांपर्यंत आणि बेशिस्तपणाने एकावर एक चढवलेल्या शिल्पाकृतींपासून ते रंगीत भित्तिचित्रांना झाकोळून टाकणाऱ्या धुराच्या काजळीपर्यंतअजिंठ्याचा प्रत्येक अवयव काही तरी सांगतो. स्पिंक यांची असामान्य निरीक्षणशक्तीत्यांची सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलाचा अन्वयार्थ लावण्याची हातोटी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांची सांगड एकमेकांशी घालण्याची समावेशक दृष्टी यांमुळे अजिंठ्याची रहस्ये स्पिंक यांच्यापुढे एकापाठोपाठ एक उलगडू लागली ! त्यांच्या बारा वर्षांच्या तपश्चर्येला यश मिळाले ! त्यांनी अजिंठा लेण्यांसदर्भातील त्यांच्या सुधारित लघु कालक्रमाची मांडणी एका परिषदेत जाहीरपणे केली. त्यांच्या मांडणीसोबत भरघोस पुरावे होते. त्यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म बारकाव्यासदेखील ऐतिहासिक पुराव्याचा दर्जा देणाऱ्या नावीन्यपूर्ण संशोधनशैलीला जागतिक पातळीवर शास्त्रशुद्धतेची मान्यता लाभली. स्पिंक यांच्या संशोधनात त्यांची कलात्मक संवेदनशीलता आणि शास्त्रशुद्ध कार्यपद्धत यांचा अनोखा संगम पाहण्यास मिळतो असा जाणकारांनी अभिप्राय दिला.

स्पिंक यांनी त्यांचा सुधारित लघु कालक्रम पुढील चार भक्कम खांबांवर उभा केला आहे. 1. त्यांनी स्वतः केलेले फिल्डवर्क2. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महानिदेशक जेम्स बर्जेस यांनी तयार केलेले लेण्यांचे अचूक आराखडे, 3. अजिंठा आणि इतरत्र उपलब्ध असलेले शिलालेख व ताम्रपट यांचे महामहोपाध्याय वि.वा. मिराशी यांनी केलेले वाचन व लावलेला अन्वयार्थ आणि 4. दंडी याने सातव्या शतकाच्या सुमारास केलेल्या दशकुमारचरित या गद्य रचनेतील विश्रुतचरितनावाचे शेवटचे प्रकरण. स्पिंक यांनी या चारही पुराव्यांची अचूक व अद्वितीय अशी सांगड घालून त्यांचे निष्कर्ष विद्वजगतात मांडले.

खांबावरील कोरीव सजावट (लेणे एकोणीस)

 

भारतीय इतिहासात गुप्त साम्राज्याच्या काळाला सुवर्णयुग मानण्याची जुनी परंपरा आहे. त्या संदर्भात स्पिंक यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनाच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी सुचवली आहे. ती थोडक्यात अशी एक, अजिंठा लेणी समूह हा हरिषेणाच्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत आणि त्यानंतरच्या दोन वर्षांत वेगाने घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींचा आरसा आहे व तो इतिहास जिज्ञासूला एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचता येतो. आणि दोन, इतक्या कमी काळातयुद्धाची टांगती तलवार डोक्यावर असताना इतक्या अप्रतिम सुंदर कलाकृती निर्माण करण्याची क्षमता असलेले कारागीर ज्या राजवटीत होतेती हरिषेणाची अल्पकालीन राजवट हाच प्राचीन भारतीय सुवर्णयुगाचा कळस म्हणून ओळखला जावा. स्पिंक यांचा तो आग्रह व दावाही आहे. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधून दिसणारे सुवर्णयुग वास्तवात प्रत्यक्ष अवतरले ते पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातहरिषेण या वाकाटक सम्राटाच्या अवघ्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत, असा स्पिंक यांच्या संशोधनाचा सारांश सांगता येईल.

या लेण्यांमधील एकूणएक भित्तिचित्रेही त्याच सतरा वर्षांच्या कालावधीत रेखली गेली आहेत. स्पिंक यांनी मायकेल एंजेलो (पंधरावे शतक) आणि अजिंठ्याची (पाचवे शतक) पेंटिंग्ज यांची तुलना करून अजिंठ्याची भित्तिचित्रे कलात्मक दृष्ट्या अधिक श्रेष्ठ आहेत असा निर्वाळा दिला आहे.  

विसाव्या लेण्यात डावीकडे बुद्धमूर्ती, खांबावर खाली नागराज मध्ये मिथुन त्यावर स्त्रीदेवता

स्पिंक यांच्या त्या संशोधनाने पुरातत्त्व जगतात खळबळ माजली. त्यांची मांडणी तंत्रशुद्ध आणि तर्ककठोर होती. शिवायत्यामुळे अजिंठ्याच्या नंतर कोरलेल्या घारापुरी इत्यादी सर्व लेण्यांचा कालक्रमदेखील त्या प्रमाणात आपोआप दोन शतकांनी छोटा झाला. शिलालेखांमधील मजकुरामुळे अजिंठ्याची निर्मिती राजकीय प्रेरणेतून झाली हे स्पिंक यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले. त्याबरोबरच ती लेणी कोणी निर्माण केली या प्रश्नाची उकलदेखील या सुधारित लघु कालक्रमामुळे निर्विवादपणे झाली. ‘केव्हा’ आणि ‘कोणी’ ही अजिंठ्याबाबतची दोन कोडी समाधानकारक रीत्या सुटली. मात्र स्पिंक यांच्या या संशोधनास भारतीय विद्यापीठांमध्ये मान्यता लाभलेली नाही. अजिंठ्याचा कालक्रम ठरवणे कठीण होते, कारण शिलालेखांमध्ये तारखा नव्हत्या. स्पिंक यांनी कलाकृती घडवण्यासाठी ‘जास्तीत जास्त वीस वर्षे’ असे ठाम पुराव्यासकट जाहीर केल्याने प्रचलित अंदाजसमजुतींना फार मोठा धक्का बसला. हे कसे शक्य आहेहाच प्रश्न वारंवार पुढे येत राहिलाअजूनही येतोपण बऱ्याच कमी प्रमाणात. प्रदीर्घ वादविवाद झाले.

स्पिंक यांच्या निष्कर्षांना अभ्यासपूर्वक आव्हान दिले कार्ल खंडालावालाब्रह्मानंद देशपांडे आणि अरविंद जामखेडकर अशा ज्येष्ठ, नामांकित आणि मातब्बर मंडळींनी. त्यांच्या विद्वत्तेचा आणि प्रामाणिक जिज्ञासेचा मान राखून स्पिंक यांनी मुख्यतः अजिंठा व जोडीला इतरअशा सर्वांगीण पुराव्यांच्या अभ्यासाच्या आधारे या तिन्ही विद्वानांच्या प्रत्येक मुद्द्याला समर्पक उत्तर दिले. तो संपूर्ण वादविवाद प्रथम ‘पथिकने प्रसिद्ध केला. तो Ajanta: History and Development या स्पिंक यांच्या सातपैकी दुसऱ्या खंडात संपूर्ण प्रसिद्ध केला आहे.

अजिंठ्याचा अन्वयार्थ लावताना इतरांनी एखाद्या पुराव्यावर अधिक लक्ष देऊन दुसरीकडे दुर्लक्ष केले. उदाहरणार्थदंडीच्या दशकुमारचरितात ऐतिहासिक सत्य असावे असे मिराशी यांनी सांगितले असूनसुद्धा काही विद्वानांची ते मान्य करण्याची तयारी नव्हती. पण दंडीने हरिषेणाच्या मृत्यूनंतर माजलेल्या अराजकाचे जे वर्णन केले आहे त्याचे हुबेहूब मूर्त रूप अजिंठ्याला उघड्या डोळ्यांनी दिसते असे स्पिंक यांनी पुरातत्त्वज्ञांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणेवाकाटकांनी पाडलेली कोणतीही नाणी सापडलेली नसल्यानेत्या काळात नाणीच वापरात नव्हती असे काहींनी म्हटले. त्यावर स्पिंक यांनी अजिंठ्याच्या अनेक शिल्पांमध्ये आणि रंगीत भित्तिचित्रांमध्ये दाखवलेली नाणी त्यांच्या नजरेस आणून दिली. भिक्खूंच्या खोल्यांची दारे आतून बंद करण्याची यंत्रणाज्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हतेती कशी कशी बदलत गेली व त्यांच्या अभ्यासातून अचूक कालक्रम कसा ठरवता येतो हा त्यांचा सिद्धांत क्रांतिकारी (extraordinary) ठरला. स्पिंक यांनी स्वतःच्या प्राथमिक संशोधनामधून बिनतोड पुराव्यांचा अक्षरशः ढीग रचला आहे आणि प्रत्येक पुरावा विचारात घेऊन त्यांची एकमेकांशी सांगड घातली आहे.

स्पिंक म्हणतातकी इतिहासकारांनी वाकाटक राजघराण्यावर व विशेषत: सम्राट हरिषेण या महान सम्राटावर अन्यायच केला आहे. रोमिला थापर यांच्या प्रसिद्ध ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या पाठ्यपुस्तकात हरिषेणाचा उल्लेखदेखील नाही याची खंत स्पिंक यांनी लेखी स्वरूपात व्यक्त करून, अधिकृत इतिहास लेखनात अजूनही किती मोठी भगदाडे आहेत याकडे लक्ष वेधले आहे.     सम्राट हरिषेण याचे धिपत्य भारतात पूर्वेला कलिंगच्या किनारपट्टीपासून पश्चिमेला कोकणच्या किनारपट्टीपर्यंत संपूर्ण मध्य भारतावर होते हे लेण्यांमधील शिलालेखांमुळे स्पष्ट होते. हरिषेण याचा मृत्यू झाल्यानंतरडोक्यावर युद्धाची टांगती तलवार असतानाघाईगडबडीतदेखील अत्यंत वेगाने उत्कृष्ट कलाकृतींची निर्मिती झालेली असल्याचे पुरावे अजिंठ्याला पावलोपावली दिसतात. हरिषेण याच्या सतरा वर्षांच्या कालावधीच्या शेवटास अश्मक या मांडलिक राज्याच्या धुरिणांनी कटकारस्थाने करून हरिषेणाचा आकस्मिक मृत्यू घडवून आणला. त्याच अश्मक राज्याच्या पुढाकाराने इतर मांडलिकांनी हातमिळवणी करून निर्नायकी अवस्थेतील वाकाटक साम्राज्याचे स्वामित्व झुगारून टाकले व सामूहिक बंड पुकारले. त्यानंतर प्रचंड अराजक माजले आणि अत्यल्प कालावधीत एकेकाळच्या बलाढ्य़ वाकाटक साम्राज्याच्या ठिकऱ्या उडाल्या.

वॉल्टर स्पिंक

स्पिंक हे वर्षांतून दोनदा अजिंठ्याला येत. ते विद्यार्थ्यांना अजिंठ्यालाच सुधारित लघु कालक्रम प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून शिकवत असत आणि त्याचबरोबर स्वत:च्या मूळ संशोधनाचे काम पुढे नेत असतशिवायत्यांनी व्हिडिओ फिल्म्सदोनशेहून अधिक शोधनिबंध आणि प्राचीन भारतीय कलाइतिहासावर विपुल लिखाण अशी भरगच्च साहित्यसंपदा निर्माण करून ठेवली आहे. स्पिंक यांनी प्रत्येक बारीक सारीक तपशिलाचे केलेले दस्तावेजीकरण महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासू विद्वानांसाठी तो अमूल्य ठेवा आहे.

स्पिंक हे भारत इतिहास संशोधक मंडळभांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटइंडियन आर्किऑलॉजिकल सोसायटीइण्टॅक अशा संस्थांचे आजीव सदस्य होते. ते त्या संस्थांच्या नियतकालिकांसाठी लिहीत असत. त्यांनी लिहिलेल्या ‘कृष्णमंडल’ आणि ‘दि अॅक्सिस ऑफ इरॉस’ या दोन ग्रंथांमधून त्यांच्या भारताबद्दलच्या आत्मीय भावनेची आणि ज्ञानाच्या व्याप्तीची व खोलीची कल्पना येते. त्यांच्या भारताशी जुळलेल्या साठ वर्षांच्या भावनिक बांधिलकीपोटीसौंदर्यासक्त नजरेने निरखूनपारखून निवडलेल्या कलात्मक वस्तूंचे कायमस्वरूपी संग्रहालय खास त्यांच्या नावाने मिशिगन विद्यापीठात मांडण्यात आले आहे. स्पिंक यांचे भारतीय इतिहासकलासंस्कृती यांवर आणि माणसांवर मनापासून व पराकोटीचे प्रेम होते. मिशिगन विद्यापीठातील संग्रहालय हा अजिंठ्याच्या त्या यक्षाचा योग्यच सन्मान आहे !

(फोटो क्रेडिट – सरयू कामत)

शुभा खांडेकर 9969439986 shubhakhandekar@gmail.com

(अश्मक हे राज्य अजिंठ्याच्या दक्षिणेलाथोडेसे नैऋत्येकडे होते. सोबत मिराशीकृत नकाशा जोडला आहे. पण त्याचा राजा कोण होता याचा उल्लेख कोणत्याही शिलालेखात नाही. अजिंठ्याला लेणे क्रमांक 26 मध्ये असलेल्या या संबंधातील शिलालेखात अश्मकराजा असा शब्द वापरला आहे. त्याच्या प्रधान सचिवाचे नाव भव्विराजा असे दिले आहेत्याची व त्याच्या मुलाची स्तुती केली आहेपण राजाचे नाव नाही! मिराशी यांनी अश्मक राज्य हे औरंगाबादच्या भोवती होते असे सिद्ध केले. पण औरंगाबादच्या समकालीन लेण्यांमध्ये किंवा इतरत्रही अश्मकांचा एकही शिलालेख सापडलेला नाही. दंडीच्या दशकुमारचरितात अश्मकांची थेट खलनायकाची भूमिका आहे व हरिषेणाचा मृत्यू (कदाचित खून) झाल्यानंतर वाकाटकांचे साम्राज्य उलथून टाकण्यासाठी सुरुवातीच्या कटकारस्थानांपासून शेवटच्या निर्वाणीच्या युद्धापर्यंत त्यांनी काय काय केले व ज्या विश्रुताने त्यांचा अखेर बिमोड केला त्याची कहाणी: दंडीने या सर्व घडामोडींचे तपशीलवार वर्णन केले आहे.)

————————————————————————————–———————————————————

About Post Author

13 COMMENTS

  1. अगदी मुद्देसूद, परिपूर्ण आणि ओघवत्या शैलीतला लेख आहे हा. आवर्जून वाचावे असे काही या सदरात निश्चितपणे मोडणारा.

  2. शुभा, चांगला लेख आहे. थोडक्यात लिहिला आहेस पण तुझे संक्षिप्त पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.

  3. किती बारकाव्यानिशी सगळी माहिती लिहिली आहेस शुभा. वाचताना खूप छान वाटत होतं. तो इतिहास तू देखील तितकाच जगली आहेस असं वाटलं. ❤️तुझ्याबरोबर अजिंठा पाहायचं आहेच.

  4. फार सुस्पष्ट आहे लेख. एवढ्या मोठ्या कामाचा एका लेखात आढावा घेणं जिकिरीचंच. पण तुम्ही ते लीलया केलं आहे अगदी प्रतिवादाच्या उल्लेखासकट. त्यातही माझ्यासारख्या अनभिज्ञ वाचकांनाही समजेल असं लिहिलं आहे. ������

  5. सहज आणि सोप्या भाषेत लेख रहस्य उलगडत जातो, व् वोल्तर् स्पिन्क् यान्चे मोठे सशोधन अधोरेखित करतो.

  6. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद.

  7. सुंदर लेख. वाचत असताना पुन्हा एकदा अजिंठा जगले… आता ओढ लागली ती पुन्हा तो परिसर प्रत्यक्ष अनुभवण्याची❤.. प्रो. वॉल्टर स्पिंक यांच महत्त्वपूर्ण योगदान.. यांचे उल्लेख.. लेख छानच. हा वाचूनच तिथे जावं आणि डोळे भरून पाहावं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here