छत्तीसावे साहित्य संमेलन (Thirty Sixth Marathi Literary Meet-1953)

वि.द. घाटे यांचे पुष्कळसे लेखन स्वान्त सुखाय झालेले आहे. त्यांच्या लेखनात त्यांचे उत्कट, पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा मिलाफ झालेला दिसतो. घाटे यांच्या सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार लेखनशैलीच्या साहित्याने स्वतःचा वेगळा ठसा मराठी साहित्यात उमटवला…

छत्तीसावे साहित्य संमेलन अहमदाबाद येथे 1953 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल दत्तात्रय घाटे हे होते. वि.द. घाटे यांचा जन्म 18 जानेवारी 1895 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील घोसपूर ह्या गावी झाला. घाटे यांची हयात शिक्षण क्षेत्रात गेली. त्यांचा क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या संपादनात सिंहाचा वाटा होता. त्यांनी आचार्य अत्रे यांच्याबरोबर नवयुग वाचनमाला संपादित केली होती. ते ललित लेखक म्हणून प्रसिद्ध होते. घाटे हे वृत्तीने कवी होते. त्यांनी उत्कृष्ट व्यक्तिचित्रे रेखाटली.

घाटे यांचे वडील दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त हे नावाजलेले कवी होते. वि.द. घाटे यांना कवी वडिलांचा सहवास अवघ्या चार वर्षांचा मिळाला. कवी दत्त हे अल्पवयात म्हणजे वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी निधन पावले. वडिलांच्या मृत्यूनंतर विठ्ठलराव त्यांचे आजोबा कोंडो राणोजी यांच्याकडे शिक्षणासाठी गुजरात राज्यात गेले. तेथे त्यांचे आजोबा वकिली करत. ते गुजरातमध्ये थोडे दिवस होते. पुढे ते शिकण्यास इंदूरला गेले आणि ते तेथे एम ए झाले. त्यांची पहिली नोकरी म्हणजे ते ग्वाल्हेर येथे शिक्षण खात्यात इन्स्पेक्टर झाले. ते तेथे चार वर्षे होते. मग ते डेप्युटी इन्स्पेक्टर म्हणून रत्नागिरीला रुजू झाले. प्र.के. अत्रे आणि कृ.पां. कुलकर्णी यांच्याबरोबर ते बी.टी. परीक्षेला बसले आणि पुढे लंडनला टी.डी. म्हणजे टिचर्स डिप्लोमा करण्यास गेले. ते शिक्षण उपसंचालक म्हणून 1950 साली निवृत्त झाले.

घाटे हे रविकिरण मंडळाचे सदस्य होते. ते पहिल्यांदा ‘मधुकर’ या टोपणनावाने कविता लिहित होते. वि.द. घाटे आणि माधव ज्यूलियन ह्या दोघांनी मिळून संयुक्त काव्यसंग्रह 1924 साली प्रसिद्ध केला. त्या संग्रहाचे नाव होते ‘मधुमाधव’. पुढे त्यांनी माधव ज्यूलियन यांच्या सहकार्याने ‘काही म्हातारे व एक म्हातारी’, ‘मनोगते’, ‘विचार विलसिते’, ‘पांढरे केस, हिरवी मने’ (ललित), ‘दिवस असे होते’ (आत्मचरित्र) इत्यादी साहित्यनिर्मिती केली. त्यांचे पुष्कळसे लेखन स्वान्त सुखाय झालेले आहे. त्यांचे उत्कट, पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा त्यात मिलाफ झालेला दिसतो. त्यांची गद्यशैलीही सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार आहे.

घाटे यांनी लेखन मोजकेच केले. पण त्यांच्या साहित्याने स्वतःचा असा वेगळा ठसा मराठी साहित्यात उमटवला. ते मुंबई विधानसभेचे सदस्यही 1952 साली होते.

त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “मराठी भाषेला तिचे स्वाभाविक स्थान महाराष्ट्राच्या सर्व प्रकारच्या व सर्व क्षेत्रांच्या सार्वजनिक जीवनात मिळावे म्हणूनच आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रात मराठीला अग्रपूजा मिळेल. सरकारी कारभारात, न्यायालयात, विद्यापीठात, कायदेमंडळात मराठीचे राज्य चालेल.” असे म्हणत त्यांनी संयुक्त महाराष्ट्रात मराठी भाषेला अग्रगण्य स्थान मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.

त्यांचे 3 मे 1978 रोजी निधन झाले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here