Home व्यक्ती आदरांजली रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री

रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री

1

माणूस एखाद्या वैशिष्ट्यानेही अमर होऊन राहतो ! मूळ दापोलीचे रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या येण्याजाण्यावरून लोक घड्याळ लावत असत ! ‘मंडलिकी टाइम’ अशी संज्ञाच दापोलीत प्रसिद्ध होती ! रावसाहेब मंडलिक आले की समारंभाची वेळ झाली असे समजले जाई. रावसाहेबांनी ज्यांच्यासमोर वकिली केली त्या न्यायाधीशांनाही वेळेच्या बाबतीत सवलत नसे. सत्यनिष्ठा व निःस्वार्थ कर्तृत्व यांचे अधिष्ठान जीवनाला असले की ते जीवन किती भव्य आकार घेते याचे मनोहर चित्र रावसाहेब मंडलिक यांच्या रूपाने साकारले होते. त्यात ज्ञानार्जनाची विलक्षण ओढ होती. त्यांनी विद्यार्थीदशा संपली आहे असे कधीच मानले नाही. ते एकदा नेटिव्ह जनरल लायब्ररीत गेले. तेथे भेटण्यास येणाऱ्या माणसांची वेळ अजून व्हायची होती. मध्ये थोडा वेळ आहे असे वाटले. बरोबर एक शास्त्रीबुवा होते. या विद्वानाने तेवढ्यात त्यांच्याकडून संस्कृत व्याकरणाचा एक धडा घेतला ! अविश्रांत उद्योग हेच त्यांच्या जीवनाचे सार. प्रखर कर्तव्यनिष्ठा ही त्यांच्या जीवनाची बैठक होती. त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे, की ‘अकर्तव्य ते केले असे बुद्धिपुरस्सर झाल्याचे अजून आठवत नाही. जसे लिहून येईल तसे त्यांतून होण्याजोगे असेल ते करण्याचा प्रयत्न करीन !’ ते ‘पृथ्वी फिरली तरी सत्त्व जाऊ नये,’ असे नेहमी म्हणत. स्पष्टवक्तेपणा व सडेतोडपणा यांच्यामुळे रावसाहेब मंडलिक जेथे उभे राहिले तेथे पृथ्वी नमली. त्यांच्या चारित्र्याने ती दीपली.

विश्वनाथ नारायण मंडलिक हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूडचे. जन्म 8 मार्च 1833 चा. मंडलिक रत्नागिरीला थोडे शिक्षण संपवून एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईत आले. नव्या जमान्याचा व इंग्रजी शिक्षणाचा त्यांच्यावरही परिणाम झाला. त्यांचे वाचन अखंड चाले. ते भूजला नोकरीसाठी गेले, कराचीला गेले. तेथे त्यांनी सिंधी भाषेचा व प्रांताचा इतका अभ्यास केला, की सिंधचा चालताबोलता माहितीकोश म्हणून त्यांचा उल्लेख होई ! ते त्या नोकऱ्या सोडून मुंबईला आले. त्यांची नेमणूक ठाणे जिल्ह्यातील शाळांचे तपासणी अधिकारी म्हणून झाली. मुंबई शहराचेही काम त्यांच्याकडे नंतर आले. मुंबईहून घोड्यावर बसून मंडलिक मालाडकडे शाळा तपासण्यासाठी जात असत. नंतर ते मुन्सफ झाले आणि गाजले ते त्यांच्या कडकपणामुळे, निर्भयतेमुळे व निःस्पृहतेमुळे.

संबंधित लेख –
दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे
पी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श
जी.व्ही. – आप्पा मंडलिक – गरिबांचे डॉक्टर

रावसाहेबांच्या बुद्धिमत्तेचे पाणी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जोखले व त्यांना शालोपयोगी पुस्तकांचे क्युरेटर म्हणून नेमले. रावसाहेब मंडलिक यांच्या शैक्षणिक कार्याकडे त्यामुळे लक्ष वेधले गेले. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उपयुक्त अशा क्रमिक पुस्तकांचा जन्म त्यामधून झाला. शिक्षणाचा दर्जा त्या पुस्तकांनी ठरवला- तो वाढवला व त्यांनी दोन पिढ्यांना ज्ञानसंपन्न केले. न पेलणारी पुस्तके म्हणून नव्या पिढीने ती दूर सारली !

रावसाहेबांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या व वकील होऊन हायकोर्टात काम सुरू केले. मी खटल्यांत खोटी विधाने करणार नाही असे पक्षकाराला सांगणारा हा वकील. आगरकर यांनी त्यांच्या मृत्यूनंतर ‘सुधारका’त लिहिताना त्यांचा उल्लेख रामशास्त्री प्रभुणे म्हणूनच केला आहे.

त्यांनी वकिलीचा व्यवसाय करत असताना सार्वजनिक सेवेच्या त्यांच्या आवडत्या कार्यांत स्वतःला गुंतवून घेतले. रावसाहेब मंडलिक मुंबई महापालिकेसाठी सतत छत्तीस वर्षे अविश्रांत परिश्रम घेत होते. त्यांनी पालिका लोकप्रतिनिधींची व्हावी म्हणून आवाज उठवला. ते मुंबईचे महापौरही 1879 साली झाले होते. मुंबईच्या आधुनिकतेचा पाया घालणाऱ्या व्यक्तींत मंडलिक यांचे स्थान महत्त्वाचे आहे. ‘नेटिव्ह ओपिनियन’ या इंग्रजी पत्राची स्थापना मंडलिक यांनीच केली. ‘नेटिवांचे’ विचार या सरकारला कळले पाहिजेत म्हणून 1864 च्या आरंभालाच झालेला त्यांचा तो प्रयत्न. ते स्वतः त्या पत्राचे मालक होते, काही वर्षे संपादक होते. त्यांनी त्या पत्राचे संपादक म्हणून अनेक नामवंत व्यक्तींना आणले व इतरांना लेखनास प्रवृत्त केले. इंग्लडमध्येही या पत्राच्या प्रती जाऊ लागल्या. मुंबईमधील विचारवंतांचे पत्र म्हणून मानाचे स्थान त्या नियतकालिकाला मिळाले. त्यात मराठीतून मजकूर येऊ लागला व त्यामुळे वाचकवर्गही वाढला. मंडलिक यांचे स्वभाववैशिष्ट्य या सर्व उद्योगांतही स्पष्ट दिसून आले. मंडलिक त्यांना लेखनासाठी जी वृत्तपत्रे आवश्यक वाटली त्यांच्या वर्गण्या भरण्यास चुकले नाहीत.

रावसाहेब मंडलिक यांनीच बॉम्बे असोसिएशनचे कार्य जेव्हा बंद पडण्याच्या मार्गावर आले तेव्हा ते हाती घेतले. त्यांनी 1867 मध्ये त्या संस्थेचा जणू जीर्णोद्धारच केला ! दादाभाई नवरोजी, डॉ. गोपालकृष्ण भांडारकर, नंतर न्या. महादेव गोविंद रानडे हे सर्व त्यांचे सहकारी झाले. त्यांनी त्या संस्थेच्या सभेत ‘मजुरीचे दर’ व ‘धान्याचे वाढलेले भाव’ हे विषय ठेवलेले वाचले म्हणजे अचंबा वाटतो. ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’, ‘डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ व ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ ही त्यांची आणखी कार्यक्षेत्रे. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्या सर्व संस्थांच्या कार्याला वळण लावले. त्यांनीच रॉयल एशियाटिक सोसायटीचे दफ्तर संशोधन करून प्रकाशात आणले.

त्यांचे स्त्रीशिक्षण प्रसाराचे कार्य चालूच होते. ते कन्याशाळा अधिक निघाव्यात म्हणून दौरे काढून प्रचार करत होते ; हुंड्याविरुद्ध व लग्नखर्चाला आळा बसावा यासाठी लेख लिहीत. धर्ममार्तंडांनी रावसाहेबांनी एका पाद्र्याकडे पानसुपारी घेतली म्हणून त्यांच्याविरुद्ध ओरड करण्यासही कमी केले नाही. परंतु अखेर, हिंदू धर्मशास्त्रावर उत्तम ग्रंथ लिहिले ते मंडलिकांनीच !

त्यांची नेमणूक मुंबईच्या कौन्सिलात 1874 साली झाली. तो त्यांच्या सार्वजनिक कार्याचा गौरव होता. ‘सरकारने या नेमणुकीने तुमचा मान केला व स्वत:चा करून घेतला,’ असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यावेळी लिहिले. रावसाहेब मंडलिक यांनी दहा वर्षांच्या त्या कारकिर्दीत इतकी उत्कृष्ट कामगिरी बजावली, की गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन यांनी 1884 साली त्यांची कोलकात्याच्या कौन्सिलात नेमणूक केली. मंडलिक हे त्या पदाचे मुंबई इलाख्यातील पहिले मानकरी ! कोलकाता कौन्सिलच्या सदस्याला त्या काळी वर्षाचे दहा हजार रुपये मिळत असत. रावसाहेब मंडलिक यांचा थाट इतका वाढलेला होता, की त्यांचे राहणे संस्थानिकाला साजेसेच होते.

त्यांचे निधन 9 मे 1889 रोजी झाले. ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांना मोठा शिष्यवर्ग, भरपूर चहाते व मित्र यांचा सहवास अखंड लाभला. जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीचे विजेते बापुसाहेब आठल्ये हे त्यांचे मोठे शिष्य. त्यांचा एल्फिन्स्टन बोटीच्या  कप्तानाला गेलेला हा निरोप पाहा. “माझे नोकरचाकर व इष्टमित्र मिळून वीस उतारूंसह मुंबईस येण्याकरिता वीस मेला मी हर्णेहून निघणार आहे. बरोबर एक अश्व, एक सवत्स धेनु व मेण्यासकट आठ भोई इतक्यांची जागा राखून ठेवणे.” तो निरोप देणारे रावसाहेब मंडलिकही गेले व तो जमानाही गेला.

– माधव गडकरी
(‘असा हा महाराष्ट्र’ खंड 2 वरून उद्धृत)
—————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. चांगला लेख . ठरलेली वेळ पाळणं या सवयीला जुन्या काळची माणसं ‘मंडलिकी बेत’ असं म्हणत असत . ब्रिटिश आमदानीत खोतांचे हक्क मंडलिक यांच्या कायद्याच्या अभ्यासामुळे मुळे शाबूत राहिले होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version