वि.स. खांडेकर- एक विसावा (Remembering V.S. Khandekar)

2
337

मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. ते स्वातंत्र्यलढ्यातल्या ध्येयवादी प्रवृत्तीचे आणि स्वातंत्र्यानंतरंच्या नवनिर्माणाच्या आकांक्षांचे उद्गाते होते. आदर्शवादी विचारसरणी आणि मानवी जीवनावरची श्रद्धा यांचा लेखनातला ललितरम्य आविष्कार या गुणांमुळे त्यांच्या लेखनाचा खास त्यांचा असा चाहतावर्ग होता. समाजाची मूल्यव्यवस्था बदलत गेली तसा त्यांचा वाचकवर्ग कमी झाला. तरी आजही ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्यांना वाचक आहेत. त्यांनी ज्या आदर्श मूल्यांचा, समतेचा आणि माणूसकीचा त्यांच्या लिखाणातून पाठपुरावा केला ती मूल्ये शाश्वत आहेत. खांडेकरांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पत्रलेखनाविषयी काही आठवणी सांगत आहेत. खांडेकरांच्या अखेरच्या काळात त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे. ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

वि.स. खांडेकर एक विसावा  

वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी झाला आणि त्यांचे 2 सप्टेंबर 1976 रोजी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. 2023 मध्ये सुरू झालेले त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीचे वर्ष 11 जानेवारी 2024 रोजी संपेल. मला त्यांच्या अखेरच्या कालखंडात म्हणजे अखेरच्या आठ-नऊ वर्षांच्या काळात त्यांचा सहवास लाभला. मी या काळात त्यांचा लेखनिक होतो तरी त्यांच्या कुटुंबातील-परिवारातील एक सदस्य झालो होतो. साहजिकच त्यांचे सर्व लेखन प्रकार- कथा, कादंबरी, आत्मकथा, रुपककथा, प्रस्तावना आणि त्यांचा दैनंदिन पत्रव्यवहार – मला जवळून पाहण्यास मिळाले. आज जेव्हा मी त्यांच्या या सर्व लेखनपसाऱ्याकडे तटस्थपणे पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे खांडेकरांचे पत्रलेखन. त्यांच्या पत्रलेखनातून त्यांचे भावजीवन, सर्वसामान्यांविषयीचा जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी जाणवतात. ते एक आगळावेगळा मार्गदर्शक होते आणि मार्गदर्शन करत असताना स्वत:च्या जीवनाकडेही मर्यादांचे भान ठेवून, तटस्थपणाने पाहणारे स्थितप्रज्ञ होते.

एक घटना यानिमित्ताने आठवते ती म्हणजे एका सकाळी, त्यांनी सांगितलेला मजकूर लिहून घेताना मला जाणवलेले खांडेकरांचे वेगळेपण ! त्याचे झाले असे – आदल्या दिवशी आलेली पत्रे उत्तरासाठी क्रमवारीने लावून ठेवलेली होती. त्यात पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात शिकणाऱ्या मुलीचे एक पत्र होते. ती तिच्या परीने तिची वाचनाची भूक-आवड भागवून घेत होती. तिने खांडेकर यांच्या सर्व कादंबऱ्या वाचल्याचे तिच्या त्या सुंदर अक्षरातील पत्रांतून जाणवत होते. मी त्या पत्राचे वर्णन भाऊंना सांगितले आणि तिचे पत्र अनुत्तरित राहू नये म्हणून ते पत्र उत्तरासाठी आधी लिहण्यास घेतले. पत्र आधी वाचून घेतले असल्याने उत्तर काय पाठवावे याचा विचार त्यांनी निश्चित आधी केला असावा.

तर त्या मुलीच्या पत्राला पोस्टकार्डावर उत्तर लिहिताना ते म्हणतात, “तू वाचनाविषयी लिहिलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव. वाचन विरंगुळा म्हणून चांगला असला तरी आपल्या दैनंदिन जीवनाचा अडसर ठरू नये. तुझी अभ्यासातील प्रगती कळली. भरपूर शीक आणि एक गोष्ट- आपला भार- आईवडिलांवरील – कमी कसा करता येईल याचा आधी विचार कर, आता तुम्हा मुलींना अनेक क्षेत्रे खुणावत आहेत. तू पत्रात माझ्या लेखनाविषयी आपुलकीने आदराने लिहिले आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव. भावी काळ माझी किंमत चिल्लर नाण्यांत करणार आहे. बंद्या रुपयात करणार नाही.” हे लिहित असताना आवर्जून तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग असेही लिहिले होते.

त्या वेळी त्यांना पूर्णपणाने अंधत्व आले होते आणि तशाही स्थितीत ते जीवनाकडे तटस्थपणाने पाहत होते. आणि तो तटस्थपणाचा अनुभव त्यांच्या त्या उत्तरातून मला जाणवत होता. उत्तर पोस्टकार्डावर लिहिले होते. येथे भाऊंचे वेगळेपण जे मला जाणवले ते सांगायचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. ते उत्तरे पाठवण्याबाबत जसे जागरूक होते तसेच कोणता मजकूर कार्डावर लिहायचा, कोणता आंतर्देशीय पत्रावर आणि कोणता मजकूर लेटरहेड वापरून लिहायचा याविषयी जागरूक असत. साधे डिंकाचे उदाहरण घ्यायचे तर नऊ-दहा वर्षे मी लेखनिक म्हणून काम करत होतो. त्या नऊ-दहा वर्षांच्या काळात कधीही डिंकाची ट्यूब आणली नाही. किराणा दुकानातून कोरडा डिंक आणायचा आणि तो एका बाटलीत (तीही रूंद तोंडाची) पाण्यात भिजवून वापरण्यासाठी डिंक तयार  करायचा असा शिरस्ता होता.

त्यांचे दुसरे एक पत्र असेच थोड्याशा वेगळ्या नजरेतून. एका संपादिकेचे पत्र होते. पत्रात दिवाळी अंकासाठी लेखन पाठवण्याची विनंती केली होती. पहिले पत्र आले, त्याला उत्तर पाठवताना भाऊंनी लिहिले होते, की ‘सध्या माझी प्रकृती बरी नाही. ब्राँकायटिसचा त्रास होतो आहे. प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली तर आणि हातून काही लिहून झाले तर अवश्य पाठवीन.’ हा खरंतर सभ्य शब्दात कळवलेला नकार होता पण या उत्तराचा अर्थ लक्षात न घेता त्या बाईंनी सतत स्मरणपत्रे पाठवायला सुरुवात केली. पहिल्या दोन-चार पत्रांना उत्तर द्यावे असे काही भाऊंना वाटले नाही. पण नंतर जे पत्र आले ते मात्र आता उत्तर द्यायलाच हवे असे त्यांना वाटले. त्या पत्रात, त्या संपादिकेने लिहिताना म्हटले, की तुमच्यासारख्या लेखकांना जात्यावर बसलात की ओवी सहज सुचेल. त्यांनी एवढ्या एका वाक्याचा संदर्भ घेऊन लिहिले- ‘पत्र मिळाले. मजकूर आणि त्यातला सूचनावजा मजकूर समजला. जात्यावर बसायला कंबर घट्ट असावी लागते आणि जाते ओढायला मनगटात बळही असावे लागते. मी त्या दोन्हीचा अभाव असल्याने लिहू शकत नाही.’

मोजक्या शब्दात मनोगत व्यक्त करणे ही भाऊंची खासियत होती. पाल्हाळ हा प्रकार नव्हता. त्यांनी स्वतःच्या प्रकृतीचे रडगाणे पत्रातून गाऊन कधी सहानुभूती मिळवली नाही. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा तर त्यांचा अतिशय आवडता भाग. मात्र ते करत असताना त्यांनी भावी जीवनातले धोक्याचे कंदील दाखवायला कधी कमी केले नाही.

एक पत्र मला आठवले, त्यांच्या एका अगदी जवळच्या स्नेह्याचे भले मोठे आंतर्देशीय पत्र आले. त्या पत्रात त्यांनी त्यांच्या व्यथा, वेदना, भोवतालची परिस्थिती, बहकत चाललेली आणि मागचा पुढचा विचार न करणारी पिढी याविषयी लिहून मन मोकळे केले होते. ते पत्र अनुत्तरीत राहू नये म्हणून भाऊंनी उत्तर सांगितले, तेही कार्डावरच! ते लिहितात – ‘पत्र वाचले. तुमची व्यथा समजली. तुम्ही साठी ओलांडली आहे आणि आता एक गोष्ट सर्वांनी; विशेषतः साठी उलटून गेलेल्या व्यक्तींनी कायम ध्यानात ठेवा. आता साठी उलटल्यावर आपण नटाची भूमिका न करता प्रेक्षकाची भूमिका करायला हवी. पिढ्यापिढ्यांत दरी पडली आहे. ती यापुढे सतत वाढत जाणारी आहे. अशावेळी आपण प्रेक्षक व्हायचे नट नाही.’

वि.स. खांडेकर यांचे तरुणांना आवाहन
सव्विसावे साहित्य संमेलन

एक पत्र मोठे गमतीदार होते. त्याने पत्रात लेखनाविषयी भाऊंकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करताना लेखनाविषयी काही प्रश्न विचारले. त्याला भाऊंनी उत्तर लिहिताना सांगितले, की तुमची लेखनाची वाट तुम्हीच शोधायला हवी. येथे मार्गदर्शक उपयोगी पडतो पण त्याची भूमिका मर्यादित असते. उत्तराच्या शेवटी त्यांना स्वतःच्याच एका कवितेची ओळ लिहिली की ‘वाट असते ज्याची त्याची, ज्याने त्याने चालायाची.’

त्यांना प्रत्यक्ष भेटायला येणाऱ्या व्यक्तींनाही ते आवर्जून भेटायचे. एकदा असेच साठी उलटून गेलेले आणि त्यांच्या लेखनाविषयी अपार प्रेम, आदर असलेले एक जोडपे आले होते. गप्पागोष्टी झाल्या. ते जोडपे अतिशय हळवे होते. भाऊंना अंधत्व आल्याचे पाहून त्यांचे डोळे भरून आल्याचे जाणवले. त्या दोघांच्या आवाजातल्या कंपावरून भाऊंनी ते जाणले. त्या जोडप्याची समजूत काढताना म्हणाले, ‘अहो, ती हेलन केलर मुकी, बहिरी आणि अंध होती. तिच्या मानाने मी मुका नाही, बहिरा नाही, फक्त अंध आहे. म्हणजे तिच्यापेक्षा मी सुखी नाही का?’

त्यांनी लिहिलेले प्रत्येक पत्र असे काही ना काही सांगून जात असे. म्हणूनच मला वाटते, की भाऊंच्या पत्र लेखनातून दिसून येणारे त्यांचे चिंतन, जीवनविचार वाचकांसमोर येण्याची नितांत गरज आहे.

-राम देशपांडे 8600145353
(छायाचित्र दूरदर्शनवरून साभार)

About Post Author

Previous articleअखंड कार्यरत हसरे चेहरे
Next articleतू सिंगल आहेस?…
राम देशपांडे यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते. त्यांच्याकडे साहित्यिकांची, मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते; तसेच, मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा, विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे, जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे. संदर्भ हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यानी साहित्य, संगीत, कला, प्रसारमाध्यम, विज्ञान, आरोग्य, व्यक्ती या विषयांवरील कात्रणे गोळा केली आहेत. त्यांच्या संदर्भसाधनांचा उपयोग अनेक जिज्ञासू, अभ्यासक, प्राध्यापक, संस्था यांनाही होतो.

2 COMMENTS

  1. राम देशपांडे यांचा लेख सुंदर.
    भाऊंच्या खास आठवणी टिपल्या आहेत.
    त्या बोधक आहेत.

  2. हा लेख वाचून भाऊन बद्दल म्हणजे वी स खांडेकर यांच्या बद्दल त्यांच्या स्वभावाची त्यांच्या वेगळेपणाची ओळख झाली मग आमचा जन्म तर त्यांच्या जाणीनंतर झालेला आहे तरीही शालेय शिक्षण घेत असताना वि स खांडेकर यांच्या विविध कविता कादंबऱ्या आम्ही वाचलेला आहे अतिशय गोड असे खांडेकरांचे लेखन होते खांडेकर हे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील जणू एक तोरणच आहे शतशत नमन भाऊ वि स खांडेकर जय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here