अजिंठ्याच्या डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत, पण दौलताबाद किंवा अंतूरसारखे प्रसिद्ध किल्ले वगळता या किल्ल्यांच्या वाटेवर फारसे ट्रेकर्स वळत नाहीत. सुतोंडा हा असाच या रांगेतील फारसा माहीत नसलेला किल्ला. हा किल्ला यादवकालीन असावा असा तज्ज्ञांचा कयास आहे. किल्ल्यावर असलेल्या लेण्यांखेरीज याला पुरावा नाही. सुतोंडा पाहायला जो कोणी जातो, तो तिथले पाण्याचे व्यवस्थापन पाहून चकित होतो. आजूबाजूच्या दुष्काळी प्रदेशात सुतोंड्यावर बारमाही पाणी असते. अशा ह्या अप्रसिद्ध किल्ल्याविषयी सुभाष बोरसे माहिती देत आहेत.
सह्याद्री मुख्यतः तीन डोंगररांगांचा बनलेला आहे. त्यातील नाशिक जिल्ह्याच्या वायव्येस ‘हातगड’पासून सुरुवात होऊन पूर्वेला औरंगाबाद जिल्ह्यात जाणारी ‘सातमाळा अजिंठा’ ही डोंगररांग सलग नसून तुटक तुटक आहे. पितळखोऱ्यापासून ते अजिंठ्यापर्यंतच्या या रांगेत अहिवंत, धोडप, कांचन, इंद्राई असे काही बेलाग किल्ले आहेत. याच रांगेतील अंतुर, लोंझा, वेताळवाडी हे किल्ले मध्ययुगात उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येत असत.
अशाच किल्ल्यांच्या साखळीतील फारसा माहीत नसलेला किल्ला म्हणजे नायगावचा सुतोंडा. ट्रेकर्सची वर्दळही तेथे कमी असते. समुद्रसपाटीपासून साधारणत: 1500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला साईतेंडा, वाडीसुतोंडा, नायगांव, वाडी अशा इतरही काही नावांनी ओळखला जातो. तटबंदी, बुरुज, दरवाजे, खंदक, पाण्याची कुंडे, लेणी असे विविध काळातील अनेक अवशेष किल्ल्यावर विखुरलेले आहेत.
या किल्ल्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो कोणी- कधी बांधला; कोणत्या सत्तेच्या अधिपत्याखाली कधी होता इत्यादी तपशील उपलब्ध नाहीत. गडावर लेणी असल्यामुळे हा यादवकालीन किल्ला असावा असा अंदाज बांधला जातो. ‘बादशाहनामा’ ह्या ग्रंथाची साक्ष काढून असे सांगितले जाते, की मुघल बादशहा शहाजहानच्या आज्ञेवरून मुघल सरदार सिपहंदरखानाने इसवी सन 1630-31 मध्ये मोठ्या फौजेच्या साहाय्याने ‘सितोंडा’ किल्ल्यावर स्वारी केली होती आणि मुघल फौजेसमोर तेथील किल्लेदार सिद्दी जमाल याने शरणागती पत्करली होती. मुघलांनी निझामशाहीचा नि:पात 1631-32 मध्ये केला तेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला असावा.
औरंगाबाद गॅझेटियरमध्ये या किल्ल्याचा उल्लेख साईतेंडा असा आहे व तो कन्नड गावाच्या ईशान्य दिशेला सव्वीस मैलांवर असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर औरंगजेबाने काही देशमुखांना या किल्ल्यासाठी सनद दिल्याचा उल्लेखही या गॅझेटियरमध्ये आला आहे.
सुतोंडा किल्ल्यावर जाण्यासाठी नाशिकहून मालेगाव-चाळीसगाव-नागद- बनोटी असा मार्ग आहे. चाळीसगाव ते बनोटी हे अंतर पंचेचाळीस किलोमीटर आहे. बनोटीगाव हिवरा नदीच्या काठावर बसलेले आहे. गावाच्या बाहेर हिवरेच्या काठी महादेवाचे सुंदर देऊळ आहे. नदीकडे जाण्यासाठी दगडी पायर्यांचा जुना घाट आहे. बनोटीपासून तीन किलोमीटरवर नायगाव आहे. हा रस्ता कच्चा आहे. हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे म्हणून सुतोंड्याला नायगाव किल्ला असेही म्हणतात. या गावात कडुनिंबाच्या एका झाडाखाली विष्णूची प्राचीन मूर्ती आहे.
गावाला अगदी लागून अजिंठा रांगेचे डोंगर आहेत. त्यातील सर्वात उंच असणारा डोंगर सुतोंडा असावा असा समज होतो, पण अर्धगोलाकार आकाराचा, सर्वात ठेंगणा आणि मुख्य टेकडीच्या अलिकडच्या टेकडीवर सुतोंडा वसलेला आहे. हा किल्ला चढाईसाठी फारच सोपा आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत चढायला फारतर अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. गडावर चांगला झाडोरा आहे. मात्र या किल्ल्याची वैशिष्ट्ये दूरवरून सहज जाणवत नाहीत.
या किल्ल्यावर चढाईसाठी दोन वाटा आहेत. किल्ल्याच्या उत्तरेकडून म्हणजे समोर दिसणार्या भागातून एक वाट जाते तर दुसरी वाट समोर दिसणार्या भागातून गडाला उजवीकडून प्रदक्षिणा घालून किल्ला डावीकडे ठेवत पलिकडच्या म्हणजेच दक्षिण बाजूने कातळ फोडून केलेल्या खंदकमार्गातील प्रवेशद्वाराने माथ्याकडे जाते. एका वाटेने वर जाऊन दुसर्या वाटेने खाली उतरून आले तर सर्व किल्ला नीट बघता येतो. किल्ला चढाईला सोपा असला आणि वर जाण्याची वाट सोपी असली तरी किल्ल्यावर पसरलेले सगळे अवशेष बघण्यासाठी गावातून सोबतीला वाटाड्या घ्यायलाच हवा.
सुतोंडा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणेकडचा डोंगर आणि किल्ला यांना जोडणारा भाग कापून काढून खिंड बनवलेली आहे. या मानवनिर्मित खिंडीतून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी लहानसा दरवाजा आहे. खिंडीचा किल्ल्याकडचा भाग कड्यासारखा तासून काढून त्यातच चोरदरवाजा असावा तसे हे छोटे प्रवेशद्वार कोरून काढले आहे. वरच्या कड्यावर विटांची भिंत बांधलेली आहे. तिथून आतमध्ये इंग्रजी ‘Z’ आकारातील वळणावळणाच्या मार्गाने किल्ल्यात प्रवेश करता येतो. या मार्गाने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात पोचतो. खिंडीच्या डोंगराकडील भागात कातळ कोरून बारा फूट उंच पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार बनवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जेथे कातळ संपतो तेथे तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीत डाव्या बाजूला शरभ शिल्प कोरलेले आहे, तर उजव्या बाजूच्या कोपर्यात तोफेसाठी पोकळी तयार केलेली आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला दरवाजाच्या आणि अडसराच्या खाचा पाहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला भुयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. भुयारातून बाहेर पडून, फरसबंदी मार्गाने पुढे जाऊन, डाव्या बाजूला वळून, वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. वरती उभे राहिल्यावर या मानवनिर्मित खिंडीचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी कसा उपयोग केलेला आहे याचा अंदाज येतो.
किल्ल्याच्या उत्तरेकडील भागातून वर चढताना, थोडे वर गेल्यावर मुख्य वाटेपासून काही अंतरावर एक लेणे कोरलेले आहे. स्थानिक लोक याला ‘जोगणामाईचं घरटं’ म्हणतात. कारण, या लेण्यात बाळ मांडीवर असलेल्या एका देवीची मूर्ती आहे. त्या शेजारीच एक पुरुष मूर्तीही आहे. या लेण्यात छताच्या कडेला भगवान महावीरांचे प्रभावळीसकट असे अस्पष्ट कोरीव शिल्प आहे. प्रवेशद्वारातील पट्टीवरची तीर्थंकराची प्रतिमा आणि लेण्याच्या आतमध्ये आढळलेल्या मांडीवर मूल घेतलेली स्त्री ही अंबिका यक्षी असावी आणि तिच्या शेजारचा पुरुष हा सर्वानुभूती यक्ष असावा आणि या प्रतिमांमुळे हे लेणे जैन धर्माचे असावे असे काही तज्ज्ञांचे मत आहे. पहिल्या लेण्याच्या पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या दुसऱ्या लेण्याकडे जाणाऱ्या पायर्या दिसतात.
या लेण्याच्या दर्शनी भागात दोन खांब कोरलेले आहेत. आत बसण्यासाठी भिंतीत दगडी बाक कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेर पाण्याचे टाके आहे. यानंतर पुन्हा मुख्य वाटेने चढल्यावर एक अरूंद प्रवेशद्वार दिसते. हा तटबंदीतला चोरदरवाजा आहे. या दरवाजाने आपण माथ्यावर पोहोचतो. संपूर्ण गडमाथ्यावर पाण्याची अनेक टाकी आहेत. खांब टाकी, लेणीवजा दिसणारी टाकी, सलग समतल खोदलेली चौकोनी आयताकृती टाकी, भुयारी टाकी, जोड टाकी, सलग ओळीने कोरलेली टाकी, उंच सखल स्तरावर एकावर एक अशी मजले असलेली टाकी, वरून तोंड झाकता येईल अशी अरूंद तोंडाची पण आतून रूंद असलेली टाकी असे पाण्याच्या टाक्यांचे सर्व प्रकार या किल्ल्यावर आढळतात. किल्ल्यांवरील टाक्यांच्या रचनेचा अभ्यास करायचा असेल तर सुतोंडा हे आदर्श उदाहरण आहे. किल्ल्यावर दोन-तीन मोठी तळीही आहेत. आजूबाजूच्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना सुतोंड्यावर बारमाही पाणी असते. सुतोंडा किल्ल्यावरचे जलव्यवस्थापन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो.
– सुभाष बोरसे 9403027752 subhashbborse@gmail.com
टीप: ह्या लेखासाठी सुदर्शन कुलथे, प्रकाश धर्माधिकारी यांनी दिलेल्या माहितीचा व आंतरजालावरील माहितीचाही उपयोग केला आहे.