नव्या मुंबईतल्या ‘करावे’ नावाच्या गावात तांडेल कुटुंबाचा तब्बल चाळीस खोल्यांचा वाडा आहे. सन 1770 च्या सुमारास बांधलेल्या ह्या वाड्याचे सागवानी लाकडाचे बांधकाम सुस्थितीत आहे आणि वाडा नांदता आहे. पूर्वीइतकी माणसे तेथे रहात नसली तरी सामाजिक, धार्मिक उत्सव तिथे उत्साहाने साजरे होतात.
एकत्र कुटुंबपद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेऊनही चार पिढ्या लोटल्या आहेत, तरीही समाजमनाला एकत्र कुटुंब पद्धतीचे एक सुप्त आकर्षण आहे. (या आकर्षणाच्या आधारावरच दूरदर्शन वाहिन्यांवरच्या अनेक मालिकांचे दळण चालू असते.) तांडेल वाड्यातले कुटुंबही विखुरले आहे. तरी सणासुदीला कुटुंबाचे सदस्य एकत्र येतात आणि सण साजरा करतात. जुन्या देशी बांधकामाचा नमुना म्हणूनही ह्या वाड्याचे महत्त्व आहे आणि म्हणून तो जतन करणेही आवश्यक आहे.
‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
– सुनंदा भोसेकर
करावे गावातील तांडेलवाडा
‘करावे’ हे नव्या मुंबईतील एका गावाचे नाव आहे. हे गाव नव्या मुंबईतील इतर गावांप्रमाणेच गगनचुंबी इमारतींनी वेढलेले आहे. नियोजनपूर्वक आखणी केलेल्या, दोन्ही बाजूंना डेरेदार झाडे असलेल्या रस्त्यांवरून अलिशान गाड्या वेगाने धावत असतात. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात गगनचुंबी इमारतींच्या भाऊगर्दीत करावे गावात, एकमेव असा तांडेलवाडा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. नवी मुंबईत अशी काही घराणी आहेत की या घराण्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. कराव्याचे तांडेल घराणे हे त्यापैकीच एक. पत, पैसा आणि कला या सहसा एकत्र न नांदणाऱ्या गोष्टी; परंतु या घराण्यात मात्र त्या हातात हात घालून नांदताना दिसतात. धर्माजी तांडेल हे या कुटुंबाचे मूळ कर्ते पुरूष. या कुटुंबात मागील सुमारे दोनशे वर्षांत बुधाजी धर्माजी, त्रिंबक बुधाजी, गणपत त्रिंबक, मधुकर गणपत अशी अनेक कर्तबगार माणसे जन्माला आली. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेती व स्वत:च्या मालकीच्या मिठागरांवर अवलंबून होता.
या कुटुंबातले कर्ते पुरूष बुधाजी धर्मा तांडेल यांनी सन 1770 च्या सुमारास विस्तीर्ण अशा एक एकर परिसरात हा भला मोठा वाडा बांधला. संपूर्ण सागवान लाकडाचे कोरीव व नक्षीकाम असलेला वाडा उभा आहे. तांडेल कुटुंबाच्या पिढ्यांना अडीचशे वर्षांहून अधिक काळ स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या या वाड्याचा रूबाब पोर्तुगीज, इंग्रज व मराठा अशा तिन्ही रियासतींनी जवळून पाहिलेला आहे. नव्या मुंबईतील अनेक मजली इमारतींच्या गराड्यातील ह्या वाड्याचे अस्तित्व म्हणजे अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
वाड्याच्या आतले काही लाकडी खांब पूर्णपणे कोरीव नक्षीकाम केलेले आहेत. खिडक्या व दरवाजे हेदेखील सागवान लाकडाचे आहेत; आणि शाबूत आहेत. ज्यावेळी वाडा बांधण्यात आला त्यावेळी बुधाजी धर्मा तांडेल यांनी दोन विशेष खोल्या बांधल्या होत्या – एक, गणपती उत्सवासाठी तर दुसरी, घरात होणाऱ्या बाळंतिणीसाठी. भल्या मोठ्या कुटुंबाच्या गणपतीसाठी मोठी खोली आवश्यक होती आणि वेगळ्या खोलीत बाळ व बाळंतीण सुखरूप राहत. वाड्यात असणारी लाकडी कपाटेदेखील जणू एखाद्या सिनेमातला सेटच उभा असावा असे पाहताक्षणी वाटते. काही वर्षांपूर्वी या वाड्यात मराठी सिनेमाचे शूटिंगदेखील झाले होते.
तांडेलवाड्यात लहानमोठे असे पन्नासाहून अधिक सदस्य 1980-85 च्या पूर्वी राहत होते. शहराचा विकास होत गेला तसे कुटुंबातील सदस्य इतरत्र राहू लागले. मात्र असे असतानादेखील वाडा काही रिकामा झाला नाही. त्या वाड्यात तांडेल कुटुंबातील लेक विजया दत्तात्रेय तांडेल (सेवानिवृत्त शिक्षिका) ह्या वास्तव्याला आहेत. त्यांच्या सोबत घरकाम करणारी अशी मोजकीच माणसे राहत आहेत. वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे वाड्यात शंभराहून अधिक माणसे बसतील अशी प्रशस्त ओटी आहे. ही ओटी एकदम सुस्थितीत आहे. त्यामुळे तिथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादश्यांना तांडेलवाड्यात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच, आज जरी कुटुंबातील सदस्य तांडेलवाड्यात राहत नसले तरी भाद्रपद महिन्यातील गणपती उत्सवानिमित्ताने आख्खे तांडेल कुटुंब न चुकता तांडेलवाड्यात एकत्र जमतात.
दोनशे वर्षांपूर्वी लहानमोठ्या तब्बल चाळीस खोल्या असलेल्या, वेगळे स्वयंपाकघर असलेल्या या आलिशान वाड्यात राहणारा माणूस कसा असेल? त्याचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व कसे असेल? ते कोणत्या पट्टीने मोजावे असा प्रश्न पडतो. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवतानाच या गावातील बाळशेठ तांडेल व गणपतशेठ तांडेल या तांडेलबंधूंनी व्यापारउदिमातही नावलौकिक मिळवला. इंग्रज आमदनीत बेलापुरात दोन हजार एकर जागेत मिठाचे उत्पादन घेतले जात असे. मिठाचे उत्पादन व विक्रीसाठी कलेक्टर, महसूल विभाग, ठाणे; यांचा परवाना घ्यावा लागे. हा परवाना काळे मीठ व पांढरे मीठ अशा दोन प्रकारच्या मीठासाठी वेगवेगळा असे. ईस्ट इंडिया कंपनीच्या इसवी सन 1780 च्या बेलापूर फॅक्टरीतील रिचर्ड प्राईसच्या नोंदीनुसार मारवाडी, पारसी, मुसलमान व ब्राह्मण यांचीच या व्यवसायात मक्तेदारी होती; परंतु करावे गावातील या दोन सुपुत्रांनी ती मक्तेदारी कायमची मोडून काढली व अल्पावधीत त्यांची शिलोतरीदार म्हणून गणना झाली (शिलोतरीदार म्हणजे मिठागराचा मालक) आणि करावे गावाला शिलोतरीदारांचे गाव असे नाव पडले. बाळशेठ हे मानी म्हणजे बोऱ्या या मिठागराचे मालक झाले. बाळशेठ हे येथील फार मोठे जमीनदार होते. त्यांची येथे सर्वात श्रीमंत आसामींमध्ये गणना होत असे. हाडाचे नाट्यकलावंत असलेल्या बाळाशेठ यांना सामाजिक कार्याचीही विशेष आवड होती. त्यांची दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती होती. ते सणासुदीला, लग्नसमारंभाला गावातीलच नव्हे तर परिसरातील गरीब व गरजूंना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करत असत. गणपतशेठ हेही ‘कोलजीचा आगर’ या मिठागराचे मालक होते. त्यांची उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून ख्याती होती. त्यांना सामाजिक कार्याचीही विशेष आवड होती. ते गावोगावी होणारे वादविवादही अगदी चुटकीसरशी मिटवत असे त्यांच्या कुटुंबातले सदस्य असलेल्या अॅडव्होकेट विलास तांडेल यांनी सांगितले.
ते म्हणाले, “तांडेलवाडा हा आमच्या पणजोबांनी बांधला होता. वाड्याची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पण गणपती उत्सव ह्याच वाड्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. माझे बालपण ह्याच वाड्यात गेले. वाड्यात आमच्या अनेक पिढ्यांच्या आठवणींचा ठेवा दडून राहिला आहे.”
विकासाच्या रेट्यामध्ये अशा वास्तू हळूहळू दुर्मीळ होत चालल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि प्रत्येकाला आपापला अवकाश हवासा वाटत असल्यामुळे त्यांची आवश्यकताही राहिली नाही; पण तरीही जनसामान्यांना त्यांची अपूर्वाई वाटते. त्यामुळेच गणपतीच्या दिवसांत करावे गावातील तांडेलवाड्यात आजूबाजूच्या लोकांची गर्दी जमते.
– शुभांगी पाटील-गुरव 8369963477shubhpatil.29@gmail.com