‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. आनंद यादव यांनी ग्रामीण क्षेत्राच्या मखमली हिरव्या जगाआड दडलेल्या काट्यांचे भान मराठी साहित्यातून प्रथम जाणवून दिले. इंद्रजित भालेराव यांनी तोच काट्याकुट्यांचा रस्ता तुडवला, पण त्याबरोबर गावाकडे येण्याचे आवाहन केले, सुरेश शिंदे यांनी ‘काटेवन’मधून ग्रामीण कवितेची पायाभरणी भक्कम केली. पण त्या काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे.
जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या खेड्याचे भीषण वास्तव संग्रहातील पहिल्याच कवितेत वाचकांना भयचकित करते. कवी त्या ‘वावटळी’चे वर्णन फार भेदक करतो – वाशासह छताला उडवणारी, गोपाळांना सैरभैर करणारी आणि गणगोत, शेत-शिवार, घरदार घेऊन जाणारी (पान 19). ती ‘वावटळ’ कवीचे जगणे हिरावून घेत आहे. त्यामुळे त्याची स्वप्ने विरून जातात आणि त्याच्या लक्षात आयुष्याच्या ‘सांजेला’ धावण्यातील फोलपण येते. ती स्वप्नेदेखील साधी सावल्यात रमण्याची, पावसात भिजण्याची, आलेल्या वाटे संगे बोलण्याची असतात ! कवी त्या पडझडीनंतर ‘आयुष्य’ नव्याने (पान 69) जगू पाहतो. विठ्ठलाची, रानाची ‘सोबत घेऊन’ (पान 84), तो भक्तीत दंग होतो आणि पुढील ‘दिव्य प्रवासा’साठी सज्ज होतो. त्याची कविता समस्यांचा अंत मृत्यूपल्याड होणार आहे याचे अप्रत्यक्ष सूचन करते. ग्रामीण समाजजीवन विदारक, विस्फोटक आणि तरीही गलितगात्र आहे. वाचक ग्रामीण वास्तवाच्या त्या दर्शनाने सुन्न होतो.
काव्यसंग्रहाच्या मध्यवर्ती भोळा भाबडा शेतकरी आहे. तो स्वतःच्या कामात ईश्वर शोधणारा, स्वतःच्या गाईगुरांशी, सोयऱ्या-धायऱ्यांशीच काय पण स्वतःच्या निर्जीव अवजारांशीदेखील एकरूप झालेला आहे. त्याला बैलांचा अभिमान आहे. तो बैलांना त्याच्या कुटुंबाचा घटक मानतो. म्हणूनच ते म्हातारे झाले तरी त्यांना कसायाच्या दावणीला बांधण्याची त्याची इच्छा होत नाही. त्याचे स्वतःच्या शेती-मातीवर प्रेम मनापासून आहे. त्याचे मन रानाच्या सहवासात पुलकित होते. त्याची ती आनंदयात्रा आहे. रानाच्या सहवासात त्याचे मन पुलकित होते. त्याची ती आनंदयात्रा रेखाटताना कवी लिहितो –
‘असा हरखतो बाप जातो पहाटेच रानात | औता संगे गातो अभंग सुरात ।
अशी किमया औताची बापालाच माहित | गेला रानात की औत चालवितो आनंदात ||’ (औत, पृष्ठ 23)
बाच्या भाबडेपणात पाऊसही दंग व्हायचा. बा रानात रमायचा. मोर बाच्या पिकात नांदायचा आणि अवघ्या शिवारात चांदण्या गोंदायचा. माय पावसात कुडकुडणाऱ्या बापाच्या काळजीने कावरीबावरी व्हायची आणि –
‘घेऊनी कुंकवाचा धनी माई रमते रानात
जीव ओवाळून टाकते पिकातल्या पानापानात’ (आभाळ/पृष्ठ 38)
माती, पाणी आणि आईबाप यांचे केवढे हे अभिन्नत्व ! गंधारे ते अभिन्नत्व उलगडून दाखवतात. संग्रहात गावाकडील काही आल्हाददायक आठवणी आल्या आहेत. कोंबडा आरवला की उठणारी, रहाटाचे पाणी ओढून सडा टाकणारी माय, गोठ्यात गाईची धार काढणारे दादा, सरपणावर फुंकर घालून शिजवलेली खरपूस न्याहारी आणि जनावरांना कडबा टाकत चंचीचे तोंड सोडणारे दादा असे एका आदर्श कृषी संस्कृतीचे चित्र कवीने वाचकांपुढे उभे केले आहे (पृष्ठ 40). कवी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत सूर मारतो, पोळ्याला नदीवर बैल धुतो. वाचकही कविमित्रांच्या घोळक्यात सामील होतो आणि-
‘नदी आता एक महिनासुद्धा वाहत नाही सरणाशिवाय नदीत कोणीसुद्धा दिसत नाही |’ (नदी /पृष्ठ 42)
या वस्तुस्थितीने खंतावून जातात. कविता साध्यासोप्या भाषेत प्रकट होते, तरी तिच्यात प्रतिमा व प्रतीके यांची अलवार आहे.
कवी द.के. गंधारे हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्याच्या राजूर येथील अॅड. एम.एन. देशमुख महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांचे एम ए, पीएच डी असे शिक्षण झाले आहे. त्यांनी महात्मा फुले यांचा शिक्षणविचार या विषयात पीएच डी प्राप्त केली आहे. त्यांनी अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग परिसरातील आदिवासी लोकगीते या विषयावर लघु संशोधन केले आहे. त्यांना महात्मा फुले पुरस्कार, कवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार असे काही पुरस्कार लाभले आहेत.
त्यांचे साहित्याचा अभ्यास, शेतकऱ्यांची हाक, संतांची कथाकविता, लोकसाहित्य – कला आणि संस्कृती, समीक्षेचा अक्षरगंध, शिक्षण सद्यस्थिती व भावी दिशा अशी विविधांगी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा वावटळ हा कवितासंग्रह पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने 2019 मध्ये प्रसिद्ध केला. ते शेतकरी परिवारातील असल्याने एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात. त्यांचे आई-वडील, पत्नी वैशाली मुले असा परिवार आहे. त्यांची मुलगी प्रज्ञा आय टी क्षेत्रात नोकरी करते. मुलगा प्रतीक रशियाला एम बी बी एस चे शिक्षण घेत आहे.
– कार्तिकी विजय नांगरे 7719804448 kartikinangare101@gmail.com
———————————————————————————————-