Home कला विद्याधर ओक यांचे श्रुती संशोधन ! (Shruti research by Vidyadhar Oak)

विद्याधर ओक यांचे श्रुती संशोधन ! (Shruti research by Vidyadhar Oak)

0

विद्याधर ओक हे पदवीने औषधांचे एम डी डॉक्टर. ते ठाण्यात प्रॅक्टिस करतात. ते संगीत तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ओक यांनी भारतीय औषधक्षेत्रात मोठमोठ्या औषध कंपन्यांमध्ये अठ्ठावीस वर्षे मेडिकल डायरेक्टर आणि प्रेसिडेंट अशा उच्च पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे त्या क्षेत्राशी संबंधित शंभर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या औषधशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळावर आणि भारतीय व आंतरराष्ट्रीय औषध उत्पादकांच्या संघटनांच्या मंडळांवर तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.

त्यांचे संगीत क्षेत्रातील ज्ञान ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाइतकेच मूलभूत स्वरूपाचे आहे. त्यांनी विशेषत: श्रुतींसंबंधात केलेले संशोधन अजोड आहे. ते स्वत: हार्मोनियमस्वतंत्र वादनात निपुण आहेत. त्यांनी गोविंदराव पटवर्धन यांच्याकडे पंचवीस वर्षे हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेतले आहे. त्यांना सुरसिंगार संसदेने 1978 साली ‘सूरमणी’ हा किताब दिला आहे. त्यांनी अनेक थोर गायकांना हार्मोनियम संगत केली आहे. त्यांनी हार्मोनियम वादनाचे कार्यक्रम देखील विविध ठिकाणी केले आहेत. त्यामुळे त्यांचा संगीत या विषयावरील अधिकार मोठा आहे. त्यांच्या मातोश्री शांता ओक हार्मोनियम उत्तम वाजवत असत. त्यांचे चिरंजीव आदित्य ओक हेसुद्धा कुशल हार्मोनियमवादक आहेत.

ओक यांनी विज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण, भरतमुनी यांचे संगीतविषयक संशोधन, रागदारीतील श्रुतींची निवड आणि त्याचे सांगीतिक माधुर्य या सर्वांची सांगड घालून श्रुतींसाठी एक निर्विवाद अशी भक्कम बैठक तयार केली आहे. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरांची बैठक उपलब्ध झालेली आहे.

ओक यांनी केलेले संशोधन पुढीलप्रमाणे सूत्रबद्ध सांगता येते : 1. त्यांनी संगीत आणि गणित या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दाखवून दिले. 2. त्यांनी श्रुतींची संकल्पना स्पष्ट केली आणि श्रुतींविषयी जे अनेक समजुतीचे घोटाळे तयार झाले ते दूर केले, 3. श्रुती बावीसच का याचे शास्त्रशुद्ध उत्तर दिले, 4. श्रुतींचे आपापसातील गणिती आणि सांगीतिक नाते शोधून काढले, 5. श्रुती वाजवू शकणारे हार्मोनियम निर्माण केले, 6. तार वाद्यांवरील श्रुति स्थानांची गणिती अचूकता दाखवून दिली, 7. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरतमुनी यांनी घालून दिलेली शास्त्रीय संगीताची बैठक ही गणिताच्या कसोटीवर सुद्धा कशी परिपूर्ण आहे हे तात्त्विक, गणिती आणि सांगीतिक अशा सर्व पातळ्यांवर तपासून सिद्ध केलेले आहे.

‘श्रुती’ या शब्दाभोवती गूढ वलय आहे. मात्र ओक यांनी श्रुती विषयाचा पाठपुरावा चिकाटीने केला आणि श्रुतीविषयक अज्ञानाचा अंधःकार दूर केला. जणू अडगळीत पडलेले  पितळेचचे  मोठे घंगाळ घासूनपुसून स्वच्छ केल्यावर खरे   म्हणजे माणिक मोत्यांनी जडवलेले  सोन्याचे  पात्र आहे असा साक्षात्कार व्हावा तसे  महत्त्व त्या संशोधनाचे   आहे. ते संशोधन किशोरी आमोणकर, अजय चक्रवर्ती, विश्वमोहन भट्ट यांच्यासह संगीतक्षेत्रातील काही दिग्गजांनी खूप वाखाणले आहे.

ओक यांनी केलेल्या संशोधनात संगीतातील हिंदुस्थानी श्रुती या वैज्ञानिक दृष्ट्या अचूक कशा आहेत ते सिद्ध झाले आणि अनेक गैरसमजही दूर झाले. मानवाचे निसर्गाशी घट्ट नाते प्राचीन काळापासून होते. त्याला नैसर्गिक आवाजातच सप्तसूर सापडले, नव्हे, बावीस सूर सापडले. भरतमुनी यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि संवेदनशीलतेने भारतीय शास्त्रीय संगीताचा अवकाश उभा केला, तो त्यांना जाणवलेल्या बावीस श्रुतींच्या आधारावर. भारतीय शास्त्रीय संगीतात कोणत्या रागात बावीसपैकी कोणते स्वर घ्यायचे, आरोहात कोणते घ्यायचे- अवरोहात कोणते घ्यायचे- त्याचे चलन कसे  असावे  अशा अनेक गोष्टी हळुहळू निश्चित होत गेल्या. श्रुती आणि रागदारी यांचे ज्ञान प्रत्येक पिढीकडे वारसा म्हणून गुरुशिष्य परंपरेने आणि मौखिक पद्धतीने सुपूर्द होत आले.

एका वेळी कानावर येणारे अनेक आवाज म्हणजे गोंगाट.

एक ओळखता येणारा आवाज म्हणजे ध्वनी.

संगीताचा अनुभव देणारा ध्वनी म्हणजे नाद.

आणि सप्तकात न्यासाकरता प्रमाणित केलेले 22 नाद म्हणजे श्रुती. अशा बावीस श्रुतींमधून रागासाठी निवडलेल्या श्रुती म्हणजे स्वर. काही म्हणतात की श्रुतीची व्याख्याच होऊ शकत नाहीत, काही म्हणतात श्रुती अगणित असतात, काही म्हणतात कलाकाराच्या ‘मूड’प्रमाणे श्रुती वेगवेगळ्या निघू शकतात. परंतु भारतातील संगीताचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे की श्रुती या बावीस असतात. त्या ‘असंदिग्ध व सैल’ असू शकत नाहीत. श्रुतींचा प्रत्यक्ष उपयोग करताना त्यांच्या आजूबाजूचे अतिरिक्त नादही गमक किंवा काही अलकांकर करताना घ्यावे लागतात. त्यामुळे समज असा होतो, की ते अतिरिक्त स्वरदेखील श्रुतीच आहेत. परंतु श्रुती या न्यासाकरता (बावीस श्रुतींपैकी विशिष्ट रागासाठी निवडलेल्या श्रुती हेच त्या रागाचे स्वर असतात) रागविस्ताराकरता वापरल्या जातात. त्यामुळे कण स्वर गमकसाठी, मींडसाठी वापरलेले आजूबाजूचे स्वर हे श्रुती नव्हेत.

श्रुती बावीसच का? भारतीय संगीतातील सप्तकात बारा स्वरक्षेत्रांमध्ये सात स्वयंभू वा नैसर्गिक श्रुती आहेत आणि त्याहीपैकी प्रथम निर्माण होणाऱ्या श्रुती म्हणजे ‘षड्ज’ आणि ‘पंचम’. कोठच्याही तारेवर कोठचाही षड्ज लावला तर सर्वप्रथम वाजतो तो षड्ज व त्यानंतर वाजतो तो पंचम. त्याचप्रमाणे, षड्ज ज्याचा पंचम होतो तो मध्यम. तंबोरा सा-प किंवा सा-म याच स्वरांमध्ये लावण्याच्या परंपरेचे ते कारण आहे. षड्जाचा पंचम हा पंचम. त्याचप्रमाणे पंचमाचा पंचम हा रिषभ होतो. रिषभाचा पंचम हा धैवत होतो आणि ‘पंचमचे हेच चक्र’ जर तसेच पुढे नेले तर गायक/वादक पुन्हा षड्जावर येतो. त्याचप्रमाणे षड्जाचा मध्यम हा मध्यम. मध्यमाचा मध्यम हा कोमल निषाद. कोमल निषादाचा मध्यम हा कोमल गंधार आणि हे ‘मध्यमाचे चक्र’ जर तसेच पुढे नेले तर गायक/वादक पुन्हा षड्जावर येतो. अशा प्रकारे, सा-प चक्रामुळे बारा आणि सा-म चक्रामुळे बारा अशा एकूण चोवीस मूलभूत श्रुती तयार होतात. त्यामध्ये सप्तकांतील बारा स्वरक्षेत्रांमधील प्रत्येकी दोन जागा येतात. त्यापैकी सा व प हे दोन स्वर भारतीय संगीतात अचल मानले गेल्यामुळे त्या दोन स्वरांना प्रत्येकी एक जागा दिली आहे. अशा प्रकारे, इतर दहा स्वरांच्या प्रत्येकी दोन म्हणजे वीस, अधिक षड्ज व पंचम असा श्रुतींचा हिशोब बावीस इतका होतो.

श्रुतींच्या कंपनसंख्या निश्चित करण्यासाठी दोन मार्ग ठरवले आहेत. एक, प्रख्यात गायकांनी गायलेल्या स्वरांच्या कंपनसंख्या संगणकाच्या सहाय्याने विश्लेषण करून शोधणे आणि दुसरे म्हणजे गणिती तत्त्व लावून व गुणोत्तरांनी शोधणे. त्या दोन्ही मार्गांनी शोधलेल्या कंपनसंख्यांमध्ये काही साम्य आढळते का ते पाहणे. त्या दिशांनी प्रयत्न सुरू असताना तज्ज्ञांना आढळले की सा जर 100 हर्ट्झ (कंपन संख्या मोजण्याचे वैज्ञानिक परिमाण) असेल तर त्याच्यापासून 5.35% वर रे 1 आणि 6.66% वर रे 2 (ही रसिकांना माहीत असलेल्या कोमल रे ची दोन वेगळी स्वरस्थाने, त्यातील एकाला अतिकोमल म्हणतात) तर सा पासून 11.11% वर रे 1 आणि 12.50% वर रे 2 (रसिकांना माहीत असलेल्या शुद्ध रे ची दोन स्वरस्थाने) सापडली. अशाच तऱ्हेने आणि हीच गुणोत्तरे सा पासून 12.5%वर असलेल्या रे 2 पासून वापरून ग् 1, ग् 2, ग 1, ग 2 या श्रुती सापडल्या. पुढे सा पासून 26.56%वर असलेल्या ग 2 या स्वरापासून तीच गुणोत्तरे वापरून (5.35%, 6.66%, 11.11%, 12.5%) म 1, म 2, म् 1, म् 2 या श्रुती सापडल्या. त्याच तऱ्हेने ध आणि नी साठीच्या प्रत्येकी चार श्रुती सापडल्या. गणिती पद्धतीने काढलेल्या श्रुतींच्या फ्रिक्वेन्सीज सिंथेसायजर वापरून, अचूक निर्माण करून त्या कानांना सुरेल वाटतात का याची खात्री करून घेतली. अशा तऱ्हेने तत्त्व, गणित आणि कान या तिघांचे एकमत झाल्यावरच श्रुतींना स्वीकारले गेले.

श्रुतींचे गणित वेगळ्या पद्धतीने मांडून ताळा म्हणूनही खात्री करून घेतली. ती पद्धत अशी – भारतीय संगीत षड्ज-पंचम आणि षड्ज-मध्यम भावांवर आधारित आहे. त्याच कारणामुळे, सर्व रागांतील वादी: संवादी स्वरांच्या जोड्या बहुतेक वेळी एकमेकांचे षड्ज-पंचम किंवा षड्ज-मध्यम असतात. त्यामुळे 22 श्रुतींपैकी किती श्रुतींचे पंचम व मध्यम 22 श्रुतींमध्येच आहेत ते तपासले. अशा पंचम आणि मध्यम यांच्या जागाही 22 श्रुतींमध्ये असणे जरुरीचे होते, नाहीतर एकूण श्रुती 66 झाल्या असत्या आणि आश्चर्य म्हणजे, सर्व पंचम व मध्यम मूळ 22 श्रुतींच्या जागांतच येत होते ! दुसरी एक विस्मयकारक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे 22 श्रुती दोन्ही षड्जांपासून दोन्ही बाजूंनी समगुणोत्तर आहेत (समान अंतरावर नव्हे). गणित आणि संगीत यांचे नाते असे अतूट आहे. तिसरे आश्चर्य म्हणजे 22 श्रुतींच्या संलग्न गुणोत्तरांमध्येही निश्चित असा एक क्रम दिसतो. संलग्न गुणोत्तर म्हणजे लागोपाठच्या दोन श्रुतींमधील गुणोत्तर. त्यात तीन प्रकारची गुणोत्तरे आढळली. त्यांना भरत मुनींनी प्रमाण श्रुती, पूर्ण श्रुती आणि न्यून श्रुती असे संबोधले आहे.

ओक यांनी हार्मोनियममध्ये 22 श्रुती वाजवता येण्यासाठी वेगळीच युक्ती केली. टेम्पर्ड स्केलच्या हार्मोनियममध्ये एका सप्तकात 12 पट्ट्या (सूर) असतात. त्यांनी हवे तेव्हा वीस श्रुती काढता येण्यासाठी त्यांतील, दहा पट्ट्यांमधून प्रत्येक पट्टीसाठी एक खटका लावला आणि आतमध्ये अजून एक ‘रीड’ (म्हणजे हार्मोनियममधील कंप पावून स्वर निर्माण करणारी धातूची पट्टी) लावली. अर्थातच सर्व ‘रीड्स’ या श्रुतींच्या शोधलेल्या फ्रिक्वेन्सींशी जुळणाऱ्या आहेत. खटका ओढला तर अतिकोमल स्वर वाजेल नाहीतर कोमल स्वर अशी योजना केली आहे. त्यांनी नव्याने रचलेल्या अशा या पेटीचे – या हार्मोनियमचे पेटंटही घेतले आहे.

श्रुतिस्थानांची तारवाद्यांवरील गणिती अचूकता – कोणत्याही दोन श्रुतींमधील किंवा सा पासूनचे प्रत्येक श्रुतीचे अंतर हे एका निश्चित पण वेगवेगळ्या गुणोत्तराने ठरते. तीच गोष्ट जेव्हा ओक यांनी तारवाद्याला लागू केली तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, वाद्य कोणतेही असू दे, त्यावरील तार कोणत्याही सुरात असू दे, तारेची लांबी काहीही असू दे, वाजवणारा कोणीही असू दे, ज्या संलग्न गुणोत्तरांवर षड्जापासून पुढील सर्व श्रुती येतात, त्याच गुणोत्तरांवर तारेवरील श्रुतींची अंतरेही असतात. उदाहरणार्थ, 80% लांबीवर गंधार वाजणार म्हणजे वाजणार. 90% लांबीवर शुद्ध रिषभ वाजणार म्हणजे वाजणार. 71.11% लांबीवर तीव्रतम मध्यम वाजणार म्हणजे वाजणार. प्रत्येक श्रुतीचे तारेवरील अंतर हे त्या त्या श्रुतीच्या सा शी असलेल्या गुणोत्तरानुसार निश्चित आहे. ते संशोधन अपूर्व आहे. वादकांना त्याचा फार मोठा फायदा होतो. त्यांनी जर सतार, सारंगी, दिलरुबा, व्हायोलिन वगैरे तंतुवाद्यांवर तारेखाली गुणोत्तरानुसार अंतरांवर ठिपके काढले तर त्यांना ते स्वरस्थान लक्षात ठेवावे लागणार नाही. बोट जर थेट ठिपक्याच्या जागी ठेवले तर तेथील अपेक्षित श्रुती वाजणारच. विशेषतः, पडदे नसलेल्या वाद्यांवर ती गोष्ट प्रचंड उपयोगी ठरते. अर्थात, वादकाचा अभ्यास कोणत्या रागासाठी कोणती श्रुती आवश्यक आहे यासाठी हवाच.

युरोपीयन इक्विटेम्पर्ड सप्तकामुळे जगातील अनेक तऱ्हांच्या संगीतावर, प्रचंड अतिक्रमण गेल्या दीडशे वर्षांत झाले आहे. ते आक्रमण हार्मोनियम, ऑर्गन, पियानो, सिंथेसायजर अशा वाद्यांमुळे घडून आले आहे. अनेक देशांतील मूळ संगीत व मूळ स्वर मागे पडून, त्याऐवजी युरोपीयन इक्विटेम्पर्ड सप्तकातील स्वरच खरे स्वर आहेत असा जगाचा गैरसमज झाला आहे. भारतातही बहुतेक गायक-वादकांनी त्यांच्या मूळच्या भारतीय 22 श्रुतींना तिलांजली देऊन हार्मोनियमसारख्या टेम्पर्ड वाद्याशी नको इतकी सलगी केली आहे. सर्वांना युरोपीयन व भारतीय स्वरातील फरक सूक्ष्म असले तरी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी ते महत्त्वाचे आहेत याचा सोयीस्कर विसर पडला आहे. दिलरुबा, सारंगी, वीणा इत्यादी 22 श्रुती वाजू शकणारी, साथीची पारंपरिक भारतीय तंतुवाद्ये मागे पडली. काही मोजक्या पंडितांनी इक्विटेम्पर्ड पद्धतीने जुळवलेल्या हार्मोनियम, ऑर्गन, पियानो, सिंथेसायजर या वाद्यांना विरोध केला. आकाशवाणीने तर 1940 ते 1971 या काळात त्यावर बंदीही घातली होती. तरीही, या वाद्यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती. ओक यांचे संशोधन हे भारतीय शास्त्रीय संगीताला पुन्हा एकदा त्याचे स्वरवैभव मिळवून देण्यासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करते. भारतीय शास्त्रीय संगीताचा संपूर्ण आनंद लुटायचा असेल तर गायक-वादक-श्रोते-गुरु-शिष्य अशा सर्वांनी प्राचीन ज्ञानाची परंपरा पुढे न्यावी. ओक यांनी ती गणिताने भक्कम केली आहे.

हार्मोनियम एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातून आले. हार्मोनियममध्ये एका सप्तकात बारा सूर होते आणि तेही एकमेकांपासून सारख्या अंतरावर (अंतर म्हणजे कंप्रतेतील, फ्रिक्वेन्सीतील फरक). म्हणजे खालचा सा आणि वरचा सा यांतील अंतर दुप्पट; पण मधला प्रत्येक स्वर, ते अंतर भागिले बारा इतक्या अंतरावर ! त्या उलट, भारतीय शास्त्रीय संगीतात बावीस स्वर आणि तेही वेगवेगळ्या प्रमाणात एकमेकांपासून दूर. हार्मोनियमच्या आगमनापूर्वी भारतीय शास्त्रीय संगीतात साथीला सारंगी, दिलरुबा ही वाद्ये घेतली जात असत. सारंगीत तारेवर जेथे बोट ठेवू तेथे स्वर उत्पन्न होतो, त्यामुळे अचूक स्वर लावण्याची सोय आहे. दिलरुब्यात त्याचे पडदे रागानुरूप अचूक स्वरांवर आणून ठेवले की तोही अचूक वाजू लागतो. हे बावीस स्वर हार्मोनियममध्ये नाहीतच; प्रत्येक स्वर थोडा आजूबाजूला असतो. म्हणजे चुकीचा असतो, पण हे हार्मोनियम भारतीयांच्या कानामागून आले आणि भारतीयांचे तिखट कान मिळमिळीत करून गेले. ते वाजवण्यास सोप्पे, कोठल्याही पट्टीत वाजवता येण्यासारखे, हाताळण्यास हलके, किंमतीलाही वाजवी आणि सारंगी-दिलरुब्याच्या मानाने दणकट असे असल्यामुळे, भारतभर हार्मोनियमचा सुळसुळाट झाला. त्या धांदलीत, भारतीयांनी त्यांचा नैसर्गिक कान गमावला. गाणाऱ्यांनी, ऐकणाऱ्यांनी, गुरूंनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी ! त्यामुळे, कालांतराने ‘श्रुती’ हा ऐतिहासिक, गूढ विषय झाला आणि हिंदुस्थानी संगीताला बावीसऐवजी बाराच सूर पुरेसे वाटू लागले. सारे जग इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून अधिकाधिक सूक्ष्मतेकडे जात आहे. त्यावेळी भारतीय संगीत सूक्ष्मतेकडून ढोबळपणाकडे जात राहिले.

1. मानवी कान हा एखादा स्वर ‘सुरेल’ आहे की ‘बेसूरे’ आहे हे कसे ठरवतो? तो निर्णय घेण्यासाठी, कानास ‘संदर्भस्वर’ कोणता हे प्रथम कळावे लागते. कारण, जर संदर्भस्वरच नसेल, तर गायलेले स्वर हे फक्त ध्वनी राहतील आणि त्यांच्या सुरेलपणाचा प्रश्नच उद्भवणार नाही.

2. कलाकार त्याचा गळा वाद्यातून येणाऱ्या स्वरांमध्ये मिळवू पाहत असतो, तेव्हा वाद्यातील स्वर हे ‘संदर्भस्वर’ म्हणून काम करतात आणि गळ्यातील स्वर त्या संदर्भस्वरांशी अचूकपणे जुळतात तेव्हा गाणे सुरेल चालले आहे असे जाणवते. भारतीय श्रोत्यांनी अनेक वर्षे ऐकलेल्या सर्व थोर कलाकारांच्या बाबतीत हे असेच घडत होते. त्या वेळीही हार्मोनियम वा ऑर्गन यांच्यामधील सर्व स्वर हे टेम्पर्डच होते. तरीही, श्रोते गाणे सुरेल आहे असे म्हणत होते, कारण, गळ्यातील स्वर हे वाद्यातील स्वराबरहुकूम होते आणि श्रोत्यांच्या कानामध्ये ते स्वर मुळातच चुकीच्या जागी आहेत हे कळण्याची कोठलीही सोय नव्हती.

3. ही गोष्ट गायक स्वतः त्यांच्या घरीच सिद्ध करू शकतात. एक टेम्पर्ड हार्मोनियम घ्यावे. बिहाग गाऊ लागावे. त्यांचा गळा हार्मोनियममधील (टेम्पर्ड) गंधाराशी अचूकपणे मिळवून गावे. गायकाचा कान त्याला सांगेल, की गायला जाणारा गंधार सुरेल आहे. जरी प्रत्यक्षात टेम्पर्ड गंधार हा षड्जापासून 26% अंतरावर असला, म्हणजे 25%वर असलेल्या नैसर्गिक गंधारापासून दूर असला तरीही सर्व ठीक आहे असा भास होईल. अशा 25%वरील नैसर्गिक गंधारास आपण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गळ्यातील गंधार म्हणतो. दुसरेही अनेक थोर कलाकार (कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर इत्यादी) जेव्हा हा 25%वरील स्वयंभू गंधार गातात, तेव्हा टेम्पर्ड हार्मोनियम वाजवणारे काही वादक, हवेच्या नियंत्रणाने हार्मोनियममधील 26%वरील गंधार 25% करून म्हणजे हवेचा भात्यातील दाब कमी करून वाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा तसा दावाही असतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की भात्यावरील व हातावरील कितीही नियंत्रणाने 26% चे 25% होऊ शकत नाहीत.

4. याच कारणासाठी, कुमार गंधर्व हे गोविंदराव पटवर्धन यांच्यासारख्या कसलेल्या साथीदारासही (अनुक्रमे 25% व 50% अंतरावर गंधार व पंचम जुळवलेल्या विशेष) हार्मोनियममध्ये फक्त षड्ज व पंचम धरून वाजवण्यास सांगत असत, कारण त्या हार्मोनियममध्येही बाकी स्वर टेम्पर्डच असत.

5. याच कारणासाठी काही थोर कलाकार टेम्पर्ड हार्मोनियम साथीस न घेता त्याऐवजी सारंगी किंवा व्हायोलिन साथीस घेतात.

6. मी जेव्हा काही सुरेल व थोर गायकांच्या गळ्यातून निघालेल्या श्रुतींचे संगणकाद्वारे विश्लेषण केले तेव्हाही असे दिसले, की टेम्पर्ड हार्मोनियम साथीला घेतल्यावर त्यांचा गळाही नाईलाजाने व साहजिकच टेम्पर्ड स्वरच गात होता. मात्र तेव्हाही आपला कान आपणास सर्व काही ठीक चालू आहे असे दर्शवत होता.

22 श्रुतींची हार्मोनियम साथीला घेतल्यानंतर गायकांच्या गळ्यातून 22 श्रुती उमटण्यास मदत होईल, कारण या हार्मोनियममध्ये सर्व ‘संदर्भस्वर’ 22 श्रुतींचेच असतील. यामुळे मैफिलीचा सुरेलपणा वाढवण्यास या हार्मोनियमचा प्रत्यक्ष हातभार लागेल.

 

हेमंत साने 9324281681 hemantsane85@gmail.com

(डॉ. विद्याधर ओक यांनी लिहिलेल्या ‘22 श्रुती’ या पुस्तकावर आधारित)

—————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version