हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai – A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...
इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले आणि हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai – A Sketch of a Bombay High Caste Young Wife. प्रकाशक होते मार्शल ब्रदर्स. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या. लेखिकेने केवळ ते एक पुस्तक लिहिले असे नाही. त्यांनी उच्चवर्णीय विवाहित, वयाने मोठ्या आणि विधवा यांच्यासाठी एक शाळाही 1890 साली काढली. शाळा सुरू झाली तेव्हा फक्त पाच विद्यार्थिनी दाखल झाल्या होत्या (रोकिया बेगम यांनी शाळा सुरू केली तेव्हाही पहिल्या दिवशी फक्त पाच विद्यर्थिनी होत्या).
निकंबे बाई ज्या पुस्तकामुळे विख्यात झाल्या त्या कथेची नायिका आहे ती अकरा वर्षांची रतनबाई. तिचे लग्न ती नऊ वर्षांची असताना झाले आहे. तिचा नवरा प्रतापराव हा पदवी परीक्षेचा अभ्यास करत आहे. ती ऋतुमती झालेली नसल्याने त्या काळच्या रीतीप्रमाणे माहेरी राहत आहे. तिचे वडील वासुदेवराव हे यशस्वी वकील आहेत. त्यांनी ते आधुनिक विचारांचे असल्याने मुलीला शाळेत घातली आहे. ती तिसरीत आहे आणि मन लावून अभ्यास करत आहे. त्या काळात उच्चवर्णीयांचे आचारविचार स्त्रियांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आड येत होते. ते दाखवणे हा या कादंबरीचा हेतू असल्याने त्या उच्चवर्णीयांचे दैनंदिन जीवन कसे होते ते कादंबरीत दाखवले आहे.
उच्चवर्णीयांच्या आचारांचे वर्णन करताना त्या त्या शब्दांचे इंग्रजीत स्पेलिंग लिहून खाली तळटीप देऊन अर्थ स्पष्ट केला आहे. उदाहरणार्थ धोतर, सासर, माहेर, झिम्मा, फुगडी, बाबा, सारी, बाळ, दादा इत्यादी. त्या कथेत डोहाळजेवण, हळदीकुंकू, श्रावण सोमवार, मंगळागौरीचे व्रत इत्यादी सणांची दैनंदिन आचारांची वर्णनेदेखील येतात.
रतनबाई हिचा नवरा– प्रतापराव शिकत होता आणि तिचे सासरे वारल्यानंतर, घरचा कारभार तिच्या सासऱ्यांचा भाऊ बघत होता. रतनबाईच्या सासूला काही महत्त्व नव्हते. नवऱ्याची चुलती मुलींनी शिक्षण घेण्याच्या विरूद्ध होती. रतन सासरी काही कारणाने राहिली तर तिला शाळेत पाठवले जात नसेच, पण अभ्यासाच्या पुस्तकांना हातही लावू दिला जात नसे. त्यामुळे सासरी गेलेली रतन अतिशय घुसमटून जाई. दिवस असे जात असताना एके दिवशी तिचा चुलता मरण पावतो. तो आजारी असल्याची तार येते. ती घरात कोणाला वाचता येत नाही. उच्चवर्णीयांच्या घरातील हे तत्कालीन वास्तव होते. तार बघून रतनचे वडील त्यांच्या भावाला भेटण्यास म्हणून गेले आणि पाच दिवसांनी परत आले ते केशवपन केलेल्या त्यांच्या विधवा भावजयीला घेऊन ! तसे ते येतात आणि दुःखाने व्याकुळ झालेली असली तरी त्यांची आत्या (तीही विधवाच होती) चुलत सुनेला दूषणे देते, माणसाला गिळणारी हडळ वगैरे म्हणते. ती तिचे अस्तित्व ‘आपला दिनू गेला, ती आता आपली कोणी नाही’ अशा शब्दांत पुसून टाकू बघते.
तो चुलता मेला कसा, तर साथीत. ‘सिंहस्थ आले की साथी येतातच’ या वाक्याने हिंदूंच्या जत्रा आणि यात्रांचे भीषण वास्तव (एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस असलेले) प्रकट होते. पुढे होते असे, की रतनबाईची सासू, तिला सुनेचे शाळेत जाणे तिला पसंत नाही अशी तक्रार रतनबाईच्या आईच्या कानावर जाईल अशी व्यवस्था करते आणि रतनबाईच्या वडिलांची काकू रतनबाईच्या वडिलांना रतनचे शाळेत जाणे बंद करण्यास भाग पाडते. म्हणजे येथेही पुन्हा एकदा स्त्रीची प्रगती खुंटवणारी स्त्रीच असते हे दाखवून दिले जाते.
आता हा निर्णय बदलतो कसा ?
रतनचा एक नातेवाईक (चुलत बहिणीचा नवरा) बी ए परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होतो. त्याचे वडील त्याला म्हणतात, तुला हवी ती भेट माग. तो सांगतो, तुम्ही माझ्या पत्नीची शाळा चालू ठेवलीत तर त्यामुळे मला सर्वात जास्त आनंद होईल. तुम्ही माझ्या आईचे मन वळवा आणि पत्नीची शाळा सुरू करा. त्या मुलीला सोबत म्हणून रतन पुन्हा शाळेत जाऊ लागते. ती परवानगी कशी मिळवली जाते तो प्रसंग फार चित्रमय पद्धतीने मांडला आहे.
ज्या मुलीची शाळा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव येतो तिचे सासरे रतनच्या वडिलांना विनंती करतात, की तुमच्या मुलीला माझ्या सुनेबरोबर शाळेत जाऊ दे. त्यावर रतनचे वडील सांगतात, लग्न झाल्यानंतर मुलगी तिच्या आईवडिलांची नसते. तेव्हा तिच्या सासरची परवानगी घेण्यास हवी. त्यामुळे रतनच्या चुलत बहिणीचे सासरे रतनच्या चुलत सासऱ्याला विचारतात, कारण त्या घराचा कर्ता पुरुष तोच असतो. चुलत सासरा रतनच्या सासुबाईला हाक मारतो तेव्हा ती अर्ध्या बंद दाराआड उभी राहते (कारण परपुरुषासमोर कोणत्याही स्त्रीने–आणि विधवा स्त्रीने तर अजिबात जायचे नाही असा रिवाज). सासू म्हणते मी ‘बाळ’ला (म्हणजे रतनच्या नवऱ्याला) विचारते. तो स्त्रीशिक्षणाच्या बाजूने असतोच. तर असा हा घास हात लांबवून घेतला जातो !
अशा तऱ्हेने, रतन पुन्हा शाळेत जाते. एक शिकवणीही तिच्यासाठी मागील अभ्यास भरून काढण्यासाठी लावली जाते. ती वार्षिक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होते. दुर्दैवाने तिचा नवरा प्रतापराव बी ए च्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतो. लगेच, रतनची शाळा बंद केली जाते. शाळेत तिला बक्षीस समारंभात बक्षीस दिले जाणार असते, त्या समारंभालाही तिला हजर राहू दिले जात नाही. पुरुषी वर्चस्व उफाळून येते. प्रतापराव परीक्षेला पुन्हा सहा महिन्यांनी बसतो. रतनला सांगण्यात येते, की नवरा पास व्हावा अशी प्रार्थना देवाकडे कर. प्रतापराव पास होतो. पेपरात नाव छापून येते तेव्हा ती प्रथमच नवऱ्याचे नाव दोन–तीन वेळा उच्चारते. तोपर्यंत तिने ते उखाण्यातच घेतलेले असते (उच्चवर्णीय विवाहितेचे शब्दचित्र हे असे).
एवढे सारे होऊनही रतनची सासू तिला शाळेत जाऊ न देण्यावर ठाम असते. ती तिला बोलून बोलून हैराण करते. अभ्यासाला हात लावू देत नाही. रतन शाळेत मागे पडू लागते. सासूची मजल येथपर्यंत जाते की ती सुनेला धमकी देते, “तू माळ्याकडे वाईट नजरेने बघत होतीस असे मी प्रतापरावाला सांगेन.” अखेर, एके दिवशी रतनची आई मृत्यू पावते. रतनच्या काकू तिच्या दुसऱ्या विधवा सुनेला पुन्हा दूषणे देतात. सून कंटाळून आत्महत्या करू पाहते. तिला एक सुधारक वाचवतो.
प्रतापराव बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला जातो. मात्र जाताना त्याच्या पत्नीला शाळेत पाठवलेच पाहिजे असे बजावून जातो. त्याच्या पाच वर्षांच्या परदेशी वास्तव्य काळात, त्याची काकी (विधवा) मिशनच्या ‘होम’मध्ये शिक्षण घेऊन शिक्षिका बनते. ती विधवा स्त्रियांवर असलेली पोशाख, केशवपन इत्यादी बंधने झुगारून देते. प्रतापराव परत येतो. रतन पत्नी बनण्याच्या वयात आली आहे. अखेर ती दोघे समारंभपूर्वक पती–पत्नी म्हणून एकत्र येतात. त्या समारंभाचे तपशील रंजक वाटतात. उखाणेवजा ओळी दोघे म्हणतात – “त्यानंतर त्याने तिला आपले पाय कोरडे करू दिले. तिने ते कोरडे केले आणि त्याच्या पावलांवर सुगंधी चूर्ण टाकले. ते टाकताना तिने म्हटले – आला आहे वसंत, पक्षी आहेत गात; प्रतापरावांच्या गुणांनी होईल आनंदाची बरसात !
अशाच काही काव्यपंक्ती प्रतापरावाच्या तोंडीही घातल्या आहेत. समारंभ संपतो, मेजवानी होते आणि अखेर, पतिपत्नी त्यांच्या खोलीत येतात. दोघांनाही एकच पुस्तक प्रिय आहे असा साक्षात्कार दोघांना होतो आणि तेथे कथा संपते.
या कथेची वैशिष्ट्ये नोंदणे जरूरीचे आहे. पहिले म्हणजे ही कथा एका मराठी स्त्रीने, इंग्रजीत लिहिली आणि ती ब्रिटनमध्ये प्रकाशित झाली. दुसरे, उच्चवर्णीयांच्या दैनंदिन जीवनाचा परिचय करून देणे आणि कुतूहल शमवणे किंवा मनोरंजन करणे हा हेतू त्यामागे नव्हता; ती कथा मुलींना शिक्षण देणे आवश्यक आहे हे ठसवणे ह्या हेतूने लिहिली आहे. तिसरे, साधारणपणे, स्त्रियांचे जे दमन एकोणिसाव्या शतकात होत होते त्याला पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत होती आणि अन्याय पुरुष करत असत, पण या कथेत रतन हिला शिक्षण देणारे किंवा देऊ पाहणारे सारे पुरुष होते आणि विरोध केला तो घरातील म्हाताऱ्या आणि अधिकारावर असलेल्या स्त्रियांनी. इतकेच नाही तर स्त्रियांनी केलेल्या विरोधापुढे पुरुषांनीही नांगी टाकलेली दाखवले आहे.
लेखिका शेवंतीबाई यांच्याबद्दल तपशील फार उपलब्ध होत नाहीत. त्यांचा जन्म 1865 साली पुणे येथे झाला. त्या ख्रिस्ती होत्या, परंतु त्यांचे आईवडील कोण याचे तपशील मिळाले नाहीत. निकंबे हे त्यांच्या पतीचे आडनाव. पती माधवराव निकंबे हे रेव्हरंड होते. पंडिता रमाबाई यांचे शारदा सदन पुण्याला स्थानांतरित 1890 साली झाले. त्यापूर्वी शेवंतीबाई यांनी रमाबाईंच्या सहायक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःची शाळा काढली. त्यांचे 1895 साली प्रकाशित झालेले उपरोक्त पुस्तक त्यांनी भक्तिभावाने इंग्लंडच्या महाराणींना अर्पण केले आहे. त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती मुंबईचे गव्हर्नर (कै) हॅरिस यांच्या पत्नी लेडी अडा हॅरिस यांनी. त्यांनी प्रस्तावनेत ‘शेवंतीबाई यांनी सुरू केलेल्या शाळेला मी भेट दिली आणि त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी किती मौल्यवान कार्य करत आहेत हे बघून मला खूप समाधान झाले’ असे म्हटले आहे.
लेखिकेने रतनबाई यांनी कादंबरीत ख्रिस्ती धर्माचा छुपा प्रचार केला आहे असा आक्षेप त्यांच्यावर एका अभ्यासकाने घेतला होता. रतनबाई यांचे काका सिंहस्थानंतर आलेल्या पटकीच्या साथीत दगावले आणि अशा साथी यात्रा व मेळावे यानंतर येतातच ह्या विधानामुळे हिंदूंच्या धार्मिक यात्रांचा अधिक्षेप होतो अशी समजूत टीकाकारांची असावी. तसेच, शाळेच्या प्रमुख बाई मुलींना त्यांच्या घरी चहाफराळ यासाठी बोलावत आणि मुलींच्या हातून सांड–लवंड झाली, काचेचे पेले फुटले तरी बाई चिडल्या नाहीत त्यातूनही ख्रिस्ती धर्मीयांचे श्रेष्ठत्व सूचित करणे आहे, असाही एक तर्क टीकाकारांनी लढवला असेल.
शेवंतीबाई ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ होत्या का? पुस्तक इंग्लंडच्या महाराणींना अर्पण करणे व माजी गव्हर्नरच्या पत्नीची प्रस्तावना घेणे यामुळे तसा तर्क बांधला तर ते स्वाभाविक म्हणता येईल. परंतु त्या काळात लिहिणाऱ्या अनेक लेखकांना ब्रिटिशांचे श्रेष्ठत्व मान्य होते – निदान काही अंशी तरी. त्यामुळे अशी अर्पणपत्रिका हे केवळ निष्ठेचे द्योतक म्हणता येईल असे वाटत नाही. याउलट कथेतील एक प्रसंग असा आहे, की त्यात रतनबाई एक कविता म्हणते, त्या कवितेचे शीर्षक आहे Casablanca. त्या कवितेत ब्रिटिशांच्या सैन्याविरोधात स्वत:ची बोट सांभाळणाऱ्या मुलाची कथा आहे. ती कविता प्रथम 1826 मध्ये प्रकाशित झाली होती व ती एका सत्य घटनेवर आधारित आहे असे समजते. त्यामुळे दोन्ही ग्रह दूर ठेवूनच या कथेचा आस्वाद घेण्यास हवा.
शेवंतीबाई यांनी प्रथम इंग्लंडला भेट दिली, ती (बहुदा) 1895 मध्ये. त्यांनी 1912-13 मध्ये पुन्हा युरोपचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी युरोप खंडातील शिक्षण आणि समाजकार्याच्या पद्धती यांची माहिती करून घेतली. त्यांनी अनेक संस्थांतून मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यांनी विवाहित महिलांसाठी वेगळी शाळा 1912-34 या काळात चालवली.
– रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com
————————————————————————————————————————-
..अदभुत! स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवणारे प्रेरणादायी पुस्तक!
छान माहितीपूर्ण लेख.
तत्कालीन भारतात राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी होती, त्या परिस्थितीत ब्रिटिशांचे साम्राज्य स्वीकारून त्यांना पुस्तक अर्पित होणे, ह्यात वावगे वाटत नाही. मुळात पुस्तक स्त्रियांचे हक्क ह्या सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी लिहिले असे दिसते.
इंग्रज घटनाप्रेमी आणि न्यायप्रविष्ट होते, असे निदान उघडपणे दाखवत. तत्कालीन भारतात सामाजिक पातळीवर उद्धार होण्यात त्यांचाही थोडाफार हातभार आहेच. त्यामुळे उपरोक्त विषयावरील पुस्तक इंग्रज अधिकाऱ्यास अर्पित करणे ह्या भागावर जास्त प्रश्न उपस्थित न करता तत्कालीन उच्च वर्णीय कुटुंबात जर शिक्षण आणि स्त्रियांचे हक्क याबाबत तशी स्थिती असेल तर बहुजनांची स्थिती काय असावी याबाबत अंदाज बांधता येईल, ह्या बाबीकडे पुरेशा अभ्यासक दृष्टिकोनातून पाहता येईल.
छान माहितीपूर्ण लेख.
तत्कालीन भारतात राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी होती, त्या परिस्थितीत ब्रिटिशांचे साम्राज्य स्वीकारून त्यांना पुस्तक अर्पित होणे, ह्यात वावगे वाटत नाही. मुळात पुस्तक स्त्रियांचे हक्क ह्या सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी लिहिले असे दिसते.
इंग्रज घटनाप्रेमी आणि न्यायप्रविष्ट होते, असे निदान उघडपणे दाखवत. तत्कालीन भारतात सामाजिक पातळीवर उद्धार होण्यात त्यांचाही थोडाफार हातभार आहेच. त्यामुळे उपरोक्त विषयावरील पुस्तक इंग्रज अधिकाऱ्यास अर्पित करणे ह्या भागावर जास्त प्रश्न उपस्थित न करता तत्कालीन उच्च वर्णीय कुटुंबात जर शिक्षण आणि स्त्रियांचे हक्क याबाबत तशी स्थिती असेल तर बहुजनांची स्थिती काय असावी याबाबत अंदाज बांधता येईल, ह्या बाबीकडे पुरेशा अभ्यासक दृष्टिकोनातून पाहता येईल.