तुरळ नावाचे गाव मुंबईहून येताना, संगमेश्वर तालुक्यात प्रवेश करताना लागते. तेथून डावीकडे कडवई गावात जाण्यासाठी रस्ता लागतो. त्या रस्त्याने गेल्यास लागते ती राजवाडी गावातील शिर्केवाडी आणि तो पायथा आहे किल्ले भवानीगडाचा. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहळणी गड म्हणून महत्त्वाचा होता. त्या गडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि किल्ले प्रचीतगड हे दोन महत्त्वाचे किल्ले येतात. तसेच, राणी येसुबार्इंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावेही हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ले भवानीगड त्या सगळ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे.
भवानीगड हा भुईकोट ह्या प्रकारात येणारा किल्ला आहे. त्या किल्ल्याची बांधणी नक्की कधी झाली याचा संदर्भ सापडत नाही. पण किल्ल्याची रचना बघता तो किल्ला चौदाव्या शतकातील असावा. तो ब्रिटिशांनी 1818 मध्ये जिंकून घेतला. किल्ल्याच्या पायथ्याच्या कडवई या गावातील कच्चा रस्ता भवानीगड किल्ल्यापर्यंत जातो. गोसावीवाडी आणि शिर्केवाडी असे दोन टप्पे पायथ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी लागतात. शिर्केवाडीच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायर्या बांधल्या आहेत. त्या रुंद आणि नीट बांधलेल्या आहेत. त्या पायर्यांवरून किल्ल्यावर पंधरा मिनिटांत पोचता येते. पायर्या चढत असताना, वाटेत डावीकडे दोन समाधी बांधलेल्या दिसतात. त्यांतील पहिल्या समाधीवर कै. सोनू माधू पुरी आणि कै. जनाबाई सोनू पुरी ही नावे कोरण्यात आली आहेत, तर दुसर्या समाधीवर कै. रुक्मिणी विठ्ठल पुरी आणि विठ्ठल सोनू पुरी ही नावे दिसतात. ती तिघे राजवाडी गावातील रहिवासी होते. त्या दोन समाध्यांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्हींवर दोन शिवलिंगे बसवली आहेत. दुसर्या समाधीवर शिवलिंगासह त्रिशूळही आहे.
तेथून पुढे, चढण चढण्यास सुरुवात केली, की दोन्ही बाजूंला दाट झाडी लागते. चढण संपत येते तेथे पाण्याची तीन टाकी (कुंडे) आहेत. त्यांना साखरटाके, राजनमुख टाके व पाळणाटाके अशी नावे आहेत. त्यांपैकी दोन टाकी ही खांब टाकी आहेत. त्या टाक्यांमध्ये बारमाही पाणी असते. त्या टाक्यांसमोर एक दगडी नंदी आहे. त्या टाक्यांना वळसा घालून पायर्या चढत गेले, की लागते ते गडाचे भग्न प्रवेशद्वार. त्या प्रवेशद्वाराच्या आत आहे भवानी मातेचे देऊळ. हे देऊळ शिवाजी महाराजांनी 1661 साली बांधून किल्ल्याची डागडुजी केली.
देवळात काही शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवला आहे. तो देवळाच्या मध्यभागी आहे. पुतळ्याच्या उजवीकडे पराक पुरी बाबा ह्या गोसावींची समाधी आहे. ते गोसावी काही काळ त्या मंदिरात वास्तव्याला होते. पुतळ्याच्या उजवीकडे भवानी मातेचे देऊळ आहे. त्या देवळात एक तोफ असून तिला शेंदूर फासलेला आहे. ती तोफ साधारणतः तीन फूट लांबीची आहे. देवळाच्या भोवती गडाची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे.
देवळात वर्षातून दोन वेळा उत्सव होतो. पौष पौर्णिमेला एक दिवसाचा उत्सव असतो. देवळात जत्राही भरते. ग्रामस्थ देवळाच्या आसपास स्वच्छता करतात, देवळाची पताका लावून सजावट करतात. रात्री देवळात महाप्रसाद होतो. दुसरा उत्सव असतो तो नवरात्राच्या नऊ दिवसांत. त्या दोन्ही उत्सवांत ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
भवानीगड किंवा राजवाडीचा किल्ला यांचेही महत्त्व आणि अस्तित्व हे कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे केवळ उत्सवाच्या दिवशी आणि यात्रेच्या दिवसापुरते उरले आहे. बाकी इतिहास काळाच्या ओघात हरवून गेला आहे !
– अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com
——————————————————————————————————-