Home संगीत गायन बहुरंगी, बहुढंगी तोडी

बहुरंगी, बहुढंगी तोडी

आमच्या शाळेतील काळाची गोष्ट. सोऽहम हर डमरू बाजे | उसके सुर तालोंके | सुखकारक झूले पर | झूम रहे सरिता सर | भुवनत्रय गाजे… चौथीचा वर्ग आणि आमच्या वर्गातील नेहा गुरव हे नाट्यगीत म्हणत होती. मुले भान हरपून ऐकत होती. त्या सुरांची जादूच अशी होती, म्हणा ! नंतर तिने सांगितले की या रागाचे नाव तोडी ! तोडीशी पहिली ओळख झाली ती अशी ! नेहा ही एक व्यावसायिक आणि उदयोन्मुख शास्त्रीय गायिका झाली आहे. तोडीने तेव्हा मनात जागे केलेले कुतूहल आणि आकर्षण माझ्या मनात तसेच आहे; किंबहुना वाढतच चालले आहे !

जसे आकर्षण आहे, तशी थोडी भीतीदेखील ! त्याचे कारण असे की मी तोडीचे सूर जेव्हा पहिल्यांदा लावण्याची वेळ आली तेव्हा ते काही केल्या जमेचना ! ऋषभ गंधार कोमल, मध्यम, तीव्र आणि धैवत कोमल, पंचम, अल्प हे सगळे लिहिण्यास सोपे वाटत असले तरी सरळ आरोह म्हणणेही कठीण वाटत होते. गाणे तर राहूच दे… तरी का होईना, ‘लंगर काकरीया जिन मारो’ ही बंदिश शिकण्याचा प्रयत्न केल्याचे आठवते. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ म्हणण्याचाही प्रचंड प्रयत्न केल्याचे स्मरते; पण काही जमेना. त्या काळात माझ्या ऐकण्यात वारंवार असे ती मालिनी राजूरकर आणि किशोरी आमोणकर यांची तोडी ! ते गाणे ऐकून तोडी गाण्याची इच्छा अधिक बळावत असे. मालिनी यांनी म्हटलेला ‘लाल मनावन’ हा खयाल आणि ‘कान्हा करत मोसे रार एरी माई’ ही द्रुत या रचना माझ्या फार आवडीच्या ! तसेच, किशोरी यांच्या अल्बममधील ‘बेगुन गुन गाईये’ ही द्रुत व तराणा यांमधील रचना !

पुढे जेव्हा तोडीबद्दल माहिती वाचली तेव्हा ‘मियाँ की तोडी’ आणि ‘गुजरी तोडी’ असे दोन मुख्य; पण वेगवेगळे असे तोडीचे प्रकार असतात, हे कळले. ‘मियाँ की तोडी’मध्ये पंचम अल्प प्रमाणात; तर ‘गुजरी तोडी’मध्ये तो वर्ज्य असतो. ‘मियाँ की तोडी’पेक्षा ‘गुजरी तोडी’ हा काहीसा चंचल, उत्तरांगप्रधान असा राग! एवढेच नाही, तर जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक व गुरू पंडित रत्नाकर पै हे ‘मियाँ की तोडी’ हा ‘श्री’ अंगाने म्हणजे श्री रागाच्या अंगाने गावा; तर ‘गुजरी तोडी’ ‘मारवा’ अंगाने, असे सांगत. हे सगळे ऐकून तोडीचा मी असा काहीसा धसका घेतला होता आणि गाण्याच्या वाटेला जायचे नाही असे ठरवून फक्त श्रवणभक्ती सुरू ठेवली.

भीमसेन यांचा ‘चंगे नैनुवाली या कुडिया’ हा खयाल व ‘भवानी जगत जननी’ ही द्रुत रचना सकाळी ऐकणे म्हणजे पर्वणीच ! त्यांच्या धीरगंभीर सुरात तोडी सुरू झाला; की आपोआप मन एकाग्र होई ! मल्लिकार्जुन मन्सुर यांचा तोडी ऐकताना तोच अनुभव येई. ‘सब निस बरजोरी’ हा खयाल अण्णा सुरांचे लिंपण करून गायले आहेत. परंतु मी सर्वात जास्त रमलो तो किशोरी यांच्या तोडीमध्ये ! ‘मेरे मन याहूँ रटे रे’ हा खयाल त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेला.

मला तोडीतून प्रतीत होते ते सकाळी आठ-साडेआठची वेळ, उन्हे अजून चढायची आहेत, हवेत किंचित गारवा आहे. सकाळी उठून नित्यकर्मे आटोपून एखादा विद्यार्थी एकाग्र चित्ताने अभ्यासाला बसला आहे व हळूहळू त्यात पूर्णपणे गढून गेला आहे. शांतता, एकाग्रता आणि वैचारिक सुसूत्रता यांचा अनोखा मेळ जमला आहे; असे काहीसे. विकारांचा व विचारांचा गोंधळ दूर करावा तो तोडीच्या सुरांनीच !

मी नंतरच्या काळात ‘कुतुबदिन कुतुब आलम’ ही बंदिश शिकलो. ती मल्लिकार्जुन मन्सूर आणि किशोरी आमोणकर या दोघांनी गायली आहे; त्याचबरोबर ‘भोर भई तोरी बाट तकत पिया आज’ ही गुजरी तोडीची आणि ‘अब मोरी नय्या पार करो तुम’ ही ‘मियाँ की तोडी’ची बंदिशही प्रसिद्ध आहे. त्या आग्रा, पटियाला घराण्यांच्या गायकांकडून ऐकण्यास मिळतात.

अस्सल गुजरी तोडी ऐकला तो बेगम परविन सुलताना यांचा ! वातावरण सुरावलेले असणे म्हणजे काय हे तेथे कळले आणि पुढे, किशोरी यांना तोडी गाताना प्रत्यक्ष ऐकले तेव्हा स्वत:च्या श्वासोच्छवासातूनही तोडीच ऐकू येतो की काय असे वाटण्याएवढा त्या सुरांचा असर झाला होता !

त्यानंतर मात्र मी तोडी शिकण्याचा मनापासून प्रयत्न करू लागलो. पारंपरिक खयाल ‘मेरे मन याहूँ रटे रे’; तसेच, मोगुबाईंनी माझ्या गुरुजींना शिकवलेली ‘गरवा मै सन लागी’ ही चीज… अशी तालीम सुरू झाली. त्यातून तोडीच्या अतिकोमल ऋषभ व गंधार यांची जाणीव होऊ लागली आणि त्यासाठी किती एकाग्र चित्ताने स्वराभ्यास करावा, हे जाणवले ! त्यामुळेच ‘तोडीचा सकाळचा रियाज’ या गोष्टीला संगीतसाधनेत फार महत्त्व आहे असे का म्हणतात ते उमगले.

तोडी हा इतका सर्वव्यापी राग आहे, की प्रत्येकाने तो त्याचा त्याचा रंग देऊनही दशांगुळे उरतो ! ग्वाल्हेर घराण्याचे कलाकार गातात तो ‘बाजो रे मोंमद’ हा खयाल किंवा ‘जा जा रे पथिकवा’ हा वरच्या अंगाची घडण असलेला खयाल, ‘जयपूर’मधील ‘राज करो या नगरीमें’ हा पंचम ते ऋषभ अशी मिंड मुखड्यात घेऊन येणारा खयाल, ‘अब मोरे राम, दैया बाट दुबर’ असे अनेक खयाल शिकावेत, ऐकावेत आणि गावेत ! त्यामुळे तोडीच्या अंतःकरणात अधिक खोल शिरण्यास खूप मदत होईल; असे सर्वच ज्येष्ठश्रेष्ठ कलाकार सांगतात.

तोडीत किती विविध बंदिशी आहेत ! त्या वेगवेगळ्या अनेक विषयांवर आधारित आहेत. मला काही विशेष येथे सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे ‘गुजरी तोडी’मधील ‘जियु मोरा चाहे’ आणि पंडित शंकर अभ्यंकर यांची ‘बोलता जा रे दिल खोलता जा’ ही रचना ! ‘जियु मोरा चाहे’ ही अश्विनी भिडे-देशपांडे, शाल्मली जोशी आणि प्रतिमा टिळक या जयपूर घराण्याच्या आघाडीच्या गायिकांकडून ऐकण्यास मिळते. शंकर अभ्यंकर यांची रचना वीणा सहस्रबुद्धे यांनीही गायली आहे.

अश्विनी यांनी ती त्यांच्या तोडीवरील ‘राग की तस्वीर’ या शृंखलेत ऐकवली आहे. मी ती बंदिश गाण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचप्रमाणे अभिषेकी यांनी गायलेली ‘चलो सखी सौतन के घर जईये’, केसरबाईंनी गायलेली ‘हां रे दैया तोरी सगरी बात’ ही चीज तोडीचे वेगवेगळे ढंग दाखवतात. रामकृष्ण वझे यांनी गायलेली ‘नि मैं मसलत पूछे जिया तुसां’ ही पंजाबी चीज त्यांच्या खजिन्यामधील खास आहे. निवृत्तिबुवांनी तर ‘दैया बाट दुबर’ या पारंपरिक खयालात गुंतागुंतीच्या क्लिष्ट तानांची आतिषबाजी केली आहे. ‘अल्ला जाने मौला जाने’, ‘राम सुमर मोरे प्यारे’ अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.

विजय सरदेशमुख यांच्या शिष्या तन्वी जगदाळे यांनी तोडीच्या विविध बंदिशींमधून तोडीच्या विविध रूपांचा आढावा घेणारा ‘मनस’ हा ऑनलाईन कार्यक्रम केला होता. त्यातील विविध बंदिशी, कुमारजींच्या रचना… सगळेच श्रवणीय व अभ्यास करण्याजोगे आहे.

मराठी, हिंदी सिनेसंगीत आणि नाट्यगीते यांमध्येही तोडीचा वावर बराच आहे. ‘जा जा रे’ हा खयाल ‘लेकिन’ या चित्रपटात हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात वापरला आहे. ‘ताजमहाल’ चित्रपटातील ‘खुदा ए बरतर’ हे गाणे, ‘रैना बीती जाये’, ‘दुनिया न भाई मोहे’ हे गाणे तोडीच्या छायेतील आहे. लेखाचे शीर्षक आहे ते ‘भीनी भीनी भोर’ हेही आशा भोसले यांचे तोडीमधील नितांतसुंदर गाणे आहे. बिस्मिल्ला खाँ यांचा सनईवर वाजवलेला तोडी तर नेहमीच शुभ कार्यांमध्ये वाजवला जातो.

मराठीतील ‘अरे अरे, ज्ञाना झालासी पावन’ हा अभंग, ‘अगा, करुणाकरा’ हे गाणे; तसेच, ‘पिंजरा’ चित्रपटातील ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ ही गाणी तोडीवर आधारित आहेत.

तोडी हा असा बहुरंगी आणि बहुढंगी आहे. आयुष्यभर पुरून उरेल असा !

 सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. सकाळी सकाळी तोडीचं एवढं बिनतोड, समग्र विश्लेषण वाचायला मिळाले,ही दिवाळीची अपूर्व अशी सुंदर भेट आहे जणूं.,
    खूप छान, विविध उदाहरणांनी नटलेला सुंदर लेख

  2. “तोडी” खूपच glamorous वाटायचा आत्तापर्यंत.
    डॉ. चिंगू खाँ साहेब खूप खूप धन्यवाद ‘ तोडी’ शी जानपहचान करवून दिल्या बद्दल….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version