देगावच्या वहिनी – इंदिराबाई गोंधळेकर (Indira Gondhlekar – Progressive Lady from Degav)

0
322

दापोली तालुक्याच्या देगाव गावात गणपतीचे, व्याघ्रेश्वराचे आणि ग्रामदेवता झोलाई देवीचे अशी तीन मंदिरे आहेत. पैकी झोलाईच्या देवळात मासिक पाळी येणाऱ्या मुलींनी, स्त्रियांनी कधीही (पाळी नसताना देखील) जायचे नाही असा दंडक होता. गावातील स्त्रियांकडून त्या नियमांचे पालन केले जात असे. गावाबाहेर, आजूबाजूला डेरेदार वृक्ष असलेल्या शांत-निवांत परिसरातील त्या देवळात जाण्यास आपल्याला बंदी का? आपण जायचेच, तेसुद्धा लपूनछपून नाही तर राजरोस जायचे, असे नुकतीच पाळी येऊ लागलेल्या एका शाळकरी मुलीने ठरवले. तिने त्या देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतले. घंटा वाजवली. बंदी हुकूम मोडला गेल्याचे गावांतील स्त्रियांनी पाहिले. तिच्या त्या कृत्याबद्दल गावकीची पंचायत भरली. गावकऱ्यांना चिंता देवीचा कोप होणार- गावावर संकट येणार अशी लागली. त्या वेळेस तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या देगांव गावातील इंदिराबाई गोंधळेकर. त्यांना संपूर्ण गाव ‘वहिनी’ म्हणूनच संबोधायचे. इंदिराबार्इंनी त्या वेळी ‘त्या शाळकरी मुलीने देवीचा कोप होईल अशी कोणतीच चूक केली नाही’ असे ठाम प्रतिपादन केले. तसेच, त्यांनी ती बंदी उठवण्याबाबतदेखील गावकऱ्यांचे मतपरिवर्तन केले. त्यांनी स्त्रीची मासिक पाळी व देवीचा रोष, गावावर कोप यांचा कोणताही संबंध नाही हे साऱ्यांना पटवून दिले. परिणामी, झोलाई देवीचे देऊळ सर्व वयांच्या स्त्रियांसाठी तेव्हापासून कायमचे खुले झाले ! एक अनाठायी अंधश्रद्धा कायमची मोडून काढली गेली. ती मोडून काढणारी स्त्री होती देगाव गावाचा आदर्श; आरोग्याचा, बुद्धिमत्तेचा, सुधारक, पुरोगामी विचारांचा ‘आयकॉन’ इंदिराबाई गोंधळेकर तथा वहिनी !

इंदिराबाई यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील सांसवणे गावच्या फडणीस कुटुंबात 30 नोव्हेंबर 1913 रोजी झाला. त्या विष्णू रामचंद्र फडणीस यांच्या जेष्ठ कन्या. त्यांचा दापोलीचे विधाधर गणेश गोंधळेकर यांच्याशी विवाह झाला. त्यांच्यावर वीस वर्षांच्या सांसारिक जीवनात पतीच्या सुधारक, पुरोगामी विचारांचा प्रभाव पडला. इंदिराबाईंच्या वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी पतीचे अकस्मात निधन 1949 साली झाले. त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली.

इंदिराबार्इंनी प्रापंचिक जबाबदाऱ्या निभावताना कर्तव्य हीच देवपूजा, माणुसकी हाच धर्म ही मूल्ये आयुष्यभर जपली. ती पुरोगामी विचारांची स्त्री देवळात न जाणारी, पोथ्यापुराणे यांच्या वाटेला न जाणारी, कोणतेही कर्मकांड न करणारी, स्वस्थ बसून राहून जपमाळ न ओढणारी अशी होती. त्यांचा स्थायिभाव सतत कार्यमग्न राहणे हा होता. त्या संसारातून निवृत्त कधी झाल्याच नाहीत ! इंदिराबार्इंच्या घरात माणसांचा मोठा राबता असे. त्या मे महिन्यात येणाऱ्या हापूस आंब्यांचे सर्व व्यवहार-व्यापार, कौटुंबिक जबाबदाऱ्या लीलया सांभाळत. त्यांचा कार्यभाग म्हणजे वर्षभर आंब्यांच्या कलमांची निगराणी, उत्पादन, व्यापार, विक्री; तसेच, अवीट गोडीचा दर्जा कायम राखून उत्पादन वाढवण्यासाठी चौकसपणे नवीन गोष्टी माहीत करून घेणे- शिकणे. इंदिराबाई गरजू कुटुंबाला घासातला घास देत असत. त्या मुंबईतून भाजीचे बी-बियाणे आणून गावातील बायकांना लावण्यासाठी देत. उन्हाळ्यात गावातील विहिरीचे पाणी आटू लागल्यावर स्वतःच्या विहिरीचे पाणी भाजी शिंपण्यासाठी देत.

कोकणातील गावांमध्ये स्पृश्यास्पृश्यता यांचे प्राबल्य होते. इंदिराबार्इंच्या घरातील काही खोल्या शिक्षकांना भाड्याने राहण्यास देण्यासाठी असत. गावातील शाळेत बदली होऊन आलेल्या शिक्षकांची सोय त्यामुळे होत असे. कोणी नवबौद्ध नवीन शिक्षक बदलीद्वारे राहण्यास आले आणि भाडेकरू म्हणून ती व्यक्ती योग्य वाटली तर इंदिराबार्इ – “गुरुजी, राहा येथे आमच्या घरात. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला येथे कसलीच अडचण येणार नाही.” असे सांगत. गावकऱ्यांनी नाके मुरडली तरी त्यांना त्यांच्या घरात सहज सामावून घेत असत. शिक्षक कुटुंबातील मुली-स्त्रियांना घरातील एकमेव न्हाणी घर वापरण्यास देत असत. इंदिराबार्इंनी परसातील पाण्याची विहीर, संडास व घरातील न्हाणी घर येथे स्वच्छता महत्त्वाची मानली ! त्यांनी जात, धर्म नव्हे तर आरोग्य, स्वच्छता व समानता महत्त्वाची ही शिकवण प्रत्यक्षात अंगिकारली होती. त्यांच्या घरी राहत असलेल्या एका शिक्षक दाम्पत्याचा तेरा-चौदा वर्षांचा अडनिड्या वयाचा मुलगा अचानक कशाने तरी बिथरत असे. बेभान होऊन सगळ्या परसावात दंगामस्ती करत धावत असे. अशा वेळी त्याला आवरण्यास दोघेजण बोलावावे लागत. त्याला तो विहिरीजवळ जाऊन रहाटाशी दंगा करू लागल्यावर, पुढील आपत्ती टाळण्यासाठी नाइलाजाने बांधून ठेवत. तो सर्व प्रकार म्हणजे ‘बाहेरची बाधा’ यावर गावकऱ्यांचे शिक्कामोर्तब झाले. इंदिराबार्इंनी त्याच्या आईवडिलांना “त्याला बांधले तरी मारू नका. त्याच्या अंगातली रग जिरवण्यासाठी त्याला मैदानी खेळ खेळण्यास मिळाले आणि त्याचे वय वाढले, की तो आपोआप शांत होईल. बाहेरचे, भूत, गिरा वगैरे काही करू नका” असे बजावले.

इंदिराबार्इंचे पती विद्याधर गणेश गोंधळेकर यांचे निधन 16 फेब्रुवारी 1949 रोजी झाले. मुळात ते पुरोगामी विचारसरणीचे, काळाच्या पुढील विचारांचे, स्पृश्यास्पृश्य भेदभाव न मानणारे होते. ते दापोलीतील श्रेष्ठ समाजसुधारक बाबा फाटक यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात- मेलेल्या गुरांची कातडी सोलण्याच्या कामातही- सहभागी होत असत. इंदिराबार्इंनी पतीच्या निधनानंतर खडतर परिस्थितीतून जाताना त्यांचे पुरोगामी, समतेचे आणि माणुसकीचे विचार स्वत: अंगिकारले. त्यांनी स्वत:च्या मुलांची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना गावातील अनेक गरजू लोकांना आर्थिक मदतीचा आणि आपुलकीचा, मायेचा हात दिला. इंदिराबाई म्हणजे गावात नवीन आलेल्या सासुरवाशिणींची आई, त्यांचे जणू दुसरे माहेर होते. कोणाच्याही कुटुंबात, वाडीत तंटे-बखेडे काही झाले की ते सोडवण्यासाठी, न्यायनिवाडयासाठी त्यांचे घर म्हणजे सर्वांसाठी चावडी होती. इंदिराबाई दुखरे संबंध सुधारण्याचे, दुरावलेली माणसे सांधण्याचे काम सहजतेने करत.

त्यांना आयुर्वेद, औषधी वनस्पती यांचेही ज्ञान होते. त्या गावातील बिनपदवीच्या डॉक्टरच होत्या ! त्यांच्याकडे गावात कोणी आजारी पडले, ताप आला, की गुळवेलीचे सत्त्व, सर्दी-पडसे झाले की आल्याचा तुकडा-चहाची पात, खोकला ढास थांबवण्यासाठी मध-अडुळशाची पाने, पावसाळ्यात येणाऱ्या तापासाठी काढ्यात घालण्यास प्राजक्ताचे पान, खोकल्यासाठी बेहडा अशा औषधांचा बटवा होता. पंचक्रोशीत डॉक्टर नसलेल्या त्या गावात त्यांचा साऱ्यांना आधार होता. देगाव गावात अजूनही जवळपास डॉक्टर, दवाखाना नाही; आजारी, अत्यवस्थ माणसाना उपचारांसाठी दापोली वा अन्य इस्पितळात न्यावे लागते. तेव्हा रुग्णवाहिकेची सोय इंदिराबार्इंचे कुटुंबीय करत असतात.

देगावमधील लक्ष्मी धाकटू जोंधळे, वेणू अनंत भोसले, घाणेकर, लीला गणपत लिंगायत, आनंदी बाबू लिंगायत, ललिता मोरे, गंगा नारायण शिंदे, भागीरथी भोसले, सुमन, मथुरा, पार्वती व प्रभावती शंकर लिंगायत आणि अशा अनेक स्त्रिया वहिनींच्या घराशी जिव्हाळ्याने जोडल्या गेल्या होत्या. नांगरधारी शेतकऱ्यांच्या देगाव गावात त्यावेळी जवळपास सारे निरक्षर होते. इंदिराबार्इ पोटापाण्यासाठी मुंबईला गेलेल्या मुला-माणसांची आलेली पत्रे ग्रामस्थांना वाचून दाखवत. परगावी राहत असलेल्या नातेवाईकांना खुशाली कळवणारी पत्रे लिहून देत. त्यांनी वर्तमानपत्रे वाचून ग्रामस्थांना महत्त्वाच्या घडामोडींबद्दल समजेल अशा रीतीने सांगण्याची जबाबदारी घेतली होती. त्या गावातील मुले शिक्षणाअभावी राहू नयेत यासाठी प्रयत्नशील होत्या. त्या मुलांना शिक्षण द्यावे, मुलांना शेतीच्या कामासाठी शाळा बुडवून घरी बसवू नये यासाठी प्रबोधन करत; शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची विशेष आस्थेने विचारपूस करत; मुलींना शक्य होईल तितके शिकू द्या- लवकर लग्न करून त्यांच्या शिक्षणात खंड पाडू नका अशा अनेक मुद्यांवर मार्गदर्शन स्त्रियांना करत.

त्यांनी देव आहे की नाही, धर्म-रूढी यांची आवश्यकता काय यावर कधीही कोणाशीही चर्चा वा वाद न घालता, निव्वळ स्वत:च्या आचरणातून धर्मसुधारणा, बुद्धी प्रामाण्यवाद यांचे संस्कार समाजावर केले. त्यांनी कधीच कोणालाही कर्मकांड करण्यात शक्ती आणि बुद्धी यांचा अपव्यय करू नका, पोथ्यापुराणे-चरित्रे यांची पारायणे करण्यात वेळ घालवू नका, असे ‘नको’-‘नाही’चे नकारात्मक उपदेश केले नाहीत. ‘काय करू नये’ यावरील उपदेश टाळून ‘काय करावे’ ते स्वत:च्या आचरणातून, न बोलता शिकवणाऱ्या ‘वहिनी’ हा देगाववासीयांचा मोठा आधार व पुढील पिढीसाठी आदर्श होत्या.

गोंधळेकर कुटुंबीयांची समाजसेवेची परंपरा त्यांचा मुलगा मुकुंद गोंधळेकर यांनी ‘राजमाची ग्राम सहाय्य योजना’ व मुलगी स्मिता जोशी यांनी ‘बांधिलकी’ या संस्थांद्वारे पुढे नेली आहे. इंदिरा गोंधळेकर यांच्या नावे देगावात दरवर्षी ‘श्रमप्रतिष्ठा पुरस्कार’ दिला जातो. इंदिराबार्इंचे निधन वयाच्या एकशे एकव्या वर्षी 17 फेब्रुवारी 2015 रोजी झाले. त्यांची प्रकृती, बुद्धी व स्मृती शेवटपर्यंत ठणठणीत होती.

रजनी अशोक देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

—————————————————————————————————–

About Post Author