वडार बोली ही तेलगूमिश्रित आहे. वडार लोक भटकंती करतात, त्यामुळे प्रादेशिकतेचे रंगगंध त्या भाषेला लाभले आहेत. तिला स्वतंत्र लिपी नाही, ती मौखिक स्वरूपात जिवंत आहे. तिचा व्यवहारात सांकेतिक भाषा म्हणूनही वापर होताना दिसतो…
वडार समाज हा ‘भटका व विमुक्त’ आहे. अस्पृश्यांना जागा गावकुसाबाहेर राहण्यास मिळते, पण वडारांना तीच मिळत नाही ! त्या समाजाने कामधंद्यानिमित्त भटकंती करत असताना त्यांची संस्कृती व बोलीभाषा यांचे जतन मौखिक स्वरूपात पिढ्यान् पिढ्या केले आहे. त्या समूहाची स्वतंत्र बोली आहे, त्यामुळे त्या समूहाचे (किंवा जातीचे) वेगळेपण टिकून आहे.
वडार समाज आंध्र, तेलंगणा या प्रदेशांमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. वडार बोली हीदेखील तेलगू भाषेतून तयार झाली आहे. वडार लोक स्वतःला नागवंशी द्रविड समजतात, त्यामुळे त्या समूहाची भाषा द्रविड भाषा-समूहात सामील होते. तेलगू हा शब्द ‘त्रिलिंगा’ या शब्दाचा अपभ्रंश होय. तेलगू भाषेवर संस्कृतचा प्रभाव आरंभी होता, परंतु पांतलुळू यांनी या तेलगूला ‘वडुका भाषा’ म्हणजे बोलीभाषेचे रूप दिले. त्यामुळे तिचा प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत झाला. तेलगू भाषा इसवी सनपूर्व 500 ते 1000 या काळात अस्तित्वात होती, असे पुरावे सहाव्या शतकातील शिलालेखात आढळले आहेत. त्यामुळे तिला केंद्र सरकारचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. वडार बोली ही शुद्ध तेलगू नाही, तर ती तेलगूमिश्रित आहे. वडारी बोलीतील शब्दांत स्थलांतरामुळे बदल घडलेला आहे. वडार लोक ज्या ज्या भागांत भटकंती करत असतात, त्या त्या भागातील भाषेचा त्यांच्या बोलीभाषेत समावेश करून घेत असतात. सद्य परिस्थितीत तर असंख्य इंग्रजी शब्दांचा वापरही होताना आढळतो.
वडार बोलीला स्वतंत्र लिपी नाही. ती जिवंत मौखिक स्वरूपात आहे. त्या भाषेत मवाळपणा नाही. ती व्यामिश्र पद्धतीची बोली मानली जाते. तीत अनेक वैविध्यपूर्ण शब्द आढळतात. ते शब्द उच्चार करण्यास कठीण असतात, पण वडार व्यक्ती मात्र ते शब्द सहजतेने उच्चारतात. ती भाषा भाषाशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण त्या भाषेत दीर्घ शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात आढळतो, त्याचप्रमाणे ‘ड’ हे अक्षर त्या बोलीत बऱ्याचदा येते.
जॉर्ज ग्रीयर्सन यांनी केलेल्या भारतीय भाषांच्या चिकित्सक लिखाणात वडार बोलीभाषेचे उल्लेख थोडेफार आढळतात. प्रभाकर मांडे यांच्या ‘गावगाड्याबाहेर’ या पुस्तकातही त्या भाषेचा उल्लेख आहे. डॉ. बी. एन. भालेराव यांनी त्यांच्या ‘बोलीया, समाज और संस्कृती’ या हिंदी पुस्तकात वडार बोलीभाषेला न्याय दिला आहे.
ते लोक ज्या प्रदेशात राहतात, त्या प्रदेशातील भाषेचे हेल व ध्वनी उच्चारणाऱ्यांचा प्रभाव त्यांच्या भाषेवर होतो. त्यांच्या भाषेवर महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कन्नड, तामिळनाडूत तमीळ अशा भाषांचा प्रभाव दिसतो. प्रादेशिकतेचे रंगगंध त्या भाषेला लाभले आहेत. महाराष्ट्रात नांदेड, भोकर, देगलूर, किनवट येथील वडारी बोलीत तेलगू भाषेचा; लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली भागात कन्नड भाषेचा; कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई भागात मराठी भाषेचा पडलेला प्रभाव जाणवतो. त्यामुळेच औरंगाबाद जिल्ह्यात बाळंतिणीच्या स्नानगृहाला ‘बच्छाळ’ आणि पायाला ‘कालू’ म्हणतात, तर यवतमाळ जिल्ह्यात त्या शब्दांना अनुक्रमे ‘कोल्तीगुंता’ व ‘काल’ असे म्हणतात. वडार समाजात गाडीवडार, मातीवडार, पाथरवट इत्यादी पोटजाती आहेत. त्यांच्यामध्ये बोलताना काही शब्दांच्या उच्चारामध्ये ऱ्हस्व-दीर्घचा फरक जाणवतो. या जातीजातींतील शब्द वेगवेगळ्या ढंगांनी येतात. ही बोलीभाषा कामचलाऊ आहे; तसेच, ती व्यवहारात सांकेतिक भाषा म्हणूनही वापरली जाताना दिसते.
इंग्रजी भाषेप्रमाणे या भाषेतही आदरार्थी सर्वनाम नाही. ‘नु’ हा शब्द ‘तू’ किंवा ‘तुम्ही’साठी वापरला जातो. फक्त ‘मीर’ हा शब्द अनेकवचनी सर्वनाम तुम्ही किंवा आपण या आदरार्थी सर्वनामाप्रमाणे येतो.
सर्वनामे- मराठी (वडारी) : मी, आम्ही – (नानू/नान्, मीमू/माम्); तू, तुम्ही- (नु, मीरू/मीर); तो, ती- (आ, आदी/ई); ते- (वारू/वार)
वाक्यरचना- मराठी (वडारी) : तुम्ही/आपण या. (मीर दांडा.); तुम्ही/आपण बसा. (मीर कुसनांड.); तू ये. (नू दा.) (एकवचनी); तुम्ही या. (मीर दा.) (आदरार्थी/अनेकवचनी); तू बैस. (नू कुसनू.) (एकवचनी)
क्रियापदे: बरीचशी क्रियापदे ईकारान्त ‘दी’ने जोडलेली आढळतात. उदाहरणार्थ- उठणे (लेशाडदी), कापणे (कोशाडदी), खाणे, जेवणे (तिन्नेडदी), जाणे (पोय्यडदी), चावणे (कोरक्यादी), बसा (कुसून), उठ (लेयी), हसणे (नग्गेद).
भारतीय भाषांतून आलेले शब्दः वडारी भाषेतील काही शब्द हिंदी, मराठी, कानडी, इंग्रजी भाषांचा प्रभाव दाखवतात. वानगीदाखल –
हिंदी मराठी कन्नड वडारी
पगडी पटका पटका पटका
रूमाल रूमाल रूमाल रूमाल
करेला कारले कारळी कारल्याळ
कलाई मनगट मनगटे मनगटमू
मसूडा हिरड्या हिरड्या हिरड्याल
मूछ मिशा मिशी मिसालू
ऊंट ऊंट वंटी वंट्या
इंग्रजी भाषेतील बस, कार, रेल्वे, रोड, इंजेक्शन, स्टेशन, कप, ग्लास, डॉक्टर, सायकल इत्यादी शब्दांचाही दैनंदिन भाषेत त्याच अर्थाने वापर होतो.
वडार भाषेतील काळ :
भूतकाळ (भूतकालमू) – मी आलो (नेनु वच्चानु), आम्ही आलो (मीमु वच्चामु)
– तो आला (अतनु वच्चीनाडू), ती आली (अम्मे वच्चनादी)
– तुम्ही आलात (मीरू वच्चीनारू)
- वर्तमानकाळ (वर्तमानकालमू) –
– मी येते, येतो (नेनु वस्तानु); आम्ही येतो (मेमु वस्तामु)
– तू येतोस (नीवु वस्तावु); तुम्ही येता (मीरू वस्तारु)
– तो येतो (अतनु वस्ताडु); ती येते (आदि वस्तांदी)
– त्या, ते येतात (वारु वस्तारु)
- भविष्यकाळ (भविष्यकालमू)-
– मी येईन (नेनु वस्तानु); आम्ही येऊ (मिमु वस्तामु)
– तू येशील (नुवू वस्तावु); तुम्ही येणार (मिरु वस्तारु)
– तो, ते येतील (वारु, अतनु वस्तारु); ती येईल (आदि वस्तादी)
वाक्प्रचार : – मड्यावर टाकणे (बोंदा मिंदा येय)
– घराला आग लावणे (इछुग आगी तालगी)
– थांब तुझे पाहून घेतो (थांबा निद सुस्तान)
– तुझ्याच्याने होते ते कर (नितोंठा आते शकसको)
– पाहून घेतो (सुसकोटात)
– घोड्यावर बसून आला (गुर्राम एक्की वच्छिनाडू)
– दगड फोडायला जा (राय मोतदेनकी फो)
– नदी पाण्याने भरून वाहते (वंका निंदा नेळ फारताय)
म्हणी- काखेत कळसा गावाला वळसा (चंकन बिड्डा पट्टीकोनी ऊरता वेतीकारु), गोगलगाय पोटात पाय (चुड्डानिकी नेकी चंचचेलिक गोडलू तोव्वनि पंदीकोक), मांजराला उंदीर साक्ष (पिल्लीकी एलका साक्ष), नाव मोठे लक्षण खोटे (कस्तुरीवारु इल्ल गब्बीलाल कंपु)
– स्वभावाला औषध नाही (स्वाभानिकी मंदु लेदू)
– तोंड चांगलं तर गाव चांगलं (नोरु मचिद्उंटे ऊरु मचिंगा)
– बघून ये म्हटलं तर जाळून येतो (चुची रमंटे कालची वस्ताडू)
– खायला काळ आणि भुईला भार (तिंडीक तिमराज पानिक पोतराज)
– आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना (अम्मा पेट्टा पेटदू आडु को तिनवदु)
– कुत्र्याचे शेपूट वाकडे (कुका ताका वळगा)
– बुद्धी असून गवत खाते (बुद्धि गड्डी तिनड)
– तोंड काळं कर, निघून जा (नुती नलगा सेय्)
– पाण्याचा पैसा पाण्यात गेला (नेळा फालु नेळाला फो)
– मुंगी होऊन साखर खावी, पण हत्ती होऊन लाकूड फोडू नये (सिमा आयी शकार मेआल येनग्या अयी कट्टल कोरकादारल)
– महापुरे लव्हाळे वाचती (वंकाल निंडी फारते गरका नेतीयेतका निलश्लीनाद)
– उकराल तेवढा कचरा (तिप्पानिंडा कसुर)
– राजाला दिवाळी काय माहीत? (राजानंक फंडगा येम गोत्त)
– ताकाला जाऊन मडके लपवणे (कुराक फोयी कुंडा दासकिन्या)
– उंटावर बसून शेळ्या हाकणे (ओंट्यामिंदा टुशीन म्याकाळ कासेद)
– पालथ्या घड्यावर पाणी (नेत्ती मिंदा नेळ)
– पाण्यावर लोणी काढणे (नेळामिदा यन्ना तिशेद)
दैनंदिन व्यावहारिक शब्द :
1.अवयव– उजवा हात (तिन्यासेई/खुडीसेई); डावा हात (येडमासेई/रोड्डासेई);- उजवा (खुडीकाल); डावा पाय (येडमाकाल); पाट (बेळू);- खांदा (गुजाम), त्वचा (तोल); हाड (यमका); छात(यदा) चेहरा (नुती)
- वस्त्र- सदरा (अंगी); चड्डी (श्यणाम), धोतर (ओल्या), लुगडी (शिरा), झंपर (फोलका), परकर (लगा), वाकळ (बंताल); घोंगडी (ग्वांगाडी)
- वस्तू- सुई दोरा (सुदी धाराम्), पोतं (तित्ती), दाभण (दभणान), सूप (स्याटा),- आरसा (कनीडग्या), पेटी (संदकाम), झाडू (फरका), विळी (ईळग्या), पंख (फवोच्छ), तंबाखू (फगाक), माती (मन्न), चिखल (बुरधा), गाळ (एदूल), पाणी (नेळ), देव (ध्यावर)
- आठवड्याचे वार – ‘मु’ हा प्रत्यय लावून बोलले जातात.- रविवारमु, सोमवारमु, मंगळवारमु, बुधवारमु, गुरूवारमु (बृहस्पतीवारमु), शुक्रवारमु (लक्ष्मीवारमु), शनिवारमु.
- वेळ – दिवस (दिनमु), दिवसा (पगलु), पहाट (ववेकुवझामु),- सकाळी (तेललवारी), दुपार (मध्यहनमु), सायंकाळी (सायंकालमु), रात्र (रात्री), तास (गंटा).
- ऋतू- उन्हाळा (एंडाकालम्, वेसकीकालमु), पावसाळा (वर्षाकालमु), हिवाळा (शीताकालमु, चळिकालमु)7
- पशू- बैल (एह), गाय (आवु), रेडा (दुन्नपोतु), म्हैस (गंदे), घोडा (गुर्रमु), गाढव (गाडिद), कुत्रा (कुक्का), मांजर (पिल्ली), बकरी (मका), मेंढी (गोरे)8
- पक्षी- पोपट (चिलका), कबूतर (व्याळवा), मोर (नेमिली), कोंबडा (कोडी), साप (पामु), बदक (बातु), माकड (कोती), उंदीर (एलुका), कोल्हा (नक्क), लांडगा (तोंडली).
- भाजीपाला (कुरगायलु) – वांगे (वंकायलु), कांदे (उल्लीपायलु), टमाटे (पुलवुकायलु), भेंडी (बेंडकायलु), भोपळा (सोरकायलु), दोडके (बीरकायलु), कैरी (मामीडकायलु).
- नातेवाईक- आई (अम्मा), आज्जी (अम्मम), वडील (नान्ना), आजोबा (ताता), मावशी (पिन्नतळी), काका (पेदनाना), आत्या (अत), काकू (पिन्नमा), सासू (अतगारु), बहीण (चेलछ्लेळू).
- जेवण – चपाती (गोदमा रोट्या), भाकर (जीना रोट्या), वरण भात (बियाम पापू), पुरणपोळी (पोल्या), आंबट वरण (पुलाड पापू), लोणचे (उरगा), दही (पेरगु), ताक (साला), दूध (पाल), तूप (नई).
शिव्याः शिव्या बिनदिक्कतपणे वापरल्या जातात. अपेक्षित परिणामासाठी त्यांचा वापर केला जातो. बोलताना त्या बीभत्सपणे बोलल्या जातात – काळतोंड्या (नाल्ला मुट्टोडा), रांड (गवशी), भडवीच्या (गवश्या), ढेरी फोडतो (ढेरगा पाडेस्तान), तुला गाडतो (नीनु कुडतान), तुला जाळतो (नीनु कालतान), केस उपटतो (येंडकाळ पिकताना).
वडार समाजाच्या गुप्त व सांकेतिक भाषेला पारुषी, पारशी अथवा पारोशी भाषा असे म्हटले जाते. नेत्रपल्लवी, करपल्लवी यांचेही उल्लेख आढळतात. गुप्त व सांकेतिक भाषा पोलिसांपासून संरक्षण मिळवणे, कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेणे, इतर समाजघटकांपासून संरक्षण मिळवणे, गुन्हेगारी कौशल्य टिकवणे अशा कारणांसाठी तयार केली गेली असावी. पारुषी भाषा उपजीविकेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विपरीत परिस्थितीत जगवणारी, संरक्षण देणारी म्हणूनही वापरात येते. मात्र, नवीन पिढी पारुषी भाषेला अनभिज्ञ आहे. कर्नाटक वडार पारुषी भाषेतील काही शब्द याप्रमाणे- घरफोडी, डाका (पेरडू, उन्सळू), घरफोडीचे हत्यार (शिलाकट्टी), चोरी (दोंगा), चोरीचा माल (दोंगापाणी, वल्कमू), घर, वाडा (पेरडू), धाड (कोत्तलू), मारहाण (उनसळू), वरिष्ठ पोलिस अधिकारी (परमेश्वर), पोलीस (मुल्लावाडू), टोळीप्रमुख, नायक (पेद्दाड), पोलिस पाटील, सरपंच (नेमटू), भिंतीतील भोक, भगदाड (मणकलू).
ज्या भाषेला लिपी नसते, त्या भाषेचा विकास होत नाही. त्या अर्थाने वडारी बोलीभाषा विकसित झालेली नाही. परिणामत: वडार समाजाचा विकास धिम्या गतीने होताना आढळून येतो. तो समाज ज्या प्रदेशात वास्तव्य करत आहे, त्या प्रादेशिक भाषेला त्याने त्यांच्या शिक्षणाचे माध्यम स्वीकारले आहे.
भटक्या लोकांच्या बोलीभाषा लोप पावू नयेत म्हणून काही व्यक्तींची धडपड सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडी येथील विद्यानिकेतन शाळेत तसे प्रयोग होत आहेत. शिवाजी आंबुलगेकर या प्रयोगशील शिक्षकाने ‘अनुवादाची आनंदशाळा’ हा उपक्रम राबवून आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बोलीभाषेतून मराठीतील कवितांचा अनुवाद केला आहे. संत नामदेवांचा ‘पतितपावन नाम ऐकुनी’ हा अभंग गंगाधर इरगलवार या मुलाने वडारी बोलीभाषेत पुढीलप्रमाणे केला आहे-
पतितपावन पेर इनी आस्ती नेनू तलपुला,
पतितपावन लेवू आनी पोती एन काकू.
नामा अन्टाडू देवूडा नीदी एम्बी तळगदी नाकू,
प्रेम उन्डानी मनसुला आनी पडता कालामिदा.
मात्र, वडार बोलीभाषा ही जागतिकीकरण, औद्योगिक क्रांती, शिक्षण यांमुळे आलेले आत्मभान, बदलता समाजप्रवाह इत्यादी कारणांमुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. निरंजन कुलकर्णी यांनी ‘कातळवाट’ या नावाने वडार बोलीभाषेतील छोट्या छोट्या गोष्टींचे संकलन केल्याचे आढळते. मात्र, त्याव्यतिरिक्त वडार बोलीभाषेचे डॉक्युमेंटेशन झाल्याचे आढळत नाही. वडार समाजातील काही संस्था वडार बोलीभाषेचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आढळते. त्यांनी पुणे येथे वडार बोलीभाषेचे संमेलन 2019 साली घेतले होते.
–विजयालक्ष्मी विजय देवगोजी 8446375251
———————————————————————————————————————————————————-
वडार समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमीच उपेक्षित आणि वंचित राहिला आहे. शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेला हा समाज आजही अतिशय हलाकीचे आणि कष्टाचे जीवन जगत आहे. एकेकाळी सिंधू संस्कृतीपासून ते भव्य किल्ले, राजमहाल, वाडे हवेल्यापासून तर सामान्य माणसाच्या घराच्या बांधकामापर्यंत उत्तम अभियंता म्हणून ओळखला जाणारा वडार समाज आज कुठे आहे? त्याचे समाजव्यवस्थेत काय स्थान आहे? यावर चिंतन करण्याची गरज आहे.
डॉ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांचे मी मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ‘मराठी साहित्यातील वडार समाजजीवनाचे चित्रण’ या विषयावर बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठातून पी एचडी केली आहे. या विषयावर संशोधन करून या वंचित समूहाचा इतिहास, बोलीभाषा संस्कृती आणि लोकपरंपरा यांचे दर्शन मराठी भाषिकाला करून दिले. यासाठी आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो.
Best