एस.एम. जोशी यांच्या नावे संकेतस्थळ (VMF’s website released to cover S M Joshi’s life and work)

0
225

प्रख्यात समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या नावाचे संकेतस्थळ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि गिरीश घाटे यांनी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’साठी पुण्यामध्ये एका बैठकीत खुले केले. त्यामुळे एस.एम. जोशी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचारकार्य जगभरच्या लोकांना एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. एस.एम. यांचे संकेतस्थळ हा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘महाभूषण’ प्रकल्पाचा एक भाग आहे. यापूर्वी साने गुरूजी आणि रामानंद तीर्थ यांची संकेतस्थळे तयार केली आहेत. अनेक संकेतस्थळे निर्माण करून ती सार्वजनिक रीत्या लोकांना दृश्यमान होतील अशी सायबरस्पेसमध्ये ठेवण्याचा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चा संकल्प आहे. ताबडतोब उपलब्ध व्हावीत अशा दृष्टीने शंतनुराव किर्लोस्कर, लक्ष्मणशास्त्री जोशी, बा.सी. मर्ढेकर यांच्या संकेतस्थळांची तयारी सुरू आहे. 

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या या प्रकल्पाचे वैशिष्टय असे, की ज्या महनीय व्यक्तींचा जन्म 1900 ते 1930 च्या दरम्यान झाला आणि ज्यांची जन्मशताब्दी सार्वजनिक रीत्या 2000 सालापासून साजरी केली जात आहे अशांची चरित्रे व त्यांचे जीवनकार्य लोकांना सहजी उपलब्ध होईल. फाउंडेशनने तशा सुमारे तीनशे व्यक्तींच्या नावांची यादी तयार केली आहे. याखेरीज साने गुरूजी, विनोबा भावे, व्ही शांताराम यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या इतिहासातील महनीय व्यक्तींची परिपूर्ण संकेतस्थळे तयार करण्याचा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चा बेत आहे. तसेच, ज्यांची संकेतस्थळे आधीच अन्यांकडून बनवली गेली आहेत. त्यांच्या बाह्यकडी (लिंक) देण्याची योजना ‘महाभूषण’ प्रकल्पात आहे. त्यांच्यावर लेखन करण्यासाठी इच्छुक मंडळींचा शोध चालू आहे. पुण्यातील बैठक हा त्या दृष्टीने एक प्रयत्न होता.

बैठकीस आरंभ करताना एसएम यांच्या जीवनकार्यातील टप्पे संकेतस्थळावर दाखवून गिरीश घाटे यांनी सांगितले, की संयुक्त महाराष्ट्र 1960 साली मोठ्या आंदोलनातून निर्माण झाला. त्यापूर्वी महाराष्ट्राचे विशेषत: मराठवाडा व विदर्भ हे भाग अनुक्रमे निझाम व मध्यप्रदेश या प्रशासनाखाली होते. त्यामुळे त्यांचे इतिहास वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ते सारे प्रदेश भाषिक एकात्मतेने एकत्र जोडले गेले व समरसही झाले. त्यांचा सर्वांचा मिळून इतिहास या ‘महाभूषण’ संकेतस्थळ प्रकल्पामधून व्यक्त होणार आहे.

दिनकर गांगल यांनी संचितावर जास्त भर दिला. ते म्हणाले, की 1900 ते 1930 च्या दरम्यान जन्माला आलेल्या मोठ्या लोकांनी गेले शतक आणि या शतकाची पंचवीस वर्षे हा काळ घडवला आहे. पुल, गदिमा आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी 2018 साली साजऱ्या झाल्या. तेव्हा ध्यानी असे आले, की आधुनिक महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक घडण घडवणारे जे महावीर होऊन गेले, त्यांच्यातील सर्वपरिचित अशी ही त्रयी असली तरी तो इतिहास घडवणाऱ्या कर्तबगार व्यक्ती अनेक आहेत. त्या सर्वांची नोंद संकेतस्थळांतून होत गेली तर आपोआपच आधुनिक महाराष्ट्राचा ऐतिहासिक पट लोकांसमोर खुला होऊ शकतो. त्यातही गंमत अशी आहे, की हे शताब्दीवीर त्यांच्या आधीच्या पिढ्यांच्या कर्तृत्वामधून घडलेले आहेत. त्या आधीच्या पिढ्या म्हणजे एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनकाळ !

बैठकीस वेगवेगळ्या क्षेत्रांतील लेखक, अभ्यासक उपस्थित होते. त्यांनी जवळ जवळ एकमुखाने प्रकल्पाची प्रशंसा केली, यादीत गळलेली नावे सुचवली. काही अभ्यासकांनी संकेतस्थळांसाठी लेखन करण्याची तयारी दर्शवली.

बैठकीस उपस्थित लेखक अभ्यासकांमध्ये शर्मिष्ठा खेर, मेधा सिधये, संगीता बर्वे, वैशाली कार्लेकर, सतीश जकातदार, स्वाती महाळंक, दिलीप फलटणकर अशा मान्यवरांचा समावेश होता.

– नितेश शिंदे 9892611767 info@thinkmaharashtra.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here