अण्णासाहेब किर्लोस्कर यांना लाभलेले एक ज्येष्ठ गायक नट म्हणजे बाळकोबा नाटेकर. ते पदांना सानुकूल चाली लावण्यासाठी प्रसिद्ध होते. साक्या-दिंड्यांना वेगवेगळ्या चाली लावण्याचा पहिला मान बाळकोबा यांचा होता. तल्लख स्मरणशक्ती आणि विलक्षण ग्रहणशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये होती…
बाळकोबा नाटेकर यांचे पूर्ण नाव बाळकृष्ण नारायण नाटेकर. नाटेकर हे ‘संगीत शाकुंतल’मध्ये कण्वाची भूमिका करत. बाळकोबा यांचा आवाज गोड होता. ते ‘शाकुंतल’मध्ये कण्वाच्या भूमिकेत त्यांच्या मधुर गायनाने मूर्तिमंत करुणरस निर्माण करत. ते नाटक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे. बाळकोबा सतारवादनही करत. बाळकोबा यांनी प्रसिद्ध सतारवादक अमीरखाँ यांचा सतारवादनाचा गंडा बांधला होता. ती दीक्षा त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळी ग्वाल्हेरला गेली असताना घेतली. त्यांची बालवयातील माहिती फारशी उपलब्ध नाही. बाळकोबांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी लिहिण्यावाचण्यापुरते झाले होते असे म्हणतात.
बाळकोबा यांना त्यांच्या वडिलांनी संगीत शिक्षण दिले होते. ते गायनाच्या मैफिलीही ऐकत असत. ते थोड्या शास्त्रीय संगीताबरोबर लावण्या आणि ठुंबर्या हे प्रकारही चांगले गात असत. बाळकोबा ‘सौभद्र’मध्ये नारद आणि कृष्ण, ‘रामराज्य वियोगा’त शंबूक आणि वसिष्ठ, ‘विक्रमोर्वशीय’मध्ये चित्रसेन गंधर्व आणि नारद अशा अन्य भूमिका करत असत; तसेच, ते ‘शाकुंतल’मध्ये कण्वाच्या भूमिकेखेरीज पारिपार्श्वक, सारथी, सेनापती, कंचुकी, मातली या भूमिकाही वठवत असत. बाळकोबा पदांना सानुकूल चाली लावण्यासाठी प्रसिद्ध होते. साक्या-दिंड्यांना वेगवेगळ्या चाली लावण्याचा पहिला मान बाळकोबा यांचा होता. ते ‘सौभद्र’मध्ये नारदाच्या भूमिकेत गळ्यात सतार घालून येत आणि ‘राधाधर मधुमिलिंद जयजय’ हे भक्तिरसपूर्ण गीत परिणामकारक रीतीने म्हणत. किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार भाऊराव कोल्हटकर बाळकोबा यांना श्रवणगुरू मानत. बाळकोबा फक्त किर्लोस्कर नाटक मंडळींत राहिले. ते पगाराबाबत तेढ निर्माण झाल्याने किर्लोस्कर नाटक मंडळीमधून बाहेर पडले, मात्र इतर नाटक मंडळींत गेले नाहीत. ते पुण्याला एका शाळेत गायन, सतार वादन शिकवत; खाजगी मैफिलीही करत.
बाळकोबा काही दिवस भांडण किंवा मतभेद झाल्यामुळे किर्लोस्कर नाटक मंडळीमधून निघून गेले होते. त्यावेळी त्यांना काहीही करून परत बोलवावे, अशा सूचना करणारी पत्रे लोकांनी किर्लोस्कर नाटक मंडळीकडे पाठवली. तसेच, तशा जाहीर सूचना वर्तमानपत्रांतूनही प्रसिद्ध झाल्या होत्या. बाळकोबा किर्लोस्कर नाटक मंडळीतून निवृत्त त्यांच्या नाकात काही विकार उद्भवल्याने 1893 साली झाले. त्यांचे निधन 13 जानेवारी 1910 रोजी झाले.
– मेधा सिधये 9588437190
———————————————————————————————————————————