कोकणी घराचा नमुना देगावला (Typical layout of a Konkan house at Degaon)

0
462

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला (एके काळी) लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले.

घराच्या कुंपणाचे फाटक उघडून आत गेले, की दोन्ही बाजूंला नानाविध वृक्षांची हिरवाई आहे. त्यातून मधोमध रस्ता घराकडे जातो. घरासमोर सारवलेले ऐसपैस अंगण आहे. अंगणालगत जांभा दगडाच्या कट्ट्यांवर रंगीत आकर्षक फुलझाडांच्या कुंड्या आहेत.  घराचे जोते चांगले तीन फूटांहून उंच आहे. घरात पायरी चढून वर जावे लागते. तेथे मोठी पडवी आहे. पडवीतून पुन्हा ओटीवर मुख्य घरात जाण्यासाठी जांभा दगडाच्या चार उंच पायऱ्या आहेत. ओटीवर दगडासारखा मजबूत लाकडी खांब आहे. ओटीवरचा दरवाजा माजघरात उघडतो. घर पुढील पडवी, माजघर, माजघरातून डाव्या बाजूला स्वयंपाकघर, उजव्या बाजूला बाळंतिणीची खोली, स्वयंपाकघर आणि माजघर यांना जोडणारी मागील पडवी यांना घराच्या कडेला असलेल्या पडवीतील तीन खोल्या व वर माळा असे घर प्रशस्त आहे.

पडवीतून माजघरात उघडणाऱ्या मोठ्या लाकडी दरवाज्याची नक्षीदार कलाकुसरीची चौकट, भिंतीमधील कोनाडे-फडताळे ही तत्कालीन गृहरचनेची वैशिष्टये तेथे आहेत.  पुढील पडवीतील मुख्य दरवाजा, माजघराचे पुढील आणि मागील पडवीत उघडणारे दोन दरवाजे आणि मागील पडवीतील परसात उघडणारा मागील दरवाजा असे चार दरवाजे एकासमोर एक आहेत. वास्तूची ही आखणी नियोजनपूर्वक केलेली आहे. पुढील अंगणातील कुंपणाचे फाटक, घराकडे येणारा रस्ता, घराचे एकासमोर एक असलेले चार दरवाजे, मागील परसातील विहीर, सारे सरळ रेषेत आहे. परसातील विहिरीच्या रहाटाजवळ काम करणाऱ्या व्यक्तीला पुढील अंगणातील मुख्य फाटकातून आत घराकडे येणारी व्यक्ती दिसावी, मागील परसातून पुढील अंगणातील वावर कळावा यासाठी तशा चार दरवाज्यांची व फाटकाची एकासमोर एक नियोजनपूर्वक आखणी करणे हे कुशल स्थापत्य चातुर्य तेथे आढळते.

घरात असलेली बाळंतिणीची काळोखी खोली तत्कालीन पद्धतींवर प्रकाश टाकणारी आहे. खोलीत मोकळी हवा तर यावी मात्र वारा, ऊन याचा त्रास नवजात अर्भकाला होऊ नये याची काळजी घेऊन ती जागा निवडलेली. त्या खोलीला असलेली एकमेव खिडकी हवा, वारा, उजेड सारे सांभाळते. त्या खोलीत असलेले भिंतीतील कपाट बाळ-बाळंतिणींचे कपडे व वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त असे आहे. तसेच, तत्कालीन पद्धतीनुसार बाळंतिणीला शेक-शेगडी करण्याची गरज. त्यातील धुराचे वायू विजन नीट व्हावे यासाठी खोलीच्या छतावर मोकळी जागा राखली आहे. त्या खोलीत स्वतंत्र न्हाणीघर आहे. त्याच्या बाहेर सांडपाण्यावर त्यावेळी अळू, कर्दळ अशा भाज्या व शोभेच्या वनस्पती लावल्या जात असत.

माळ्यावर धान्य साठवण्याचे, वस्तू ठेवण्याचे दोन जाड लाकडी अजस्त्र महाकाय हडपे (पेटारे) आहेत. लांबी, रुंदी सहा व चार फूट, उंची तीन फूट असे अवजड ते हडपे. ते अर्थातच घर बांधल्यानंतर माजघरातील छोट्या लाकडी जिन्याने माळ्यावर नेले नाहीत तर घर बांधताना वासे, भिंती बांधण्याच्या आधी आधाराच्या खांबांवर चढवले गेले आणि माळ्यावर विराजमान कायमस्वरूपी केले गेले. त्यांना ओटीवरील मजबूत खांबांनी आधार दिला आहे.

घराच्या मागील पडवीत मोठे जाते ऊर्फ घरट आहे. ते देगाव गावात एकमेव आहे. धान्य दळण्यासाठी जाती तेव्हा सगळ्यांकडे असत, मात्र भात भरडण्यासाठी लागणारे घरट फक्त या घरात होते. तेथे गावातील बायका भात भरडण्याच्या कामासाठी येत. घरट ओढण्यासाठी दोन जणी लागत. घरट जात्यासारखे बसून नाही तर उभे राहून फिरवावे लागते. घरटाचा सात फूट लांब दांडा पडवीतील लाकडी वाशावर केलेल्या भोकात खोवून घरट दोघींनी फिरवले, की फोलपट बाजूला होऊन तांदूळ मिळतो. तांदूळ उखळात घेऊन मुसळाने कांडला, की त्यावरील उरलासुरला तूसं, कोंडा वेगळा होऊन भात करण्याजोगा तांदूळ मिळतो. विजेच्या अभावी खेडेगावात तेव्हा भात भरडण्याच्या, कांडण्याच्या गिरण्या नव्हत्या. तेव्हा घरट, उखळ, मुसळ ही साधने वापरली जात. खलबत्ता, पाट, वरवंटा, जाते या गोष्टी सगळीकडे असायचे मात्र या घरात घरट आणि उखळ-मुसळ आहे.

घरामागे सारवलेले परस (मागील आंगण) आहे. त्या सारवलेल्या अंगणामागे असलेल्या परसावात विविध प्रकारची झाडे लावली आहेत. मागील बाजूस गणपतीचे देऊळ आहे. घराभोवती लावलेली आंबा, फणस, चिकू, जांभूळ, अननस अशी विविध प्रकारची फळझाडे, नारळ; तसेच पारिजातक, सोनचाफा, कवठी चाफा, सोनटक्का बकुळ, गुलाब, रातराणी यांसारखी सुगंधी फुल झाडे आणि देशीविदेशी रंगीत शोभिवंत फुलांची झाडे याने घराभोवतीचा परिसर विलोभनीय केला आहे. सुतार पक्षी, शिंजर, हळद्या, कोतवाल, बुलबुल, दयाळ, नर्तक, खेकाट्या, ककणेर, कवडे अशा पक्ष्यांचा नित्य वावर तेथे असतो. नदी व एकमेव गाडी रस्ता असलेले गाव. ते समुद्रसपाटीपासून उंचावर वसलेले आणि थंड हवेचे हिरवाईने नटलेले ठिकाण आहे.

काळाच्या ओघात काही बदल झाले आहेत. गावात वीज 1978 साली आली. विहिरीवरील हातरहाटाशेजारी पाण्याचे पंप, अंगणात ठिकठिकाणी झाडांसाठी नळ अवतरले. स्वयंपाकघरात चुलीबरोबर, ओटा, गॅस शेगडी, सिलिंडर आले. बदल स्वीकारलेले हे घर नव्या, जुन्याचा संगम आहे. घरामागील खोपी (फाटी-जळाऊ लाकडं, सरपण ठेवण्याची जागा), चूल, पाणी तापवण्याचे मशेरे, माजघराच्या कोनाड्यात ठेवलेली चिमणी (लहान दिवा), कंदील लावण्यासाठी असलेल्या सलकांड्या, माजघर व ओटीवरील खुंटीवर टांगलेले कंदील जुन्या काळच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकतात.

रजनी अशोक देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com
———————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here