चाळिसावे साहित्य संमेलन (Fortyth Marathi Literary Meet 1958)

0
63

कवी अनिल यांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या  काव्यप्रकाराचा आविष्कार केला. साधी, सरळ, भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे…

चाळिसावे साहित्य संमेलन मालवण येथे 1958 साली भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल हे होते. अनिल म्हणजे पन्नास-पंचावन्न वर्षे सतत कविता लिहिणारा आणि वाचकांच्या कुतूहलात तेजाळत राहिलेला एक विलक्षण सुंदर भावकवी. ‘ऋणानुबंधाच्या…’ ही त्यांची कविता कुमार गंधर्व यांच्या गाण्याने अजरामर झाली आहे. त्यांच्या कवितेवर कोणाचा ठसा उमटलेला नाही नि त्यांच्यासारखी कविता लिहिणारा पंथही निर्माण झालेला नाही. कवी अनिल रविकिरण मंडळाच्या अगदी समीप असूनही रविकिरण मंडळाच्या कवींच्या आसपासही कधी गेले नाहीत!

अनिल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी मूर्तिजापूर येथे झाला. त्यांचे बी ए, एलएल बी असे शिक्षण झाले. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे. त्यांनी वकिली काही काळ अमरावतीला केली. त्यांनी कोलकात्याजवळच्या शांतिनिकेतनमध्ये वर्षभर राहून चित्रकलेचा अभ्यास केला. ते पुढे सबजज्ज झाले, नंतर डिस्ट्रिक्ट जज्ज झाले. त्यानंतर न्यायखात्यातून शिक्षणखात्यात गेले. ते केंद्रीय शिक्षण संचालकही झाले. त्यांनी केंद्रीय शिक्षण संचालक असताना युरोप-अमेरिकेचा दौराही केला.

त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘फुलवात’ हा 1931 साली प्रसिद्ध झाला; त्यानंतर ‘भग्नमूर्ती’, ‘निर्वासित चिनी मुलास’, ‘पेर्ते व्हा’, ‘सांगाती’ व ‘दशपदी’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. ते मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना दिल्ली येथेही अनेक मानसन्मान मिळाले.

त्यांची सामाजिक आणि राजकीय जाणीव तीव्र होती. ते मूलत: भावकवी म्हणून प्रसिद्ध होते, परंतु कवी अनिल यांनी ‘निर्वासित चिनी मुलास’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या दीर्घ कविताही लिहिल्या आहेत. कवितेत रूपबंधाला फार महत्त्व असते, ते काव्यसौंदर्याच्या अनेक अंगांमधील एक महत्त्वाचे अंग आहे- कवी अनिल यांना त्याची जाण होती. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या काव्यप्रकाराचा आविष्कार केला. त्यांचा तो संग्रह त्यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षी प्रसिद्ध झाला होता. ‘पेर्ते व्हा’ या संग्रहातील ‘विशेष’ या कवितेत त्यांनी ‘एकेक आहे तो जिवंत क्षण ऊन रक्ताने अनुभवलेला’ असे जे म्हटले आहे, ते त्यांच्या समग्र कवितेला लागू आहे! अनिल यांचे चित्रकला, मूर्तिकला, संगीत यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्यांना त्याविषयी खोलवर जाणीवही होती. त्यामुळे त्यांच्याकडून ‘भग्नमूर्ती’सारखे दीर्घकाव्य निर्माण होऊ शकले.

कवी अनिल यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे जाण्याचा ध्यास लागलेला होता. पण इतके असूनही ‘प्रेम’ हा भाव त्यांच्या कवितेचा प्राणबिंदू ठरला. अनिल प्रवासात सतत कविता लिहित असत. त्यांच्या कवितेच्या पहिल्या श्रोत्या पत्नी कुसुमावती देशपांडे असत. इतके त्यांचे कुसुमावती यांच्यावर प्रेम होते. त्या दोघांचे फर्ग्युसन कॉलेजमधील प्रेम प्रकरण हा मोठ्या कुजबुजीचा विषय कित्येक काळ होता. त्यांचे लग्नापूर्वीच्या एकमेकांच्या पत्रव्यवहाराचे ‘कुसुमानिल’ हे पुस्तक 1972 साली प्रसिद्ध झाले, ते खूप गाजले. मराठी साहित्यात साहित्यरस आणि एकमेकांवर प्रचंड प्रेम असणारे असे ते दुर्मीळ जोडपे होते.

अनिल यांच्यावर केशवसुत व ब्राऊनिंग या दोन कवींचे संस्कार होते. त्यांचा संस्कृत आणि उर्दू साहित्याचा, विशेषतः कवितेचा अभ्यास उत्तम होता. त्यांना संतांचे साहित्य आवडे. त्यांनी प्रत्येक कविता पूर्ण विचार करून लिहिली. त्यांच्या अनेक कविता ध्वनिमुद्रित झाल्या.

त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात “संयुक्त महाराष्ट्राचा सांस्कृतिक पाया भरभक्कम करायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र धर्म काय आहे हे सूक्ष्मपणे पाहिले पाहिजे. त्या महाराष्ट्र धर्माची अखिल भारतीय संदर्भात नव्याने निश्चिती करावयास पाहिजे आणि त्याला शोभेसे महाराष्ट्रीय चारित्र्य घडवले पाहिजे,” असे उद्गार काढले.

कवी अनिल यांचे निधन 8 मे 1982 रोजी झाले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

—————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here