ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)

0
121

ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले. मश्रुबेन यांनी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या मृत्यूनंतर, 1946 मध्ये तेथे ‘ट्रस्ट’ स्थापन केला. त्या ट्रस्टमार्फत महिला आणि बाल कल्याण हाच त्यांच्या आचार-विचार-चिंतनाचा केंद्रबिंदू राहिला.

त्यांच्या प्रमाणे त्या वेळी अनेक स्त्रियांनी अनाथ बालकांसाठी, विधवा (बालविधवा), घटस्फोटिता, निराधार स्त्रिया यांच्यासाठी गांधीजींच्या प्रेरणेने कामे केली. कोकणात इंदिराबाई हळबे, नागपूरला कमलाबाई होस्पेट, आदिवासींसाठी झटणाऱ्या अनुताई वाघ, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक ही नावे त्यात अग्रणी म्हणून सांगता येतील. गांधीजींच्या पंचकन्यांमध्ये ताराबेन मश्रुवाला यांचा समावेश आहे.

मश्रुवाला (कुटुंब) हे मूळ सुरतचे व्यापारी. ते व्यापाराच्या निमित्ताने मुंबईला व त्यानंतर अकोला… असे महाराष्ट्रात आले व येथेच स्थिरावले. त्यांचा संबंध गांधीजींशी आला. संपूर्ण मश्रुवाला कुटुंबच ‘चले-जाव’ चळवळीत सामील झाले होते. ताराबेन यांची वयाच्या बाराव्या वर्षी गांधीजींशी पहिली भेट झाली. त्यांचे नेतृत्व आणि कस्तुरबांचा सहवास त्यांना आयुष्यभरासाठी विधायक कार्याची प्रेरणा देऊन गेला. त्या बापूंची भजने, संतवाणी, प्रार्थना आवडीने म्हणत. ताराबेन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोल्याच्या राष्ट्रीय शाळेत झाले. त्यांचे उच्च शिक्षण अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात झाले. ताराबेन यांना तीन बहिणी. मोठ्या सख्ख्या बहिणीचे- सुशिलाचे लग्न गांधीजींचा मुलगा मणिलाल याच्याशी झाले. चुलत बहीण निर्मलाचे लग्न रामदास याच्याशी (गांधीजींचा धाकटा मुलगा) झाले. तिसरी बहीण अविवाहित राहिली. त्यांनी (तिने व मी) स्वत:ला समाजकार्याशी जोडून घेतले.

किशोरीलाल मश्रुवाला हे ताराबेन यांचे काका. ते गांधीजींच्या कार्याशी कायम जोडले गेले होते. महादेवभाई देसाई हे गांधीजींचे स्वीय सचिव होते. त्यांच्यानंतर किशोरीलाल हे गांधीजींच्या स्वीय सचिवपदाचे काम करत.

ताराबेन या ‘माधान कस्तुरबा आश्रमा’च्या संस्थापक. त्यांनी हजारो निराधार स्त्रियांना, मुलींना, अनाथ बालकांना आभाळभर माया दिली. त्यांनी ‘माधान आश्रम’ त्रेपन्न वर्षे (1946 ते 1999) सातत्याने चालवला. शिक्षणमंत्री पंजाबराव देशमुख यांनी आश्रमाला माधान गावाबाहेर खूप मोठी जमीन दिली आणि मोठी शाळा व दवाखाना बांधण्यासाठी आर्थिक तरतूदही केली. शिवाय, एका धनिक दानशूर व्यक्तीने सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी सांभोरा खेड्यानजीकची तेरा एकर जमीन ताराबाईंच्या आश्रमाला दान दिली.

ताराबेन यांची गांधीजींच्या सहवासात धारणा बनली होती, की प्रत्येक स्त्रीमध्ये अतूट अशी शक्‍ती असते. त्यांना लाजणे-रडणे-रुसणे मान्य नव्हते. प्रत्येकीने आलेल्या प्रसंगाला तोंड निर्भयपणे दिले पाहिजे. त्यातून तिचे कर्तृत्व सिद्ध होते. त्यांनी स्वत: त्यांच्या आत्मबळ आणि इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर ‘कस्तुरबा आश्रम’ नावारूपाला आणून कित्येक महिलांना स्वावलंबनाचे धडे दिले. त्यांनी निराधार-अनाथ मुलांची आई बनून त्या बालकांना सक्षम बनवले. असंख्य बालमेळावे, शिबिरे घेऊन त्यांना सामाजिक जाणीवजागृतीची शिकवण दिली.

गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांचा ताराबेन यांच्यावर लोभ होता. ते अधुनमधून ‘माधान कस्तुरबा आश्रमा’ला भेट देत- मदत करत; आश्रमातील स्त्रियांचे मनोबल वाढेल असा सुसंवाद करत. ताराबेन यांनी त्यांच्या व अनेक दात्यांच्या मदतीने त्या जागेत सूतिकागृह काढले, आरोग्य सेवा केंद्र सुरू केले, बालवाडी-अंगणवाडी-प्राथमिक शाळा यांच्या रूपाने शैक्षणिक कार्य तेथे उभे राहिले, मात्र त्यांना त्या आश्रमशाळा उभी करू शकल्या नाहीत याची खंत अखेरपर्यंत होती. त्यांनी गांधीजींचीच जीवनमूल्ये, पण वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेत रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सांगण्याचा, साध्या राहणीचा प्रभाव जनमानसावर पडत असे.

गांधी जन्मशताब्दी 1969 साली होती, त्या वेळी ताराबेन यांनी स्त्रियांची अनेक शिबिरे वेगवेगळ्या गावी, वेगवेगळ्या ठिकाणी घेतली. स्त्रियांच्या सोयीने प्रभात फेरी काढणे, वेगवेगळ्या पद्धतीचे- कार्यक्रमांचे नियोजन करणे, त्यात भजन, प्रार्थना, कीर्तन, भारुडे, विविध प्रकारचे स्त्रियांचे खेळ, ग्रामसफाई, गोष्टी, गाणी असे सांस्कृतिक कार्यक्रम असत. त्यामुळे स्त्रिया दैनंदिन व्यवहारातून थोड्या मुक्त होत. त्यांना एकमेकींचा परिचय होई. एकमेकींच्या सुखदु:खाची वाटणी होई. त्यातून त्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होई. सर्वसामान्य गृहिणींची शिबिरे, शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील अशी शिबिरे- मेळावे यांचेही नियोजन केले जाई. बालआनंद मेळाव्यांसाठी कवी-लेखकांना, त्यांच्यासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना बोलावले जाई. शाळा-शाळांमध्ये जाऊन बालमेळाव्यांचे आयोजन केले जाई. शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी त्या मेळाव्यांची दखल घेतली. तसेच, ग्रामीण भागात ‘माधान’च्या लोकांनी, सधन शेतकऱ्यांनी, आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी सढळ हातांनी मदत केली. चांदूरबाजार या गावी सात हजार शालेय मुलांची शोभायात्रा काढली गेली. तेवढ्या मुलांनी एका सुरात-तालात गीते म्हटली. प्रार्थना झाली, स्फूर्तिगीते, समरगीते होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचेही नियोजन नीट केले गेले. ताराबेन म्हणतात, “एवढे सगळे केले, पण त्यासाठी पैसा कधी कमी पडला नाही !”

ताराबेन यांनी ‘माधान कस्तुरबा आश्रम’ काढल्यापासून खूप ‘आपली माणसं’ – आश्रमाला सदैव ‘आपला’ मानणारी- जवळ केली होती. त्यांत अमरावतीच्या दुर्गाबाई जोग, डॉ. ध्रुवभाई मांकड, कौसल्याबाई मानकर, कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, सरोजिनी नायडू, राजेंद्रबाबू प्रसाद, राजगोपालाचारी, ताराबाई मोडक, दाजी पटवर्धन, जानकीदेवी बजाज, अकोल्याच्या मनुताई भागवत, सुभद्राबाई काशीकर, शांता भट, कृष्णा भावे, कमला लेले, सुशीलाबाई जोशी, मीरा उखळकर, सदानंद उखळकर. भाई धोत्रे- अलका धोत्रे, शांताबाई आणि भाऊसाहेब अत्रे, साधना आणि बाबा आमटे, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे मनोहर दिवाण, ठक्कर बाप्पा, मालती थत्ते, डॉ. मोरे व त्यांच्या पत्नी मनोरमाबाई, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रभा राव या आणि इतर कित्येक होते. पैकी पार्वतीबाई पटवर्धन या ताराबेन यांच्या जिवाभावाची मैत्रीण. त्या दोघींनी एकत्र स्वातंत्र्यलढ्यात 1932 साली तुरुंगवास भोगला होता. पार्वतीबाई या दाजी पटवर्धन यांची विधवा बहीण. त्या मवाळ पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या.

ताराबेन यांनी टी.बी.सारख्या असाध्य (त्या वेळी) रोगाशी झगडत, पण तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर स्त्री-मुक्तीचा ध्यास घेऊन, प्रसिद्धिविन्मुख राहून विदर्भातील एका खेड्याचे नंदनवन केले. त्यांनी हजारो भारतीय वृक्षांची लागवड करून सातपुड्याचा डोंगरमाथा-पायथा हा प्रदेश हिरवाईने नटवला. त्यांनी ते कार्य निसर्गाचे सौंदर्य अबाधित राहवे आणि त्या जोडीला स्त्रीला मुक्‍त श्वासासाठी सारे आकाश खुले व्हावे याकरता केले. निराधार अनाथ बालकांना आश्रमात मायेची, घराची ऊब दिली. माणूस म्हणून समाजात स्वाभिमानाने जगण्यास शिकवले. त्यांनी तशा मुलांपैकीच बाळू नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याला शिकवले. त्याला त्याच्या स्वत:च्या पायावर उभे केले. त्याचा संसार थाटून दिला. त्या म्हणत, ‘माझे पहिले अपत्य ‘माधान संस्था’ व दुसरे अपत्य बाळू !’

ताराबेन यांना दलित-मित्र पुरस्कार मिळाला, इंदिरा गांधी यांच्या हस्ते ‘बजाज अॅवार्ड’ मिळाले. तसेच, त्या सावित्रीबाई फुले पारितोषिक, ‘बा-बापू’ पुरस्कार यांच्या मानकरी ठरल्या. त्यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची सर्व रक्‍कम संस्थेच्या कामासाठी खर्च केली. त्या स्वत:चा खर्च त्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पेन्शनमधून भागवत असत. आचार्य कृपलानी त्यांना म्हणाले, “ज्या जगामध्ये गांधीजींचा खून होतो, तेथे आपली निंदा-नालस्ती झाली तर काय नवल आहे?” तो विचार सतत मनात ठेवूनच ती बाई तिच्या वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षांपर्यंत अखंड काम करत राहिली !

– इंदुमती जोंधळे 9689910949 indumati.jondhale@gmail.com 

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here