शिराळशेट (Shiral Sheth – Fictious Character Becomes Part of Folk Festival)

0
592

श्रीयाळ शेठ नावाचा अपभ्रंश शिराळ शेट, सक्रोबा, शंकरोबा असा महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळा झालेला आढळतो. त्याला औट घटकेचा राजा असेही म्हटले जाते. औट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग बारा वर्षांच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात (1396-1407) निर्माण झाला असे म्हणतात. फिरोझशाह ऊर्फ ताजुद्दीन फइरोझ या बहामनी राजाने शिराळशेठ यांनी त्या दुष्काळात लोकांना केलेल्या मदतीने खूश होऊन त्यांना पाहिजे ते मागण्यास सांगितले. त्यावर शिराळशेठ यांनी औट (साडेतीन) घटकांसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यावा अशी मागणी केली. बहामनी राजाने ती मान्यही केली. शिराळशेठ यांनी तेवढ्या काळात अनेक समाजोपयोगी, जनतेला न्याय देणारी कामे केली. अशा त्या औट घटकेच्या राजाचा उत्सव महाराष्ट्रातील पैठण, शिखर शिंगणापूर आणि हडपसर या भागांत श्रावण महिन्यातील नाग पंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. त्यातील पुणे येथील रास्ता पेठेतील, जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरातील, बारामतीजवळील कार्हाटी येथील आणि इंदापूर शहरातील उत्सव प्रसिद्ध आहेत.

इंदापूरमध्ये एस टी स्टँडवर उतरल्यानंतर शहरात प्रवेश करताच खडकपूरा हा भाग लागतो. तेथून बरेच मोठे पोट व तशाच मोठ्या मिशा असलेल्या पुतळ्याची मिरवणूक श्रावण शुद्ध षष्ठीला निघते. तो पुतळा असा बनवलेला असतो की पूर्ण शहरातून मिरवणूक जात असताना त्याच्या पोटातून सतत धूर बाहेर पडत असतो. इंदापूरकर त्याला सक्रोबा म्हणतात. त्या मिरवणुकीत विशेषतः माळी समाजातील पुरुष व स्त्रिया नटूनथटून, लोकगीते गात, झिम्मा व फुगड्या खेळत भाग घेतात. पूर्ण पेठेतून मिरवणूक फिरत फिरत शहराच्या पूर्व दिशेला असलेल्या सुमारे आठशे वर्षे पुरातन देवीच्या मंदिरात जाऊन विसर्जित होते. ती मिरवणूक नयनरम्य असते. ती इंदापूर शहराचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.

‘नायक’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता. एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊनही राज्यात किती बदल होऊ शकतात हे त्या चित्रपटात पाहण्यास मिळाले होते. ती कल्पना शिराळशेटवरून आली होती का, त्याबद्दल माहिती नाही.

विलास पंढरी 9860613872 vilaspandhari@gmail.com

———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here