‘वसंतदादा’ या स्मृतिग्रंथातील एकतीस लेख राजकारणी दादांमधील ‘माणूसपण’ दाखवणारे आहेत. त्यांच्यातील ‘जिंदादिल माणूस’ टिपणाऱ्या लेखांमधील अनेक प्रसंग वाचताना डोळे पाणावतात. महाराष्ट्रातील 2020 च्या दशकातील राजकारण आणि राजकारणी पाहता त्यांतील काही प्रसंग तर चमत्कार वाटावेत… दंतकथा वाटावेत असेच भासतात…
वसंतराव बंडूजी ऊर्फ वसंतदादा पाटील यांचा स्मृतिग्रंथ ‘वसंतदादा’ हा प्रकाशित झाला आहे. ग्रंथात एकतीस लेख आहेत. या ग्रंथाचे संपादन दशरथ पारेकर यांनी केले असले तरी मुखपृष्ठावर आणि आतील पानावर त्यांचा उल्लेख या ग्रंथाचे लेखक असल्यासारखा कसा हे कळत नाही. एकतीस लेखांपैकी अशोक चौसाळकर, भारती पाटील, विजय नाईक, कुमार सप्तर्षी यांचे लेख वसंतदादांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि राजकारणावर भाष्य करणारे आहेत; तर विनायकदादा पाटील, अरुण चव्हाण, मोहन पाटील, यशवंत हाप्पे, यशवंतराव गडाख, उल्हास पवार, सतीशचंद्र नलावडे, राम देशपांडे यांचे लेख राजकारणी दादांमधील ‘माणूसपण’ दाखवणारे आहेत. त्यांच्यातील ‘जिंदादिल माणूस’ टिपणाऱ्या लेखांमधील अनेक प्रसंग वाचताना डोळे पाणावतात. महाराष्ट्रातील 2020 च्या दशकातील राजकारण आणि राजकारणी पाहता त्यांतील काही प्रसंग तर चमत्कार वाटावेत… दंतकथा वाटावेत असेच भासतात.
त्यांना भेटण्यास येणाऱ्यांची रीघ मंत्रालयात लागलेली असे. त्यांना जेवण्यासही वेळ मिळत नसे. एक प्रसंग आहे. ग.प्र. प्रधान यांना केबिनमध्ये बसलेले मुख्यमंत्री पाटील सांगतात, “प्रधान थोडे इथंच थांबा. भाकरी खाऊन घेतो. जेवायला वेळच झाला नाही.” प्रधान म्हणतात, “तुम्ही सावकाश जेवा. मी तासाभराने येतो.” त्यावर दादा प्रधान यांना म्हणतात, “तुम्ही इथंच बसा, म्हणजे दुसरं कुणी आत येणार नाही.” ‘भाकरी खाऊन घेतो’ अशी ग्रामीण शब्दकळा वापरणारे आणि तसे करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात होऊन गेले, हे पटेल का?
त्यांनी त्यांच्या अंगातील शर्ट मंत्रालयात मुख्यमंत्र्याच्या आसनावर बसून काम करत असताना समोर आलेल्या, अंगात शर्ट नसलेल्या खेडुताला घालण्यास दिला व शिपायाला घरून त्यांच्यासाठी दुसरा कुडता आणण्यास पाठवले. दादा पुढील एक तासभर, शिपाई कुडता घेऊन येईपर्यंत अंगात बंडीवर राहूनच मंत्रालयात काम करत होते ! असा मुख्यमंत्री पटेल कोणाला? दादा बंडी आणि धोतर अशाच वेशात बऱ्याचदा असत. त्यांचा बंडीचा खिसा बऱ्याचदा नोटांनी भरलेला असे. भेटण्यास आलेल्या खेडुताला, गरजूला आश्वस्त करत निरोप देताना त्यांचा हात बंडीच्या खिशात जाई. ते त्यांच्या हाताला लागतील तेवढ्या नोटा समोरच्याच्या हातावर ठेवत. असे प्रसंग अनुभवलेली खूप माणसे. त्यांचे लिहिलेले अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
मला मी सांगलीचा राहणारा असल्याने वसंतदादांना पाहण्याचा योग अनेकदा आलेला आहे, पण जवळून अनुभवण्याची संधी लाभली नव्हती. त्यांना अगदी हाताच्या अंतरावरून एकदाच पाहता आले – सरदार भगतसिंग यांचे भाऊ सरदार कुलतारसिंग सांगलीत आले होते, तेव्हा सांगली नगरपालिकेच्या वतीने कुलतारसिंग यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता, त्या समारंभाचे अध्यक्ष होते वसंतदादा. मी त्यावेळी आठवीत शिकत होतो. त्या समारंभात मला माझ्या वाचनवेडासाठी सरदार कुलतारसिंग यांच्या हस्ते गुलाबाचे फूल देण्यात आले होते. तेव्हा मला दादा अगदी हाताच्या अंतरावरून दिसले होते. पुस्तकातील अनेक लेख वाचताना त्यांना जवळून अनुभवल्याचा अपार आनंद मिळाला.
वसंतदादांवरील बहुतेक सर्व लेखन वाचताना त्या सगळ्यातून दिसतात ते राजकारणापलीकडे जात माणसे जपणारे… सांभाळणारे दादा. त्यांची तशी प्रतिमा या ग्रंथामधील अनेक लेखांमुळे वाचकांच्या मनात अधिक ठसते; एक संवेदनशील मनाचा, वत्सल असा सुसंस्कृत राजकारणी डोळ्यांसमोर उभा राहतो. नंतर बकाल होत गेलेल्या राजकीय वातावरणात तर ती प्रतिमा मनात अधिकच कोरली जाते. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते.
हा स्मृतिग्रंथ आशयदृष्ट्या समृद्ध असला तरी यातूनही काही राहून गेले आहे. ग्रंथाचे संपादन… जर केले असेल तर ते अधिक सजगपणे होण्यास हवे होते असे राहून राहून वाटते. वसंतदादा पाटील यांचा जीवनपट या ग्रंथात अखेरीस दिला आहे. त्या एकाच ठिकाणी दादांचे जन्मस्थळ अचूक नोंदले गेले आहे. इतर ठिकाणी जन्मस्थळाची नोंद चुकीची झाली आहे. ‘देशभक्त, असाही’ या लेखात एक परिच्छेद आहे. “…ब्रिटिशांना दिलेल्या पाठिंब्यातून भारताचा हेतू साध्य न झाल्यामुळे तो झोपेतून जागा झाला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सिद्ध झाला. या जागृतीतूनच कॅनडात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ‘गद्दार पार्टी’चा जन्म झाला.” (पृष्ठ 187) हे वाक्य वाचले तर लाला हरदयाळ त्यांना ‘गद्दार’ ठरवल्याचे वाचून स्वर्गातही आत्महत्या करतील ! एका माजी मंत्र्यांनी त्यांच्या लेखात लिहिलेले हे वाक्य. ते संपादकांनाही योग्य वाटले? की त्यांच्याकडून ते वाचण्याचे राहून गेले?
‘नि:स्वार्थ राजकारणाचा दुर्मीळ आदर्श’ या लेखात (पृष्ठ 211) 17 जुलै 1978 रोजी सांगलीत रात्री उशिरा झालेल्या वसंतदादांच्या सभेचा वृत्तांत आहे. त्यात दादांच्या तोंडी म्हणून काही वाक्ये दिली आहेत. प्रसंग दादांचे मंत्रिमंडळ गडगडल्यानंतरचा… पुलोद सरकार येण्याच्या पार्श्वभूमीवरील असल्याने दादांच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. असे असताना त्यांच्या तोंडी दिलेल्या शब्दांत एक शब्दही इकडेतिकडे झाला तर संदर्भ आणि अर्थ बदलतो. हे संपादकांनी पाहिलेले नसावे. कारण त्या सभेची दादांच्या आवाजातील ध्वनिफीत माझ्या संग्रही आहे. पुस्तकातील लेखात दिलेली वाक्ये जशीच्या तशी नाहीत.
या स्मृतिग्रंथाला प्रस्तावना आहे सदा डुम्बरे यांची, तर मुखपृष्ठ विजय बोधनकर यांचे. प्रस्तावनेतही दादांच्या जन्मस्थळाची चुकीची नोंद आहे. असे स्मृतिग्रंथ हे अभ्यासकांसाठी आधार असतात. म्हणूनच त्यातील नोंदी आणि माहिती अचूक असण्यास हवी. अन्यथा अशा चुकीच्या नोंदी पुरावे म्हणून दाखवत समाजमाध्यमांवर गोंधळ उडवून देणारी व्हॉटस् अॅप विद्यापीठातील जनता तर रोजच अनुभवास येते.
वसंतदादा
दशरथ पारेकर
ग्रंथाली, मुंबई.
पृष्ठे 270 किंमत350 रुपये
– सदानंद कदम 9420791680kadamsadanand@gmail.com
संबंधित लेख-
लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)
आकाशवाणी आणि आंदोलन (How All India Radio Agreed To Marathi Cricket Commentary? Thanks To Vasantdada Patil)
दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !
———————————————————————————————-
परखड शीर्षक, अभ्यासू आणि यथोचित लेखाजोखा. धन्यवाद!
परखडपणा असाच भीडभाड न ठेवणारा असावा…