आर्ट डेको ही वास्तुरचनेची एक शैली आहे. अनेक वास्तुरचना शैलींचा मेळ घालणारी ही शैली विसाव्या शतकाच्या मध्यावर लोकप्रिय झाली. इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबईमध्ये प्रचलित असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या तुलनेत आर्ट डेको ही शैली आधुनिक समजली जात असे. मुंबईमध्ये त्या पद्धतीने बांधलेल्या दोनशे इमारतींची नोंद झाली आहे. आर्ट डेको इमारती असलेला तो सर्व भूभाग 2012 नंतर ‘आर्ट डेको प्रेसिन्क्ट’ म्हणून मान्यता पावला आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. मुंबई हे सर्वात जास्त संख्येच्या, सार्वजनिक सहभाग असलेल्या आर्ट डेको इमारती असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून मान्यता पावले आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतील मायामी शहर आहे.
वास्तुरचनेच्या या शैलीची आणि या शैलीत बांधलेल्या मुंबईतील इमारतींविषयी शर्मिला फडके यांनी लेखात माहिती दिली आहे.
– सुनंदा भोसेकर
आर्ट डेको, मुंबई
मुंबईतील, किंवा बाहेरून मुंबईत येणार्या कोणालाही सर्वात मोहात पाडणारा, मुंबई शहराचे व्यक्तिमत्त्व ज्यात सामावलेले आहे असा भाग म्हणजे मरीन ड्राइव्ह. प्रशस्त, सदैव वाहत्या रस्त्याच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्राला कवेत घेतलेला देखणा ‘प्रोमेनेड’ आणि दुसर्या बाजूला शतकभराहूनही जास्त वयाच्या, अजूनही स्वत:चे सौंदर्य व शान टिकवून असलेल्या इमारतींची रांग ! चौपाटी, नरीमन पॉइंटपर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा हा रस्ता, तो मध्ये वाळकेश्वरला अदृश्य होणारा, मलबार हिलला चढतो. त्या पूर्ण रस्त्यापैकी एक तृतीयांश पट्ट्यात अप्रतिम देखण्या आर्ट डेको इमारती आहेत. त्या इमारतींच्या स्तब्ध सौंदर्यामधे ऐतिहासिक घडामोडींचे, आठवणींचे असंख्य क्षण गोठून राहिलेले आहेत.
कृष्णधवल युगापासूनच्या असंख्य हिंदी सिनेमांमध्ये या रस्त्याचे दर्शन झाले आहे. ‘ऐ दिल है मुश्किल जिना यहां’पासून ‘लेके पहला पहला प्यार’, ‘रिमझिम गिरे सावन’ किंवा ‘रोते हुए आते है सब’… सारखी किती तरी गाणी, दृश्ये प्रत्यक्षात आलेली लोकांनी येथे पाहिली. हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगातील कितीतरी तारेतारका येथे वास्तव्य करून गेले. जगभरातील प्रवाशांनी ‘राणीच्या गळ्यातला रत्नहार’ म्हणून त्या रस्त्याचे वर्णन केले. तो कित्येक पर्यटकांच्या अल्बम्समध्ये, ट्रॅव्हल ब्लॉग्जवर, पिक्चर पोस्टकार्डसवर झळकला आहे.
एकेकाळी 123 क्रमांकाची डबल डेकर बस या रस्त्यावरून जाई तेव्हा बसच्या खिडकीतून डाव्या बाजूला बघावे की उजव्या बाजूला अशी द्विधा मनस्थिती होई. आणि तरीही त्या रस्त्याच्या सौंदर्याने पोट भरायचे नाही. ती बस आता नाही, पण टॅक्सीतून किंवा पायी जातानाही प्रत्येक वेळी नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भिरभिरत राहते. एका बाजूला उसळता समुद्र आणि दुसऱ्या बाजूला ओळीत उभ्या असलेल्या देखण्या इमारतींच्या रांगा.
मरिन ड्राइव्हच्या याच ‘प्रोमेनेड’वर ‘आयकोनिक’ आणि ऐतिहासिक ‘सुना महल’ ही इमारत आहे, आल्हाददायक सममित रचनेची, सुंदर पिवळ्या रंगावर केशरी उभे पट्टे रेखलेली, दर्शनी भागावर बुरूजासारखी (टुरेट) लक्षणीय रचना असलेली ती इमारत मोक्याच्या कोपर्यावर डौलात उभी आहे. त्या इमारतीचे 75 वर्षांचे मालक मेहेरनोश सिद्धवा अभिमानाने, त्यांच्या आजोबांनी 1937 साली बांधलेल्या त्या इमारतीच्या आर्ट डेको रचनेबद्दल बोलतात. गेल्या 70 वर्षांच्या काळात तीन पिढ्यांनी मनापासून केलेल्या जपणुकीची हकिकत सांगतात. “आमच्या ‘सुना महल’ची वास्तुरचना समुद्राच्या लाटांना मागे टाकत डौलाने पुढे सरकणार्या अवाढव्य, देखण्या जहाजासारखी आहे.” इमारतीच्या मूळच्या पिवळ्या-केशरी छटेची रंगसंगती त्यांनी तशीच राखलेली आहे.
मुंबईतील काही रस्त्यांचे देखणेपण बॉम्बे आर्ट डेको या खास शैलीच्या नावाने ओळखल्या गेलेल्या इमारतींमध्ये सामावलेले आहे. चर्चगेट स्टेशनवरून इरॉसच्या बाजूने जाणारा, ओव्हल मैदानाला समांतर असलेला महर्षी कर्वें मार्ग हा दहा-बारा मिनिटांच्या चालीचा रस्ता. त्या रस्त्यावरून दोन्ही बाजूंच्या इमारती बघत रमतगमत जावे असाच तो आहे. झळाळत्या प्रसन्न रंगांमध्ये रंगलेल्या समुद्रकिनार्यावरील अर्धवर्तुळाकार प्रशस्त बाल्कन्या, कमनीय कोपरे, गोलाकार कठडे आणि एक्झॉटिक म्हणता येतील अशा डिझाईनच्या आकार-रचना असलेल्या आर्ट डेको इमारतींची रांग, त्याच्या समोर वार्याच्या हलक्या झुळुकीने डोलणारे पाम ट्रीज… मायामी शहराचे वर्णन कितीही वाटत असले तरी ते आहे मुंबईतील मरीन ड्राइव्हचे, किंवा ओव्हल मैदानाच्या पश्चिमेकडील इमारतींच्या समुदायांचे.
ओव्हल मैदानापलीकडील राजेशाही इमारती उतरत्या सूर्याच्या मऊ, सोनेरी किरणांमधे झळाळून उठतात. मुंबई युनिव्हर्सिटी, राजाबाई टॉवर, हायकोर्टच्या देखण्या, डौलदार इंडो सारसेनिक इमारती एका हाताला आणि दुसऱ्या हाताला इरॉसपासून सुरू होत थेट पुढे मैदानाच्या टोकापर्यंतच्या सलग सुबक, वेगळ्या वास्तुशैलीतील चौदा इमारतींची ओळ. फोर्ट, मुंबईतील इतर गॉथिक, निओक्लासिकल आर्किटेक्चरच्या देखण्या इमारतींच्या तुलनेत त्या इमारती बारकाईने न्याहाळण्यात वेगळीच मजा आहे. मुंबईचे व्यावसायिक केंद्र असलेल्या दक्षिण भागात दोन वास्तुशैलीच्या तर्हा परस्परांच्या विरूद्ध उभ्या ठाकल्यासारख्या आमनेसामने असतात. पूर्वेला वसाहतवादी राजवटीच्या वारशावर हक्क सांगणार्या, ब्रिटिश सत्तेने उद्दाम अधिकाराचा तोरा मिरवण्याच्या दृष्टिकोनातूनच उभारलेल्या इमारती. पश्चिमेकडे सुबक, आटोपशीर, मुक्तपणाचा पहिला वारा अंगावर घेणार्या इमारतींची ओळ. त्यांची ‘सनशाईन’, ‘हॉरिझोन व्हयू’, ‘सी व्हयू’, ‘मुनलाइट’, ‘फेयरलॉन’ अशी इंग्रजी नावेही आधुनिक. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागल्यानंतरच्या इमारतींची नावे वेगळी -‘शांती भुवन’, ‘राजाब महल’, ‘ज्योति सदन’. ही सर्व नावे इमारतींच्या सिमेंट स्टुक्कोचाच एक भाग. साधी, वळणदार, देखणी अक्षरे, नावाभोवती सुरेख साजेशी सिमेंटचीच महिरप; म्हणजे समुद्राच्या लाटा, उडते पक्षी, कमळांच्या वेली, उगवत्या सूर्याची किरणे. त्या इमारती साध्या वाटल्या तरी त्या तशा नाहीत. त्यांचे डिझाईन, रचना जाणीवपूर्वक केली आहे. या इमारती जगप्रसिद्ध ’आर्ट डेको’ शैलीतील आहेत.
ओव्हल मैदानाच्या दक्षिण टोकाच्या कोपर्यावर, जेथे महर्षी कर्वे रस्ता आणि समुद्राकडून येणारा मादाम कामा रोड एकमेकांना छेदतात त्या चौकाच्या बरोबर टोकावर असलेली सुरेख आर्ट डेको इमारत ‘मूनलाइट’ ही त्या सर्व इमारतींचा मुकुटमणी. डौलदार पाच मजली, देखण्या डेको अक्षरात लिहिलेली ‘मूनलाईट’ ही अक्षरे, सज्जामधील हिरव्या संगमरवरी फ़रशा, सर्पाकृती जिन्यांचे गोलाकार, गुळगुळीत लाकडी कठडे हे सारे आर्ट डेको शैलीची ओळख करून देतात. त्या इमारतीच्या पुढे आणि मागे असलेल्या इतर इमारतीही त्याच शैलीतील आहेत. एकसमान सौम्य रंगांचे पट्टे, त्यातील जाणीवपूर्वक साधलेली सलगता, काही ठिकाणी झळाळत्या विरुद्ध छटेच्या रंगसंगतीची मजा आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रत्येक इमारतीच्या पुढेमागे मोकळे, आदबशीर लहानसे अंगण आहे. अंगणाच्या आणि रस्त्याच्या मधील कुंपणाचे ग्रील्स इमारतीला भोवतालच्या परिसरातच सामावून घेणारे… कमी उंचीचे आपलेपण त्यात आहे. ते आर्ट डेको इमारतींचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. इमारतीच्या बाहेरील हिरव्या, राखाडी ग्रॅनाईटच्या कठड्यावर शांत बसून समोरच्या ओव्हल मैदानातील गजबज पाहवी, मोकळा वारा अंगावर घ्यावा. मुंबईत क्वचितच मिळणारा निवांतपणा आपसूक समोर येतो !
मरीन ड्राइव्ह, ओव्हल मैदानाव्यतिरिक्तही मुंबईत काही ठिकाणी आर्ट डेको इमारती आहेत. दक्षिण मुंबईतील पाच सिनेमागृहे आर्ट डेको शैलीत आहेत. इरॉस आणि रीगल या सिनमागृहांचाही त्यात समावेश आहे, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची इमारत, प्रवेशद्वारावर दोन मोठे इजिप्शीयन शिल्प असलेली न्यू इंडिया ॲश्युरन्सची इमारत हे आर्ट डेको शैलीचे देखणे नमुने आहेत. ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलही आर्ट डेको शैलीत बांधलेले आहे.
आर्ट डेको इमारती असलेला तो सर्व भूभाग 2012 सालानंतर ‘आर्ट डेको प्रेसिन्क्ट’ म्हणून मान्यता पावला आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. मुंबई हे सर्वात जास्त संख्येच्या, सार्वजनिक सहभाग असलेल्या आर्ट डेको इमारती असलेले जगातील दुस-या क्रमांकाचे शहर म्हणून मान्यता पावले आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरीकेतील मायामी शहर आहे.
मुंबईतील आर्ट डेको इमारतींचा इतिहास म्हणजे शहराच्या आधुनिक आणि समकालीन रूपाची पायाभरणी आहे. मुळात सात विखुरलेल्या बेटांचा समुदाय असलेले हे शहर पुढच्या तीनशे वर्षांच्या काळात समुद्राच्या पाण्यात भराव घालून तयार केलेल्या जमिनीने एकमेकांशी जोडले गेले, वाढत राहिले, करोडो भारतीयांच्या स्वप्नपूर्तीचे शहर बनत गेले !
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरत लुटणाऱ्या मराठ्यांच्या आक्रमणाच्या भीतीने मुंबई बेटाभोवती गडकोट उभारला, तो म्हणजे फोर्ट विभाग. तो किल्ला बांधून 1716 साली पुरा झाला. किल्ल्याला तीन मजबूत, सुरक्षित दरवाजे होते. पूर्वेकडील दरवाजा ‘अपोलो गेट’ (लायन गेट), पश्चिमेकडील दरवाजा- चर्चगेट, तिसरा दरवाजा- बझार गेट. किल्ल्याच्या उंच भिंतीच्या आत राहती घरे, कार्यालये, दुकाने, प्रार्थनास्थळे इत्यादी. किल्ल्याच्या भिंतीबाहेर मराठा डिच नावाने ओळखला गेलेला खंदक. पश्चिमेच्या दरवाजाबाहेर, म्हणजे चर्चगेटच्या बाहेर, समुद्रालगत मोकळे, सपाट मैदान मुद्दाम बनवलेले- ते एस्प्लेनेड. त्याचा हेतू- पश्चिमेच्या समुद्रात ये-जा करणाऱ्या जहाजांवर गढीतून लक्ष ठेवता यावे. त्याच काळात बोरीबंदर स्टेशन, मुख्य पोस्ट ऑफिस, मुंबई विद्यापीठ, म्युझियम, गेटवे अशा इमारतींसोबत वॉटसन हॉटेल, जुने मंत्रालय आणि इतर अनेक राजेशाही देखण्या वास्तू उभारल्या गेल्या. त्यांच्या रचनेसाठी स्थानिक कुर्ला-मालाड येथील खाणींतून काढलेले दगड वापरले गेले. काही दगड हेमनगर, पोरबंदर येथून आणले होते. नावाजलेले ब्रिटिश स्थापत्यतज्ज्ञ, कसबी बांधकामतज्ज्ञ यांनी त्या इमारतींना वैभवशाली सौंदर्य बहाल केले. प्लेगच्या साथीने मुंबईत एकोणिसाव्या शतकात थैमान घातले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी फोर्ट परिसरातच मर्यादित असणार्या मुंबईचा परीघ वाढवून गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आणि मग दक्षिणेकडील समुद्रात भर घालून जागा निर्माण करण्यात आली.
मुंबई शहरात व्यावसायिक, नोकरदारांचा ओघ एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांमधे, म्हणजे 1880 पासून भारतातील इतर सर्व भागांमधून सुरू झाला. व्यावसायिक शहर म्हणून मुंबईचा बोलबाला देशभरात होत होता. व्यापारी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक जोपासलेले ते धोरण होते. मुंबईची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चौकट विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून झपाट्याने बदलत गेली. शहर विकासाच्या नव्या योजना मोठ्या संख्येने शहरात दाखल होणाऱ्या स्थलांतरितांना सामावून घेण्याकरता सरकारी आणि खाजगी पातळीवर आखल्या जाऊ लागल्या. समुद्रात भराव घालून नव्या जागा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.
दक्षिण मुंबईला आजचे स्वरूप 1928 ते 1942 या काळात बॅकबे रेक्लमेशन स्कीमनंतर प्राप्त झाले. एवढी मोठी नवी जमीन अचानक उपलब्ध झाली. त्याच सुमारास परदेशात आर्ट डेकोशैलीची लोकप्रियता ऐन भरात होती. तेथे शिकत असलेल्या काही तरुण, कल्पक, बुद्धिमान भारतीय वास्तुविशारदांनी शिक्षण संपवून पुन्हा मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तो एक सुखद, भाग्यशाली योगायोग होता.
अनेक आधुनिक इमारती त्यानंतरच्या काळात, एकोणिसशेतीसच्या सुमारास नव्याने उपलब्ध झालेल्या जागेवर बांधल्या गेल्या. सिनेमागृहे, कार्यालयीन इमारती, निवासी इमारती उभ्या राहिल्या. झिगुराट डिझाईनचे इरॉस, भिंतीवर पियानोच्या पट्ट्या असलेले लिबर्टी, फोर्टमधली न्यू इंडिया ॲश्युरन्स बिल्डिंग. शहराची एक नवी ओळख निर्माण करणार्या या सुंदर इमारतींची शैली होती आर्ट डेको.
ओव्हल मैदान हे एकेकाळी शहराचा अंतिम किनारा होता. त्यानंतर अथांग समुद्र ! म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी, राजाबाई टॉवर, हायकोर्टाच्या इमारती समुद्राच्या किनार्यावर वसलेल्या होत्या. ओव्हल मैदान ही किनारपट्टी होती. तेथील समुद्रात भराव घातल्यावर तयार झालेल्या नव्या जागेवर आधुनिक जगात शिक्षण घेऊन आलेल्या तरुण वास्तुविशारदांनी कल्पकतेचा पुरेपूर उपयोग करून ज्या नव्या धर्तीच्या इमारती बांधल्या त्या ओव्हल मैदानाच्या पश्चिमेला असलेल्या वसाहतवादी इमारतींपेक्षा पूर्ण वेगळ्या ठरल्या. मैदान ओलांडल्यावर मुंबईच्या वास्तुशैलीत अचानक बदल झालेला दिसतो, तो त्यामुळे. अशा तऱ्हेने ओव्हल मैदानाजवळचा बावीस एकर जमिनीचा पट्टा दोन विरुद्ध वास्तुशैलीना कवेत घेणारा ठरला.
बॉम्बे आर्ट डेको हे केवळ एक नवे, आधुनिक डिझाईन फॅड राहिले नव्हते. उच्चवर्गीय, सुशिक्षित, आधुनिक विचारसरणीच्या भारतीय धनिकांनी नव्या मरीन ड्राईव्हवरच्या आधुनिक इमारतींमध्ये प्रशस्त सदनिका घेतल्या, काही धनाढ्यांनी स्वतंत्र इमारती विकत घेतल्या. ‘केवल महल’, ‘कपूर महल’, ‘झवेरी महल’ अशा नावांच्या त्या इमारतींमध्ये त्या वेळच्या हिंदी सिनेमा व्यवसायातील सिंधी, पंजाबी फायनान्सर राहत होते. ‘अलसबाह’ ही इमारत कुवैतच्या राजपुत्राची !
खरे तर, आर्ट डेको शैलीमध्ये स्वत:चे असे खास वैशिष्ट्य नाही. जगातील सर्व प्राचीन, लोकप्रिय संस्कृतींमधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची मोटबांधून ती शैली घडली गेली आहे. उदाहरणार्थ काही आर्ट डेको इमारतींच्या बाह्यभागावर एकावर एक वळकट्या रचत गेल्यासारखी दिसणारी जी रचना असते (tiered façades) ती मेसोपोटेमियाच्या झिगुराट पिरॅमिड्सवरून उचललेली आहे. बाहेरच्या भिंतींवर सिमेंटमधे तयार केलेल्या भव्य शिल्पाकृतींची रचना (bas-reliefs) इजिप्शीयन डेकोरेटीव मोटिफ्सवर आधारित आहेत. न्यू इंडिया ॲश्युरन्सच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सिमेंटच्या आडव्या खांबांवर असलेल्या इजिप्शीयन शिल्पाकृती आठवून पाहा. आर्ट डेको इमारतींचा गुळगुळीत, पॉलिश केल्यासारखा दिसणारा अंतर्भाग हा जपानी लॅकरिंगवरून उचललेला आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या इमारतीच्या संकल्पनेत जहाजाची प्रतिकृती वापरली आहे. गोल आकारांच्या पोर्टहोल विंडोज, डोलकाठीसारखे खांब इत्यादी गोष्टी त्या इमारतीमध्ये दिसतात.
आर्ट डेको शब्दाचा उगम फ्रेंच ‘डेकोरेटीव आर्ट’मध्ये आहे. साधारणत: 1910 ते 1940 ह्या काळात तयार झालेली वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्स नंतर ’आर्ट डेको’ म्हणून ओळखली जाऊ लागली. केवळ वास्तुरचनेकरता नाही तर दागिने, वस्त्रांच्या फॅशन्स, ग्लास/सिरॅमिक्स या वस्तूंमधेही ती शैली वापरली गेली. आर्ट डेको शैलीचा उदय पहिल्या महायुद्धानंतर जगभरात खालावलेल्या आर्थिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून झाला. ती अल्पजीवी शैली होती, पण ती पुढील काळातील मिनिमलिस्ट शैलीची जनक ठरली.
आर्ट डेकोशैलीवर क्युबिझममधील ठळक भौमितिक रचनांचा प्रभाव अगदी सुरुवातीपासूनच होता; फॉविजममधले झळझळीत/ब्राइट रंग होते. लुई फिलिपसारख्या डिझायनर्सनी फर्निचरच्या घडणीत सुबकपणा आणला. चीन, जपान, भारत, पर्शिया, प्राचीन इजिप्त-मायन संस्कृतीच्या आकार-रचनांमधील, पौर्वात्य शैलीची अद्भुतता, देखणेपणा त्यात अंतर्भूत होता. जगभरातील कला-संस्कृतीतील आकार-नक्षी-रचनांचा मनोरम मेळ आर्ट डेकोमध्ये घातला गेला. आर्ट डेकोचे अत्युत्तम, भव्य नमुने शिसे, हस्तिदंत यांसारखे दुर्मीळ, महागडे मटेरियल, उत्कृष्ट कलाकौशल्य यांमुळे 1920-40 च्या दशकात बनवले गेले. ‘ख्रायसलर बिल्डिंग’, ‘एंपायर स्टेट बिल्डिंग’ यांचाही त्यात समावेश करता येईल. त्या शैलीत बराचसा सौम्यपणा आर्थिक महामंदीच्या काळात (1930) आला. आधुनिक साहित्य, उदाहरणार्थ क्रोम प्लेटिंग, स्टेनलेस स्टील, प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. काँक्रिट इमारतीच्या बांधकामात ‘स्वस्त’ पर्याय म्हणून पुढे आले. बांधेसूदपणा, निमुळत्या आकारांचा वापर फायदेशीरपणाच्या दृष्टिकोनातून शैलीत वाढला. त्या आकारांमधे गुळगुळीत, सुबक कमनीयता होती. आर्ट डेको शैलीचे वर्चस्व 1940 पर्यंत जगभरातून झपाट्याने कमी झाले. दुसरे जागतिक महायुद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. सुटसुटीत, उपयोगी, अनलंकृत थोडक्यात फंक्शनल अशा शैलीला आधुनिकतेच्या, किफायतशीरपणाच्या रेट्याखाली मोठ्या प्रमाणावर सर्वच कला-व्यावसायिकांनी स्वीकारले. निओ आर्ट डेको स्टाईल पुढे 21व्या शतकात त्यातूनच अनेक आधुनिक कल्पनांना सामावून घेत निर्माण झाली. क्लासिक ते निओ असा हा आर्ट डेको शैलीचा प्रवास जेमतेम तीन दशकांचा आहे.
भारतीय वास्तुविशारदांनी जेव्हा मुंबईत आर्ट डेको शैली वापरण्याचे ठरवले तेव्हा त्यात भारतीय पारंपरिक रचनांमधील घटकही वापरले, त्यातून अजून एक स्वतंत्र आर्ट डेको शैली निर्माण झाली. तिला डेको सारसेनिक शैली म्हणून ओळखले जाते. आर्ट डेको शैलीतील संमिश्र अशा प्रकारामुळे महान पाश्चात्य वास्तुविशारदांनी तिला वेडगळ शैली संबोधून कायम दूर ठेवले. मुंबईतील आर्ट डेको इमारतींमध्येही तो संमिश्रपणा दिसतो, पण तो खूपच लोभसही वाटतो. खूप कोरीव नक्षीकाम, अचूक समसंयोजन असलेल्या प्रचंड व्हिक्टोरियन इमारतींच्या तुलनेत त्या जास्त आपल्याशा वाटतात.
बॉम्बे आर्ट डेकोमधे उपयुक्तता मात्र आवर्जून पाळली गेली. बाल्कनीच्या वर सीमेंटचा छज्जा असतो त्याला आर्किटेक्चरच्या भाषेत आयब्रो (भुवई) म्हणतात. ती मुंबईतील आर्ट डेको इमारतींवर आवर्जून असते. तिचा मुंबईच्या धुवांधार पावसातील उपयोग किंवा गरज वेगळा सांगण्यास नको. रुंद व्हरांडे, उंच छत, इमारतीबाहेर पुरेसे अंगण या मुंबईतील जुन्या निवासांच्या, फक्त धनवान बंगल्याच्या नाही; तर मध्यमवर्गीय इमारतींमधीलही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ही आर्ट डेको शैलीचीच देणगी आहे. अवकाश, डौल आणि प्रकाशमानता या गोष्टी जुन्या मुंबईकरांना लाभल्या त्या आर्ट डेको इमारतींमुळे.
पाश्चिमात्य फॅशन भारतात आणताना तिचे भारतियीकरण कसे केले जाते याचे आर्ट डेको हे पहिले आणि उत्तम उदाहरण आहे. भारतियीकरण करण्यात तेव्हाच्या वास्तुविशारदांची विद्रोहाची भावना असेलच असे नाही, मात्र ब्रिटिश वर्चस्वाखाली असतानाही संकल्पनेच्या अभिव्यक्तीत स्वतंत्र, मोकळा श्वास घेण्याचे धाडस ते दाखवू शकले, हे मात्र निश्चित. आर्ट डेको शैलीने ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीला स्वतंत्र वृत्तीने छेद दिला. बॉम्बे स्कूल ऑफ आर्टमधून बाहेर पडलेल्या पहिल्या पिढीतील भारतीय वास्तुकलाकारांनी शहराची क्षितिजरेखा आर्ट डेको शैलीमुळे सुंदर बनवली. अनेक भारतीय वास्तुविशारद, इमारत बांधणी करणारे व्यावसायिक- उदाहरणार्थ सोहराबजी भेडवार, जी.बी. म्हात्रे, मेरवानजी बाना आणि कं., शापुरजी पालनजी आणि कं., इत्यादी- हे आर्ट डेको शैलीच्या व्यापकतेला कारणीभूत ठरले. अनेक महत्त्वाच्या व्यावसायिक इमारती पारशी बांधकाम विशारद जेथे काम करत होते त्या बेटले आणि किंग या कंपनीने बांधल्या आहेत. उदाहरणार्थ ‘रिगल सिनेमा’ (1933),‘धनराज महल’ (1935-38) तर स्थानिकांच्या निवासाच्या इमारती, ज्या ओव्हल मैदानाजवळ आणि मरीन ड्राईव्हला होत्या त्या जी.बी. म्हात्रे यांच्यासारख्या निष्णात भारतीय वास्तुविशारदाने उभारल्या. न्यू इंडिया ॲश्युरन्स (1936) ची रचना ‘मास्टर, साठे आणि भुता’ यांनी केली. त्याचे वास्तुविशारद होते एन.जी. पानसरे. इरॉस सिनेमाची रचना आणि बांधकाम केले वास्तुविशारद सोहराबजी भेडवार यांनी. हे सगळे भारतीय वास्तुविशारद एकदिलाने आर्ट डेकोची भाषा बोलणारे होते. त्यांच्यामुळे शहराची स्वतंत्र, मुक्त, भक्कम वीण 1930 ते 40 या काळात घातली गेली. ती तिच्या सौंदर्याने, टिकाऊपणामुळे शहरातील सर्वात डौलदार, शैलीदार आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेचा मान राखून आहे. मुंबईतील आर्ट डेको वास्तुकलेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात ‘क्लासिकल आर्ट डेको’ आणि ‘बॉम्बे डेको’ या शैलींचा मनोरम मेळ आहे. त्यात आयताकृती झिगुराट आहे, गोलाकार, झुलत्या बाल्कन्या आहेत, निमुळते मनोरे आहेत, इजिप्शीयन आकार आहेत, वेगवान रेषाकार आहेत आणि भारतीय परंपरेतील कमळांचे आकार व त्रिशूळ रचनाही आहेत.
मुंबईतील डेको इमारतींवर व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील प्रचंड वास्तुरचनांच्या-उदाहरणार्थ बोरीबंदर स्टेशन, म्युझियम, हायकोर्ट इत्यादीच्या- शैलीची सावली नक्की पडलेली आहे, पण तरीही आर्ट डेकोने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जपले. आल्हाददायक रंगसंगती, मुक्तपणा, आधुनिकता, सोफिस्टिकेशन यांमुळे वेगळा दर्जा त्या इमारतींना प्राप्त झाला आहे हे लगेच लक्षात येते. पारतंत्र्यात असलेल्या भारताने वास्तुकलेत दाखवलेला हा मुक्त वेगळेपणा स्वातंत्र्यलढ्याला पूरक अशा एका ठाम विधानाचे निदर्शक नक्कीच होता !
आर्ट डेको इमारती जेव्हा बांधल्या गेल्या (1930), तेव्हा त्या इमारतींमधील फ्लॅट्सचे 250 रुपये भाडे तेव्हा फक्त श्रीमंतांना परवडणारे होते. गमतीची गोष्ट अशी, की भाडे गोठवणारा कायदा 1947 मध्ये आला आणि ते भाडे पुढील कित्येक दशके तेवढेच राहिले. शहरातील सिनेमाचे दरही त्या भाड्यापेक्षा जास्त झाले. तेथील तीन हजार स्क्वेअर फूट फ्लॅट्समध्ये राहणारे काही जुने भाडेकरू शहरातील या सर्वात महागड्या जागेत त्याच जुन्या भाड्यात राहतात. त्याचा परिणाम असा झाला की त्या इमारतींच्या देखभालीची, रंगरंगोटीची काळजी पुढील बरीच वर्षे कोणी घेतली नाही. मात्र, बॉम्बे आर्ट डेको हेरिटेजच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारी संस्था स्थापन झाली आहे. त्यात मुंबईतील आर्ट डेको शैलीत बांधलेल्या प्रत्येक इमारतीची नोंद केली जाते. ‘मुंबई आर्ट डेको’ नावाची ही ‘नो प्रॉफिट संस्था’ अतुल कुमार यांची आहे. ती हा नोंदणी प्रकल्प करते. इमारतीत राहणार्या रहिवाशांना इमारतीच्या आर्ट डेको हेरिटेजची माहिती देऊन, त्या शैलीतील मूळ बांधकामाला धक्का पोचेल अशी कोणतीही दुरुस्ती, नवे जोड- बांधकाम त्या इमारतीला न करण्याच्या, आहे त्याची जपणूक करण्याच्या सूचना दिल्या जातात. मुंबई शहरात आर्ट डेको इमारतींची संख्या जगभरात सर्वात जास्त आहे. तो वारसा फार महत्त्वाचा आहे. वास्तुकलेतील हा वारसा सर्वात आधुनिक असा आहे.
मुंबईत 200 आर्ट डेको इमारतींची नोंद झाली आहे, अजूनही होणे चालू आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये उदाहरणार्थ माटुंगा, दादर, बांद्रा येथेही मोठ्या प्रमाणात आर्ट डेको बांधकाम झालेले आहे. तो आकडा 300 च्या पुढे सहज जाऊ शकतो. केवळ इमारतीची आर्ट डेको शैली नोंदली जाणे पुरेसे नसते, इमारतीचे बांधकाम नेमके कधी झाले, कोणी केले, वास्तुरचनाकार कोण होता, डेको फीचर्स कोणकोणते आहेत, दुरूस्ती कधी-कोणत्या प्रकारे झाली, डेको शैलीतील मूळचे फ्लोरिंग, ग्रील्स, लाकडी सज्जे, कठडे, सिमेंटच्या रचना इत्यादीपैकी नेमके काय शिल्लक आहे, जपणूक कशी झाली आहे या गोष्टीही नोंदणे आवश्यक असते. आर्ट डेको मध्ये 1930 ते 1950 या काळामधलीच बांधकामे नोंदली जातात. त्यानंतर केलेल्या बांधकामात जरी ती शैली वापरलेली असली तरी ती निओ आर्ट डेको म्हणून वेगळी नोंदली जाते. अनेक आर्ट डेको इमारतीच्या मालकांना त्यांचे महत्त्व माहिती नसल्यामुळे त्या पाडल्या गेल्या किंवा दुरूस्ती करताना हलगर्जीपणाने त्या उखडल्या गेल्या, गिलावा फासून नष्ट केल्या गेल्या. अर्थात जागेचे भाव गगनाला भिडलेल्या, इंच इंच जमीन सोन्यापेक्षा जास्त भावाने विकली जात असताना आर्ट डेको वारसा इतपत का होईना शिल्लक राहू शकला हे मोठे सुदैव मानायला हवे !
– शर्मिला फडके 9820378244 sharmilaphadke@gmail.com