Home अवांतर छंद शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ

शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ

शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. त्यांचा जन्म इसवी सनपूर्व 507/8 ला केरळातील कालडी या गावी झाला. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. त्यांचे वडील वयाच्या तिसऱ्या वर्षी वारले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांनी भारतभ्रमण पायी करून, ठिकठिकाणी वादचर्चा घडवून आणून वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. गोविंदपाद यति हे शंकराचार्यांचे गुरू. ते पतंजलीचा अवतार होते अशी धारणा आहे. त्यांची गुरू परंपरा शुकमुनी-गौडपादाचार्य-गोविंदपाद यति-शंकराचार्य अशी आहे. ते नर्मदाकिनारी ओंकारेश्वर येथे अनंतकाळ समाधी अवस्थेत शंकराचार्यांची वाट पाहत होते. ते शंकराचार्य यांची दीक्षा झाल्यानंतर समाधिस्थ झाले.

आचार्यांचे भाष्य ग्रंथ ही त्यांची सर्वश्रेष्ठ निर्मिती होय. तरीही त्यांच्या ग्रंथांचे अध्ययन फार थोडे करू शकतात. आचार्यांनी ‘प्रकरण ग्रंथां’ची निर्मिती वेदांताचे सर्वश्रेष्ठ ज्ञान देण्यासाठी केली. त्या प्रत्येक ग्रंथाची रचना साधारणपणे – 1. वेदांताची कल्पना व्याख्यारूपात देणे, 2. वेदांत थोडक्यात स्पष्ट करणे, 3. सूक्ष्म विषयांची उकल करणे अशा प्रकारची आहे. त्यांपैकीच एक ग्रंथ ‘विवेकचूडामणि’ हा. त्यात पाचशेऐंशी श्लोक आहेत. तो वेदांत तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. त्यात ‘साधन चतुष्टया’पासून ‘मुक्ती’पर्यंतचा मार्ग विवरण केलेला आहे. त्यातील भाषा (कालानुरूप) सुलभ आहे. त्या ग्रंथाची वैशिष्ट्ये छंदबद्ध रचना, गेयता, सुलभ व्याकरण ही आहेत. शिक्षक जसा एखादा विषय, मूळ मुद्दा सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या गळी पाठ, सारांश, स्वाध्याय, उजळणी यांच्या आधारे व वारंवार ठसवतो. त्याच पद्धतीचा वापर आचार्यांनी ‘विवेकचूडामणि’ हा ग्रंथ लिहिताना केला आहे. त्याची रचना मुमुक्षू (मोक्षाची इच्छा असणारा) डोळ्यांसमोर ठेवून केलेली आहे. त्यामुळे एकच विषय वेगवेगळ्या पद्धतींनी तेथे मांडला आहे. उद्देश हाच, की मनुष्यमुक्तीची भव्य इमारत मजबूत पायांवर उभी असावी; ती अक्षर ठरावी.

‘विवेकचूडामणि’ या ग्रंथाच्या सुरुवातीस पाटी कोरी असलेला विद्यार्थी दिसतो, तर तो विद्यार्थी ग्रंथ संपत असताना त्यास समाधी अवस्था प्राप्त होऊन ‘मुक्त’ झालेला असतो ! आचार्यांनी सर्वसाधारण जीवास समजून घेण्यासाठी अकरा विभाग पाडले आहेत- 1. नरदेहाचे दुर्लभत्व, 2. अधिकारी साधक, 3. साधन चतुष्टय, 4. बद्ध निरूपण, 5. आत्मा म्हणजे काय?, 6. ब्रह्म म्हणजे काय?, 7. तत्त्वमसी महावाक्य विचार, 8. समाधी निरूपण, 9. नानात्व बोध, 10. जीवन्मुक्ताची लक्षणे, 11. मुक्ती !

‘विवेकचूडामणि’ या ग्रंथात विवेक हा शब्द कोठल्याही लौकिक अर्थाने येत नाही. तेथे विवेक आत्मानात्म, सत्यासत्य, नित्यानित्य यांतील भेद समजणारा म्हणून अभिप्रेत आहे आणि चूडामणी म्हणजे मुकुटमणी – विवेकाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार ! तसा विवेक साधल्यावर मनुष्य आध्यात्मिकतेकडे स्वाभाविक वळतो.

ग्रंथाची सुरुवात शिष्याच्या प्रश्नाने होते. उत्तरात गुरू सांगतात, की मन जीवास भ्रमित करते. म्हणून मनाची शुद्धी साधावी. जीव अज्ञानामुळे संसारात भटकतो. अविद्येद्वारे जो जीवभाव उत्पन्न होतो, तो सम्यक ज्ञानामुळे दूर होऊन आत्मस्वरूप कळते. श्रुतीद्वारे पंचकोश हे अनात्म असा विवेक केल्यावर उरते केवळ आत्मचैतन्य. हा आत्मा जागृती-स्वप्न-सुषुप्ती या अवस्थांचा साक्षी असून, तो विकाररहित निरंजन आहे. मी म्हणजेच आत्मा ह्याची अनुभूती केवळ साधनेद्वारे शक्य आहे असे गुरू सांगतात.

गुरू शिष्यास वारंवार तू ब्रह्म आहेस असे सांगून त्याच्या मनावर “ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि” हा मुद्दा ठसवतात. तो ह्या ग्रंथाचा सर्वोच्च बिंदू आहे. अनात्माच्या ठिकाणी ‘मी व माझे’ अशी बुद्धी हा अध्यास (जे मुळात नाही तसे दिसणे – भ्रम) आहे. साधकाने स्वात्म निष्ठेने (आत्मप्रतिती) म्हणजेच ब्रह्मात्मैक विज्ञानाने ह्या अध्यासाचे निराकरण करावे. सर्व काही मी स्वतः आहे हा भावच बंधनातून बाहेर पडण्याचा उत्तम उपाय आहे. गुरू पुढे सांगतात, ती स्थिती आत्मरत झाल्यावरच प्राप्त होऊ शकते. असा जीवन्मुक्त जीवात्मा ब्रह्म व सृष्टी यांत भेद करत नाही. तो स्थितप्रज्ञ असतो. त्याचे बाह्य वर्तन इतरांसारखे असते. ते त्याचे प्रारब्ध असते. परंतु संचित कर्में ‘मी ब्रह्म’ (अद्वैत) ह्या ज्ञानाने नाश पावतात. केवळ ब्रह्म आहे, भेदरूपी संसार नाही असे श्रुती वचन आहे. ‘नेह नानास्ति किंचन’ हाच विचार शिष्याच्या मनावर ठसवला आहे. पुढे गुरू मोक्षाची व्याख्या सांगतात “जीव व सकल जगत हे ब्रह्मच आहे आणि त्यात अखंड स्थित असणे हाच मोक्ष होय.”

त्यानंतर शिष्यात झालेले स्थित्यंतर पाहा- (शिष्याने) एकाग्र मनाने ऐकले. गुरुउपदेश, श्रुतिप्रमाण व तर्क यांनी तो (शिष्य) एकमेव आत्मतत्त्वावर ध्यानपरायण होऊन आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ व समाधिनिष्ठ झाला. समाधी उतरल्यावर गुरूला त्या पदी पोचवल्याबद्दल वारंवार वंदन करत कृतज्ञता व्यक्त करतो आणि निघून जातो. गुरूही पृथ्विभ्रमणास जातात. ह्या ठिकाणी ग्रंथ संपतो.

आत्मा हाच परमात्मा. जीव-शिव ऐक्य किंवा अद्वैत ह्याचा सर्वसामान्य जीवास बोधच नव्हे तर प्राप्ती करून देणारा नकाशा म्हणजे ‘विवेकचूडामणि’ होय.

– विनय देशपांडे (खंडाळकर) 9325066915 deshpandevinay02@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. असामान्य ग्रंथाचा थोडक्यात आशय मांडणारा उत्तम लेख!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version