अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल !…
‘विदर्भ मिल्स’ची कर्मचारी वसाहत ब्राह्मण चाळ या नावाने ओळखली जाई. त्याच्या बाजूलाच कामगारांच्या ‘नवी’ व ‘जुनी’ अशा दोन चाळी होत्या. या वसाहती हे ‘विदर्भ मिल’चे सर्वात मोठे वैभव होय. प्रत्यक्ष गिरणीने अनेक चढउतार पाहिले, पण या वसाहती हा तेथील रहिवाशांच्या सांस्कृतिक जीवनाचा मोठा ठेवा बनला. ती वसाहत मिलचे संस्थापक बाबासाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झाली होती. कर्मचारी-कामगार यांच्यासाठी अशा सोयी हा विचार भारतात नवीन होता. त्या सामूहिक वस्तीत राहिलेल्यांपैकी कोणी तेथील वातावरण विसरू शकत नाही. सर्वांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. बाईमावशी पिंपळीकर या सर्वांच्या अडीअडचणीच्या काळात मदतीस पुढे असत. त्यांचा शब्द शेवटचा मानला जाई. लग्नकार्ये सर्वांच्या सहकार्याने आनंदात पार पडत. सणवार सामूहिक स्वरूपात साजरे होत असत. चातुर्मासात नामसप्ताह किंवा एक्का (एक दिवस अखंड रामनाम) असे. त्यानंतर होणारा भंडारा हे मुख्य आकर्षण असे. सामूहिक आवळी भोजन; तसेच, इतर धार्मिक कार्यक्रम यांत बाईमावशींचा पुढाकार असे. कर्मचारी वसाहतीत महिला मंडळ आघाडीवर होते. मंडळातर्फे शारदोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके सादर होत असत. त्यात विमल यावलकर, प्रमिला घिके, गोखले, सुशीला खंडाळकर यांचा पुढाकार असे, तर पुरुषांची नाटके थिएटरात होत असत. त्यामध्ये गणपतराव पार्डीकर, आबासाहेब भारतीय, पळशीकर बंधू, गावली बंधू यांचा सहभाग असे. चीनने भारताविरूद्ध युद्ध पुकारले तेव्हा मोठा संरक्षण निधी राष्ट्रीय पातळीवर उभा केला गेला. त्यासाठी महिला मंडळाने ‘ज्योती’ या नाटकाचे अकोला व परतवाडा येथे प्रयोग केले आणि स्वत:ची मदत उभी करून दिली.
विदर्भ मिल्सच्या परिसरातील मारुती मंदिर हे आमचे ‘डब्बा पार्टी’चे आवडते ठिकाण. तेथे मोठ्ठे वडाचे झाड होते. आम्ही डाबडुबली (सूरपारंब्यांचा खेळ – वडाच्या झाडाच्या पारंब्यावरील खेळ) खेळत असू. रामनवमी व हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असे. त्यात भाऊसाहेब शेवाळकर यांचे कीर्तन असे. त्यानंतर ती धुरा मोरे गुरुजींनी पुढे चालवली.
चंदनाची झाडे परिसरात भरपूर होती; त्यामुळे की काय, मिल आणि साप हे घनिष्ट समीकरण काही काळ होऊन गेले होते. जवळपास सर्व कोब्रा. क्वचित बदल म्हणून धामण, घोणस वगैरे सर्पजाती मधून मधून दर्शन देत. कधी कधी चिलाटीदेखील दिसे, पण मुख्य कोब्रा. त्या काळी सर्पमित्र वगैरे नव्हते. त्यामुळे सापास मारणे हेच धोरण ! त्या कामी राजाभाऊ खंडाळकर व बाळासाहेब यावलकर यांचा पुढाकार असे. एकदा संध्याकाळी यावलकरकाकांनी चपलेने चिलाटी मारली होती ! मुनीर म्हणून सफाई कामगार होता. तो सापाची शेपटी धरून त्याला गरगर फिरवून जमिनीवर आपटून मारत असे. नवीन चाळीतील रमाकांत नावाचे एक गृहस्थ पण तोच प्रयोग करत. कोठेही साप निघाला की ही गर्दी ! मग तो साप मारून झाल्यावर पूर्वीच्या कथा निघत व बराच काळ गप्पागोष्टी रंगून जात. साधारणपणे, दोनतीन तास त्यात निघून जात. तेवढीच आमच्या अभ्यासाला चाट पडे.
मिलच्या गोडाऊनमध्ये एक किंग कोब्रा कायम वास्तव्यास होता. त्याला शेवटचे 2003 साली बघितल्याचे आठवते. मिलमध्ये कापसाच्या गाठी नेण्यासाठी; तसेच, तयार कापडाच्या गाठी नेण्यासाठी गोडाऊन ते मिल अशी रुळावर चालणारी गाडी होती. आम्ही मुले दुपारी खेळत असताना त्या गाडीवरील साप हमखास दिसत असे.
विदर्भ मिल सरकारने ताब्यात घेतल्यावर, त्या वेळचे मुख्याधिकारी दंताळे यांच्या पुढाकाराने मिलचा गणेशोत्सव कॉलनीत सुरू झाला. कोजागिरीस ‘अजब कारस्थान’ ह्या नाट्यप्रयोगाने अचलपूरच्या अर्वाचीन नाट्यपरंपरेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गणेशोत्सवात तीन अंकी नाटक होत असे. त्याची जबाबदारी काही काळ अशोक भारतीय यांनी उचलली. त्यातही आबासाहेब भारतीय यांचे मार्गदर्शन मोलाचे असे. सुबोध हायस्कूलच्या रौप्य महोत्सवात सादर करण्यात आलेले ‘वऱ्हाडी माणसं’ हे नाटक अशोक भारतीय यांनीच दिग्दर्शित केले होते. ती परंपरा एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता, अगदी मिल बंद होईपर्यंत सुरू होती. मी दिग्दर्शन, नेपथ्य इत्यादी जबाबदारी 1982 पासून शेवटच्या नाटकापर्यंत सांभाळली.
विदर्भ मिल्सचा गणेशोत्सव सर्वसमावेशक असे. बालमंदिरातील शिशू ते वयस्कांपर्यंत सर्व जण त्यांची कला सादर करत. अगदी लहानांचे कार्यक्रम सुशिला खंडाळकर बसवत. त्यापेक्षा थोड्या मोठ्यांचे कार्यक्रम पद्मा पिंपळीकर, त्यानंतरच्या प्रौढांचे कार्यक्रम सरोज चांदोरकर, विमल यावलकर या बसवत. सांस्कृतिक कार्यक्रमात शकुन जोशी यांचाही वाटा असे. त्यात कामगार-कर्मचारी यांच्या कुटुंबीयांचा सहभाग मोठा असे व त्यामुळे वातावरण उत्साही राही. एक दिवस सुबोध हायस्कूलच्या कार्यक्रमांना दिलेला असे. बाकी दिवसांत महिलांचे तीन अंकी नाटक, स्त्री-पुरुष एकत्रित तीन अंकी नाटक, लहानांच्या नाटुकल्या, बाहेरील कलावंतांचा नाट्यप्रयोग, ऑर्केस्ट्रा, प्रख्यात गायकांचे गायन-नकला अशा कार्यक्रमांची रेलचेल असे. कधी कधी तर, गणपती उठल्यावरही कार्यक्रम होत राहतात, क्रीडास्पर्धा होत. शेवटच्या दिवशी, सर्वांना बक्षिसे वाटली जात.
त्याच काळात संध्याकाळी ज्ञानसत्र असे. त्यात प्रख्यात वक्ते-प्रवचनकार यांची भाषणे होत. वादविवाद स्पर्धा असे. विदर्भ मिल्सचे लेबर ऑफिसर हे त्या उत्सवाचे पदसिद्ध सचिव होते. त्यात वामनराव गोतमारे, प्रकाश चौधरी यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. प्रश्नोत्तरी स्पर्धा खूपच विख्यात होती. स्पर्धेत फक्त सत्तावीस टीम भाग घेऊ शकत, पण जवळपास तितक्याच प्रतीक्षा यादीत सहभागासाठी उत्सुक असत. त्यात व्हिडिओ, ऑडिओ व इतर सामान्यज्ञान असे प्रश्न असत. त्याचे पूर्ण नियोजन मीच करत असे. अमोल अविनाशे, गिरीश अविनाशे, वसंत राठी यांची मदत मला होई.
स्टाफ रिक्रिएशन क्लब हेही गावातील लोकांचे आकर्षण केंद्र होते. तो क्लब चांदोरकर (उत्पादन प्रबंधक) व खानोलकर (गिरणी प्रबंधक) यांच्या कल्पनेतून साकार झाला. जवळपास पंचवीस हजार पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, टेनिस, टेबलटेनिस, कॅरम, क्रिकेट, व्हॉलिबॉल, बुद्धिबळ वगैरे सोयी होत्या. खुली कॅरम स्पर्धा पूर्ण महाराष्ट्राला परिचयाची होती. सामने दुपारी चारला सुरू होत व पहाटेपर्यंत चालत. साधारणपणे एक आठवडा धमाल येई.
विदर्भ मिल्सच्या कामगार वसाहती दोन होत्या- एक नवीन चाळ व एक जुनी चाळ. परंतु वातावरणात मात्र कामगार व व्यवस्थापन असा भेद जाणवत नसे. कामगार-कर्मचारी बरोबरीने सांस्कृतिक व क्रीडा प्रकारांत भाग घेत. रोजचे भजनपूजन दत्तोपंत परांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाले. त्यात शंकरराव देशपांडे, नामदेवराव भोगे, वामनराव बेंडे, माधवराव पांडे, पुंजजी जिचकार इत्यादींचा सहभाग असे. त्या ठिकाणी कोणताही भेदभाव मिलच्या वातावरणात अनुभवास येत नसे. तेच मुलांच्या बाबतीत. गरिबीमुळे तेथील मुले आईबापांस हातभार लावत. रेल्वेवर बाहेर पाठवण्यासाठी सागवानाचे ट्रक वन विभागातून येत. वाघिणींसाठी वाट पाहवी लागे. त्या मधल्या काळात, ती मुले सागवानी ओंडक्यांच्या साली जळणासाठी जमा करत; त्यासाठी ‘सालपटाले गेलतो’ हा शब्दप्रयोग त्यांच्या तोंडी असे. त्या ठिकाणी असणाऱ्या बांबूचे भलेमोठे गंज आम्हा सर्वांची गुप्त मोहिमेची जागा होती.
जुन्या चाळीतील कामगार नेते रामदास नायकवाड हे अनेक वर्षे नगर परिषदेचे मिल्सच्या वार्डाचे प्रतिनिधी होते. कोठलाही वाद असो त्यांचा शब्द शेवटचा असे. अनेक कामगारांनी मिलच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे करून शेतीवाडी; तसेच, इतरही धंद्यांत जम बसवला आणि प्रगती केली. अनेकांची मुले शिकून मोठ्या हुद्यावर आहेत. जुन्या चाळीत एक नकलाकार राहत- प्रभाकर चोबे. त्यांना सर्वजण प्रभुभाऊ या नावाने ओळखत. त्यांचा कार्यक्रम कामगार कल्याण केंद्र, गणेशोत्सव यांत हमखास असे. त्यांची परंपरा पुढे ज्ञानेश्वर रोंगरे यांनी चालवली. ते त्यांच्या नकलांत भजन-भारुड यांचाही अंतर्भाव करत. ते प्रसिद्ध पूर्ण विदर्भात होते, पण अकाली निधनामुळे त्यांची कारकीर्द लवकर संपली. विदर्भ मिल बंद पडली तरी ती वस्ती बराच काळ राहिली- किंबहुना ब्राह्मण चाळ 2008 पर्यंत होती. नवीन चाळ व जुनी चाळ ही कामगार वस्ती. त्यांची घरे नवी बांधली गेली. तरीसुद्धा विदर्भ मिलचे ते वातावरण नव्या जमान्यात हरवून गेले. चिरकाल राहिल्या आहेत त्या तेथील आठवणी !
– विनय देशपांडे (खंडाळकर) 9325066915 deshpandevinay02@gmail.com
अचलपूर
——————————
खूप सुंदर, मनापासून लिहिले आहे विनय! जुन्या आठवणी जाग्या झाल्यात!