आमची बैलगाडी वर्धा नदीचे दोन्ही काठ जोडणाऱ्या पुलावरून पुढे सरकत होती. वर्धा नदीचे पाणी हळूहळु वाहत होते. वाहणाऱ्या पाण्याच्या संथ प्रवाहाबरोबर आमचादेखील प्रवास सुरू होता. आम्ही दुसऱ्या काठावर अवघ्या काही वेळात मजल-दरमजल करत पोचलो. तो दिवस म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या लहान भावंडांसाठी आनंदाची पर्वणीच होता ! मी व माझी बहीण, आई-बाबा, मोठे बाबा, मामा-मामी, आत्या-काका, आम्ही सगळी भावंडे आणि आमची इतर दोन कुटुंबे असे आम्ही सर्वजण पुलाच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या नदीच्या काठावर आलो. नदीच्या काठाला लागूनच शेत पसरले होते. आम्हा सात ते आठ कुटुंबीयांच्या बैलगाड्या त्या शेताजवळ उभ्या केल्या. माझी आई एक-एक करून सामान बैलगाडीतून खाली उतरवू लागली. माझ्या बाबांनी शेतालगत असणाऱ्या मोकळ्या जागेची खराट्याने साफसफाई केली. ती जागा स्वच्छ झाडून मोकळी केली. शेतातील चारा आणून बैलांना दिला. लगोलग, माझी आई आम्हा मुलांसह आमचे अंघोळीचे कपडे, साबण, बकेट, गुंड, लोटा घेऊन नदीवर जाण्यासाठी निघाली. मी त्या पहाटेच्या रम्य वेळी आजुबाजूला पाहण्यात गर्क असतानाच, आईने पाठीवर धपाटा मारून पटपट चालण्याकरता बजावले. पाठीत धपाटा बसल्याने मी मात्र भरभर चालण्यास सुरुवात केली. आम्ही नदीकाठी येऊन पोचलो. माझे मन आता इतक्या सकाळी नदीकाठी अंघोळ करण्याच्या विचारानेच भारावून गेले. आमच्या अंघोळी काही वेळातच आटोपल्या. आम्ही सर्व भावंडांनी नदीच्या वाहत्या पाण्यात अंघोळ करण्याची मौज लुटली. बराच वेळ, आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा खेळ खेळत राहिलो. तेव्हा झुळझुळणारी थंड हवादेखील आमच्या अंगाला झोंबत होती; आम्ही मात्र पाण्यात खेळण्याची मजा लुटण्यात गुंग झालो होतो. आईने आम्हाला नदीच्या काठावर आणून कपडे चढवून, पावडर- डोळ्यांत काजळ घालून तयार केले. आम्ही सर्वांचे कपडे घेऊन सोबत आणलेल्या भांड्यांत पिण्यासाठी आणि स्वयंपाकाकरता पाणी घेऊन आमच्या बैलगाड्या उभ्या होत्या त्या ठिकाणी परतलो. तेथे आलेल्या प्रत्येक कुटुंबाने त्यांची त्यांची जागा ठरवून घेतली होती. आईने अंघोळीचे धुतलेले कपडे सुकण्यासाठी बैलगाडीवर टाकून दिले. आईने जवळपास पडलेली चांगली तीन दगडे गोळा करून तेथे चूल मांडली. तिची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. तिने आम्हा लहान भावंडांना सकाळची न्याहरी म्हणून रात्रीची भाजी-भाकरी खाण्यास दिली. आमची न्याहरी झाल्यावर आम्ही सगळे शेतावर हुंदडण्यासाठी निघालो.
आम्ही नजर फिरवावी तेथपर्यंत पसरलेले हिरवेगार शेत, त्यावर वाहणारी वाऱ्याची झुळूक आणि जवळून वाहणारी वर्धा नदी अशा त्या मनोरम वातावरणात सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेऊन अनवाणी पायाने मातीवर हसत खिदळत होतो. आम्ही आमचे शेतात हिंडून झाल्यावर आमच्या जागी परतलो.
मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.” मी उत्सुकतेने विचारले, “बळी काय असतो? कशाचा देतात?” आई उत्तरली, “अगं आज कोंबडं, बकरी, मेंढरू देवीसमोर कापून त्याचं रक्त नैवेद्य म्हणून देवीवर चढवतात. त्याला बळी म्हणायचं.” एवढ्यावर माझे समाधान न झाल्याने मी विचारले, “का बळी देतात?” आई माझी समजूत काढत म्हणाली, “अगं हिंदू धर्मात त्यांच्यावर, त्यांच्या घरावर आलेलं संकट दूर व्हावं यासाठी हे लोक देवीला नवस मागत्यात. अन् त्यांचा नवस पूर्ण झाला, की मग देवीसमोर बकरं, कोंबड कापून नवस फेडत्यात. हे असं लय वर्षांपासून सुरू हाय. याला नवस फेडणं नाय तर बळी चढवणं असं म्हणत्यात.” पुढे माझा प्रश्न तयार होता, ‘बळी दुसऱ्याचा का देतात मग?’ आईने त्यावर माझे तोंड बंद केले आणि म्हणाली, “ते मला नाय माहीत ! आता गप्प बस अन् जा खेळायला.”
आईने माझी प्रश्नांची मालिका मला खेळायला परत पाठवून खंडित केली. मीही खेळण्यासाठी निघून गेले. मात्र माझ्या मनात बळी देणे, म्हणून आम्ही गाव सोडून नदी काठावर येऊन राहणे, नवस फेडण्यासाठी प्राण्याला मारणे, मग माणसाला का नाही बळी देत? प्राण्याला का मारतात? त्याने काय केलेले असते? हे विचारचक्र सुरूच होते. मी माझे खेळणे सोडून पुन्हा आईकडे गेले आणि तिला विचारले, “आय, आपण इकडे का आलो?” आई मला सांगू लागली, “आपल्या महानुभाव पंथात चक्रधर स्वामींच्या उपदेशात ‘अहिंसा’ सांगितली हाय. आज गावात बकरं-कोंबडं कापलं जाणार. त्या हिंसेला विरोध म्हणून जिथं हिंसा होणार हाय, तिथं न राहता दुसरीकडं राहायला जायचं. त्या हिंसेला विरोध करायचा. आपल्या पंथात गुरू सांगतात त्याप्रमाणे आपण कधी बळी देत नाय. त्याला विरोध करतो. म्हणून आज आपण आपले गाव सोडून इकडं राहायला आलो.’ पुढे, आई माझ्याकडे कटाक्ष टाकत म्हणाली, “ठका, तुला आनंद नाही झाला? इकडं आल्यावर.” मी नुसती मान डोलावली.
पळण म्हणजे काय, हिंसेला विरोध कसा करतात आणि का करायचा या प्रश्नांची उत्तरे मला त्या बालवयात किती उमजली ते माहीत नाही. मात्र तेव्हा आपले घर, आपले गाव सोडून नदीकाठी, शेतावर येऊन एक दिवस घालवायची मजा काही औरच होती. दिवसभर त्या शेतशिवारात खेळण्या-बागडण्याचा आनंद तर होताच !
सूर्य अस्ताला जाऊ लागला तसा आमचा गावाकडे जाण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि रात्र होण्याच्या मार्गावर असताना आम्ही आमच्या घरी परतलो.
– अनुपमा अर्जुन बोरकर 8484034121
(लेखिकेच्या ‘अनुपमा’ या आत्मकथनातून उद्धृत, संपादित-संस्कारित)