सदाशिवभाऊ साठे हे स्वकर्तृत्वावर रावबहादूर झाले होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी आणि करून घेतलेले वाड्याचे बांधकाम; तसेच, अन्य लग्नकार्य व समारंभ या संबंधात लिहिलेले हिशोब यावरून त्या काळातील जनजीवन आणि महागाई-स्वस्ताई याची नेमकी माहिती मिळते. त्या पार्श्वभूमीवर सदाशिवभाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तृत्व सहजपणे उठून दिसते.
सदाशिवभाऊ यांचा जन्म 3 सप्टेंबर 1827 रोजी पुण्याजवळील शेडणी या गावात झाला. ते गाव मुळशी धरणामध्ये पाण्याखाली गेले आहे. त्यांचे वेद व उपनिषद यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यवर शास्त्री-पंडितांकडे सुरू होते. सदाशिवभाऊंना आधुनिक शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मिळू शकले नाही.
सुखवस्तू घरातील पंधरा वर्षांचा तो मुलगा, इंग्रजी शिक्षण घेण्याचा ध्यास मनी ठेवून, घर व गाव सोडून निघाला. ज्ञान संपादन करण्यासाठी घर सोडून जाणाऱ्या त्या मुलाचे धैर्य आणि ध्येयपूर्तीसाठी कोणतेही कष्ट घेण्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे. घरातून निघालेले सदाशिवभाऊ चाकण येथील महादेव आपटे वकील यांच्या घरी पोचले. आपटे वकील आधुनिक शिक्षणाचे महत्त्व जाणत होते. त्यांनी त्या मुलाचा प्रामाणिकपणा लक्षात घेऊन त्याला त्यांच्या घरी आश्रय दिला आणि त्या तरुणाकडे स्वतःच्या मुलाच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सोपवली. सदाशिवभाऊंचे वडील-मोरेश्वर साठे हे मुलाचा शोध घेत, चाकणला आपटे यांच्या घरी पोचले. मोरेश्वर यांना त्यांच्या मुलास आश्रयास घर त्याच्यावर चांगले संस्कार होतील असेच मिळाले आहे हे पाहून समाधान वाटले. त्यांनी सदाशिवभाऊंना आपटे यांच्या संमतीने मिशन शाळेत प्रवेश घेऊन दिला. भाऊंनी त्या शाळेत गणित, मराठी, इतिहास, भूगोल व मोडी लेखन या विषयांत प्रभुत्व मिळवून, शाळाचालकांकडून प्रशस्तिपत्रक प्राप्त केले. त्यांनी शिक्षकाची नोकरीही त्याच शाळेत दोन रुपये मासिक वेतनावर मिळवली. त्यानंतर, ते मुंबईला विल्सनसाहेबाकडे 1845 मध्ये पोचले. तेथे त्यांनी शाळेत मराठी शिकवण्याची नोकरी दहा रुपये वेतनावर करत, त्यांचे इंग्रजी शिक्षण तीन वर्षांत पूर्ण केले. विल्सन यांनी सदाशिवभाऊंची बुद्धिमत्ता लक्षात घेऊन, त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी पन्नास रुपये वेतनासह नोकरी दिली. त्याचबरोबर, सदाशिवभाऊंना ख्रिश्चन धर्माबद्दल आकर्षण वाटेल अशा तऱ्हेने भाऊंशी प्रेमाचे संबंध ठेवले.
सदाशिवभाऊंच्या मनात, हिंदू धर्माबद्दल अभिमान होता आणि ते घरात वैदिक संस्कारात वाढलेले होते. त्यांना विल्सन यांची कृती रुचली नाही. त्यांनी विल्सन यांना रामराम ठोकला आणि ते रेव्हेन्यू खात्यात नोकरीस 1850 मध्ये लागले. त्यांना मासिक वेतन बारा रुपये होते. तेथे ते परीक्षा देत, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत शिरस्तेदार 1854 मध्ये झाले.
सदाशिवभाऊंना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून रावबहादूर ही पदवी 1869 मध्ये कैरा येथे बदली झाल्यानंतर दिली गेली. त्यांच्या बदल्या ठाणे, बेळगाव, पुन्हा ठाणे, सातारा, अहमदाबाद अशा ठिकाणी 1871 ते 1875 या दरम्यान झाल्या. ते सेवानिवृत्त ठाणे येथे डेप्युटी कलेक्टर असताना 1880 मध्ये झाले. त्यावेळी त्या पदावरून निवृत्त होणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना निवृत्तिवेतन घरपोच दिले जात असे. परंतु सदाशिवभाऊंना मात्र त्यांचे निवृत्तिवेतन ते नेटिव्ह म्हणून घेऊन जाण्याची सूचना सरकारी कार्यालयातून मिळाली. भाऊंनी घरपोच निवृत्तिवेतन इंग्रज अधिकाऱ्यांप्रमाणे हिंदी अधिकाऱ्यांनाही मिळाले पाहिजे असा आग्रह धरला आणि कार्यालयात जाऊन निवृत्तिवेतन घेण्याचे अमान्य केले. त्यांच्या त्या प्रयत्नांना एक वर्षाने यश येऊन त्यांना निवृत्तिवेतन घरपोच मिळू लागले.
सदाशिवभाऊंची गव्हर्नरचे पहिले नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नियुक्ती अहमदाबाद येथे झाली. त्यावेळी त्यांना दोन हजार रुपये पगार मिळत होता. ते आर्थिक दृष्ट्या सुखवस्तू स्थितीला पोचले होते. सदाशिवभाऊ त्यांच्या कुटुंबाला धरून होते. सदाशिवभाऊंनी त्यांच्या धाकट्या तिन्ही भावांना त्यांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देत सर्वतोपरी मदत केली. त्यांनी त्यांची कर्तव्ये आणि कुटुंबाचे प्रेमळ पाश कधीही दूर केले नाहीत. साठे यांना ते नोकरी व्यवसायात भरारी घेत असताना, त्यांच्या समाजाचे आणि सामाजिक जबाबदारीचेही भान होते.
सदाशिवभाऊंना वाचनाची आवड होती. त्यांच्याकडे स्वत: विकत घेतलेल्या इंग्रजी व मराठी पुस्तकांचा संग्रह मोठा होता. त्यांचा आग्रह त्यांच्या प्रमाणे सर्व लोकांनी वेळ मिळेल तेव्हा अधिकाधिक वाचन करावे असा होता आणि म्हणून त्यांनी त्यांच्या घरातील खाजगी पुस्तकसंग्रह कल्याणकरांना उपलब्ध करून दिला; साठेवाड्यातच वाचनालय सुरू केले. पुढे, गावातील काही अन्य वाचकांनी त्यांच्या घरच्या पुस्तकांची भर त्यामध्ये घातली तेव्हा ते वाचनालय दामोदर जोशी यांच्या वाड्यात म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या भावाच्या वाड्यात हलवले गेले. रावबहादूर साठे यांनी कल्याण सार्वजनिक वाचनालयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी वाचनालयाच्या विस्तारातही पुढाकार घेतला. ते नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नगरपालिकेसमोरच वाचनालयास स्वतंत्र जागा मिळवून दिली. ते वाचनालय शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा करणार आहे.
रावबहादूर सदाशिवभाऊ साठे संस्कृततज्ज्ञ होते. त्यांची भेट कल्याणमध्ये येणारे पंडित आवर्जून घेत असत. त्यांनी धर्मग्रंथांचे, पोथ्या-पुराणांचे पुनर्मुद्रण करण्यासाठी मुद्रणसंस्था आणि छापखाना हे दोन्ही लक्ष्मी व्यंकटेश या नावाने काढले. त्यांनी संस्कृत ग्रंथांचे हिंदीमध्ये भाषांतर करून घेण्यात पुढाकार घेतला.
सदाशिवभाऊ इंग्रजी भाषेचे मान्यवर विद्वान तर्खडकर यांच्या मुलीला संस्कृत शिकवण्यासाठी जात असत. सदाशिवभाऊ त्यांच्या विनंतीवरून एका संस्कृत शिक्षकाचा पन्नास रुपये पगार देत असत. सदाशिवभाऊ यांचा शिक्षण हा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी सुभेदार वाड्यातील जागा जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या हायस्कूलला मिळवून देण्यापासून अनेक प्रकारे घसघशीत अशी मदत केली होती. त्यांची निवड जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट हायस्कूलच्या डायरेक्टर बोर्डवर 1894 मध्ये झाली होती.
सदाशिवभाऊंना कल्याण शहराबद्दल असलेली आपुलकी लक्षात घेऊन कल्याण नगरपालिकेचे पहिले सरकारनियुक्त अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक 1885 मध्ये झाली. गावातील घरंदाज लोकांना कल्याणबाहेरील माणूस गावच्या नगरपालिकेचा पहिला अध्यक्ष होणे हे रुचले नव्हते; साठे शिस्तबद्ध आणि स्वच्छ कारभारासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळेही ते नगरपालिकेचे अध्यक्ष असणे अनेक सभासदांना अडचणीचे वाटत होते. त्यातूनच साठे यांच्या योजनांना स्थानिक प्रतिनिधींकडून विरोध होत राहिला. तेव्हा त्यांनी कलेक्टरला कळवले, की “येथील लोकप्रतिनिधींच्या अडथळ्यांमुळे कल्याण शहरचा विकास करण्यात गेल्या तीन वर्षांत मी अयशस्वी ठरलो आहे. तेव्हा सर्वांच्या मान्यतेचा नगराध्यक्ष सरकारने नेमावा.” त्या पत्रातून सदाशिवभाऊंच्या निर्भीड, पण निरपेक्ष वृत्तीची ग्वाही मिळते. सरकारने मात्र त्यांची अध्यक्षपदी नेमणूक त्यानंतरही पुन्हा तीन वर्षांसाठी केली.
सर्वधर्मसमभाव हा शब्द जरी त्यावेळी आलेला नव्हता, तरी साठे हे तो भाव मानणारे सद्गृहस्थ होते. त्याचे उदाहरण म्हणजे कल्याणमध्ये सप्टेंबर 1889 मध्ये गाजलेले ‘पालखी प्रकरण’ ! मुसलमानांचे मोहरमचे ताबूत आणि जैनांची मिरवणूक एकाच दिवशी निघणार होती. वेळ आणि मार्ग यांची योग्य तडजोड झालेली असूनही, त्या योजनेत अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. न्यायनिष्ठुर अध्यक्ष सदाशिवभाऊ यांनी तेव्हा मुसलमानांच्या बाजूने निकाल देऊन पालखी थांबवली. हिंदू समाजाचे शत्रू म्हणून त्यांच्या विरूद्ध अपप्रचार केला गेला. त्यांच्यावर ग्रामण्य लादले. त्यांना वाळीत टाकले. साठे यांनी तशा प्रसंगालाही तोंड खंबीरपणे दिले. रावबहाद्दूर साठे यांनी लोकसेवा हे त्यांचे कर्तव्य मानले आणि ते निस्वार्थी वृत्तीने सदैव कार्यरत राहिले. ते नगरपालिकेच्या कार्यातून निवृत्त 1891 मध्ये झाले. सदाशिवभाऊ या जिद्दी, ग्रंथप्रेमी आणि गुणग्राही अशा असामान्य व्यक्तिमत्त्वाची इहलोकीची यात्रा स्वत:च्या वास्तूत 1898 च्या नोव्हेंबरमध्ये समाप्त झाली.
– विद्या देवधर 9440373777 vidyadeodhar@gmail.com
———————————————————————————————-