Home व्यक्ती अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी

अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी

0

अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो !

धर्माधिकारी आहेत वऱ्हाडातील नावाजलेले हास्यकवी. त्याचा प्रत्ययही त्यांच्या संभाषणातून येतो. ते बोलू लागले, की एकामागून एक वऱ्हाडी, मराठी, हिंदी धमाल हास्यव्यंग्य कवितांचा खजिनाच खुला होतो. खास वऱ्हाडी ढंगाने पेश होणाऱ्या त्या व्यंग्य कवितांची खोली व विचारांची उंची कळून जाते आणि त्यांतील काव्यप्रतिभेने वाचक-श्रोता मोहीत होतो. राजाभाऊ कविता वाचन व गायन या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असतात. ते प्रज्ञा मंच या कवीगटाशी बांधले गेले आहेत. त्यांची वार्षिक कवी संमेलने ठिकठिकाणी होत असतात.

ते म्हणाले, की माझी शेती आहे, प्रवासासाठी गाड्या पुरवण्याचा व्यवसाय आहे आणि कविता हा माझा छंद व ध्यास, दोन्ही आहे. त्यांनी सांगितले, की “मी लहानपणी, आठवी-नववीत असताना वडिलांनी शेतावर काम करत असलेल्या मजुरांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी सोपवली. त्यावेळी माझे लक्ष बायका वऱ्हाडी बोलीत गप्पागोष्टी करत तिकडे जाई. त्या वऱ्हाडी बोलीभाषेतील गोडवा मला खूप आवडे. त्या ओढीतून भाषेतील शब्दसाठाही भरपूर मिळत गेला. मग वऱ्हाडी भाषेतच कविता आपोआप सुचत गेल्या. मी त्या बोलायचो, लोकांनाही त्या आवडायच्या. असा छंद बाहेर वाढत गेला. घरून मात्र त्याला फारसा प्रतिसाद नसे.

राजा धर्माधिकारी यांनी ‘हसरी मैफिल’ नावाचा दोन तासांचा स्वतंत्र कार्यक्रम तयार केला आहे. त्याचे साडेतीन हजार प्रयोग महाराष्ट्रभर झाले आहेत. त्यांनी ‘झी मराठी’वरील ‘हास्य सम्राट’ कार्यक्रमातही हजेरी लावली आहे.

ते शिक्षणासाठी नागपूरला असताना त्यांनी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ ते ‘संस्कार भारती’ उपाध्यक्ष ते राष्ट्रीय साहित्य टोळींचे सभासद येथपर्यंत विविध जबाबदाऱ्या उचलल्या आहेत व त्या कामांनिमित्त त्यांनी विविध प्रांतांत खूप भटकंती केली आहे. साहजिकच, त्यांना अनेक विचारवंतांचा सहवास लाभला आहे. त्यातून त्यांचे मन व बुद्धी घडत गेली असे ते म्हणतात.

राजा धर्माधिकारी यांचे कवितांतून प्रकट होणारे संवेदनाशील मन प्रत्यक्ष समाजकार्यातूनही प्रकट होते. त्यांनी समाजकार्य पारंगत अर्हता प्राप्त केली आहे. त्यांनी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी दोन लाख व्यसनींना पूर्ण व्यसनमुक्त केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मिळाला आहे. ते परतवाडा रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या ‘जागृती व्यसनमुक्ती केंद्रा’चे संचालक आहेत. व्यसनमुक्तीचे त्यांचे काम ‘विवेकानंद मित्र परिवार’ या महाराष्ट्रव्यापी संस्थेच्या सहाय्याने पण स्वतंत्रपणे, व्यक्तिगत पातळीवर चालते. त्यात एका अमेरिकन कंपनीचे औषध व्यसनी व्यक्तीच्या भोजनपदार्थांत टाकले जाते. त्यामुळे ती व्यक्ती व्यसनापासून दूर होते. शिवाय, मग त्याचे कौन्सीलिंग करायचे असते. ते म्हणाले, की वीस वर्षे माझा हा उद्योग चालू आहे. माझ्या समाजसेवा पदवीने या कामासाठी माझी पात्रता वाढवली आहे. ते व त्यांच्या पत्नी विजया यांचा निर्धार पाच लाख व्यसनींना व्यसनमुक्त करण्याचा आहे.

ते त्यांना लिहिण्याची आवड पूर्वीपासून असल्याने सर्व व्याप सांभाळून लोकसत्ता, तरुण भारत, हिंदुस्थान, नवराष्ट्र इत्यादी वर्तमानपत्रांत बातम्या व स्तंभलेखन करतात. ते त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासून असल्याने शालेय वयात नकलांचे लेखन करत. त्यांनी ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘काका किशाचा’ ते ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यातील कोतवालापर्यंतच्या विविध भूमिकाही केल्या आहेत.

त्यांनी त्यांना सामाजिक संशोधनपर लेखनाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोळा पुरस्कार मिळाले असल्याचे सांगितले. व्यक्ती एकाच आयुष्यात मनात आणले तर कितीतरी विविध कार्यात स्वत:ला झोकून देऊ शकते ! मौज म्हणजे धर्माधिकारी हे सारे हसतखेळत करत असतात. त्यांची आई त्यांना म्हणे, ‘तू विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा काहीना काही निर्मिती करत राहा.’ आईची ती शिकवण मी प्रत्यक्षात आणून दाखवली असे किंचित अभिमानाने ते सांगतात !

राजा धर्माधिकारी 9422890099

विनय हर्डीकर 9324811755 vina_hardi@yahoo.co.in

—————————————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version