वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ या पुस्तकातून भातुकली या खेळाचा, मराठी संस्कृतीचा व समृद्ध परंपरेचा इतिहास आणि वारसा प्रकट होतो ! भातुकलीच्या सर्व पैलूंचे दर्शन आणि दस्तावेजीकरण या पुस्तकात आढळते…
‘भातुकली’मधील भातुक या शब्दाचा अर्थ खाऊ असा आहे ! ‘ठकी’ हे भारतीय बाहुलीचे जुने नाव. तिची ‘बार्बी’ नावाची विदेशी बहीण गेल्या शतकात अवतरली. त्या बार्बीचा किचन सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब हे सर्व काही म्हणजे भारतीय/मराठी ठकीची भातुकली ! छोटी मुलेमुली त्या कृतक संसारनाट्यात तासन् तास रंगून जात. भातुकलीत पूर्वी मातीची, लाकडी बांबूची; तर नंतर कचकड्याची, काचेची खेळणी अवतरली. त्यानंतर तर पितळ-तांबे-स्टील यांचे आधुनिक किचन सेट आले. ते गावोगावच्या ‘तुळशीबागां’मध्ये मिळत. भातुकलीच्या खेळाच्या अशा आठवणींनी, त्यांतील भांडी-वस्तू यांच्या दर्शनाने हळवे होण्यास होते.
बच्चे कंपनी मोठ्यांचे अनुकरण करत असतात. लहान मुलांना आई, बाबा, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या यांच्या जगण्याचे आकर्षण असते. त्यांना शाळेतील बाईंचे आणि सरांचेही आकर्षण असते. मुले त्यांच्यासारखे बनू पाहतात. छोट्या मुली खोटी खोटी पातळे नेसून खोटे खोटे जेवण बनवतात. मुलगे डॉक्टर बनून, सर बनून त्यांची नक्कल करतात. खेळणी लहान मुलांची तशी मानसिकता पाहून बनवली जातात. ती परंपरा शतकानुशतके चालू आहे. म्हणून जगभरात भातुकलीच्या खेळांची निर्मिती झाली. त्यात जेवणाची भांडी, छोट्या छोट्या गाड्या, डॉक्टरी सेट, बाहुली-बाहुला यांचा समावेश असतो.
करंदीकर यांच्याकडे सुमारे दोनशे प्रकारची भांडी आहेत. त्यामध्ये वासुदेव प्याला, वेडं भांडं, शकुंतला भांडं, काथवट, ताकाचा कावळा अशी वैविध्यपूर्ण भांडी आहेत. ठकी, पाणी शेंदणारी बाई, पोहरा, बंब, अग्निहोत्र, कचोळं, कळशा, चंबू, घंगाळे, नरसाळे, किटल्या, झांजा, संपुट, तबक, द्रोण, चुली, वडधन, पंचपाळे, खुळखुळे अशांचा समावेशही आहे. त्यांच्याकडे त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू वीस-पंचवीस आहेत. दीपाली केळकर या विलास करंदीकर यांच्याविषयी म्हणतात, “भातुकली खेळाने झपाटलेला हा अवलिया आहे !”
करंदीकर यांच्या संग्रहाचे पहिले प्रदर्शन 10 मे 1998 रोजी पुणे येथील बालगंधर्व कलादालनात भरले होते. उद्घाटन चकलीच्या छोट्या सोर्यातून चकली पाडून अभिनव पद्धतीने झाले ! करंदीकर यांनी निवृत्ती 1998 मध्ये स्वेच्छेने घेतली व ते भातुकलीमय झाले. बाजारातील भांड्यांचे दुकानदार, भांडी तयार करणारी मंडळी करंदीकर यांच्या ओळखीची झाली. प्रदर्शन पाहण्यास येणारी मंडळीही त्यांच्याकडील भांडी करंदीकर यांना कधी कधी देत असत. जी भांडी मिळत नसत, ती भांडी करंदीकर स्वतः तयार करू लागले. प्रदर्शनांची एकशेअडुसष्ट भांड्यांनी सुरुवात झाली. त्यांच्याकडे गेल्या वीस वर्षांत तीन हजारपर्यंत भांडी जमली आहेत. त्यांना प्रदर्शनाची तयारी, भांडी लख्ख घासणे, टेबलवर मांडणे-सजवणे, लाकडी खोक्यांतून वाहतूक करणे या सर्व कामांत पत्नी अश्विनी यांची साथ असते.
दीपाली केळकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ पुस्तकाची सुरुवात स्वतः करंदीकर, त्यांच्या पत्नी अश्विनी आणि सहकारी सुभाष कुलकर्णी यांच्या मनोगताने होते. पुढे मग वेगवेगळ्या प्रकरणांतून भातुकलीचे दर्शन होत जाते. ‘मान्यवरांच्या नजरेतून भातुकली’ असे विचारभाव प्रकट करणारे एक मनोरम प्रकरण पुस्तकात आहे. त्यांतील स्वाती चांदोरकर, प्रज्ञा कुलकर्णी, सुहासिनी कीर्तिकर, अनुपमा उजगरे, सिसिलिया कार्व्हालो, प्रवीण दवणे या मान्यवरांच्या नजरेतील भातुकली, भातुकलीच्या खेळाचा वाचकाला गांभीर्याने विचार करण्यास लावते. त्यातील काही प्रातिनिधीक विचार पुढीलप्रमाणे आहेत :
“नाट्यकलेचा उगम भातुकलीत आहे. भातुकलीत अनुकरण आहे, निरीक्षण आहे तसेच, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आहे. जो भातुकली छान खेळतो ना, तो पुढे जाऊन कलाक्षेत्रात उत्तम काम करू शकतो.” – डॉ.माधवी वैद्य
“मोठ्यांनी स्वतःत सुधारणा करण्यासाठी छोट्यांनी केलेलं नाटक म्हणजे भातुकली. भातुकली म्हणजे केवळ भांडी नव्हे; तर ती जगणं समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे.” – राजीव तांबे
“शाश्वत मूल्ये असणारी भांडी आणि आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा भातुकलीचा खेळ आपण जतन करायला हवा. भातुकली या खेळाकडे आपण लैंगिक समानतेचे एक साधन म्हणून पाहू शकतो.”- शुभदा चौकर
“भातुकली ही स्वप्नांची पाऊलवाट आहे. भातुकली खेळता-खेळता स्वतःची ओळख होते, कार्यक्षेत्रही गवसते. भातुकली आणि इतर खेळ ही आयुष्याची मुळे आहेत, पाया आहेत.” – प्रवीण दवणे
“गुरुकुल ते ऑनलाइन शिक्षण इतका बदल माणसाच्या जीवनशैलीत झाला आहे. ‘जुनं ते सोनं’ असे मी म्हणणार नाही. पण जुन्याची माहिती करून द्यायला हवी. थोडक्यात, कृतिशील शिक्षणासाठी भातुकलीचा, भांड्यांचा, जुन्या खेळांचा उपयोग नक्की होईल.” – डॉ. स्नेहलता देशमुख
‘संतसाहित्य आणि भातुकली, तसेच इतर खेळ’ ह्या भागात रामचंद्र देखणे, अलका मुतालिक, सीमा गोखले यांनी संतांच्या गाथा-ओव्यांमधून साध्यासोप्या भाषेत भातुकली या खेळामागे दडलेला आध्यात्मिक अर्थ समजावून सांगितला आहे. ‘डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून भातुकली’ हे शीर्षक वाचून थोडे आश्चर्यच वाटते. भातुकलीशी डॉक्टरांचा काय संबंध? परंतु त्या प्रश्नाचे उत्तर लेख वाचल्यावर कळते, की व्यक्तीचा मनोविकास होण्यामध्ये बालपणी खेळलेल्या भातुकलीची आणि त्याबरोबर खेळल्या जाणार्या खेळांची भूमिका किती आणि कशी महत्त्वाची आहे ! त्यांनी तसे काही दाखले दिले आहेत. लेखिकेने मराठी साहित्यातील लेखक-लेखिका, कवी-कवयित्री यांच्या लेखांचा आणि कवितांचा संदर्भ ठिकठिकाणी दिला आहे. भातुकलीचे भावविश्व सहजसुंदर, ओघवत्या, रसाळ शब्दांत उलगडून दाखवले आहे.
पुस्तकाची छान बाब अशी, की मान्यवरांच्या लेखाच्या-डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या लेखांसह त्या प्रत्येक लेखाच्या शेवटी, पुढे कोणत्या मान्यवराने कोणते वेगळे विचार मांडले आहेत ह्याची कल्पना सूचकपणे अगदी एका ओळीत दिली आहे. त्यामुळे वाचताना उत्सुकता निर्माण होत राहते.
‘गाथा भांड्यांची’सुद्धा खूप छान प्रकारे मांडली आहे. विशेषत: भांड्यांचा त्यांच्या नावांसह फोटोत समावेश केला आहे, त्यामुळे त्याबद्दल स्पष्ट कल्पना येते. भांड्यांना त्या त्या प्रदेशानुसार असलेल्या नावांचा इतिहास कळतो. उज्ज्वला ढमढेरे यांच्या अठरा प्रकारच्या भातुकलीचेही फोटो छान आहेत. पुस्तकाची मांडणी आकर्षक आहे. ह्या पुस्तकाचा मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे अगदी शेवटी परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले रविप्रकाश कुलकर्णी यांचे मनोगत – ‘ठकी, तू कोठे आहेस?’ ते खूप रंजक आहे व तेवढेच हृद्यही आहे. भातुकली हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून दीपाली यांनी केले आहे.
खेळ मांडीयेला
लेखिका – दीपाली केळकर
प्रकाशक – डिंपल प्रकाशन
पृष्ठ – 222, मूल्य – रुपये 400/-
– श्रीकांत पेटकर 9769213913 shrikantpetkar@yahoo.com
———————————————————————————————-