वि.स. खांडेकर यांचे तरुणांना आवाहन (V.S. Khandekar’s Appeal to the Youth)

वि.स. खांडेकर (भाऊसाहेब) यांनी मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून दिले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 चा आणि त्यांचे निधन झाले 2 सप्टेंबर 1976 रोजी. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यामध्ये कथा, कादंबरी, लघुनिबंध, निबंध, प्रस्तावना यांबरोबरच कवितांचा व नाटकांचाही समावेश आहे. त्यांनी कितीतरी व्यक्तींना प्रोत्साहन देणारी सुरेख पत्रे लिहिली. त्या पत्रांतून ते काहीतरी विचार सांगत असतात. त्यामुळे त्यांची पत्रे ही चिंतनाला पूरक ठरली. त्यांची प्रकृती बरी असली तर ते कार्यक्रमांना जायचे; पण कधी कधी त्यांची प्रकृती ऐनवेळी बिघडल्यामुळे आधी येतो म्हणून त्यांनी दिलेला शब्द पाळणे त्यांना कठीण जात असे. तशा वेळी भाऊसाहेब त्या कार्यक्रमास शुभेच्छा पत्राद्वारे देत. त्यांची निष्ठा या देशात काही बदल घडवू शकेल तर ती युवापिढी यावर होती, त्यांची श्रद्धा तशीच होती. ते त्यांच्या भाषणांतून,संभाषणांतून, पत्रांतून सांगत, की या युवा पिढीसमोर विविध प्रकारची आव्हाने जशी आहेत तशी ती पिढी प्रलोभनांच्या आहारी जाण्याची शक्यताही. ते म्हणायचे, की आजची युवा मंडळी अशी आव्हाने समर्थपणाने पेलू शकेल अशी जबरदस्त इच्छाशक्ती, ताकद त्यांच्याजवळ आहे. त्या आव्हानाशी दोन हात करायचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नक्कीच आहे. मात्र त्यांना समजून घेणारा, मीच्या कोशातून बाहेर पडून आम्हीशी जवळीक साधणारा, नि:स्वार्थी, स्वत:च्या कामावर निष्ठा आणि प्रेम असणारा, त्याच प्रमाणे निष्कलंक चारित्र्याचा आदर्श त्या पिढीसमोर ठेवणारा योग्य असा मार्गदर्शक मिळायला हवा.त्यांनी त्या संदर्भात बाबा आमटे यांच्या ओळींचे स्मरण करून दिले हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नाही’.

भाऊंची लेखनाची वेळ ही सकाळची असे. त्यांची लेखनबैठक सकाळी तास-दोन तासांची जमायची. मात्र कोणी या काळात त्यांना भेटण्यास आले तर ते त्यांचे लेखन थांबले असा विचार न करता त्या मंडळींकडे पाहत म्हणत, दार उघडा त्यांच्यासाठी. येऊ द्या त्यांना. लेखन काय, आजचे उद्या होईल. पण ही मंडळी भेटण्यास लांबून येतात, त्यांना नाराज करणे बरोबर नाही. भाऊ त्यांना आलेल्या पत्रांना उत्तरे कधी त्रोटक तर कधी सविस्तर पाठवत. ते उत्तर जेथे पोस्ट कार्डवर देता येईल तेथे अंतर्देशीय वापरत नसत. जेथे अंतर्देशीय वापरायचे तेथे लेटरहेडचा वापर करायचा नाही याकडे लक्ष देत. ते पत्राला उत्तर देताना मोजक्या शब्दांत मौलिक मार्गदर्शन करायचे.

एकदा, अशाच सकाळी पाचसहा तरुण मंडळी भाऊंना भेटण्यास आली. भाऊंचे लेखन थोडेफार झाले होते. ती मंडळी भाऊंना एका कार्यक्रमाला पाहुणे म्हणून यावे यासाठी निमंत्रण देण्यास आली होती. भाऊंना रक्तदाबाचा त्रास सुरू असल्याने त्यांनी सर्व कार्यक्रमांच्या संयोजकांना वेळीच त्यांची असमर्थता कळवली होती. त्या मंडळींना भाऊंच्या प्रकृतीची आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर घातलेल्या बंधनांची थोडीशी कल्पना आधीच दिली होती. भाऊ बाहेरच्या खोलीत आले. त्या मंडळींनी भाऊंच्या पायांना हात लावून नमस्कार केला आणि त्यांच्या येण्याचा उद्देश सांगितला. त्यांचा आणि भाऊंचा संवाद सुरू होता. त्यावेळी भाऊंनी त्यांच्याकडून ते ग्रामीण भागात करत असलेले विविध सामाजिक उपक्रम आणि भावी योजना या विषयीही जाणून घेतले. त्या मंडळींचा चहा झाला. त्यांतील एक जण पुढे झाला आणि म्हणाला, आम्ही बरकी या छोट्याशा खेड्य़ात एक शिबिर घेतले होते. त्याच्या समारोपाला तुम्ही यावे अशी आमची इच्छा आहे.

मी माझी प्रकृती बरी असती तर नक्की आलो असतो. सध्या माझी प्रकृती साथ देत नाही. काही ना काही तक्रारी चालू असतात. त्यातून जमेल तेवढे लेखन करत असतो. भाऊंची अगतिकता त्या मंडळींनी जाणली. त्यांच्यापैकीच एक जण म्हणाला, भाऊ, आम्ही तुम्हाला अजिबात त्रास देत नाही. पण आमचा एक हट्ट आहे तुमच्याजवळ. आमच्या या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात तुमच्याकडून मिळालेल्या तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे मार्गदर्शनाचे पत्र आम्ही वाचून दाखवावे. भाऊंनी त्या कल्पनेला आनंदाने संमती दिली. शुभेच्छा पत्र पाठवायचे आश्वासन दिले. ती मंडळी निघून गेल्यावर भाऊ एवढेच म्हणाले, या तरुण मंडळींच्या व्यथा-वेदना यांची कल्पना आली काल. त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आपणच कोठे तरी कमी पडत आहोत हेच खरं!” त्यानंतर भाऊंनी एकदोन पत्रांना उत्तरे लिहिली. लेखन मात्र त्या दिवशी त्यांच्याकडून काहीच झाले नाही.

दुसऱ्या दिवसाची सकाळ. कथालेखन त्या दिवशी तरी थोडे पुढे सरकण्याची शक्यता असताना भाऊ म्हणाले, त्या मंडळींचे पत्राचे काम हातावेगळे करूया. एवढी धडपड करत आहेत ती मुले, त्यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाला नकार देऊन त्यांना नाराज करणे जिवावर येते. पण काही इलाज नाही.

मग भाऊंनी शिबिराच्या पत्राचा मजकूर सांगण्यास सुरुवात केली बरकी येथील शिबिरात येऊन चार शब्द बोलण्याविषयी प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांनी मला सांगितले. पण माझी प्रकृती रक्तदाबाच्या त्रासामुळे फार अस्वस्थ असते. प्रवासाचा त्रास बिलकूल सोसवत नाही. त्यामुळे मी मनात येणारे त्रोटक विचार लिहून पाठवत आहे. पहिली गोष्ट ही, की सध्याच्या तरुणांनी प्रौढांकडून अगर वृद्धांकडून कोणत्याही प्रकारच्या संदेशाची अपेक्षा करू नये. संदेश म्हणजे काही एक मंतरलेला ताईत नव्हे. संदेशाला सामर्थ्य येते ते त्यांतील शब्दांमुळे नव्हे तर त्या शब्दाच्या मागे सत्याचा शोध घेणारे, चिरंतन मूल्यांची पूजा करणारे आणि ती मूल्ये जपण्याकरता रक्त सांडावे लागले तरी ते सांडण्यास एका पायावर तयार असणारे जे व्यक्तिमत्त्व असते त्याच्यामुळे. असे व्यक्तिमत्त्व जेथे आढळेल तेथे तरुणांच्या मनांनी रुंजी घातली पाहिजे. केवळ सुभाषितांवर किंवा सुंदर भाषणांच्या उपदेशावर भाळणारे भारतीय मन यापुढे ज्या जीवनसमस्यांना तोंड द्यावे लागणार आहे त्याच्याशी समर्थपणे मुकाबला करू शकणार नाही. आगरकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, वृद्ध माणसे ही समाजनौकेची भरताडे होत. तरुण ही तिची शिडे आहेत.एवढा संदेश तरुणांना पुरेसा आहे असे मला वाटते. जेव्हा शिडात वारा भरतो तेव्हाच होड्या किंवा गलबते प्रवास करू शकतात. स्वतंत्र झालेल्या भारताला एका नव्या दिशेने असाच दूरवरचा प्रवास करायचा आहे. त्याकरता वारा प्यालेल्या तरुणांची फार जरुरी आहे. आपल्या भोवतालच्या समाजाशी आपले जे रक्ताचे नाते आहे; मातीचे जे नाते आहे त्याची जाण तरुण मनाला सतत असली पाहिजे. ती जाण असली तरच माणसाला कर्तव्याचे भान राहते आणि ते कर्तव्य पार पाडण्याकरता त्याला ज्ञानविज्ञानाची जोड देण्याची इच्छा निर्माण होते.

माझ्या तरुण मित्रांनो! तुम्ही शहरात असा, अथवा खेड्यात असा, कोणाचा जन्म गरीब घरात झाला असेल, कोणी सुखवस्तू कुटुंबात जन्मला असेल; एखाद्याला बुद्धीचे अथवा अन्य गुणाचे वरदान मिळाले असेल, दुसऱ्याला ते मिळाले नसेल. पण हे सारे भेद वरवरचे आहेत. या सगळ्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन आपण एका विश्वाची लेकरे आहोत, एका मातीची अपत्ये आहोत ही जाणीव मनात बाळगून जे कार्यक्षेत्र वाट्याला येईल त्यात माणसाने प्रामाणिकपणाने कार्य करत राहिले पाहिजे. आज आपली पहिली निकड ती आहे.

केवळ बाह्य समाजरचना बदलून किंवा नाना प्रकारचे लोकोपयोगी कायदे करून भारतातील दैन्य आणि दारिद्र्य यांचे निर्मूलन करता येणार नाही. त्याकरता प्रत्येकाच्या मनात त्याचे श्रम, बुद्धी, ज्ञान, धन ही सर्व अंशत: तरी समाजाच्या कारणी लावण्याची भावना सतत जागती राहिली पाहिजे. बाबा आमटे हे त्या जागल्या भावनेचे एक भव्य प्रतीक आहे. तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या ठिकाणी आहे. तरुणांनी ईशावास्योपनिषदापासून ज्वाला आणि फुलेपर्यंतचे वाङ्मय वाचावे. त्यांच्या बुद्धीने त्यांच्यातील प्रतिपादनाशी झुंज घ्यावी आणि त्यातून जी जीवनसत्वे कठोर वास्तवाच्या निकषावर घासून निश्चित होतील त्यांचा मागोवा घेत त्यांचे आयुष्य सार्थ करावे एवढेच माझ्यासारख्याला सुचवावे असे वाटते. (वि.स. खांडेकर, 26 मे 1972)

राम देशपांडे 8600145353

———————————————————————————————-————————————

About Post Author

1 COMMENT

  1. लेखन ,चिंतन ,मनन आणि संवादातून अनुभवातून घडत जाते याचा उत्तम उदाहरण आहे हे लेखन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here