Home वैभव ग्रामदेवता लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर

लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर

लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आनंदेश्वर शिव मंदिरासाठी. लासूर गाव दर्यापूर-अकोला मार्गावर आहे. मंदिरापर्यंत जाण्यास सिमेंटचा रस्ता सुस्थितीतील आहे. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे.

मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यास, नजर जरा सभोवताली डोकावून फिरवली, की सगळीकडे हिरवेगार दृश्य दिसते ! झाडे आणि खाली पसरलेले कुरण- त्यात चरत असलेल्या गायी आणि वर पसरलेले, मळभ दाटून आलेले आभाळ. फार छान देखावा !

मंदिराचे लोखंडी फाटक ओलांडून आत आवारात गेले, की उजव्या हाताला आहे पिंपळ ! मस्त पसरलेल्या हिरवागारवाऱ्यावर मनसोक्त झुलणारा… झाडाभोवती पार बांधलेला.. पाराशी निवांत बसलेली गावातील एक-दोन जुनी खोडे… अंगात बंडी-धोतर, सोबत पाण्याची जुनाट बाटली आणि काठी… डोक्यात असंख्य विचार.. विचारांची मालिका तोडत कोणी पाहुणा बोलला तर मात्र त्यांच्या गावरान भाषेत संवाद साधणारी !

मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्याचा मेळ कोणार्कच्या सूर्यमंदिराशी जाणवतो. मंदिर फारच सुंदर दिसते ! दगडी पायऱ्या चढून वर गेल्यावर आत प्रशस्त सभामंडप आहे. विशेष म्हणजे त्या मंदिराला कळस नाही, गोलाकार छताचा भाग संपूर्ण मोकळा. त्या छतातून दिसणारे निळे आकाश आणि तेथे चालणारा उनसावल्यांचा खेळ- सगळेच अचंबित करणारे. या न बांधलेल्या छताबद्दल आख्यायिका अशी आहे, की ते मंदिर दैत्यांनी एका रात्रीत बांधले, दैत्य सकाळ होताच पळून गेले, छताचा भाग बांधण्याचा राहून गेला !

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर ज्या दगडी शिळांनी बांधले आहे, त्या प्रकारचा दगड आसपासच्या जवळपास दोनशे किलोमीटर परिघात सापडत नाही. त्यामुळे एवढे प्रचंड दगड त्या परिसरात आणले कसे? तो संशोधनाचाच विषय आहे ! मंदिर हे सभामंडपातील बारा खांब आणि भिंतीतील सहा अशा एकूण अठरा दगडी खांबांनी तोलून धरले आहे. प्रत्येक खांब खूप सुंदर, कोरीव काम असलेला, भिंतींवर- अगदी छतावरदेखील नक्षीकाम कोरलेले आहे ! छिन्नी-हातोड्यासारख्या आयुधांनी अशी सुंदर शिल्पे कोरणे म्हणजे खरेच कमाल ! मंदिर त्रिदल आहे, म्हणजे तीन गाभाऱ्यांनी बनलेले, प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूंना दोन उपगाभारे व समोर एक मुख्य गाभारा. डावीकडील गाभाऱ्यात मंदिर परिसरात सापडलेल्या काही मूर्ती ठेवल्या आहेत तर उजवीकडील गाभाऱ्यात एक विहीर होती असे म्हणतात. तेथून तळघरात जाण्यासाठी छुपा रस्ता होता. ती विहीर बुजवलेली दिसते. तसेच तो गाभारा कुलूपबंद आहे.

दोन यक्षमूर्ती बाहेर दाराशी डाव्या-उजव्या बाजूंला आहेत. त्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी दिसतात. शिवलिंग प्राचीन आहे. बेलपत्री आणि फुले वाहिलेली काळीशार पिंड मोठी सुरेख दिसते !

मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यास रुंद दगडी चौथरा आहे. खाली उतरून देखील प्रदक्षिणा मारता येते, त्यासाठी सिमेंटची पाऊलवाट बनवली आहे, ती अलिकडे बनवली असावी. मंदिराची सुबकता बाहेरूनदेखील ठायी ठायी जाणवते, विशिष्ट रचनेत मांडलेले दगड लक्ष वेधून घेतात. कोरीव काम बाहेरच्या बाजूनेसुद्धा आहे. पाना-फुलांची नक्षी, कोरलेले गायक-नर्तक-वादक यांच्यासोबतच नरसिंह अवतार आणि कृष्णासह गोपिका यांच्या मूर्ती मोहक दिसतात. काही नक्षीकाम काळाच्या ओघात भंगलेले आढळते. वरून बघितल्यास मंदिर स्वस्तिकाच्या आकाराचे आहे असे दिसते. एका प्रचंड रथाला हत्ती जोडलाय असादेखील भास होतो.

असे म्हणतात, की हे संपूर्ण मंदिर बऱ्याच वर्षांअगोदर जमिनीच्या आत गडप होते. हळूहळू मंदिराचा छताकडील भाग वर येऊ लागला. गावकऱ्यांनी जमिनीतून हे विहिरीसारखे वर काय येते याचा शोध घेतला, हकिगत ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी खोदकाम केले, उत्खननात हे लक्षवेधी मंदिर बाहेर आले ! मंदिराची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली आहे, गरज पडेल तेथे सिमेंट लावून दगड सांधण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभागाने ती जबाबदारी नीट पार पाडली हे दिसून येते.

मंदिराच्या आवारात लोकांना बसण्यासाठी लोखंडी बेंचेस आहेत. मंदिराचा परिसरदेखील स्वछ आहे. मंदिरात ना दानपेटी आहे, ना देणगी देण्यासाठी पावती फाडण्याची व्यवस्था. पण मंदिराचे एकूण कामकाज सुरळीत चाललेले दिसते. हे मंदिर एक संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्त्व स्मारकासंबंधीच्या 1958 च्या अधिनियमानुसार घोषित करण्यात आले आहे. तसा सूचनावजा फलक फाटकाबाहेर लावण्यात आला आहे. या परिसरात फोटो तर इतके सुंदर येतात की अकोल्याच्या एका साडीच्या ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीसाठी तेथे फोटोशूटदेखील केले आहे.

विनया मगरे-सहस्त्रबुद्धे vinaya.magare@gmail.com

——————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. प्राचीन भारतीय संस्कृती -आदर्श स्थापत्यकला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version