एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता (आईसाहेब) महाराज यांनी सुरू केला. निमित्त झाले ते तिरुपती बालाजी यांचे दर्शन. त्या तेथे गेल्या असताना, तेथील धार्मिक कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांना स्फुरण मिळाले, की त्यांच्या गावीही तसा उत्सव असावा. सर्वांचा एकोपा राखण्याचे काम उत्सवाचे विविध प्रकारचे मान सर्व जातिधर्मांच्या लोकांना रथयात्रेच्या निमित्ताने देऊन अव्याहतपणे सुरू आहे. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते.
रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते. सगुणामाता साहेबांनी रथोत्सवासाठी बारा गावे इनाम दिली आहेत. रथ दोर लावून ओढण्यासाठी मानकरी संस्थानाच्या वडले, मिरढे व तिरकवाडी या गावांतील असतात.
श्रीराम प्रभूचे मंदिर मुधोजी मनमोहन राजवाड्याशेजारी मध्यवर्ती ठिकाणी आहे. मंदिराच्या ठिकाणी रामाचा ओटा या नावाने ओळखला जाणारा चौथरा होता, त्यावर वनवास काळात प्रभू श्रीराम सीतामातेसह वास्तव्यास होते अशी लोकधारणा आहे. सीतेचा संसार म्हणून काही पुरातन भांडी, वस्तू असे साहित्यही तेथे पाहण्यास मिळतात. सगुणामाता यांनी राज्यकारभार सांभाळत असताना, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी या रामाच्या ओट्याच्या ठिकाणी राममंदिर व इतर मंदिरे यांची उभारणी केली. त्यांनी संस्थानचे काही उत्पन्न देवाच्या सेवेसाठी व पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी स्वतंत्रपणे देऊ केले.
श्रीराम हे फलटण संस्थानिकांचे उपास्य दैवत आहे. श्रीरामाचा रथ ग्राम प्रदक्षिणेला दरवर्षी निघतो. तेव्हा ती फलटण व आसपासच्या लोकांना एक पर्वणीच असते. दिवस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा देवदिवाळीचा असतो. फळाफुलांच्या माळांनी, पानाफुलांनी सजवलेल्या त्या रथावर श्रीराम-सीतेची प्रतिमा असते. रस्त्या रस्त्यावर हजारो स्त्री पुरुष पानेफुले उधळून श्रीरामाचा जयजयकार करत असतात. रथाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रीपुरुषांची झुंबड उडते. रथाचे उत्स्फूर्त स्वागत चौकाचौकात होते. कोणी नारळाची तोरणे बांधतो, कोणी फळे उधळतो, तर कोणी नोटांचे हार बांधतो. तो या भागातील मोठा धार्मिक सोहळा समजला जातो. लोक संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि शिखरशिंगणापूरच्या शंभू महादेवाला जाणारी कावड यानंतरचा मोठा सोहळा म्हणून राम रथोत्सवाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.
वास्तविक, फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याची कुलस्वामिनी निंबळक येथील निमजाईदेवी ही आहे. राजघराण्यातील पुरुष फलटणहून निंबळकला जात, देवीचे दर्शन घेत. पुढे, त्या घराण्यात जावली येथील सिद्धनाथाची भक्ती सुरू झाली. राजघराण्यातील पुरुष जावलीच्या सिद्धनाथासही निमजाई देवीप्रमाणे जाऊ लागले.
नाईक निंबाळकर राजघराण्यातील जानोजीराव (बजाजी) फलटणच्या गादीवर असलेल्या मुदतीत बावडे (इंदापूर) येथे काही दिवस राहिले. जानोजीरावांचे वय तीस ते पस्तीस झाले तरी त्यांना मुलगा नव्हता, त्यांच्या मनात विषाद होता, त्यांनी त्या दु:खात श्रीरामाची उपासना सुरू करू असा नवस केला. त्याप्रमाणे जानोजीराव यांना खरोखरीच मुलगा झाला. त्यांनी ते श्रीरामाच्या कृपेचे फळ आहे असे जाणले. त्यांनी बावडे मुक्कामावरून फलटण येथे येताच त्यांच्या राहत्या घरानजिक ओट्यावर (चौथरा) श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली, तेच राजवाड्याशेजारील राममंदिर होय. नाईक निंबाळकर यांनी रामनवमीचा उत्सव तेथे दरवर्षी सुरू केला.
सगुणाबाई ऊर्फ आईसाहेब या जानोजीराव यांच्या सूनबाई. त्यांनी ओट्यावर भव्य दगडी मंदिराचे बांधकाम केले. मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यावर नगारखाना आणि आकर्षक मेघडंबरी तयार केली आहे. देवालयात ठिकठिकाणी मुरलीधर, हणमंत, गरुड, लक्ष्मीनारायण, गणपती अशा मूर्तींची स्थापनाही करण्यात आली आहे. देवालयातील राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींसाठी पेशवे सरकारकडील उत्तम गंडकी शीला आणून, पुण्यामध्ये त्या काळी प्रसिद्ध असलेले मूर्तिकार बखतराम यांजकडून मूर्ती करवून घेतल्याची नोंद संस्थानच्या कागदपत्रात आहे. सगुणामातांनी राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीची धार्मिक विधीपूर्वक स्थापना 1774 मध्ये करण्यात आली. देवालयाचा नैमित्तिक खर्च भागवण्यासाठी फलटण तालुक्यातील विडणी हे गाव देवस्थानकडे कायम इनाम म्हणून दिले आहे.
सगुणामाता यांनी पंढरपूरप्रमाणेच येथेही काकड आरतीची प्रथा सुरू केली. श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात हरिजागर संपल्यावर कार्तिक वद्य एकादशीपासून होते, त्यामध्ये प्रथम दिवशी पालखीची वाहने, दुसर्या दिवशी प्रभावळी, तिसर्या दिवशी अंबारी, चौथ्या दिवशी गरुड आणि पाचव्या दिवशी हनुमान अशी वाहने निघतात.
फलटण शहर हे त्यामुळे रामाची नगरी म्हणून ओळखले जाते. त्या शहराची शान त्या दिवशी पाहवी. कुस्त्यांचे जंगी फड गोविंद मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस, फलटण नगर परिषद आणि नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट यांच्या संयुक्त सहभागाने रथोत्सवानिमित्त भरवले जातात. तसेच, यात्रेमध्ये शेकडो प्रकारची लहानमोठी दुकाने, विजेचे पाळणे, रहाटगाडगी, खेळण्यांची-मेवामिठाईची दुकाने आणि खरेदी करणारी ग्रामीण जनता, विजेचा लखलखाट, रंगीबेरंगी वस्त्रांचा उसळता जनसागर, आनंदाचे वातावरण, जादूचे खेळ, झटपट फोटो काढून देणारे यात्रेतील फोटो स्टुडिओ… सारेजण मनोरंजनाचे खजिने घेऊन येतात.
रथोत्सवासाठी विविध प्रकारे मानकरी असून त्यामध्ये मेटकरी, पवार, ढेंबरे, वाघमारे, शिंदे, मेणसे, अब्दागिरे, घोलप, भोसले, टाळकुटे, पेटकर, वादे असे विविध जातिधर्मांमधील लोक आहेत. त्यांच्या मानाप्रमाणे रथोत्सवासाठी काम वर्षानुवर्षे केले जात आहे. रथोत्सवास फलटण पंचक्रोशीतील; तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात. रथोत्सवासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असते.
– इंदुमती अरविंद मेहता 9822266691, arvindmehtaphaltan@gmail.com
———————————————————————————————-