यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते.
मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी ठिकठिकाणी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली ‘मल्हार जॅम‘ ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील.
‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
–सुनंदा भोसेकर
कारी कारी बादरिया – मल्हार !
वर्षा ऋतूचे आगमन झाले असल्यामुळे मला लेख ‘मल्हारा’वर लिहावासा वाटला नसता, तरच नवल होते.
मल्हार आणि पाऊस याचे नाते नवीन नाही. तानसेनाने मियाँ मल्हार गायला की पाऊस पडे, ही कथा सर्वांना ठाऊक असते. पण शास्त्रीय रागसंगीताच्या जगात मल्हाराचं असं वेगळं विश्व आहे. मियाँ मल्हार रागाच्या लोकप्रियतेमुळे मल्हार म्हणजे मियाँ मल्हार आणि त्याची ‘सिग्नेचर फ्रेज‘ म्हणजे नि_ध नि सां असं एक समीकरण रूढ झालेले दिसते. पण मल्हार हा मियाँ मल्हारापुरता मर्यादित नसून ते त्याचे एक अंग आहे (रागांग) असेदेखील म्हणता येऊ शकते. आणि त्याची मुळे प्रमुख सहा रागांपैकी एक अशा मेघ या रागापर्यंत मागे जाणारी आहेत. मुळात ‘शुद्ध मल्हार’ असाही एक राग आहे, पण तो फारसा प्रचारात नाही.
मल्हाराच्या विविध प्रकारांपैकी बहुतांशी प्रकार शुद्ध मल्हारावर आधारित आहेत किंवा निदान त्याचे अंग त्या रागामध्ये असलेले आढळते. हे अंग म्हणजे रेsप या स्वरांची वारंवार वापरली जाणारी संगती !
साहजिकच ‘मियाँ मल्हारा’मध्ये ही संगती वारंवार येते; परंतु त्याबरोबरच कोमल गंधार व दोन निषादांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही त्याची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये ! मियाँ तानसेनाने निर्माण केला असल्याने त्याला ‘मियाँ की मल्हार‘ असे म्हटले जाते. ‘तानसेन की मल्हार‘ किंवा ‘दरबारी मल्हार‘ ही त्याचीच प्रतिनावे !
मियाँ मल्हार आणि माझा पहिला संबंध आला तो भीमसेन जोशी यांच्यामार्फत ! भीमसेन जोशी आणि त्यांचा मल्हार किती अजोड आहे; याची तोवर कल्पना नव्हती. पण त्यांच्या स्वतःच्या पहिल्या लॉन्ग प्लेईंग रेकॉर्डवर गायलेला मल्हार ऐकल्यावर मी आणि माझा मोठा भाऊ अक्षरशः वेडे झाले होतो. ‘करीम नाम तेरो‘ हा खयाल आणि त्याला जोडून गायलेली ‘अत धूम धूम रे‘ ही द्रुत, श्रोत्याला स्वरांच्या पावसात भिजवून, चिंब करून सोडते. तसेच ‘महंमदशा रंगीले’ ही बंदिश गातानाची त्यांची व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध आहे. भीमसेन जोशींनी त्यांच्या गाण्याने लहानथोर, रंक–राव, सगळ्यांना मोहित केले. भीमसेन जोशींचा धीरगंभीर स्वर, वेगवान बरसणाऱ्या ताना, सगळे कसे एकमेवाद्वितीय ! या स्वरविलासातून दाटून आलेले ढग, कडाडणारी वीज आणि त्यानंतर वेगाने येणारी सर सगळे कसे समोर साकार उभे राहते ! अशाच काहीशा वातावरणाचं थोडं स्त्रीसुलभ; पण तरीही आक्रमक असे चित्र रंगवणारा गानसरस्वती किशोरीतार्इंचा मल्हार ! हाच खयाल जयपूर गायकीचा डौल घेऊन विद्युल्लतेच्या वेगाने सरसरत जाणाऱ्या तानांसह श्रोत्याला नुसते स्तिमित करत नाही; तर पावसाची काळोखी रात्र, वादळी वाऱ्यांसह हलणारी झाडं आणि मधूनच लखकन् चमकणारी वीज अशा एका वर्षा ऋतूचं रौद्र स्वरूप दाखवणाऱ्या वातावरणात घेऊन जातो. ‘उमड घुमड गरज गरज‘ ही द्रुत बंदिश ताईंनी गायली आहे. खरं तर ही पारंपरिक रचना; पण ताईंनी तिला इतके आपलेसे करून गायले आहे की जणू ती त्यांची स्वतःची बंदिश आहे असे अनेकांना वाटते. ताईंनी इतक्या प्रकारचे मल्हार इतके वैविध्यपूर्ण स्वराविष्कार दाखवत गायले आहेत की त्यावर एक वेगळी लेखमालाच होऊ शकेल !
या ठिकाणी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते, ते म्हणजे ‘करीम नाम तेरो‘ या खयालाची, मियाँ मल्हार रागात इतर अनेक खयाल असले तरी लोकप्रियता अमाप आहे. सर्व घराण्यांतील बहुतांशी कलाकारांनी हाच खयाल गायलेला आढळतो. पण गंमत अशी, की पावसाशी समानार्थी असलेल्या मल्हार रागातील हा प्रसिद्ध खयाल, पण यात पावसाचा उल्लेख कुठेच नाही ! ही जगन्नियंत्याला केलेली प्रार्थना आहे.
करीम नाम तेरो
तू साहिब सतार
दुःखदरिद्र दूर करो सुख दे हो सबन को
अदा रंग बिनती करत है
सुन ले करतार
यात पावसाचा उल्लेख कुठेही नसला; तरी हे लक्षात येते की ही प्रार्थना पावसाच्या वरदानासाठी केलेली आहे. पाऊस येईल शेते पिकतील, दुःखदारिद्र्य दूर होऊन सगळा संसार सुखी होईल ही त्या मागची भावना ! शेकडो वर्षांपूर्वीची ही रचना पावसाचे मानवी जीवनातलं अनन्य महत्त्व दाखवून जाते.
मियाँ मल्हारची किती रूपं सांगायची ! वर वर्णन केल्याप्रमाणे रौद्र, विक्राळ तर आहेच; पण रिमझिम बरसणारा पाऊस, श्रावणातला ऊन- पावसाचा खेळ, ढगांनी व्यापलेलं आकाश, हवेतला गारवा, नजरेसमोरची हिरवाई सगळी मल्हाराचीच रूपं ! अनेक रचनांमधून व विविध सूरसंपन्न कलाकारांच्या आविष्कारातून ती जाणवतातच ! पंडित जसराज यांनी गायलेला मल्हार आणि त्याची द्रुत चीज ‘उमरड घुमड घन गरजे बादर‘ ही मी अनेकदा ऐकत असे, गुणगुणत देखील असे; तर मालिनी राजूरकर आणि राशीदखान यांनी गायलेली ‘बिजुरी चमके बरसे‘ ही चीज शिकलो होतो. सदारंगाच्या दोन पारंपरिक चिजा ‘बोलेरे पपीहरा‘ आणि ‘कहे लाडली‘; या वझेबुवा, गंगुबाई हंगल यांसारख्या दिग्गज कलाकारांकडून ऐकाव्यात. ‘कहे लाडली‘ ही चीज डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आडा चौतालात गातात, तिचाही रंग वेगळा आहे. ग्वाल्हेर घराण्याची तर तराणा ही विशेष खासियत ! मियाँ मल्हाराचा रंग घेऊन आलेला अतिद्रुत लयीतला एक तराणा अनेक ग्वाल्हेर घराण्याचे कलाकार गातात; तर वीणाताई सहस्त्रबुद्धे यांनी बांधलेला एक मध्यलयीचा, तर एक द्रुत असा तराणाही खास श्रवणीय आहे. पंडित अजय चक्रवर्ती यांनी ‘राधे झूलन पधारो‘ ही एक वेगळीच काहीशी लोकगीतवजा रचना मियाँ मल्हारात गायली आहे ती जरूर ऐकावी. मृदू स्वर, भावप्रधान काव्य आणि मल्हार यातून एक आणखी वेगळे मल्हाररूप दिसते.
पंडित कुमार गंधर्वांनी तर वर्षा ऋतू आणि त्याचे मानवी जीवनातलं स्थान यांचे नाते संगीतातून उलगडून दाखवणारा ‘गीत वर्षा‘ हा केलेला कार्यक्रम सुप्रसिद्ध आहेच. अर्थातच, त्यातही मियाँ मल्हार मधील रचना होत्या. ‘जाज्योरे बदरवा, सावन झरियो झर आयोरी‘ या दोन मला विशेष प्रिय आहेत. मालवी शब्द, कुमारांची बंदिशीची कहन आणि मल्हाराचे सूर सर्वच लाजवाब !
या सर्वव्यापी मल्हाराची सर्व संगीतकारांना भूल पडणे साहजिकच आहे. काही बंदिशी जशाच्या तशा किंवा त्यांच्या आधारावर नवीन गाणी करून अनेकांनी चित्रपटांत, तसंच भावगीतं म्हणूनही वापरल्या आहेत. पंडित जसराज एक चीज गात असत, ‘घन गरजत बरसत बूंद बूंद‘! यावर आधारित प्रसिद्ध मराठी गाणे म्हणजे भा.रा. तांबे यांचे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय‘ ! आशा भोसले यांनी गायलेले ‘आज कुणीतरी यावे‘ हे गाणेदेखील मल्हारावर आधारित आहे. सुधीर फडके यांचं ‘माना मानव वा परमेश्वर‘ हे गाणे मल्हारात आहे. ‘गुड्डी’ चित्रपटातील ‘बोले रे पपीहरा‘ हे गाणे सर्वश्रुत आहे; त्याचा उगमही सदारंगाच्या बंदिशीत आहे. लता मंगेशकर यांच्या ‘जहाँ आरा’ सिनेमातील दोन गाण्यांच्या चाली मल्हारावर आधारित आहेत.
गझलच्या दुनियेत मेहंदी हसन यांनी गायलेली ‘एक बस तू ही नहीं‘ ही गझल मल्हाराचे रूप घेऊन सजली आहे. सूफी गायिका अबिदा परवीन यांच्याही आवाजात ती ऐकायला मिळते. हरिहरन यांनी ‘ताजमहल‘ या चित्रपटासाठी गायलेले ‘अपनी जुल्फें‘ हे गझलनुमा गीतही फार गोड आहे. ‘कोक स्टुडिओ‘ या माध्यमातून अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून अनेक कार्यक्रम सादर केले जातात. ‘मल्हार जॅम‘ ही त्यातील एक प्रस्तुती! मियाँ मल्हाराच्या रचना आधुनिक वाद्यमेळासहित गाणे हा कौतुकास्पद प्रयत्न आहे व मुलांना शास्त्रीय संगीताकडे वळवण्यासाठी ती चांगली पहिली पायरी ठरू शकते.
मल्हाराचा कॅनव्हास हा असा विस्तीर्ण आहे. संपूर्ण जनजीवनाचा, त्यातील बारीकसारीक घडामोडींचा त्यात समावेश आहे. यातून हेच जाणवते, की रागसंगीत हे दैनंदिन जीवनाशी किती एकरूप होऊ शकते आणि हळूहळू एकरूप होऊन आयुष्यात मिसळून जाते. जाता जाता, श्रोत्याच्या मनावर ओलेपणाचा असा शिडकावा करून जाते की जणू पहिला पाऊस आणि मातीचा सुगंध !
टीप :- आपणा सर्वांच्या श्रवणानंदासाठी मी दर लेखासोबत विविध कलाकारांच्या त्या त्या रागाच्या यूट्युब लिंक्स देत असतो. या लेखापासून त्यात मीही एक एक छोटी बंदिश गाऊन आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जरूर ऐकावी. मियाँ मल्हारासाठी मी पंडित रामाश्रय झाया दिग्गज, तसेच वाक् गेयकारांची एक द्रुतरचना म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक्रिया जरूर कळवा.
पं. मल्लिकार्जुन मंसूर
पं. अजय चक्रवर्ती
– डॉ. सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com
मल्हाराच्या विविध रुपयांची वर्णन फारच सुरेख…
शास्त्रीय संगीताचं आकर्षण सगळ्यांनाच असतं… थोडाफार कान तयार असलेल्यांना ऐकायला आवडतील अश्या गाण्यांची खूप छान माहिती दिली आहे…
Thank you so much!
मल्हार रागाची तपशीलवार माहिती! अप्रतिम लेख! धन्यवाद!
Thank you!