साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. वीस हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या. गाव विविध समाज एकत्र येऊन वसले आहे. गावाची नोंद ग्रामपंचायत प्रशासन संस्थेअंतर्गत 27 जानेवारी 1956 रोजी झाली. गावाच्या नावाचा ऐकीव इतिहास रंजक आहे. गावात पिंपळाची मोठमोठी झाडे पूर्वी अधिक संख्येने होती. त्यायोगे गावाचे नाव पिंपळाची वाडी असे पडले आणि त्याचे पिंपळवाडी झाले. गावामध्ये साखर कारखाना चालू झाला आणि कारखान्याच्या आसपास बाजारपेठ निर्माण झाली. पुन्हा लोकांच्या बोलचालीतून साखर कारखान्यावरून ती साखरेची वाडी म्हणून साखरवाडी कधी झाली हे कोणाच्या लक्षात आले नाही आणि शेवटी, सर्वमान्य साखरवाडी या नावाने गाव नावारूपास आले.
गावामध्ये लहानमोठी बरीच मंदिरे आहेत. त्यांतील तीर्थक्षेत्र दर्जा ‘क’ लाभलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर नेहमी गजबजलेले असते. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असो वा दिवाळीतील पहाटेची काकड आरती असो वा पौर्णिमेला असणारे भजन व भोजन… असे विविध कार्यक्रम तेथे नित्यनेमाने होत असतात. त्यातच ‘अहोभाग्य म्हणावे’ तर त्याच मंदिरात असलेली संत योगिराज गुणानाथ महाराज यांची समाधी. योगिराज गुणानाथ महाराज हे संत भ्रमण करत असताना त्यांना परमेश्वरी संकेत मिळाला, की त्यांनी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा ओढा असणाऱ्या गावाचा शोध घ्यावा. त्या पाहणी दौऱ्यात ते त्या वेळच्या पिंपळवाडी गावात येऊन पोचले. तेथे त्यांचा शोध थांबला ! त्यांनी त्याच ठिकाणी वास्तव्य केले व अखेरीस समाधी घेतली. त्याचे देवस्थान झाले व ते प्रसिद्धी पावले.
गावात खंडोबा, तुळजाभवानी, हनुमान, भैरवनाथ, गणेश, दत्त, ढगाई देवी, महादेव अशी अन्य मंदिरे आहेत. भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. तेथे भव्य यात्रेचे आयोजन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्रामस्थ व यात्रा कमिटीमार्फत केले जाते. यात्रा तीन दिवस चालते. पहिल्या दिवशी, हळदी कार्यक्रमास सुरुवात होऊन त्या रात्री छबिना म्हणजे पालखी नाचवत गावातून मिरवणूक काढली जाते. पारंपरिक ढोल व नृत्ये पालखीची शोभा वाढवतात. दुसऱ्या दिवशी, देवाचा लग्नसोहळा असतो. तिसऱ्या दिवशी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून लोकनाट्याचे (तमाशा) आयोजन केले जाते. तसेच, खेळणी बाजार आणि कुस्तीचा फड असतोच. त्यासाठी गावाचा नावलौकिक बरीच वर्षे आहे. या मातीतून बरेच नामांकित मल्ल महाराष्ट्राला लाभले आहेत.
त्यांतील लोकांच्या लक्षात राहिलेले मल्ल असे- निवृत्ती जिजाबा भोसले, भीमराव खोमणे, हिरामण चव्हाण, ज्ञानेश्वर कोंडिबा पवार (उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य दुध महासंघ, महानंद, मुंबई), शंकर भोसले, कुंडलिक भोसले, गुलाबराव भोसले, तानाजीराव नारायण भोसले, शिवाजी शामराव कदम, तुकाराम कोंडिबा पवार, महेश निवृत्ती भोसले, दौलतराव हरिदास भोसले, विलास शंकरराव भोसले, रमेश महादेव भोसले (निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, पुणे) हे जुन्या फळीचे मल्ल, तसेच; सुरज रमेश भोसले व संकेत सुधीर चव्हाण (राष्ट्रीय), प्रतीक मुकुंद बनकर, दीपक रामचंद्र गुंजवटे असे राज्यस्तरीय कुस्ती खेळणारे मल्ल. या मल्लांमुळे गावाचा नावलौकिक वाढतो.
यात्रेसोबत गावातील खंडोबा मंदिरात भंडारा कार्यक्रम आयोजित केला जातो. तो मोठ्या थाटामाटात होतो. त्याचा क्रम असा, की अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी खंडोबा भंडारा आणि त्यानंतर यात्रा. हा क्रम ठरलेला असल्याने बाहेर काम करणारे, पण गावाची ओढ असणारे ग्रामस्थ सुट्टीचे नियोजन करून भंडारा यात्रा आणि पारंपरिक शिवजयंती या हिशोबाने करतात आणि साखरवाडीला येतात.
गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे. साखरवाडी हे गाव खो-खो या खेळाची पंढरी असेच ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच ! त्यामुळे क्रीडाआरक्षण मिळवून काही खेळाडू प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. खेळाडू कबड्डी, खो-खो, मल्लखांब अशा क्रीडाप्रकारांत निर्माण झाले. प्रशिक्षक संजय बोडरे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी असलेला ‘दादोजी कोंडदेव’ पुरस्कार 2007 साली मिळाला. माधवी भोसले, भाग्यश्री फडतरे व प्रियांका येळे यांनी महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ पटकावला आहे. त्या तिघींना देश पातळीवरील सर्वोच्च ‘कुमारी जानकी पुरस्कार’ मिळाला आहे. या तिघींचा वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळून गौरव झाला आहे. त्यात ‘वीरबाला पुरस्कार’, ‘शिवछत्रपती पुरस्कार’ यांचा समावेश आहे.
भाग्यश्री फडतरे हिने एकवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून आठ सुवर्णपदके, सात रौप्यपदके आणि दोन कांस्यपदके तर माधवीने तेवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून तेरा सुवर्णपदके, पाच रौप्यपदके व तीन कांस्यपदके कमावली आहेत. रुबिना सय्यद हिने एकोणीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून अकरा सुवर्णपदके, दोन रौप्यपदके व तीन कांस्यपदके मिळवली आहेत. भाग्यश्री, माधवी आणि रुबिना या तिघींनी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद पाच-पाच वेळा भूषवले आहे. सारिका जगताप हिने बारा राष्ट्रीय स्पर्धा खेळून एक सुवर्ण पदक, सात रौप्यपदके व दोन कांस्यपदके मिळवली आहेत. प्रियांका भोसले हिने सतरा राष्ट्रीय स्पर्धा खेळून अकरा सुवर्णपदके, दोन रौप्यपदके व एक कांस्यपदक मिळवले आहे. तसेच, तीन वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. ती कृषी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत काम करत आहे. पुरुषांमध्ये प्रमोद गिरी (पोलिस उपनिरीक्षक), संतोष भापकर, धंनजय गिरी, प्रेम शितोळे, निलेश शिंदे, सागर थोरात यांनी विविध खेळांत राष्ट्रीय खेळाडू म्हणून सहभाग नोंदवला आहे.
शेती आणि उद्योग यांची सांगड असलेल्या गावाचे उदाहरण म्हणून साखरवाडीचे नाव सांगता येईल. ते गाव शेतीमध्ये असणारे वर्चस्व अजूनसुद्धा सांभाळून आहे. भाजीपाला असो, धान्य उत्पादन असो वा शेतीचे अन्य प्रयोग… गाव नेहमी अग्रगण्य असते. पाण्याची उपलब्धता आणि साखर कारखाना असल्याने ऊस लागवड या ठिकाणी मोठया प्रमाणात केली जाते. तसेच, साखरवाडीमध्ये शेती माल व व्यापारी वर्ग येत असल्याने टोमॅटो लागवडीचे प्रमाण इतर भागांपेक्षा या गावी जास्त आहे. त्याचबरोबर हंगामी गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि इतरही पिके घेतली जातात. त्यासोबत केळी, कलिंगड अशा फळबागांची शेतीसुद्धा केली जाते.
महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. त्या कारखान्याने 9 फेब्रुवारी 1934 रोजी साखरेचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून फलटण तालुक्यात कृषी आणि औद्योगिक पर्व उभे राहिले. तो साखर कारखाना मोठया प्रमाणात साखरेचे उत्पादन करतो. त्यातून त्यामुळे रोजगार निर्मितीही होते. आपटे यांच्याच मालकीची डॉ.रायटर्स ही कंपनी अस्तिवात होती. तिच्यामार्फत त्या ठिकाणी कॅडबरी डेअरी मिल्कचे उत्पादन केले जात होते. तो कारखाना आर्थिक आणि तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. अशा मोठ्या उद्योगधंद्यामुळे साखरवाडी हे आजूबाजूच्या परिसरात केंद्रस्थानी राहिले. शेजारील गावांतून आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक साखरवाडीमध्ये वास्तव्य करण्यास येऊ लागले. बाजारपेठ तयार झाली. लहानमोठे उद्योग तेथे सुरू होऊन लोकांना रोजगार मिळू लागला.
साखरवाडीत रविवारी आठवडी बाजार भरतो. पंचक्रोशीतील लोक आठवडी बाजारात खरेदीसाठी येतात. त्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आठवडी बाजारात असणारी भेळ; बाजारातून येताना घरोघरी भेळ आणायलाच हवी ! भेळ बऱ्याच ठिकाणी मिळत असेलही, पण साखरवाडीची भेळ ही जगात भारी असे म्हटले जाते.
गावाची रचना आणि भौगोलिक स्थिती पाहता सगळीकडे सुजलाम सुफलाम परिस्थिती आहे. गावातून वाहणारा उजवा नीरा देवधर कालवा परिसरातील कित्येक क्षेत्र ओलिताखाली आणतो. त्याचबरोबर गावाजवळून वाहणारी निरा नदी आणि त्यातून दुथडी भरून वाहणारे पाणी… यामुळे अडचणींचा सामना मोठ्या दुष्काळजन्य परिस्थितीतही सहजपणे केला गेला. पाण्याची अडचण कधी आलीच नाही ! पावसाचे प्रमाण कमीजास्त झाले तरी त्याचा परिणाम हे दोन जलस्रोत असल्याने होत नाही. गावात सुपीक जमीन आणि पाणी यामुळे सगळीकडे हिरवळ पाहण्यास मिळते. गावात दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडतो. तसेच उन्हाळा असो व हिवाळा – हवामान हे सर्वसाधारण राहते. तेथे कोणत्याही ऋतूचा अतिरेक जाणवत नाही. गावातील रस्ते सुनियोजित आहेत.
गावामध्ये विविध सहकारी संस्था, जिल्हा बँक, विविध कार्यकारी सोसायटी, लहानमोठ्या पतसंस्था; तसेच, महाराष्ट्र-आयडीबीआय अशा मोठ्या बँका (एटीएम) आहेत… मोठी आर्थिक उलाढाल तेथे पाहण्यास मिळते. विविध सोयी गावातच उपलब्ध असल्याने कधी तालुक्याला जावे लागण्याचे प्रमाण अगदी नगण्यच. पोस्ट ऑफिस पूर्वीपासून गावातच आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आहेत. साखरवाडी विद्यालय ही शाळा अग्रस्थानी आणि प्रसिद्ध असलेली खाजगी शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेचे सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल आहे. तेथे बालवाडीपासून ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. आठवी ते दहावी तंत्रशिक्षणसुद्धा गावात मिळू शकते. शिक्षणाची सर्वसमावेशक अशी उत्तम सोय उपलब्ध असल्याने विविध स्तरांवर मोठमोठ्या पदांवर काम करणारे अनेक विद्यार्थी तेथे घडले आहेत.
साखरवाडी हे गाव आसपासच्या जिंती, फडतरवाडी, रावडी, होळ, मुरूम, सुरवडी अशा लहानमोठ्या गावांचे केंद्र नेहमीच राहिले आहे. या गावाने राजकीय उलथापालथ आणि प्रचंड राजकारण पाहिले आहे. आजूबाजूच्या गावांतील अनेक समीकरणे या गावातील समीकरणांवर अवलंबून असतात. साखरवाडी हे गाव या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.
– चैतन्य महादेव पवार 9970581842 cmpawar256@gmail.com
—————————————————————————————————————-
Apratim lekh
चैतन्य पवार यांचा ‘साखरवाडी’ वरील लेख खूप छान वाटला. मी स्वतः साखर कारखाना वसाहतीत मोठा झालो आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात साखर कारखाना वसाहत,हे ग्रामीण महाराष्ट्राचे वैभव होते. या वसाहतींना स्वतः ची अशी ओळख होती. शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात या वसाहतींचे योगदान आहे.
गाव गाथा साखर वाडी हा लेख वाचला खूप छान वाटले या लेखामुळे गावचा इतिहास गावाचे वैभव हे प्रामुख्याने नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम या लेखामुळे झाले
नविन पिढी निश्चित याचा आदर्श घेऊन नवीन आव्हाने स्विकार करून नवीन इतीहास घडवतील असे मला वाटते
चैतन्य तु खरोखर एक चांगले सामाजिक कार्य करतोय
तुझ्या या कार्याला मनःपुर्वक शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ
मी पण साखरवाडीमध्ये 1980 ते 2000 असे 20 वर्ष वास्तव्य केले. वडील साखर कारखान्यात नोकरी करत असल्याने सर्व शिक्षण, क्रीडा स्पर्धा, गणेश उत्सव, व्याख्यान, नाटक, आठवडी बाजार, तंबू सिनेमा, शेती, यात्रा, असे वेगवेळ्या प्रकारे जुन्या आणि प्रेरणादायी आनंदी वातावरणात वाढलो असल्यामुळे घट्ट अतूट नाते आहे व जे विसरणे अशक्य आहे.
– विजय रावसाहेब वाबळे
मस्त लेखन केलं आहे चैतन्य…Keep it up brother 👍🏻👍🏻👍🏻
साखरवाडी गावात असणाऱ्या तालमीत अजून नामांकित पैलवान झाले आहेत… माझ्या माहितीतील काही नावे – काळू आणी बाळू जाधव (पंधराफाटा) जुन्या काळातील अत्यंत नामवंत पैलवान. नामदेव खोमणे, निवृत्ती जाधव, संतोष जाधव, राजेंद्र जाधव, जगदीश इनामदार, विवेक भोसले, राजेंद्र फडतरे, श्याम मदने, राम जाधव… यातील काही पैलवानांच्या मी लहान असताना कुस्त्या पाहिल्या आहेत. फार जबरदस्त पिढी होती ती… यापैकी जगदीश इनामदार माझे मामा होते… 🙏🏽🙏🏽🙏🏽