देशातील वेदांचे अध्ययन आणि अध्यापन यांची परंपरा ही ऋषी-मुनी आणि वैदिक यांनी जोपासली. त्यासाठी गुरुकुल पद्धतीच योग्य आहे. वेदांचे सूत्र आहे. त्याच पद्धतीने वेदांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे. पुण्याच्या वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी असे मत मांडले आहे. त्यांनी महाराष्ट्रात ऐंशी पाठशाळा तर गोव्यात पाचसहा पाठशाळा कार्यरत आहेत. देशभरात सुमारे चार हजार वेदपाठशाळा सुरू आहेत असा अंदाज सांगितला आहे.

वेदविद्या हे जगातील आद्यवाङ्मय म्हणून मान्यता पावले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने वेदज्ञानास ‘हेरिटेज’ असा दर्जा दिला आहे. त्याची अध्ययन आणि अध्यापन परंपरा ऋषीमुनींनी व वैदिकांनी प्राचीन काळापासून जोपासली आहे. त्याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
गुरुकुल ही शिक्षणपद्धत केवळ भारतात सुरू आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून वेदांचे अध्ययन आणि अध्यापन हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. मूलतः वेदांचे ज्ञान हे व्यापक आहे. ते टिकवण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहे. त्याचबरोबर वेदांतील गरजेचे विषय संपादन करून त्यांचा लोकहितासाठी उपयोग करण्याची गरज आहे. मात्र वास्तवात वेदज्ञानाचा उपयोग हा लोकांची नित्यकर्मे करण्यासाठी होतो. त्यामुळे त्या विद्येला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत आले आहे. परिणामी, वेद शिकण्याच्या मूळ पद्धतीकडे दुर्लक्ष होते. वेदविद्या जर परंपरेने टिकवण्याची असेल तर वेदपाठशाळेतील अध्यापकांना मानधन आणि विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यास हवी. विद्यापीठ स्तरावर वेदमंत्र संशोधनासाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. त्याचा समाजासाठी आणि देशासाठी नेमका काय उपयोग होऊ शकेल याबाबतही भूमिका ठरवावी लागेल.
वेदांचा दशग्रंथांसहित अभ्यास करून अष्टविकृतींचीही परंपरा जपली गेली आहे. ती परंपरा फक्त गुरुकुल पद्धतीत पाहण्यास मिळते. गुरुकुलात विद्यार्थिसंख्या किती आहे त्यासाठी कोणतीही स्पर्धा नाही अथवा तेथे शिक्षकांना सेवानिवृत्ती नाही. त्या परंपरेचे जतन शुद्ध स्वरूपात जपले गेले तर त्या ज्ञानाचा उपयोग सर्व जगाला मार्गदर्शक ठरू शकेल.
वेदविद्या आणि भारत देशाची अनादी परंपरा हे संचित जगाचे आणि मानवाचे कल्याण करणारे आहे. संपूर्ण जगात गुरुकुल पद्धत ही केवळ भारतात आहे. त्याकडे सकारात्मक भूमिकेतून पाहण्याची आवश्यकता आहे. वेद ही परंपरा आहे. ते अनादी आहेत. त्यांना विशिष्ट कालावधी नाही, सृष्टीच्या उत्पत्तीपासून वेद आहेत. त्याला कालगणनेची आवश्यकता नाही. वेद म्हणजे मंत्र आहेत. मानवी दैनंदिन जीवनात वेदांचा उपयोग आहे. पण तो समजावून घेतला जात नाही. मानवाच्या जीवनात सोळा विविध प्रकारच्या संस्कारांना महत्त्व आहे.
वेदांची परंपरा टिकून राहवी यासाठी काही ठिकाणी वेदपाठशाळा कार्यरत आहेत. पुण्यातील वेदपाठशाळांना मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यानंतरही वेदशास्त्र परंपरेला फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. वेदांच्या अध्ययनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात झाली. त्याचाही काही परिणाम झाला. शाळांची संख्या वाढलीही आहे, पण गुणात्मक वाढ झाली का? हा खरा प्रश्न आहे. म्हणजे व्यावसायिकता वाढत आहे; पण वेदांचा प्रसार व्यापक प्रमाणावर होत नाही. वेदपाठशाळा त्यांच्या मूळ उद्दिष्टापासून दूर जात आहेत. बदलत्या स्थितीत वेदांचे महत्त्व नवीन पिढीने समजावून घेणे गरजेचे आहे.
वेदांचे एकूण चार प्रकार आहेत. वेद म्हणजे परमेश्वराचा ग्रास आहे. कल्पना अशी, की ते ऋषींनी ऐकले आणि त्यांच्या अध्ययनाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर त्यांच्या अध्ययनाची पद्धत तयार करण्यात आली. आठव्या वर्षी उपनयन म्हणजेच ब्रह्मचर्य होय. वेदाध्ययनासाठी अधिकार मिळावा यासाठी संकल्प करणे आवश्यक असते. त्यासाठी उपनयनाचा संस्कार होणे आवश्यक आहे. नंतरच वेदग्रहणाचा अधिकार प्राप्त होतो. हा संस्कार पूर्ण झाला की घर सोडून गुरूकडे जाणे आणि तेथे बारा वर्षे सेवा व अध्ययन करणे गरजेचे आहे. म्हणजेच गुरुकुल पद्धतीचा स्वीकार होय.

गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यादान कोणत्याही स्वरूपाचा मोबदला न घेता किंवा तशी अपेक्षा अथवा स्वार्थ-अभय-फायदा-तोटा यांचा विचार न ठेवता अभिप्रेत आहे. मानवाने अध्ययन पूर्ण झाल्यावर गृहस्थाश्रम स्वीकारणे आणि गुरूंची सेवा पुढे सुरू ठेवणे अपेक्षित आहे. त्याचे कारण म्हणजे वेदाध्ययनाची जबाबदारी ही परमेश्वराने सोपवली आहे अशी कल्पना त्या व्यवस्थेत केलेली आहे. त्यामुळे ती पुढील पिढीकडे संक्रमित होणे हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे. तेसुद्धा ब्रह्मचर्यांचे पालन करून. वेदाध्ययनासाठी विद्यार्थिसंख्या किती आहे हे महत्त्वाचे नाही. कारण ब्राह्मण हा षटकर्माचा अधिकारी आहे, अध्ययन, अध्यापन, यजन आणि याजन, दान आणि प्रतिग्रह ही ती षटकर्मे होती. यजन आणि याजन म्हणजे आपण स्वतः दुसरीकडे यज्ञ करणे होय, म्हणजेच दान घेणे आणि देणे होय. अध्यापनामुळे गुरूंच्या ऋणातून मुक्त होता येते.
– मोरेश्वर घैसास 9423568021 vedbhavanvarta@gmail.com
(आम्ही सारे ब्राह्मण, ऑक्टोबर 2019 वरून उद्धृत)