बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील कागदपत्रांचा संग्रह (Ambedkar’s handwritten diaries and other material preserved in Siddharth College archives)

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रे रासायनिक प्रक्रियेने सुरक्षित करून जतन करण्याची योजना सिद्धार्थ महाविद्यालयाने हाती घेतली आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या टिपाटिप्पणी, नोंदी, प्रदीर्घ लेखन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे; बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील या टिपणी कशा कशाच्या असाव्यात ! रिपब्लिक शब्दाच्या अर्थच्छेदापासून व्हायोलिन वाद्याची स्वरलिपी… एवढेच काय, पत्नीच्या बाळंतपणानिमित्ताने केलेल्या मॅटर्निटी नोट्स असे विविध तऱ्हेचे साहित्य त्यात आहे. बाबासाहेबांच्या डायऱ्या, सुटे कागद असे काय काय साहित्य त्या ठिकाणी बांधीव स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यावरून बाबासाहेबांच्या अफाट ज्ञानकक्षेचा अंदाज जसा येतो तसे त्यांचे व्यक्तिगत छंद व चौकस बुद्धी हे गुणही आकळून जातात.

सिद्धार्थ कॉलेजला हे शक्य झाले ते श्रीपाद हळबे या अर्थ व विधी क्षेत्रातील व्यावसायिकाने दिलेल्या देणगीमुळे. हळबे यांच्या दातृत्वाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे हळबे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सिद्धार्थ कॉलेजला अर्थसहाय्य केले व त्यातून हे संग्रहकार्य घडवून आणले. संग्रहविद्येचे जाणकार अमोल दिवकर हे त्यांच्या साथीदारांसह हे काम हळबे यांच्या वतीने गेले काही महिने करत आहेत. कॉलेजच्या ग्रंथपाल चैताली शिंदे म्हणाल्या, की बाबासाहेबांच्या हस्तलेखनापैकी बरेचसे काम यात होत आहे. तरी बाबासाहेबांचा लेखन व विविध वस्तुसंग्रह एवढा मोठा होता, की ते काम बराच काळ चालू ठेवावे लागेल. हळबे यांच्या देणगीने त्या खोळंबलेल्या कामास गती मिळाली. लेखन साहित्याच्या स्कॅनिंगचे काम आठवडाभरात सुरू होईल.

आंबेडकर यांच्या कागदपत्रांच्या या संरक्षणकार्याची महती कॉलेजचे प्राचार्य अशोक सुनतकरी यांनी, त्यापुढे जाऊन यथार्थ वर्णन केली. ते म्हणाले, की हा तर फक्त आरंभ आहे ! सिद्धार्थ कॉलेजला जवळ जवळ आठ दशकांचा इतिहास आहे. स्वतः बाबासाहेब कॉलेजशी स्थापनेपासून संलग्न होते. त्यांची अनेकानेक पुस्तके कॉलेजच्या संग्रही आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांचा एकूण साठा एक लाख चाळीस हजार इतका आहे. किंबहुना कॉलेजच्या प्रत्येक गोष्टीशी बाबासाहेबांचा संबंध आहे. त्यांचा वावर या साऱ्या इमारतभर झाला आहे आणि त्याच्या खुणा जपाव्या अशा आहेत.

सुनतकरी यांनी त्याच ओघात कॉलेजमध्ये सोमवारी होत असलेल्या मोठ्या बैठकीच्या सुखद वार्तेचा उल्लेख केला. ते म्हणाले, की कॉलेजच्या इमारतीचा पुनर्विकास, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण आणि संशोधन कार्य अशी तीन कामे साधण्यासाठी गेल्या वर्षभरात आम्ही तीन प्रस्ताव तयार केले. इमारत पुनर्विकासासाठी सुमारे वीस कोटी रुपये, ग्रंथालयासाठी चौतीस कोटी रुपये आणि संशोधन कार्यासाठी दहा कोटी रुपये अशा रकमांची गरज आहे असे ध्यानात आले आहे. ते प्रस्ताव आम्ही वेगवेगळ्या सरकारी खात्यांना देतच होतो. योगायोग असा, की तेवढ्यात पार्लमेंटरी कमिटी फॉर एससी अँड एसटीचे अध्यक्ष खासदार किरीट सोळंकी काही निमित्ताने कॉलेजमध्ये आले. त्यांनी कॉलेजचा इतिहास जाणला, कॉलेजमधील खजिना पाहिला आणि ते विलक्षण प्रभावित झाले. त्यांनी पंतप्रधानांकडे शब्द टाकला. त्यानुसार संसदेची एक कमिटी या कामाचा अंदाज घेण्यासाठी निर्माण झाली आहे आणि ती कमिटी सोमवारी, 28 ऑगस्टला कॉलेजच्या इमारतीची व संग्रहाची पाहणी करणार आहे. त्यातून सरकार कॉलेजला काय प्रकारे अर्थसहाय्य करू शकेल ते स्पष्ट होईल.

सुनतकरी म्हणाले, की आमचे कॉलेज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आहे. तिचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आहेत. त्यांचे मार्गदर्शन या प्रकल्पाला आहेच. आम्ही सगळे कर्मचारी स्वयंसेवकाच्या भावनेतून हा वारसा राखण्याचे काम करू पाहत आहोत. सुनतकरी दोन वर्षांपूर्वी प्रभारी प्राचार्यपदी आले. मात्र ते सिद्धार्थ कॉलेजात एकवीस वर्षांपासून शिकवत आहेत.

श्रीपाद हळबे यांनी दिलेल्या देणगीतून जे कार्य झाले त्याचे अवलोकन ते, त्यांची बहीण डॉ. सुलभा या दोघांनी व अन्य निमंत्रितांनी गेल्या आठवड्यात केले तेव्हा ते सारे लोक बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील नोंदी पाहताना थरारून गेले. तो एक छोटासा समारंभच होऊन गेला. हस्तलिखितांबरोबर काही मुद्रित साहित्यही तेथे होते. त्यात घटनेची मूळ प्रत पाहण्यास मिळाली ! समारंभास निवृत्त ग्रंथपाल श्रीकांत तळवटकर हे आले होते. त्यांनी कॉलेज ग्रंथालयाचा गेल्या साठ-सत्तर वर्षांचा इतिहास उलगडून सांगितला; ग्रंथपाल शां.शं. रेगे यांच्यामुळे या साऱ्या गोष्टी इतक्या जपल्या गेल्या हे त्यांनी मुद्दाम नमूद केले. ते म्हणाले, की आंबेडकर यांच्या काळातील हँडबिल्स, पँम्फ्लेट्स असे साहित्य जपून ठेवले आहे. चैताली म्हणाल्या, की कोणकोणत्या कोपऱ्यातून काय काय दुर्मीळ गोष्टी मिळतात; त्याला बाबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे ही मोठीच अनुभूती असते !

प्राचार्य अशोक सुनतकरी 9594909337

टीम थिंक महाराष्ट्र ———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here