Home कला सारंगाच्या छायेत

सारंगाच्या छायेत

सारंग हे नावच किती मोहक आहे ! जस नाव तसा राग आहे. त्याचा आवाकाही फार मोठा आहे. ऊन चढल्यावर मध्यान्ह येतेत्या वेळच्या रागांमध्ये सारंगाचा वावर आहे. जेव्हा केवळ सारंग’ असा उल्लेख होतोतेव्हा त्याचा इशारा हा वृंदावनी सारंग रागाकडे असतो किंवा सारंग या रागांगाकडे असतो. रागांग म्हणजे अशी स्वराकृती की जी सगळ्या सारंग प्रकारांचे सारंगपण निश्चित करते. अशा एकापेक्षा जास्त स्वराकृतीही असू शकतात. त्या एखाद्या रागाला सारंगाचा प्रकार म्हणता येण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थसा रे म प नीम ऽ रे नि ऽ सारेम रेसा निसा इत्यादी. सारंगाच्या विस्तीर्ण परिवारातील मुख्य सारंगांचे तीन प्रकार – वृंदावनी सारंगशुद्ध सारंग आणि मधमाद सारंग ! गौड सारंग हादेखील प्रसिद्ध व मैफलीतून बऱ्याच वेळा ऐकण्यास मिळणारा राग असला तरी वर उल्लेख केलेल्या सारंगच्या रागांगांपेक्षा तो भिन्न असल्याने त्याचा येथे अंतर्भाव केलेला नाही.

वृंदावनी सारंगात दोन्ही निषाद लागतात व गंधार आणि धैवत वर्ज्य आहेत. सारंगाशी माझी ओळख या रागाद्वारेच झाली. माझी आजी ना बोलो शाम हमीसन’ ही वृंदावनी सारंगाची पारंपरिक चीज म्हणत असे. मी ही रचना गांधर्व महाविद्यालयातदेखील अनेकदा ऐकली होतीपरंतु मला सगळ्यात वेडे केले ते भीमसेन जोशी यांच्या वृंदावनीने ! तुम रब तुम साहिब’ हा झपताल आणि त्याला जोडून गायलेली जाऊॅं मैं तोपे बलिहारी’ ही द्रुत चीज लाजवाबच आहे ! मला तर असे वाटते, की भीमसेन यांनी ती द्रुत इतकी आपलीशी करून म्हटली आहे कीती बंदिश कोणीही गायली अथवा वाजवली तरी भीमसेन यांची आठवण ही येणारच ! पुढे पुढे बन बन ढूँढन जाऊॅं’ किंवा रोको ना छैल मोरी’ अशा पारंपरिक चिजा ऐकण्यास किंवा शिकण्यास मिळाल्या आणि वृंदावनीचे विश्व उलगडू लागले. त्यात अजून महत्त्वाची एक बाजू म्हणजे माझ्यासारख्या कित्येक संगीताच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात घन घन माला नभी दाटल्या’ हे गीत हमखास गायलेले असते. तेदेखील वृंदावनी सारंगावर आधारित आहे. त्या गीताद्वारेही माझी सारंगाच्या विश्वात डोकावण्यास सुरुवात झाली आणि सारंगाचा आवाका केवढा मोठा आहेहे लक्षात येऊ लागले ! सारंगाचा प्रत्येक प्रकार हा दुपारच्या बदलत्या वातावरणाची वेगवेगळी छटा दाखवतो. भारतीय संगीताची ही केवढी श्रीमंती आहे ! टळटळीत दुपार वेगळीपावसातील दुपार वेगळीढगाळ वातावरणातील वेगळी, तर थंडीमधील वेगळी ! त्यांचे वेगवेगळेपण अधोरेखित करणारे विविध प्रकारचे सारंग आहेत ! अभिजात संगीताचे हे वैभव आहे !

वृंदावनी सारंग मला पावसाळ्यातील ओलेती दुपार जाणवून देतो- आरोही शुद्ध निषादातील तीव्रताअवरोही कोमल निषादाने फुंकर घातल्यासारखी कमी होते. अश्विनी भिडे-देशपांडे या मल्हाराव्यतिरिक्त पावसाळ्याचे वातावरण दाखवणारे राग अशी संकल्पना मांडतात. वृंदावनी सारंगदेखील त्यात येऊ शकेल ! आग्रा घराण्याच्या गायिका पूर्णिमा धुमाळे यांनी वृंदावनी सारंग विस्तृत नोमतोमसहित गायला आहे. त्यांनी राग सुरेख रीत्या उलगडला आहे. त्यांनी उधो धन‘ हा झपताल व प्रेम पिया’ उस्ताद फैयाज खान यांची प्रसिद्ध बंदिश सगरी उमरिया मोरी’ फार रंगवून म्हटली आहे. तीच बंदिश श्रुती सडोलीकरही छान गातात. मीदेखील ही बंदिश गाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याव्यतिरिक्त आली वा की अखियाँ जादूभरी (नायिका म्हणते अग सखी त्यांचे (वा की) डोळे /नजर जादूमय आहेत.), पंडित रातंजनकरांचा तराणाअश्विनी भिडे-देशपांडे यांनी बांधलेली मत्ततालातील चीज हो मोरा जिया बेकल होत’ व त्याची जोड कल ना परे मोहे’ या बंदिशी श्रवणीय आहेत. मालिनी राजूरकर यांनी गायलेली कारी करू मैं अकेली नार’ ही चीज मला विशेष आवडते. ठेवण डौलदार आहे व मालिनी यांनी ती मांडलीदेखील तशीच आहे.

कुमार गंधर्वांनी रागांचा जन्म हा लोकधुनांमधून झालेला आहे असे म्हटले आहे आणि सारंगावर आधारित तशा रचना अनेक सापडतात. शाश्वती मंडल यांनी गायलेला टप्पा आहे; अगदी घरोघरी गायली जाणारी बाळा जो जो रे’ ही अंगाईदेखील सारंगावर आधारित आहे. सारंगाच्या छायेतील किंवा सारंगावर आधारित कितीतरी हिंदीमराठी गाणी व नाट्यगीते सांगता येतील. संगीत शारदा नाटकातील जय कृष्णा तटवासा’ हे पद, ‘संत तुकाराम सिनेमात असलेला वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग किंवा बालगंधर्वांनी गायलेला विष्णुमय जग हा अभंग म्हणजे सारंगाची प्रतिबिंबेच होत ! सुधीर फडके यांचे संथ वाहते कृष्णामाई’ हे गीततर लता मंगेशकर यांची गाणी जशी जादूगर सैंया छोड मोरी बैंया’, ‘जा रे जा रे बादरा’ ही गाणी सारंगाची धुन जाणवून देतातरानी रूपमती या सिनेमातल निरुपा रॉय यांच्या तोंडी असलेले आजा भँवर’ हे लता मंगेशकर यांचे गाणे म्हणजे जणू सारंगाची बंदिशच ! त्यातील सपाट ताना वाखाणण्याजोग्या आहेत. पद्मावत’ सिनेमातील गाजलेले गाणे घूमर’ हेदेखील सारंगाच्या स्वरांनी मोहक झालेले आहे.

वृंदावनी सारंग राग कर्नाटक शास्त्रीय संगीतातही आहे. तो उत्तर हिंदुस्थानी सारंगासारखाच आहे. वेगवेगळ्या रचना त्यात नियमितपणे गायल्या जातात. उदाहरणार्थ, ‘रंगापूर विहारा’ ही प्रसिद्ध कृतीएम. बाल मुरलीकृष्ण यांनी बांधलेला थिल्लाना; एवढच नव्हे तरमराठी अभंगदेखील कर्नाटक संगीताच्या मैफलीत ऐकण्यास मिळतात. त्यातीलच नामदेव कीर्तन करी’ हा अभंग इंटरनेटवर उपलब्ध आहे. अनेक अमराठी कलाकारांनी सारंगावर आधारित तो अभंग तन्मयतेने म्हटला आहे.

सगळे सारंग हे पंचम सुराला प्राधान्य देतात. पण मधमाद सारंगामध्ये शुद्ध मध्यम हा मुख्यतसेच न्यास स्वर आहे. त्या रागात फक्त कोमल निषादाचा प्रयोग केला जातो. परंतु खरी गंमत अशी, की राग मेघ व तो राग यांचे सूर सारखे आहेत, त्यांचे चलनही फार वक्र नाही. पण मग मेघ आणि मधमाद यांना वेगवेगळे कसे ठेवावे? तर त्या ठिकाणी श्रुती भेद आणि न्यास स्वरांमधील भेद महत्त्वाचे ठरतात. साहजिकच, मधमाद सारंगात सा रे म ऽ रे पम या संगती वारंवार येतात. सारंगाच्या इतर प्रकारांपेक्षा हा राग कमी ऐकण्यास मिळतो. मी किशोरी आमोणकरांचा मधमाद सारंग ऐकला आणि पुरता वेडावलो. जबसे मन लाग्यो’ हा विलंबित रूपक आणि शाम रंग मन भीनो’ हा तीन ताल या दोन्ही त्यांच्याच रचना अत्यंत मुलायम स्वरलगाव आणि मोजकी पण नेमकी गमक वापरून गायलेल्या आहेत. त्यांनी मांडलेला मधमाद सारंग एका वेगळ्या विश्वात नेतो.

दुपारी दोन-अडीचची वेळ आहे. जेवणे आटपूनमागचे सारे काम आवरून एक गृहिणी नुकतीच टेकली आहे, बाकी तशी निजानीज असल्यामुळे शांतता आहेमध्येच पानांची सळसळत्यातून अलगद सरकणारी वाऱ्याची झुळूकइतकीच काय ती हालचाल ! घरातील जेवून, तृप्त होऊन निजलेल्या मंडळींप्रमाणेच आजूबाजूचा निसर्गही समाधानी आहे. गृहिणी त्या तिच्या घरावरलोकांवर नजर फिरवते आणि तिच्या सुखी आयुष्याबद्दल समाधानी होतेया वर्णनासारखे काहीसे मधमाद सारंगाच्या स्वरांतून भासते. जणू, सुट्टीत आजोळी घालवलेली एक निवांत दुपार ! रंग दे रंगरेजवा’ ही या रागातील प्रसिद्ध पारंपरिक चीज ! अश्विनी भिडे- देशपांडेवीणा सहस्रबुद्धे आणि मालिनी राजूरकर यांनी त्यांच्या त्यांच्या ढंगाने ती चीज अप्रतिम गायली आहे. वीणा यांचा तराणाही सुंदर आहे. रंग दे रंगरेजवा हीच मीही तुम्हाला ऐकवत आहे.

प्रचलित सारंगांपैकी शुद्ध सारंग हा महत्त्वाचा आणि मोठा राग ! मध्यम व धैवत हे दोन्ही सूर त्याला वृंदावनी व मधमाद यांच्यापासून वेगळे ठेवतात. काही जण शुद्ध सारंगात दोन निषादांचा वापरही करतात. काही लोक असे मानतात, की शुद्ध सारंग हा वृंदावनी सारंगाची मूर्च्छना म्हणून जन्माला आला आहे. तेच सोप्या भाषेत सांगायचे तर वृंदावनी सारंगाचे सूर जर मध्यमाला षड्ज करून गायलेतर शुद्ध सारंगाचे सूर मिळतात ! हा झाला तांत्रिक भाग ! पण शुद्ध सारंग हा सगळ्या शास्त्रीय बाबींच्या पलीकडील अत्यंत शांत आणि सुंदर वातावरणाचा अनुभव देणारा राग आहे. त्यातील तीव्र मध्यमातून डोक्यावर आलेला सूर्य व टळटळीत दुपारचा दाह जाणवतोतर शुद्ध मध्यम हळुवार येणाऱ्या वाऱ्याच्या थंड झुळकेचा परिणाम साधतो. उन्हाने दमलेल्या पांथस्थाने डेरेदार वृक्षाच्या छायेत क्षणभर टेकावे, तसा !

शुद्ध सारंगाच्या विस्तीर्ण रूपात अनेक ख्याल आहेत. तपन लागी गैली’ हा पारंपरिक ख्यालत्याचबरोबर आई सबसुंदर कंचन बरसे’, ‘सलोने नैनवा’ यांसारखे अनेक ख्याल आहेत. जयपूर घराण्यातदेखील तपन लागी गैली’, ‘ख्वाजा दीन दुखियनको देत’ हे ख्याल गायलेले ऐकण्यास मिळतात. सगळ्या चिजा शुद्ध सारंगाची विविध सौंदर्यतत्त्वे ल्यालेल्या आहेत. द्रुतचिजांपैकी अब मोरी बात’ ही माझी आवडती चीज ! आग्रा घराण्याच्या उस्ताद फैयाज खान यांची ती रचना जवळजवळ सगळ्यांनी गायलेली आढळते. उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवर वाजवलेल्या शुद्ध सारंगात तशाच अंगाची रचना ऐकण्यास मिळते. पतियाळा घराण्याचे लोक बेग दरसवा देहो साजनवा’ ही बडे गुलाम अलींची रचना गातात. मध्य लयीचे वेगळे सौंदर्य त्यात आहे. हिराबाईंनी गायलेली जारे भवरा दूर’ किशोरी आमोणकर त्यांच्या ढंगात सादर करतात. वीणा गातात तो तराणा लय कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी बांधलेली हमरी उधारो तुम हो जगत के पालन हारा’ ही चीज सारंगातील भक्तिरसाचे उदाहरण आहे. प्रभा अत्रे यांचा रवि चढत जब गगन असा सुंदर झपताल आहेत्याच्या मुखड्यामधील तीव्र मध्यमाचा वापर चढलेले ऊन यथार्थ दाखवतो.

किती म्हणून सांगावे ! सारंगाचे विश्व हे सर्वसमावेशक व व्यापक आहे. तसेच धुलियामियाँकी सारंगसामंत सारंगअंबिका सारंगनूर सारंग असे अनेक भाऊबंदही त्यात आहेत. शुद्ध सारंगात शूरा मी वंदिले’, ‘निर्गुणाचे भेटी’ यांसारख्या रचनातर आशा भोसले यांचे लागे तोसे नैनसारखे फिल्मी गाणेही आहे. लता यांनी गायलेल्या सुनो सजना पपीहेने’ या गाण्यातही शुद्ध सारंग झळकतो आणि सुखावून जातो.

सारंगाचा असा हा परिवार ! एकेक प्रकार तप्त उन्हाच्या दाहावर फुंकर घालतो आणि मनाला शांत करून जातो.
(विशेष आभार- अक्षय वर्धावे)

– सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version