ज्येष्ठ आणि साक्षेपी वैयाकरणी, यास्मिन शेख यांनी 21 जून रोजी, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या तल्लख आणि कार्यमग्न आहेत. व्याकरण आणि भाषाशास्त्र हे त्यांच्या आयुष्यभराच्या ध्यासाचे विषय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू म्हणजे परिपूर्णत्वाचा ध्यास आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांनी सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार यांच्या सोयीसाठी ‘मराठी शब्दलेखन कोश’ तयार केला. राज्य मराठी विकास संस्थेसाठी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ तयार केली. त्यांनी वृत्तपत्रांमधून भाषाविषयक लेखन केले. शेखबाईंच्या हाताखाली काम करणाऱ्या शिरीन कुलकर्णी यांनी बाईंकडून लाभलेल्या ज्ञानकणांविषयी कृतज्ञतेने आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे...