1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...