यात्रेकऱ्याचा वृत्तांत – पहिली मराठी कादंबरी (The first Marathi novel -Traveler’s Diary)

0
166

मिसेस फेरार नावाच्या बार्इंनी 1838 साली तेव्हाच्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’च्या सभासदांच्या प्रोत्साहनाने आणि सूचनांनी ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ नावाचे पाठ्यपुस्तक लिहिले. ते बराच काळ भारतातील शाळांमधून शिकवले गेले. पुस्तकात एका मराठमोळ्या शेतकरी कुटुंबाचे वास्तवतापूर्ण चित्रण कल्पकतेने करण्यात आले आहे. सशक्त कथानक, ठसठशीत व्यक्तिचित्रे, प्रवाही निवेदन, ग्रामीण भाषेतील संवाद, स्वप्नप्रतिमांचा वापर, ललित लेखकाच्या प्रतिभेने उभी केलेली प्रसंगदृश्ये; त्याचबरोबर शिक्षणाचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व तेथे अधोरेखित करण्यात आले होते. तिच्यात क्षीण स्वरूपात का होईना पण कादंबरीप्रकाराचे अंश दिसून येतात असा अभिप्राय त्या वेळी व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्राला उत्कृष्ट साहित्य निर्मितीची परंपरा तेराव्या शतकापासूनची आहे. अभंग-ओव्या-काव्य, कथा-कहाण्या, चरित्रे, बखरी असे गद्यप्रकार आणि दीर्घ स्वरूपाचे कथात्म वाङ्मय मराठीत होते. ‘कादंबरी’ मात्र आली ती एकोणिसाव्या शतकात.

भारतात मुद्रणकलेचा आरंभ सोळाव्या शतकात झाला. तेव्हापासून पाश्चात्य धर्मप्रसारकांनी धर्मप्रसारासाठी देशी भाषांची मुद्राक्षरे तयार करून बायबलसारखे धर्मग्रंथ छापण्याचा उपक्रम केला. मुंबईत छापखाना सतराव्या शतकात आला. ईस्ट इंडिया कंपनीने 1674 मध्ये मुंबईत छापखाना सुरू केला, पण तो फारसा वापरला गेला नाही. ‘बॉम्बे कुरीयर’ हे वर्तमानपत्र 1790 साली सुरू झाले. त्यात गुजराती व मराठी जाहिराती प्रसिद्ध होत असत. पहिले मराठी वृत्तपत्र 20 जुलै 1828 रोजी प्रसिद्ध झाले. ‘कादंबरी’ त्यानंतर आली.

‘दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अॅण्ड स्कूल सोसायटी’ ही संस्था किंवा ग्रंथांची भाषांतरे किंवा नवीन ग्रंथ लिहिणाऱ्यांस बक्षिसे असे उपक्रम सुरू झाले. त्याच काळात 1822 साली स्कॉटिश मिशनरी मुंबईत आल्यानंतर मिशनच्या शिक्षणकार्याला सुरुवात झाली. शिक्षणाचा एक भाग म्हणून पाठ्यपुस्तके तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मिसेस फेरार त्या वेळी नगरच्या अमेरिकन मिशनने चालवलेल्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापक होत्या. जेम्स फॅरीश या सरकारी अधिकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधला व कल्पना सांगून, ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ हे शालेय पुस्तक लिहिण्यास सांगितले. शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहीत असताना कोणते विषय त्यात येणे अपेक्षित आहे, याची यादीही जेम्स फॅरीश यांनी दिली होती. अपेक्षित विषयांसंबंधी माहिती देताना ती अधिक चांगल्या रीतीने समजावी म्हणून मिसेस फेरार यांनी कथासूत्र वापरले. ते कथासूत्र वापरून जे पुस्तक तयार झाले, त्याचे रूप निव्वळ पाठ्यपुस्तकाच्यापेक्षा वेगळ्या आणि अधिक गुणवत्तेचे होते. त्याला वाङ्मयीन रूप आणि गुणात्मकता प्राप्त झाली होती. ती मराठी कादंबरीची सुरुवात होती.

राघोजी जाधव ही या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. सालस, मेहनती असा हा कुणबी, सोमाजी नावाच्या त्याच्या मित्राच्या; तसेच, बायकोच्या व मुलीच्या आग्रहाखातर, सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकला यात्रेसाठी जाण्यास निघतो. तो वाटेत अनेक प्रकारचे हाल सोसून, नाशिकपासून सुमारे वीस कोसावर येऊन पोचतो, तेव्हा त्याला नाशिकमध्ये पटकीची साथ पसरल्याचे समजते. तरीही तो त्याचा प्रवास चालू ठेवतो. वाटेत चोर, भामटे त्याला लुबाडतात. नाशिकमध्ये पोचल्यावर त्याचा मित्र सोमाजी, जावई महादू आणि त्याची बायको सखूबाई अशा तीन मायेच्या व्यक्ती पटकीच्या रोगाला बळी पडतात. खुद्द त्यालाही मरीचा वाखा होतो पण; सुदैवाने एक काळा फिरंगी त्याला इस्पितळात घेऊन जातो. तेथे त्याच्यावर मोफत उपचार होतात. राघो बरा होऊन तिसऱ्या दिवशी तेथून बाहेर पडतो. सहज बाहेर फिरत असताना, त्याला कळते, की कोणी एक साहेब गुऱ्हाळावर गेला आहे व शाळेतील मुलेही तिकडे जाणार आहेत. तोही तिकडे जाण्यास निघतो. वाटेत त्याला साहेबाचा हमाल गोडाजी भेटतो. बोलता बोलता गोडाजी त्याला बटाट्याची लागवड, कापसाची लागवड, मेंढ्यांची लोकर यांबद्दल माहिती सांगतो. त्याला पाद्रीसाहेब गुऱ्हाळाच्या ठिकाणी भेटतात. ते त्याला उपदेश करतात. राघो गुऱ्हाळावर दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो. तेथे कोणी साहेब साखर करण्याची रीत लोकांना समजावून सांगत असतो. राघोला तो विलायती नांगराची माहिती करून देतो आणि त्याला सुचवतो, की एका साहेबाला कित्येक बिघे जमीन विलायती नांगराने नांगरणे आहे. त्याला त्या कामासाठी हुषार, मेहनती माणूस हवा आहे. तुम्ही ते काम कराल तर तुम्हाला जमीन नांगरायची कशी हे समजेल आणि वर मजुरीही मिळेल ! राघो त्या साहेबाकडे काम करतो. त्याला मजुरी मिळते. शिवाय, एक विलायती नांगरही मिळतो.

दरम्यान, त्याची मुलगी भागू शाळेत जाऊ लागते. तेथे तिला चिरडी मिळते. तिला मूळाक्षरे व थोडे थोडे शिवणकाम येऊ लागते. राघो त्याच्या गावी परत येतो व विलायती ऊसाची लागवड करतो. त्याचा मित्र संताजी त्या कामी त्याला मदत करतो. पुढे, नवरा वारल्यामुळे माहेरीच राहिलेल्या संताजीच्या मुलीशी- काशीशी राघोचे लग्न होते. शेतात लावलेल्या ऊसाची साखर करून विकल्यावर राघोला पुष्कळ पैसा मिळतो व तो सुखी होतो.

राघोजी या कुणब्याच्या जीवनकथेचे चित्रण करताना, लेखिकेने तत्कालीन सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवले आहे. सिंहस्थात नाशिक यात्रा करण्याची रीत, यात्रेकरूंना लुबाडणारे-लुटणारे भामटे, पटकीची साथ आणि त्याला बळी पडणारे लोक, नवस-दंडवत घालण्याची प्रथा अशा घटना-प्रसंगांतून, अनुभवांतून सामाजिक वास्तव कथानकाचा भाग बनून येते.

काही घटना-प्रसंगांची वर्णने दृश्यात्मक परिणाम साधणारी आहेत. उदाहरणार्थ, राघोजीला पटकीची साथ चालू असलेल्या नाशिकमध्ये गेल्यावर आलेला अनुभव कादंबरीत कसा वर्णिला आहे ते पाहण्यासारखे आहे. लेखिका लिहिते, ‘… थोडक्या दिवसांनी राघोजी खटल्यासुद्धा नासिकास पोचला. तेथे नदीकिनाऱ्यावर उतरला. तेव्हा, जिकडे तिकडे सरणे पेटली आहेत. त्यांचे सुहृत्संबंधी फिरत फिरत रडत आहेत. अनाथांची प्रेते पाण्यात वाहत आहेत, दुसरे कित्येक पटांगणावर ताठून मरत आहेत असे त्याने पाहिले. पुरुषांचे रडणे व बायकांचे आक्रोश, विलाप ऐकून त्याचे हृदय शतदा विदीर्ण झाले आणि तो मनासी बोलू लागला, ‘हाय हाय, मी या घोरात कशाला पाय ठेविला? संताजीबाबा मला खरे सांगत होता, की घरी सुखात बसावे यात अधिक शहाणपणा आहे.’ (पृष्ठ 6)

राघोजीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अनेक पात्रे, त्यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारे विविध प्रसंग, छोट्या छोट्या उपकथा, स्थळकाळाच्या तुलनेने मोठा पैस आणि या सगळ्याने मिळून तयार होणारे दीर्घ, कल्पित कथानक असे रूप धारण करणारी ही कादंबरी शालेय पाठ्यपुस्तकाची गरज म्हणून लिहिली गेली. त्यामुळे साहजिकच, बटाट्याची लागवड कशी करावी, ऊसाची लागवड कशी करावी, साखर कशी तयार करावी याचे शिक्षण देणारी माहिती त्यात संवादरूपाने येते.

लेखिका राजकीय वर्चस्वाच्या भूमिकेतून भोवताल पाहत असल्यामुळे, पाद्री अथवा ख्रिस्ती धर्मोपदेशक, साहेब, काळा फिरंगी मुलगा यांची चित्रणे परोपकारी, भले चिंतणारे, कामाची योग्य बूज ठेवून त्याचा योग्य मोबदला देणारे, हुशार, बुद्धिमान अशा उजळ रंगात आहेत; तर एतद्देशीय लोक अडाणी, अंधश्रद्ध, चोर, भामटे असे त्याच्या विरोधी रंगात वर्णले आहेत. राघोजी हा नायक वेगवेगळ्या अनुभवांतून जाऊन पुढे; पाद्र्याच्या उपदेशाने प्रभावित होतो, साहेबाचे म्हणणे ऐकतो आणि अखेर सुखी होतो. सुखी होण्याचे गमक काय, तर तो गावी जाऊन विलायती नांगराने नांगरट करतो, विलायती ऊसाचे नगदी पीक घेतो, साखर तयार करतो व ती विकून पैसा मिळवतो. संताजीच्या विधवा मुलीशी लग्न करून सुखाचा संसार करतो. येथे, राघोजीची संपूर्ण जीवनशैलीच बदललेली दिसते. त्या जीवनशैलीतून, बदलातून सांस्कृतिक वर्चस्वाची भावना व्यक्त होते. कथानकाच्या ओघात, जेथे संधी मिळेल तेथे इंग्रज राज्यकर्त्यांच्या परोपकारी कृत्यांचे, सुधारणांचे निवेदन येते. लेखिका राघोजीला ख्रिश्चन करण्याचा पर्याय स्वीकारत नाही; पण लेखिका ओघाओघाने ख्रिश्चन धर्माचे महात्म्य आणि हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा यांचे वर्णन करते.

‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ सन 1838 मध्ये प्रसिद्ध झाली. सतत दहा वर्षे अभ्यासक्रमात राहिल्यानंतर झालेल्या पुनर्मूल्यांकनातही तिचे रूप जसेच्या तसे ठेवण्याचा निर्णय झाला. ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’च्या जोडीने, त्याच वर्षी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘वाटसराची गोष्ट’ व ‘जागती ज्योत’ ही क्रमिक पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘वाटसराची गोष्ट’ आणि ‘जागती ज्योत’ यांत माहिती देण्याचे सूत्र म्हणून कथेचा वापर केला आहे. ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ मात्र सूत्ररूप कथेच्या पलीकडे जाऊन कादंबरीसदृश्य रूप धारण करते. एकाच वर्षी समान उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी तयार झालेल्या या पुस्तकांचा तुलनात्मक विचार केला, की ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’चे स्वरूप स्पष्ट होते. सूत्ररूप कथेच्या पलीकडे जाऊन, घटना-प्रसंगांची निर्मिती, समकालीन सामाजिक जीवनाचे चित्रण, माणसा माणसांतील संबंधांचे चित्रण आणि माहितीच्या पलीकडे जाऊन, विशिष्ट जीवनदृष्टीने भोवतालाकडे पाहण्याची रीत, यामुळे क्रमिक पुस्तकांपेक्षा अधिकचे वाङ्मयीन मूल्य ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ला लाभते. ती मराठीतील पहिली कादंबरी ठरते.

सर्वात जुनी कादंबरी म्हणून, बनियन्सच्या ‘पिलग्रिम्स प्रोग्रेस’च्या हरी केशवजी यांनी केलेल्या भाषांतराचा- ‘यात्रिकक्रमण’चा निर्देश केला जातो. ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ (1938) पासून ‘यात्रिकक्रमणे’च्या काळापर्यंतच्या (1841) कादंबऱ्या उपलब्ध नाहीत. ‘यात्रिकक्रमण’नंतरची मराठीतील उपलब्ध स्वतंत्र कादंबरी म्हणून ‘यमुनापर्यटन’ (1857) चा निर्देश केला जातो. ‘यमुनापर्यटन’च्या पूर्वी प्रकाशित झालेली ‘परागंदा जाहालेल्या गृहस्थाची कन्या’ या कादंबरीची तीन प्रकरणे जे.व्ही. नाईक यांनी उपलब्ध करून दिली आहेत. 1854 मध्ये ‘चंद्रिका’ मासिकातून प्रकाशित झालेली नीतीपर कादंबरी किंवा 1856 मध्ये प्रकाशित झालेली ‘रत्नप्रभा’ची काही प्रकरणे असे काही त्रोटक संदर्भ मिळतात. पण एकंदरीने, ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ ते ‘यमुनापर्यटन’तर्फे ‘यात्रिकक्रमण’ या प्रवासातील कादंबऱ्या उपलब्ध नाहीत.

रोहिणी तुकदेव 9823299990 rohinitukdeo@yahoo.com

(ललित, मे 2014 अंकावरून उद्धृत)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here