आसोंडमाळावरील उद्योजक – ज्योती रेडीज (Jyoti Redis-Lady with industry in moorlands of Dapoli)

ज्योती रेडीज या सर्वसामान्य स्त्रीने आसोंडमाळावर बागायती व इतर उद्योगव्यवसाय यांचे नंदनवन उभे केले, त्याची ही कहाणी. आसोंड हे गाव दापोली तालुक्यातील दाभीळ या गावापासून अठरा किलोमीटर दूर आहे. ते दापोलीपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. खुद्द आसोंडमाळ हा आसोंड गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. तेथे मोठमोठी जंगली झाडे नव्हती. पण बारीकसारीक झुडुपे, काटेरी झाडे व करवंदीच्या जाळ्या यांचे साम्राज्य होते; साप-विंचू असे सरपटणारे व वनगायी-ससे-कोल्हे-रानडुकरे असे जंगली प्राणी यांचा मुक्त वावर होता. मानवी वस्ती माळावर नव्हती, पण ज्योती रेडीज यांनी त्यांच्या व्यवसायाचा घाट त्या भयाण व उजाड माळरानावर घातला. ते साल होते 1988. त्यांनी तो व्यवसाय यशस्वीही केला आहे. त्यांना विंचूदंश पाच वेळा झाला, परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी माळावरील साडेचार एकर उजाड शेतजमीन आंबा, काजू, कलिंगड, भाजीपाला लावून लागवडीखाली आणली. त्या कलिंगडांचे पाच ते सहा टन व भाज्यांचे चार ते पाच टन उत्पादन दरवर्षी घेत असत. ज्योती यांचे लहानसहान उद्योग आसोंडमाळावर स्थिरावले आहेत. त्यात एक टन आंबारसाचे कॅनिंग करणे, पन्नास टन काजूबियांवर प्रक्रिया करणे, तीन टन तिळगूळ करणे, पाचशे किलो आमसूल बनवणे यांचा समावेश आहे.

ज्योती रेडीज या पूर्वाश्रमीच्या ज्योती पांडुरंग शिरगावकर. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1961 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावी झाला. ज्योती या पाच भावंडांपैकी चौथे अपत्य. त्यांच्या आईचे नाव जयश्री. त्या व्हर्नाक्युलर फायनल पर्यंत शिकलेल्या होत्या. त्या शिवणकाम उत्तम करत, मुलांचा अभ्यास घेत. त्या घरातील छोटे किराणा दुकानही सांभाळत. वडिलांचे मोठे किराणा दुकान बाजारपेठेत होते. वडिलांनी पूर्वी मुंबईत एका डॅाक्टरच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून काम केले होते. ते त्या अनुभवाच्या जोरावर गरजू लोकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची ऊठबस त्यांच्या घरात नेहमी असे. ज्योती यांनी घरात शिक्षणाला अनुकूल वातावरण असूनही फक्त बारावी कॅामर्सपर्यंतच शिक्षण घेतले.

     ज्योती यांचे लग्न दापोली तालुक्याच्या दाभोळ या गावातील होमिओपॅथिक डॅाक्टर लीलाधर शिवराम रेडीज यांच्याशी 1985 साली झाले. लग्न पारंपरिक पद्धतीने ठरले होते. आईवडिलांना मुलगा पसंत नव्हता, पण ते मुलीच्या पसंतीच्या आड आले नाहीत. लग्नानंतर ज्योती यांचे केवळ आडनाव बदलले नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्वही बदलून गेले! ज्योती यांना त्यांचा जोडीदार निवडीचा निर्णय चुकला याची जाणीव लग्नानंतर काही दिवसांतच झाली. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वतःची आहे याचे भान ठेवून, त्यांनी परिस्थितीला सामोरे जाण्याचा निश्चय केला.

लीलाधर यांनी दाभोळ व जवळच्या दाभीळ या दोन गावांत प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यांच्या स्वभावात काही गाठी होत्या. (त्यांचा ज्योती यांच्या कामातही अनेकदा अडथळा आला) त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने लीलाधर यांचा संपूर्ण आर्थिक आधारच काढून घेतला. दोघे अक्षरशः उघड्यावर आले. त्यांना दाभोळ सोडावे लागले. पण ती दोघे त्या धक्क्यातून लवकरच सावरली. ते दाभीळ या गावी स्थलांतरित झाले. तेथे डॅाक्टरांची प्रॅक्टिस चांगली चालू लागली. दोघांनी तेथे नवा संसार मांडला. मात्र डॅाक्टरांच्या कमी पैशांत सेवा देण्याच्या धोरणामुळे उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसेना.

दाभीळ हे खाडी किनाऱ्यावरील मुस्लिमबहुल छोटे गाव आहे. ते मुख्य शहरापासून दूर असले तरी गावात मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात होत्या. गावाची आर्थिक परिस्थिती चांगली होती, स्थानिक बाजारपेठ विकसित झालेली होती. ज्योती यांच्यामधील उद्यमशील व्यक्तिमत्त्व त्या वातावरणात जागे झाले. त्यांचे व्यवसाय अंगभूत कौशल्यांच्या आधारे करण्याचे निरनिराळे प्रयोग सुरू झाले. त्यांनी आलेपाक तयार करून विकण्याचा व्यवसाय उपलब्ध भांडवलाच्या आधारे प्रथम सुरू केला. जमलेल्या पैशांतून घरातील प्रमुख गरज म्हणून फ्रीज विकत घेतला आणि पेप्सी तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून आलेल्या पैशांतून व आईच्या मदतीने शिवणयंत्र विकत घेऊन शिवण उद्योग सुरू केला. आर्थिक घडी बसत गेली. ज्योती यांना नवनवे व्यावसायिक प्रयोग खुणावू लागले.

लीलाधर यांची प्रॅक्टिस आणखी तीन-चार गावांत वाढली होती. त्यांचेही उत्पन्न वाढत होते. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर 1988 साली आसोंडमाळावर साडेचार एकर शेतजमीन विकत घेतली. ती घटना ज्योती यांच्या पुढील उद्योगांसाठी पायाभूत ठरली. त्याच काळात, त्यांना अनुप हा मुलगा झाला. घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळणे, अगोदर सुरू केलेले व्यवसाय सांभाळणे, जमिनीची देखभाल करणे यांत ज्योती यांची तारांबळ होऊ लागली. लीलाधर यांची त्या कामांत काहीही मदत होत नव्हती.

माळावर पाण्याची सोय नव्हती. निवाऱ्याला साधे झोपडे नव्हते. वीज तर नव्हतीच. ज्योती घरातील कामे सकाळी आटोपत, छोट्या अनुपला सोबत घेऊन एस टी.ने दाभीळहून माळावर जात. दिवसभर तेथे राबत. संध्याकाळच्या शेवटच्या एस. टी.ने दाभीळला परत येत. त्यांचा हा नित्यक्रम अनेक दिवस चालू होता. त्यांच्या शेतजमिनीचे रंगरूप अत्यंत खडतर मेहनतीनंतर बदलू लागले. जागेवर लाकडी खांब व तारेचे काटेरी कुंपण दिसू लागले. कुंपणाच्या बाजूने सुरूची झाडे उभारी घेऊ लागली. झाडी-झुडुपे काढून जागा साफ झाली. तेथे आंबा व काजू यांची रोपे अंग धरू लागली. लाकूड व नारळाचे झाप वापरून बांधलेले झोपडेही त्याची मिजास दाखवू लागले. झोपड्याला लागून तयार केलेल्या शेडमध्ये दोन म्हशी आल्या. बिऱ्हाडाचा मुक्काम दाभीळातच होता, पण ज्योती यांचा माळावरील झोपड्यातील मुक्काम वाढत चालला.

ज्योती यांनी लहानग्या अनुपला सोबत घेऊन एखाद्या भयकथेत वर्णन करता येईल अशा त्या भयाण एकाकी माळावर एकलकोंड्या झोपड्यात मिट्ट काळोखाला आव्हान देऊ पाहणाऱ्या कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात कितीतरी रात्री काढल्या आहेत! म्हशींची देखभाल करणारा गडी किंवा कामकरी मावशी रात्री त्यांच्या सोबतीला कधी असायची. त्यांनी आंबा, काजू यांच्या लागवडीसोबत मोकळ्या जागेत भाजीपाला व कलिंगडे लावली. माळावरील वनगायी, ससे, कोल्हे, रानडुकरे, मोर यांचा उपद्रव होत असे, त्यासाठी रात्री राखण करावी लागे.

झाडांना पाणी थोड्या दूर असलेल्या ओहोळातून पत्र्याच्या डब्यांतून आणून घालावे लागे. काही काळानंतर, त्यांनी जागेत विहीर खणली. विहिरीला पाणी लागले. ज्योती यांच्या वडिलांनी डिझेल पंप घेऊन दिला. काम थोडे सोपे झाले. त्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका खूप वाढला. कलिंगडे व भाज्या यांचे उत्पादन टनांत येऊ लागले. ज्योती यांनी एकटीने मचाण बांधून रात्रीची राखण कित्येक वेळा केली आहे.

        रेडीज कुटुंब आसोंडमाळावरच्या घरात 1993 सालापासून कायमस्वरूपी येऊन राहू लागले. तात्पुरत्या झोपड्याचे रुपांतर मातीच्या घरात झाले होते. त्यांना अजून एक मुलगा झाला. त्याचे नाव चिनार. लीलाधर यांनी माळावरील घरातही दवाखाना चालू केला. दाभीळ व इतर गावांतील प्रॅक्टिस चालूच होती. ज्योती यांच्या व्यवसायांतही आर्थिक स्थिरता येत गेली.

त्यांनी म्हशी विकून जर्सी गायी विकत घेतल्या. दूध व्यवसाय वाढवला. दुधाचा खवा करून विकणे, गावठी तूप करून विकणे हे उद्योग सुरू केले. दोन वर्षे आईस्क्रीम करून विकण्याचाही व्यवसाय करून पाहिला. बकरीपालन केले. त्यांनी आंबा व काजू रोपे तयार करण्याचा नर्सरी (रोपवाटिका) व्यवसाय 1995 ते 2000 या काळात केला. त्यांनी सुमारे एक लाख रोपे विकली. त्या व्यवसायाने त्यांना चांगले उत्पन्न दिले. आंबा-काजूची भरपूर लागवड सभोवतालच्या परिसरात झाल्यावर रोपांना मागणी कमी झाली; तेव्हा त्यांनी तो व्यवसाय थांबवला.

ज्योती यांनी गांडूळखत निर्मितीचा व्यवसाय 2001 साली सुरू केला. त्या पन्नास टन गांडूळखत दरवर्षी विकत होत्या ! त्यांनी तो व्यवसाय 2010 साली बंद केला. निर्मल दीपक दाभोळकर ही महिला ज्योती यांच्याकडे सुरूवातीपासून मजुरीचे काम करत होती. निर्मल यांनी ज्योती यांच्याकडून स्फूर्ती घेतली आणि त्यांनी स्वतःच्या घरी पतीच्या मदतीने गांडूळखत निर्मितीचा व्यवसाय 2011 पासून सुरू केला. त्या पाच टन गांडूळखत तयार करून दरवर्षी विकत असतात.

          ज्योती यांनी मकर संक्रांतीसाठी तिळगूळ तयार करून विकण्याचा व्यवसाय 2006 साली सुरू केला. पन्नास किलो तिळगूळापासून सुरू झालेला तो व्यवसाय 2023 सालात तीन टनांपर्यंत पोचला आहे ! ज्योती यांचा मोठा मुलगा अनुप त्यांना व्यवसायात मदत करतो. हे व्यवसाय अनुपकडे हळूहळू हस्तांतरित होतील. लीलाधर यांचे निधन 18 फेब्रुवारी 2017 रोजी झाले.

          खेड्यात जन्मलेल्या ज्योती यांनी शहराच्या प्रलोभनाकडे पाठ फिरवली. त्या खेड्यात टिकून राहिल्या. त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची मशागत केली. आसपासच्या गावांतील पंधरा जणांना कायमस्वरूपी रोजगार दिला. त्या त्यांच्या कुटुंबांचा आधारस्तंभ बनल्या. त्यांनी पूर्वानुभव नसताना प्रयोग करत, शिकत व्यवसाय केले. त्यांची उद्यमशीलता अफाट आहे.

         जो व्यवसाय करून फायदा मिळेल तो चालू ठेवायचा. व्यवसाय तोट्यात जात आहे असे दिसले तर थांबवायचा. उत्पादनाचा दर्जा उत्तमच ठेवायचा. सरकारी योजनांवर अवलंबून राहायचे नाही. बँकेकडूनही कर्ज काढायचे नाही. गरज लागली तर जवळचे सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेतून कर्ज काढायचे. ते लवकरात लवकर फेडायचे. हे त्यांचे व्यवसायाचे धोरण राहिले.

         ज्योती यांच्या कामाचा अजून एक विलक्षण पैलू आहे. डॅा. लीलाधर यांना स्त्रियांच्या प्रसूतीही कराव्या लागत. ज्योती त्या कामातही त्यांना मदत करत. त्या लीलाधर यांच्याकडून शिकून व पाहून स्त्रियांची प्रसूती करण्यातही तरबेज झाल्या. डॅाक्टरांना अनेक वेळा व्हिजिटला जावे लागे. डॅाक्टर नसताना प्रसूतीची केस आली तर ज्योती सराईतपणे एकट्या प्रसूती करायच्या ! त्यांनी प्रसूती करण्याचा हा सिलसिला आसोंडमाळावरही 2005 पर्यंत चालू ठेवला. त्यांनी एकट्याने शंभराच्या वर प्रसूती केल्या आहेत.

          सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्री आव्हानात्मक परिस्थितीत स्वतःच्या हिंमतीवर अनेक प्रयोग करत धडपडी उद्योजक बनते, ज्योती यांचा तो प्रवास स्तिमित करणारा आहे.

(हा लेख लिहिण्यासाठी सुप्रिया पाटणकर यांची मदत लाभली.)

ज्योती रेडीज 8698174150

–  विद्यालंकार घारपुरे 9420850360 vidyalankargharpure@gmail.com

———————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. कौतुकास्पद,परिस्थिती सुप्त गुणांना पैलू पाडते। 👍🌷

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here