आधुनिक मराठी कवी व चतुरस्त्र लेखक अशी अनंत काणेकर यांची ओळख आहे. विषयाची ओटोपशीर, आकर्षक, ठसठशीत मांडणी व परखड विचारसरणी हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य. काणेकर यांचे व्यक्तिमत्त्व लौकिक जीवनाशी समन्वय साधणारे होते. ते ‘चांदरात’ या संग्रहामुळे मराठी काव्याच्या इतिहासात अजरामर झाले…
एकोणचाळिसावे साहित्य संमेलन औरंगाबाद येथे 1957 साली झाले. त्याचे अध्यक्ष अनंत काणेकर हे होते. त्यांची ख्याती अजातशत्रू, शांतचित्त, सर्व विचारप्रवाहांशी जुळवून घेणारा, स्वागतशील साहित्यिक अशी होती. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला. त्यांचे वडिलांचे छत्र लहानपणीच गेले. त्यामुळे काणेकर यांचे बालपण आजोळी गेले.
ते ‘चांदरात’ या संग्रहामुळे मराठी काव्याच्या इतिहासात अजरामर झाले. काणेकर मुळात वृत्तीने कवी होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी जी पहिली कविता लिहिली, तीसुद्धा रात्री झोपेत केवळ अस्वस्थ वाटू लागले नि लिहिण्याशिवाय गत्यंतर नाही अशी अवस्था प्राप्त झाल्यावर… तो 1917-18 चा कालखंड. काणेकर तेव्हा इंग्रजी पाचवीत होते. लोकमान्य टिळक यांचे निधन झाले तेव्हा काणेकर यांनी पुन्हा तीस-चाळीस ओळींची कविता टिळक यांच्यावर लिहिली- ‘भारतभूचा टिळक हा…’ म्हणून. त्यांनी ती त्यांच्या वर्गशिक्षकांना मोठा धीर करून दाखवली. ती कविता शिक्षकांना इतकी आवडली, की टिळक यांच्या निधनानिमित्त शाळेत जी दुखवट्याची सभा भरली, तेव्हा त्यांनी काणेकर यांची ती कविता प्रती करून सर्वांना वाटली! काणेकर यांचे ते पहिले कौतुक. त्यानंतर काणेकर हे सतत सर्वांच्या कौतुकाचा विषय होऊन बसले. काणेकर यांनीही कितीतरी समारंभांची अध्यक्षस्थाने न.चिं. केळकर यांच्याप्रमाणे भूषवली !
काणेकर हे कुशल संपादकही होते. त्यांनी शाळेत असताना ‘विद्यासेवक’ नावाचे एक मासिक काढले. त्यांना लहानपणापासून छापील शब्दांचे जबरदस्त आकर्षण होते. त्यांनी उत्तम वाचन केले होते.
काणेकर हे गिरगावातील चिकित्सक शाळेचे विद्यार्थी. ते तेथून मॅट्रिक 1922 साली झाले आणि झेवियर्स कॉलेजमधून 1927 साली बी ए व 1930 साली एलएल बी झाले. त्यांनी वकिली केवळ तीन वर्षे केली. ते मराठीचे प्राध्यापक 1941 पासून होते. त्यांनी ‘नवजवान’ नावाचे दैनिक 1930 साली काढले. त्यांनी नाट्यक्षेत्रात मन्वंतर घडवून आणणारी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था 1933 साली स्थापन केली आणि वर्तक यांची ‘आंधळ्यांची शाळा’ गाजवली. तत्पूर्वी, त्यांनी इब्सेनच्या ‘ए डॉल्स हाऊस’चे ‘घरकुल’ ह्या नावाने रूपांतर केले. निशिकांतची नवरी (1938) व फास (1949) ही त्यांची रूपांतरित नाटके प्रयोगशील रंगभूमीला उपकारक ठरली.
त्यांनी ‘चित्रा’ ह्या (1935 साली) साप्ताहिकाचे रांगणेकर यांच्याबरोबर संपादन केले. त्यांनी ‘आशा’ साप्ताहिक 1940 साली सुरू केले. ‘पिकली पाने’, ‘उघड्या खिडक्या’ यांसारखे दहा लघुनिबंध संग्रह, ‘आमची माती आमचे आकाश’, ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ यांसारखी आठ प्रवासवर्णने, ‘चांदरात’सारखे कवितासंग्रह, ‘अनन्तिका’ हे आत्मवृत्त; ‘घरकुल’सारखी चार भाषांतरित नाटके ही त्यांची ग्रंथसंपदा होय.
काणेकर राज्यारोहण समारंभाच्या निमित्ताने लंडनला 1937 साली गेले. तेथून ते रशियाला गेले आणि त्यांनी प्रवासवर्णन ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ लिहिले. ‘चांदरात’ आणि ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ ही केवळ दोन पुस्तकेच लिहिली असती तरी काणेकर साहित्यिक म्हणून चमकले असते. काणेकर यांचे लघुनिबंध ही त्यांची खासीयत होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1957 सालच्या साहित्य संमेलनाच्या वेळी पेटली होती. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांच्या अक्षरशः चिंध्या चिंध्या केल्या. एरवी, काणेकर यांनी त्यांच्या प्रसन्न शुभ बोलण्याच्या शैलीने महाराष्ट्राला जिंकून घेतले होते. त्यांनी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात असे उद्गार काढले :
“…मराठी जनतेचे जीवन समृद्ध होण्यासाठी एक भाषिक मराठी राज्य झालेच पाहिजे. भाषा हा मानवी जीवनाचा जिवंत आविष्कार आहे. भाषेचा वृक्ष जनतेच्या जीवनातून उगवतो आणि जनता-जीवनाच्या विकासाबरोबर विकसित होतो. मानवी जीवनाचा विकास साधायचा, उन्नती करायची म्हणजे प्रत्येक भाषेचा विकास आणि उन्नती झाली पाहिजे.”
त्यांना मुंबईत भरलेल्या पंचेचाळिसाव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचाही मान 1963 साली मिळाला. भारत सरकारने ‘पद्मश्री’ ही पदवी त्यांना 1965 साली बहाल केली. ते ‘सोव्हिएट देश नेहरु पारितोषिका’चे मानकरी 1971 मध्ये ठरले.
त्यांचे मुंबई येथे 4 मे 1980 रोजी देहावसान झाले.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ‘झपूर्झा’ या इमारतीत राहत. काणेकर यांच्या पत्नी कमल यांनी ‘अनन्वय’ या अनंत काणेकर यांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी 18 जानेवारी 2008 रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488
————————————————————————————————–