भेंडवडे हे सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील दोन–अडीच हजार लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव. भेंडवडे गाव विट्याच्या पूर्वेला, विट्यापासून साधारण आठ-दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. भेंडवडे हे गाव 1989 पर्यंत एकच होते. मूळ गावाचे पुनवर्सन करताना त्याचे तीन भाग करण्यात आले. त्यांतील ‘राजधानी भेंडवडे‘. मूळ भेंडवडे गाव कनिंग आणि सावळी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले होते. त्या नद्यांना आता दूधगंगा आणि वेदगंगा असे संबोधतात. त्या नद्या म्हणजे मोठे ओढेच आहेत. येथील संगमानंतरच्या प्रवाहावर बंधारा घातल्यामुळे पाणी खूप साठलेले आहे. हा सारा भाग भाकूचीवाडी या धरण परिसरात येतो.
भेंडवडे येथे पुरातन शिवमंदिर आहे. ते हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले असून साधारण बाराव्या शतकातील आहे. मंदिर पावसाळ्यात शिखरापर्यंत पाण्यात बुडते, तेव्हा मंदिराकडे जाता येत नाही. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा मोठा साठा, बाकी बाजूस पूर्णपणे मोकळा परिसर आणि हिरवीगार शेती यामुळे मंदिराला नैसर्गिक पार्श्वभूमी लाभली आहे. मंदिराच्या मागील ज्योतिबा आणि मायाक्का ही मंदिरे पाण्यात बुडालेली असून, त्यांचे फक्त शिखरदर्शन होते. ती ग्रामदैवते आहेत.
मंदिरावरील शिखर अलिकडे बांधलेले आहे. ते मूळ बांधकामाशी बेजोड वाटते. मंदिराभोवतालची संरक्षक भिंत सततच्या पाण्याच्या माऱ्याने ढासळत चालली आहे. मंदिराचे बांधकाम दगडात असून, मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला छत्री उभारलेली होती असे दिसते. त्याचे मनोऱ्यासारखे चार खांब ढासळले असले तरी ते पुन्हा उभारलेले आहेत. खालील चौथऱ्यावर प्रत्येक कोपऱ्यावरील दगडावर हत्ती कोरलेला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ ढासळलेली असून ती तशीच उभी केलेली आहे. मंदिराच्या तटरक्षक भिंतीतील दारातून आत आल्यावर मंदिराच्या चारही बाजूस बऱ्यापैकी रिकामी जागा आहे. तटरक्षक भिंतीच्या बाहेरच्या बाजूस तीन-चार वीरगळ ठेवलेले आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन पायऱ्या चढून आत जावे लागते.
मंदिराचे जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारालाच अडसराचा छोटा दगडी अडणा बसवलेला आहे. तो अडणा देवालायएवढाच पुरातन आहे. त्या अडण्याखाली वाकून, अथवा अडण्याला ओलांडूनच आत जावे लागते. मंदिर तीन भागांत विभागलेले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह मंदिरातील अडणा ओलांडून आल्यावर समोरच नंदी दिसतो. तो नंदीदेखील पुरातन आहे. मंदिर एकूण बारा अर्धस्तंभांवर उभारले गेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह यामध्ये अंतराळ आहे. ती जागा फार कमी आहे. उजव्या हाताच्या कोपऱ्यात गणेशाची बैठी मूर्ती आहे. ती काळ्या दगडातील नाही. अंतराळात इतर कोणतीही देवतेची मूर्ती अथवा फोटो नाही. गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. गर्भगृह चौकोनी आहे. तेथे महादेवाची पिंड आहे. ती दक्षिणोत्तर खालील जमिनीतच आहे. पिंडीवरील साळुंकी वरून ठेवलेली दिसते. पिंड पुरातन आहे. पिंडीवर फणा काढलेला तांब्याचा नाग अलिकडे ठेवलेला दिसतो. मंदिराचे बाहेरील बांधकाम अष्टकोनी आहे. बांधकाम अजून बर्या अवस्थेत आहे.
पूर्वी मंदिर गावाच्या वेशीबाहेर असण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने मंदिरातील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवेशद्वारातून मंदिरात आल्याबरोबर अर्धस्तंभावर असलेल्या आडव्या दगडी तुळईची लांबी सात फूट आठ इंच असून त्यातील तीन फूट लांबी भागावर कन्नड भाषेत कोरलेला सात ओळींतील मजकूर आहे. त्यात मंदिर बांधकामाची माहिती असल्याचे कळते. त्याचप्रमाणे त्या मजकूरात दोन नद्यांच्या नावांचा उल्लेख असून त्यांची नावे कनिज आणि सावळी अशी नमूद केली आहेत. हे मंदिर बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कोणा राजशेट्टी नामक व्यक्तीने उभारल्याचा उल्लेख त्यात असल्याचे समजते.
(‘आडवाटेवरचा इतिहास‘ या पुस्तकावरून उद्धृत)
– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
————————————————————————————————————————————-
छान माहिती मिळते.सुंदर लेख.कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले तालुक्यातही भेंडवडे गाव आहे.