मानववंश आफ्रिकेत लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला. मानवी समूह तेथे घडून तेथून जगभरातील अनेक भूखंडांत स्थलांतरित झाले. त्या समूहांनी तेथे तेथे रहिवास करून त्या त्या ठिकाणाला त्यांची जन्मभूमी मानले. त्यातूनच पुढे, अनेक वेगवेगळ्या भूभागांमध्ये संस्कृती विकसित होत गेल्या आणि तेथे यथाकाल देशांची निर्मिती झाली- देशांच्या सीमा ठरल्या गेल्या. तो विकास समूह व्यवस्था(पन), ग्राम व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि राष्ट्र व्यवस्था असा सांगितला जातो. त्यातूनच एकेकट्या कुटुंबांची प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील अधिसत्ता निर्माण झाल्या. ती राजेशीही होय. राजेशाहीचा अस्त जगातील बहुतांश देशांत एकोणिसाव्या व विसाव्या शतकात होऊन लोकशाही सत्ताप्रणाली जगभर प्रस्थापित झाली.
मानववंश एकच होता. त्या मानव समूहामधून भौगोलिक रचना, हवामान, पाऊस इत्यादी घटकांमुळे हजारो वर्षांच्या काळात मानवाचा रंग, वर्ण, चेहरेपट्टी, उंची यांत भेदाभेद निर्माण झाले. त्यानुसार युरोपीयन गोरे, आफ्रिकन काळे, आशियाई निमगोरे किंवा गव्हाळ, मध्य आशियाई पिवळे वगैरे वर्ण आणि तसेच वेगवेगळे गुणविशेष असलेली मानवजात ठिकठिकाणी विकसित झाली. त्यांचे समूह त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र भूखंडांच्या सीमा आखून राहू लागले. त्यामधूनच देश ही संकल्पना निर्माण झाली. त्या देशांवर व देशांतील छोट्या प्रांतांवर काही कुटुंबांची अधिसत्ता निर्माण होऊन, राजेशाही, सरंजामशाही, सरदारकी अशा संस्था घडत गेल्या. पुढे राष्ट्र ही संकल्पना विकसित झाली. प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रशासन यंत्रणा विकसित झाली-कायदेप्रणाली स्थापित झाली.
‘सबभूमी गोपाल की’ या भूमिकेतून कोणालाही जगात कोठेही जाण्याची मानववंशाच्या आरंभकाळात असलेली मुभा संपुष्टात येऊन एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात प्रवेश घेण्यासाठी त्या देशाच्या प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक झाले. तशी कायदेशीर परवानगी घेऊन दुसऱ्या देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ‘स्थलांतरित’ असे संबोधले जाते. तर अन्याय-अत्याचार-जुलुम-लढाया अशा काही कारणांना, तशी रीतसर परवानगी न घेता इतर देशांत बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांना ‘निर्वासित’ असे समजले जाते. लोकांना त्यांची मायभूमी सोडून इतर देशांत निर्वासित म्हणून आश्रय घेणे हे धार्मिक छळ, दंगली, धरणीकंप, वादळे, पूर, दुष्काळ अशा कारणांमुळे भाग पडते. उपजीविकेचे साधन मिळवण्यासाठी मायदेशातून इतर देशांत जाऊन, निर्वासित म्हणून बेकायदेशीर प्रवेश करून राहणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे…
ज्यू लोकांनी पॅलेस्टाईन या त्यांच्या मायभूमीचा त्याग पॅलेस्टाईनमधील धर्मछळाला भिऊन इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकांत केला आणि समुद्रमार्गे प्रवास करून जगातील इतर देशांत आश्रय घेतला. ते मानवी समुदायाचे ज्ञात इतिहासातील सर्वात मोठे स्थलांतर होय. ज्यू लोक ज्या ज्या देशांत गेले त्या त्या देशाच्या समाजजीवनाशी व संस्कृतीशी एकरूप झाले. ज्यू लोकांना देश सोडून पुन्हा एकदा पळावे लागले ते हिटलर जर्मनीत सत्तेवर आला तेव्हा. त्याने ज्यूंचा छळ सुरू केला. त्या छळाला कंटाळून जर्मनीतील बहुसंख्य ज्यूंनी विदेशांत आश्रय घेतला. त्यांपैकी बऱ्याच जणांना अमेरिकेत आश्रय मिळाला. त्यांत थोर शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्यासारखी मोठमोठी माणसे होती. इस्राएल या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती 15 मे 1948 रोजी झाल्यानंतर जगभरातील अनेक ज्यू पुन्हा मायदेशी परतले ! ज्यूंची जगभर झालेली पांगापांग आणि त्यांनी केलेली त्यांच्या इस्त्रायल राज्याची स्थापना हा जवळ जवळ दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. तीच ज्यू लोकांची जिद्द. त्यांनी त्यांची मायभूमी दोन हजार वर्षांनी पुन:प्रस्थापित केली ! ज्यू महाराष्ट्रात पश्चिम किनाऱ्यावर उतरले व येथे स्थायिक झाले.
महाराष्ट्राच्या जवळचे स्थलांतराचे दुसरे उदाहरण पारश्यांचे. राजकीय सत्तेच्या जुलमाला कंटाळून अनेक इराणी कुटुंबांनी समुद्रमार्गे येऊन मुंबई, गुजरात या ठिकाणी आश्रय घेतला. ही गोष्ट सोळाव्या ते अठराव्या शतकात घडून आली असे मानतात. ती कुटुंबे (त्या काळच्या) ‘पर्शिया’तून आल्याने ते पारशी या नावाने ओळखले जाऊ लागले. निर्वासित म्हणून आलेल्या त्या लोकांनी भारताच्या औद्योगिक, वैज्ञानिक व शैक्षणिक विकासात मौलिक योगदान दिले आहे. होमी भाभा, विक्रम साराभाई, जमशेटजी टाटा, दादाभाई नवरोजी अशा अनेक महान पारशी व्यक्तींनी भारताचे नाव उज्ज्वल करण्यास हातभार लावला आहे. इतिहासकार दाऊद दळवी यांनी असे मांडले आहे, की इराणातील लोक भारतात गेल्या तीन हजार वर्षांपासून आले असणार. तशा खुणा लेण्यांमध्ये दिसून येतात. आफ्रिका आणि कोकण किनारा यांच्यातील गलबतांचा प्रवास जुना आहे. त्यामुळे त्या प्रदेशांचे संबंध सहस्त्र वर्षांपासूनचे आहेत. ज्यू तसेच दोन हजार वर्षांपूर्वी आले.
भारताची फाळणी धार्मिक निकषावर आधारित झाली व पाकिस्तान हे नवे राष्ट्र निर्माण झाले. त्यावेळी तेथून, प्रामुख्याने सिंध प्रांतातून अनेक हिंदू कुटुंबांनी जातीय दंगलींना भिऊन त्यांची घरेदारे, जमिनी सोडून भारतीय भूमीत आश्रय 1947 साली घेतला. फार मोठ्या संख्येने आलेल्या त्या निर्वासितांचे पुनर्वसन भारत सरकारने अनेक शहरांत केले.
सिरियात 2010 साली निर्माण झालेल्या यादवी युद्धामुळे आणि मुस्लिम राज्यांविरुद्ध सुरू केलेल्या संघर्षामुळे सिरियांतील लोक फार मोठ्या संख्येने तो देश सोडून अन्यत्र आश्रय शोधत आहेत. तेथील सुमारे नव्वद लाख लोक निर्वासित म्हणून अन्य देशांत राहत आहेत.
बांगलादेश आणि म्यानमार (ब्रह्मदेश) येथून धार्मिक छळाला कंटाळून निर्वासित म्हणून आलेले अनेक जण भारताच्या आसाम राज्यामध्ये वास्तव्य करत आहेत. त्या देशांतून भारतातच नव्हे तर जगभर नोकरीच्या शोधार्थ जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका येथूनही भारतात अनेक लोक स्थलांतरित होत असतात.
मानवी इतिहासात स्थलांतरितांच्या संख्येमध्ये भारताचा क्रमांक पहिला प्रथम लागतो. मूळात भारत हाच देश स्थलांतरामुळे घडत गेलेला आहे, कारण येथील समशीतोष्ण हवामान आणि सलग पसरलेला व तीन बाजूंना समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिमालय यांनी बद्ध केलेला भूभाग. मात्र गेल्या काही शतकात भारतातून सर्व जगात स्थलांतरितांची संख्या ही फार मोठी आहे. भारतातून अधिकृतपणे एक कोटी दहा लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. भारतातून संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि ओमान येथे मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित होत आहेत. जगातून एकूणच अमेरिका व जर्मनी येथे बरेच लोक स्थलांतरित होतात. लोक त्या पाठोपाठ सौदी अरेबिया, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा व ऑस्ट्रेलिया येथे स्थलांतर करतात.
स्थलांतर करण्यात भारतानंतर मेक्सिकन लोकांचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तद्नंतर चीन, रशिया, बांगलादेश, पाकिस्तान, युक्रेन, फिलिपाईन्स, अफगाणिस्तान या देशांतील नागरिकांचे क्रमांक लागतात.
पुरुषांप्रमाणे महिलाही स्थलांतर करत असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे स्थलांतर करण्याचे प्रमाण फार कमी आहे. महिला उत्तर अमेरिका आणि युरोपीयन देश येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. काही महिला उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया येथील देशांतही स्थलांतर करतात.
समुद्रमार्गे इंग्लंडला जाणाऱ्या निर्वासित भारतीयांची संख्या फार मोठी आहे. इंग्लंडच्या गृहखात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये एक हजार एकशेऐंशी भारतीयांनी छोट्या नौकांमधून समुद्रमार्गे इंग्लंडमध्ये प्रवेश केला. निर्वासित मंडळाच्या अहवालानुसार 2022 साली पंचेचाळीस हजार सातशेसेहेचाळीस निर्वासितांनी छोट्या नौकांतून इंग्लंडमध्ये प्रवेश केला. त्यांपैकी तीनशेतेवीस निर्वासित भारतीय होते. त्यांपैकीच दहा जणांना आश्रय देण्याचा निर्णय ब्रिटिश शासनाने घेतला.
मॉरिशसमध्ये रोजगारासाठी भारतातून स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या कुटुंबांची संख्या लक्षणीय असून तेथील लोकसंख्येत सुमारे सत्तर टक्के भारतीय आहेत. तेथील स्वराज्य संस्था आणि शासन यांच्या प्रमुखपदी मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. इंग्लंड, कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशांतही भारतीयांची संख्या बरीच असून त्या त्या देशांत त्यांच्या खास वसाहती निर्माण झाल्या आहेत. भारतीय नागरिकांचे कार्य हे त्या देशांतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक या क्षेत्रांत लक्षणीय आहे. भारतीय नागरिकांचा सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पूर्ण देशाच्या प्रशासनातही महत्त्वपूर्ण आहे. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय, महाराष्ट्राच्या कोकणातील- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे लिओ वराडकर हे पुन्हा दुसऱ्यांदा विराजमान झाले; तसेच, मूळचे गोव्याचे अँटोनियो कोस्टा पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी तर इंग्लंडच्या पंतप्रधानपदी मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक आहेत. गायानामध्येही भारतीय वंशाच्या व्यक्ती पंतप्रधानपदी राहिल्या आहेत. तेथे मूळ भारतीय वंशाचे लोक पंचावन्न टक्के आहेत.
जगभर ग्रामीण भागातून शहरांकडे रोजगारासाठी स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असते. मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानीत शहरातील नव्वद टक्क्यांहून अधिक लोक स्थलांतरित आहेत. मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी, भंडारी, कुणबी, ख्रिश्चन हे गावठाणापुरते मर्यादित आहेत. त्यांपैकी मुंबईच्या व राज्याच्या प्रशासनात कोणालाही प्रतिनिधीत्व नाही, ही वस्तुस्थिती खेदजनक आहे.
– ॲण्ड्र्यू कोलासो 9764992768 saptahik.janpariwar@gmail.com
(जनपरिवार, वसई. 13 फेब्रुवारी 2023 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
———————————————————————————————-