आर्ट डेको ही वास्तुरचनेची एक शैली आहे. अनेक वास्तुरचना शैलींचा मेळ घालणारी ही शैली विसाव्या शतकाच्या मध्यावर लोकप्रिय झाली. इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबईमध्ये प्रचलित असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या तुलनेत आर्ट डेको ही शैली आधुनिक समजली जात असे. मुंबईमध्ये त्या पद्धतीने बांधलेल्या दोनशे इमारतींची नोंद झाली आहे. आर्ट डेको इमारती असलेला तो सर्व भूभाग 2012 नंतर ‘आर्ट डेको प्रेसिन्क्ट’ म्हणून मान्यता पावला आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. मुंबई हे सर्वात जास्त संख्येच्या, सार्वजनिक सहभाग असलेल्या आर्ट डेको इमारती असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून मान्यता पावले आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतील मायामी शहर आहे...