आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान!
खेड्यापाड्यात, आदिवासी भागात, शहरी वस्त्यांत आणि आजकाल मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्येही जाऊन, हा विषय सोपा करून लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता या संस्थेच्या कामात आहे. माणसाचा डॉक्टरांशी संबंध येतो तेव्हा त्याचे आरोग्य संपलेले असते. तसे होऊ नये म्हणून सक्षम आरोग्य संवाद घडवण्यासाठी डॉ. मोहन देस कार्यरत आहेत. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.
– अपर्णा महाजन
————————————————————————————————————–
‘आरोग्य भान’ची गोष्ट (The Story of Awareness of Health)
भान असणे म्हणजे ‘जाणीव असणे’ असे म्हटले जाते. पण भान हे जाणिवेपेक्षा काहीतरी अधिक असते. एखादी गोष्ट माणसाला अनेक पैलूंनी कळते आणि ती कळून सवरते, म्हणजे ती त्याच्या जगण्याचा भाग होते, तेव्हाच त्याला तिचे भान आले असे म्हणता येईल.
‘आरोग्य’ म्हणजे काय? ‘आरोग्य’ हा शब्द उच्चारल्यावर डोळ्यांसमोर काय येते? मी आमच्या कार्यशाळेत सुरुवातीला कधी कधी ‘त्याचेच एक चित्र काढा’ असे सुचवतो. मग जेवढी माणसे समोर असतात, तेवढी चित्रे तयार होतात. तीस-चाळीस किंवा जास्तही. त्या चित्रांमध्ये दवाखाना, रेड-क्रॉस म्हणजे लाल-अधिकचे चिन्ह, स्टेथोस्कोप, सलाईनची बाटली, अॅम्ब्युलन्स या गोष्टी तर हमखास येतात. पण काही लोक वेगळीच चित्रे काढतात. एखादे डेरेदार झाड, नदी, हंडा घेऊन चाललेली बाई, हातपंप किंवा नुसता हंडा आणि नळ, अंघोळीच्या पाण्याची बादली, टॉवेल, फुले, पाने, फुलदाणी, रोप लावलेली कुंडी, जेवणाचे ताट, भाजीपाला, फळे, हिरवा डोंगर, खेळणारी मुले, सूर्य, योगासने, प्राणायाम अशी सकारात्मक खूप चित्रे दिसतात, तर काही लोक दारूची बाटली आणि तिच्यावर फुली, उघड्यावर संडास आणि त्याच्यावर फुली, सिगारेट-बिडी आणि त्यांच्यावर फुली अशी चित्रे काढतात. कोणी मनाचा तराजू काढतात, त्यात मनाचा समतोल दाखवतात. एखादे चित्र फक्त हसणाऱ्या बालिकेचे असते! ती सगळी चित्रे एका भिंतीवर लावून त्यांचा एकत्र फोटो काढला, तर तो संपूर्ण आरोग्याचा फोटो असेल !
डॉक्टर, दवाखाना, औषधे हे घटक आरोग्यसेवांचा महत्त्वाचा भाग आहे, पण तो तुलनेने छोटा आहे. त्याचे स्थान माणसाच्या मनात प्रचंड असते. माणसाचा अनुभवदेखील तसाच असतो. अनेकांच्या वाट्याला रोगराई, साथी, आजार, औषधे, इंजेक्शने, हॉस्पिटलच्या वाऱ्या हेच आलेले असते. त्या भिंतीवर लावलेल्या बाकीच्या चित्रांमध्ये जे काही चांगले असते, ते माणसाला नीट मिळत नसते. काही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने चक्क चुकीच्या झालेल्या असतात, म्हणून रोगराई, साथी, आजारपण उद्भवतात. आरोग्य संपते. खरे तर माणसाचे सगळे जगणे चांगले अर्थपूर्ण आणि सकारात्मक असणे याला ‘आरोग्य’ म्हटले जाते.
माणसाचे आरोग्य किंवा अनारोग्य कोठे-कोठे असते? ते त्याच्या सभोवतालच्या पाण्यात, हवेत, त्याच्या जेवणाखाण्यात, परिसरात, परसात, रस्त्यावर, एस टी स्टँडवरील ऊसाच्या रसात, शेतात, बांधांवर उगवणाऱ्या धान्यात, गोठ्यात, चुलीच्या धुरात, दवाखान्यात, बाजारात, महागाईत, व्यसनात, कामाकष्टात… सगळीकडे असते. ते घरात, शाळेत आणि माणसा-माणसांतील संबंधांतही असते. तसेच ते रूढीपरंपरा, सणवार, सभासमारंभ, श्रद्धा, समज, घरगुती औषधे, जंगल, गाणी, मनोरंजन, जाहिराती, प्रसारमाध्यमे आणि आता मोबाईल व इंटरनेटमध्येही असते. म्हणूनच, आरोग्याची संकल्पना माणसाच्या सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय आसमंताला व्यापणारी आहे.
आरोग्याच्या इतक्या पसरलेल्या प्रचंड क्षेत्राशी डॉक्टरांचा फार संबंध येत नाही! एखाद्याला आजारपण आले, तरच डॉक्टरचे काम सुरू होते. मी स्वतः एक ‘डॉक्टर’ असूनही आरोग्याच्या क्षेत्रात काम करतो ! हे सर्वसामान्य लोकांचे क्षेत्र आहे. डॉक्टरी दवापाण्यापेक्षा लोकांच्या हवापाण्यात मला अधिक रस आहे. आरोग्याचे काम म्हणजे शक्यतो आजार येऊ नये म्हणून करायचे काम. ते करूनही आजार झालाच, तर आजारातून लवकर बाहेर पडता यावे म्हणून करायचे काम. आजार आलाच तर आपले हक्क कोणते, जबाबदारी कोणती हे समजूनजाणून घेण्याचे काम, आजारातून बाहेर पडल्यावर पुन्हा आजारपण येऊ नये म्हणून करायचे काम आणि माणसाला आरोग्याविषयी जे समजले, पटले, उमजले आणि जे अंमलात आणले, ते इतरांना सांगण्याचे कामसुद्धा आरोग्याचेच काम होय. म्हणजे भिंतीवर लावलेल्या त्या साऱ्या चित्रांचे एकत्रित भान म्हणजे आरोग्याचे समग्र भान.
‘आरोग्य भान’ची सुरुवात कोकणातल्या धामणी नावाच्या गावी 1996 साली केली. एक वर्ष काम झाले आणि त्यांच्या इच्छेने तेथे एक आरोग्यजत्रा भरवली गेली. ती पाहण्यास मुंबईच्या ‘केशव गोरे ट्रस्ट’चे चंद्रकांत केळकर आले होते. त्यांनी त्या कामाला नाव सुचवले- ‘आरोग्य भान… आभा!’ ते आम्हालाही आवडले. तेव्हापासून आमच्या समूहाला ते नाव मिळाले.
‘आभा’चा पसारा हळुहळू वाढत गेला. महाराष्ट्रात बहुतेक प्रत्येक जिल्ह्यात ‘आभा’च्या कार्यशाळा झाल्या आहेत. आरोग्य संवाद कार्यशाळा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतही झाल्या आहेत. दरवेळी माणसे, परिसर, संस्कृती, भाषा, बोली, चालीरीती, लोककला वेगवेगळी असत. त्यामुळे संवादाच्या कामात विविधता येत गेली. आजपर्यंत पंचवीस ते तीस हजार माणसांपर्यंत आभाचे काम पोचले आहे. त्यातली काही शिबिरे खूप मोठी, म्हणजे एका वेळी शंभर-दीडशे लोक तर काही अगदी लहान म्हणजे दहा, वीस लोक एका शिबिरात अशी होती. एक शिबिर सहाशे महिलांचे होते! ‘आभा’च्या आजपर्यंतच्या प्रवासात ग्रामीण, आदिवासी आणि शहरी-गरीब वस्त्यांमधील स्त्रियांचे योगदान खूप मोठे आहे.
आम्ही ‘रिलेशानी’ नावाची शिबिरे पंधरा वर्षांपासून घेत आहोत. नुकतेच एकशेसत्याहत्तरावे रिलेशानी पार पडले. रिलेशानी म्हणजे शानदार ‘रिलेशनशिप.’ तरुण मुला-मुलींसाठी त्यांचे एकत्रित शिबिर असते. विषय असतो ‘रिलेशनशिपमधील आरोग्य- मानसिक-शारीरिक-सामाजिक-कौटुंबिक आरोग्य.’
‘माणसाला आरोग्याविषयी जे समजले, पटले, उमजले आणि अंमलात आणता आले, ते इतरांना सांगणे म्हणजे आरोग्याचे काम’ त्यालाच ‘आरोग्य संवाद’ असे नाव दिले. त्या आधी एक पायरी असते संवादाची. पहिली पायरी म्हणजे लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे. ते चुकीचे असेल, त्यात अंधश्रद्धा, अपसमज, निराशा, नाराजी असेल, आमचे नशीबच असे अशी भावना असेल; कदाचित जे आहे ते ठीक आहे असेही वाटत असेल किंवा आमच्यात काय वाईट आहे आमच्यात काय कमी आहे असेही असेल. आम्ही जसे आहोत तसे आहोत. असू देत. त्यांच्या नजरेतून त्यांचे जग पाहायला हवे. त्यांना आरोग्याचा किंवा अनारोग्याचा साक्षात अनुभव असतो.
एखाद्या आदिवासी किंवा ग्रामीण मुलीच्या दृष्टीने पाणी म्हणजे काय, पाण्यातले कष्ट काय असतात हे एकदा तरी अनुभवायला पाहिजे. किमान तिला विचारायला तरी हवे. तिला हे विचारायला हवे, की लहान वयात लग्न म्हणजे काय असते? तिच्या वडिलांना काय वाटते? आईला काय वाटते? हे ऐकून तरी घ्यायला पाहिजे. पण अनेकदा, शिकलेली माणसे थेट शिक्षणच करू लागतात. असे करा, तसे केले पाहिजे, असे करायचे नाही, (त्याची खरी, वैज्ञानिक कारणेही दिली जातात) तुम्ही जे पाणी पिता ते अशुद्ध पाणी, हे बघा, असे करायचे शुद्ध पाणी… असे त्यांना सांगितले जाते. त्याने समोरचा माणूस गप्प होतो. त्याचा विचार बंद होतो. त्याचा नवा वैज्ञानिक विचार आत घेण्याची त्याची तयारीच झालेली नसते. त्यांचे पाणी, विहीर, ओढा, नदी, अन्न, परिसर, जंगल, हवा, रोजगार, सणवार, बाजार, रेशन दुकान, पीक-पाणी, जंगलातल्या भाज्या, फळे, त्यांचे रीतिरिवाज, चालत आलेल्या कथा, कल्पना आणि संवादाच्या पद्धती, गाणी, वागण्याच्या पद्धती यांबद्दल काहीच माहिती नसताना त्यांच्याशी अर्थपूर्ण असे बोलूच शकत नाही.
आरोग्य संवादाची सूत्रे –
* आरोग्याचा संवाद हक्काधारित, लोकाभिमुख हवा. आरोग्याच्या सर्व कार्यकारणांवर आणि आरोग्यसेवांवर लोकांचा अधिकार असतो हे मानायला हवे.
* संवादाची रचना सामान्य लोकांच्या गरजांवर बेतायला हवी. संस्थेच्या, फंडिंग एजन्सीच्या, सरकारच्या किंवा डॉक्टरांच्या प्राथमिकतेवर नाही.
* माहिती वैज्ञानिक हवी. त्यात श्रद्धा, विश्वास, पूर्वग्रह येऊ नयेत. माहिती मोघम नको. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल, तर काहीतरी ढोबळ उत्तर न देता, नंतर नेमके उत्तर मिळवून सांगावे.
* अधिकारांबाबत स्त्रिया, मुले, अल्पसंख्य, आदिवासी आणि वंचित लोक यांची न्याय्य बाजू थेट घ्यावी. तेथे तथाकथित ‘वस्तुनिष्ठ’ दृष्टिकोन ठेवू नये.
* आरोग्याच्या समग्र पैलूंचे भान ठेवावे. केवळ वैज्ञानिक माहिती देऊन संवाद होत नाही. उलट, त्याचे दडपण येऊ शकते. वैज्ञानिक माहिती देताना अर्थातच भाषा सोपी असावी. तसेच, आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य किंवा वैयक्तिक आरोग्य नाही, याचेही भान ठेवावे.
* संवादामध्ये लोकांचा केवळ सहभाग नको, निर्णयही त्यांचा हवा. सूचना, आदेश नकोत. लोकांना त्यांचे मत, भूमिका मोकळेपणाने मांडण्यासाठी हक्काची जागा असावी. बहुतेक वेळा तशी सवय लोकांना, खास करून स्त्रियांना नसते. ती कधीकधी मुद्दाम निर्माण करावी लागते. त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न जरूर करावा. शिवाय, आपली भूमिका-मत जरूर मांडावे. पण ते कोणावरही लादू नये.
* संवादाच्या पारंपरिक स्थानिक रीति, पद्धती, सामग्री, साधने, वाद्ये यांचा उपयोग जरूर करावा. त्यांचा मान राखावा. शक्यतो या गोष्टींना आवर्जून स्थान मिळायला हवे. ‘आभा’ची साधनसामग्री कमालीची साधी असते.
* सृजनशील संवादाचे विशेष स्थान ‘आभा’मध्ये मानले जाते. आम्ही आरोग्य संवादाला उत्सव मानतो. माणसे कितीही वंचित असली, त्यांचा जगण्याचा अगदी निकराचा संघर्ष असला, तरी त्यांच्या जीवनात उत्सवाचे स्थान असतेच. आम्हाला चित्रकला, संगीत, नाट्य, अनुभवकथन, विनोद यांच्याबद्दल विशेष आस्था आहे. ते लोकांनाही खूप आवडते.
आरोग्य संवाद होता होता माणसे जाणती होतात, सक्षम होतात. एकत्र येऊन निर्णय घेतात. आरोग्याचे अधिकार जाणतात. त्यांना जे समजले-उमजले, ते इतरांना सांगतात. त्यातून आरोग्य संवादाची वेगळी प्रगल्भ, सशक्त लोकसंस्कृती निर्माण होऊ शकते. हे सारे होण्यास अजून खूप काळ जाईल, पण त्याची सुरुवात झाली आहे.
– डॉ. मोहन देस 9422516079 mohandeshpande.aabha@gmail.com
————————————————————————————————————-
खूप छान लेख. भान येणं म्हणजे ती गोष्ट आपल्या जगण्याचा भाग होणं ही संकल्पना आवडली
खूप छान लेख. आरोग्याचा सर्व बाजूंनी केलेला विचारही खूप वेगळा वाटला ,पण योग्य असा वाटला. खऱ्या अर्थाने आरोग्य जगायला लावणारा लेख. खूप छान…….
छान लेख आणि रिलेशानी शिबीर स्तुत्य उपक्रम
विचार करायला भाग पाडणारा लेख.. उत्तम आरोग्य हाच खरा खजिना आहें.स्वतःच, समाजाचं आणि निसर्गाचं आरोग्य या सगळ्यात तर खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद आहें.. “आभा”च मार्गदर्शन खूपच गरजेचं आणि मोलाचं ठरेलं.
खूप सुंदर व्रत, वसा आणि वारसा. डॉ. देस यांना धन्यवाद. एक चांगला उपक्रम, कल्पना आणि कार्यक्रम महाराष्ट्राला दिलात. आपल्यासारखी माणसं खरी महाराष्ट्र भूषण आहेत. मी सांगलीकर. थिंक महाराष्ट्र डॉट काॅमचा लेखकही. आपल्या दर्शनाला खूप उत्सुक. सांगली दौरा असेल तेव्हा जरुर कळवा. मी भेटू इच्छितो.
आभा चे काम समजले आणि त्याचे सूत्र पण लक्षात आले. खूप नवे विचार मिळाले. एक माहिती हवी आहे. तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) या परिसरात आभाचे काम कोठे चालू आहे का? माहिती मिळाल्यास बरे होईल.