आम्ही वाशीच्या (नवी मुंबई) साहित्य मंदिर येथे नित्याची कामे करत होतो. पांडुरंग कुऱ्हे यांचा दुपारी बाराच्या सुमारास फोन आला, म्हणाले, ‘अंबिके गेले’. काही क्षण कान सुन्न झाले. त्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता दूध आणि पेपर विकत घेत असताना भेटलेले अंबिके गेले, (20 ऑगस्ट 2021) यावर विश्वासच बसत नव्हता. कालाय तस्मै नमः! प्रभाकर अंबिके यांनी नव्या मुंबईची ‘सिडको’ नगरी वसवण्यात मोठाच वाटा उचलला. त्यांनी सिमेंटकाँक्रिटच्या नव्या वसाहतीत साहित्यसंस्कृती रुजवण्याचा आग्रह धरला ही गोष्ट आम्हा नवी मुंबईवासीयांच्या मनी विशेष कोरली गेली आहे.
प्रभाकर यांचा जन्म 20 जून 1938 रोजी झाला. वडील शंकर रघुनाथ अंबिके हे नागोठणे (ता. रोहा, जि. रायगड) येथे पोस्टमास्तर होते. आई पार्वतीबाई. प्रभाकर यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगच्या डिग्री परीक्षेत प्रथम येऊन बाजी मारली. पुढे, ते डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट ही परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यांनी कऱ्हाड इंजिनीयरिंग कॉलेज, लार्सन-टुब्रो, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन अशा ठिकाणी नोकऱ्या केल्या. परंतु ते स्थिरावले ‘सिडको’मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून (1977 ते 1983). त्यांना ‘सिडको’तील कामात त्यांच्या इंजिनीयरिंगच्या कामाबरोबर कायदेविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असे, म्हणून त्यांनी एलएलबी ही परीक्षा दिली. अंबिके यांनी स्ट्रक्चरल इंजिनीयर म्हणून व्यवसायही केला. त्यांचे वर्तन निष्कलंक होते. त्यांनी अनैतिक मार्गाने माया जमवली नाही. त्यांनी पदानुसार उच्च आणि कमी दर्ज्याचे असा भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचा लौकिक ‘सिडको’मधील कर्मचाऱ्यांमध्ये आवडता अधिकारी म्हणून होता. ते त्यांची सचोटी, अभ्यासू वृत्ती, समजूतदारपणा, समोरच्याला विषय समजावून सांगण्याची हातोटी आणि त्यांच्या ज्ञानाची प्रगल्भता यांच्या जोरावर यशस्वी झाले. लोक काम घेऊन अंबिके यांना शोधत त्यांच्याकडे येत.
त्यांनी गव्हर्न्मेंट अॅप्रुव्हड व्हॅल्युअर, आर्ब्रिट्रेटर, काऊंसेलर या कामांचा आवाका वाढवला. त्यांनी घेतलेले निर्णय आणि दिलेले निर्णय प्रमाण मानले गेले. त्यामुळे त्यांचा लौकिक अधिकच वाढला. ते ‘सिडको’मधून बाहेर पडले; तरी त्यांनी कन्सल्टंट म्हणून ‘सिडको’च्या अनेक प्रोजेक्ट्ससाठी पुढेही काम केले, यातच त्यांच्या बुद्धिमत्तेची व कार्यकुशलतेची कल्पना येते.
नव्या मुंबईची जडणघडण वाशीपासून झाली. वाशीची भूपातळी समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे. त्यामुळे वाशी नगरामध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा संभव आहे. त्याकरता सेक्टर 8 येथे एक ‘होल्डिंग पाँड’ तयार करण्यात आला असून, पावसाळ्यात तेथे जमलेले पाणी मोठ्या पंपांच्या साहाय्याने समुद्रात टाकण्यात येते. वाशी पूर्णपणे जलमय 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झाली होती. कित्येक घरांत तीन ते पाच फूट पाणी शिरून अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी अंबिके यांच्या सूचनेनुसार ‘होल्डिंग पाँड’ची खोली वाढवण्यात आली. त्यामुळे त्याची पाणी भरण्याची क्षमता वाढली आणि विद्युत पंपाच्या जागी डिझेल पंप बसवण्यात आल्याने पंप बंद पडण्याचा धोका टळला. अतिवृष्टी 2005 नंतर अनेक वेळा झाली, परंतु वाशी नगर जलमय झाले नाही. त्या कामात नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी पुढाकार घेतला. वाशी सेक्टर 8 ते बस डेपो येथे असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून त्या भागाचे सुशोभीकरण करण्याची कल्पना त्यांचीच. त्या कामात स्थानिक नगरसेवक वैभव गायकवाड यांचाही पुढाकार होता. अंबिके यांचीच सेक्टर 17, वाशी हा विभाग डी.बी.सी. म्हणजे डिस्ट्रिक्ट बिझनेस सेंटर तयार करण्याची कल्पना होती. अशा प्रकारच्या आणखी काही योजना त्यांच्या कल्पनेतून साकारण्यात आल्या.
अंबिके यांनी त्यांचे व्यावसायिक काम ज्या कौशल्याने केले त्याच कसबाने त्यांनी नव्या मुंबईत सामाजिक-सांस्कृतिक काम केले. नवी मुंबई वसवली ती समुद्र हटवून आणि डोंगर पाडून. ते पूर्णत: नव्या वसाहतींचे शहर. मी (सुभाष कुळकर्णी) व ललित पाठक, आम्ही मिळून तेथे साहित्यमंदिर संस्थेची स्थापना करून माणसांचे भावविश्व फुलवण्याचा प्रयत्न केला. अंबिके यांनी ‘सिडको’चे मुख्य अभियंता म्हणून त्यासाठी मोलाची साथ दिली व नंतर ते स्वत:च साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बनले. त्या प्रयत्नांमधून वाशीत साहित्य कला कार्यक्रमांना उपयोगी वास्तू उभ्या राहू शकल्या. अंबिके यांची दृष्टी व त्यांचे सहकार्य त्या कामी फार मोलाचे ठरले आहे.
मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाची स्थापना 8 फेब्रुवारी 1979 रोजी झाली. संस्थेचे संस्थापक ललित पाठक हे अध्यक्ष पहिल्या वर्षी होते. अंबिके यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा 1981 ते 1994 अशी तेरा वर्षे वाहिली. त्यांचा सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शन यामुळे मंडळाला मूर्त स्वरूपप्राप्त झाले आहे.
त्यांचा सन्मान व्यावसायिक दृष्ट्या, फेलो ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स आणि फेलो ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स म्हणून झालेला होता. त्यांनी इंजिनीयरिंग असोशिएशन (वाशी) आणि रोटरी क्लब ऑफ न्यू बाँबे व ब्राह्मण सेवा संघ (नवी मुंबई) यांची अध्यक्षपदे काही काळ भूषवली होती. ते शिवसंकल्प पतपेढीचे सल्लागार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (नवी मुंबई शाखा) यांचे कार्यकारी सदस्य होते. नवी मुंबईची निर्मिती करताना येथील भूमिपुत्रांकडून जमिनी घेण्यात आल्या. त्यावेळी Land Pricing Policy तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्व धर्मांच्या देवस्थानांना (मंदिर, मशीद, चर्च)आणि प्रांतीय संस्थांना सेक्टर 9 अ मध्ये भूखंड देण्याचा विचार त्यांचाच !
त्यांनी शेवटपर्यत स्वतःला कामात व्यस्त ठेवले होते. ते त्यांच्या कार्यबाहुल्यातून एम.एम.आर.डी.ए. कन्सल्टिंगची दोन कामे पूर्ण करून निवृत्त होणार होते. परंतु ती कामे अर्धवट सोडून त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. हा एकमेव अपवाद वगळता, ते ‘कर्मण्ये वाधिकारस्ते, मा फलेषुकदाचन’या उक्तीनुसार शेवटपर्यत काम-काम आणि काम करत राहिले ! त्यांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचा अभ्यास भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी यांविषयी होता. त्यांतील कित्येक श्लोक त्यांना मुखोद्गत होते. ते त्यांचा वापर वक्तव्यातून प्रसंगानुसार करत. ते उत्तम वक्तेही होते. बुद्धी आणि भावना यांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये साधलेला होता. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या जोडीला त्यांच्या बौद्धिक विचारांची नि कर्तृत्वाची छाप सर्वसामान्य जनांवर पडत असे. त्यांच्या वक्तृत्वात घनगंभीर गडगडाट नव्हता, अस्खलितपणा नि आर्जवीपणा नव्हता, धारदार उपहास आणि उग्रपणा नव्हता. परंतु त्यांचे प्रत्येक भाषण अभ्यासपूर्ण होत असे आणि त्यात संस्कृत श्लोकांचा समावेश प्रसंगानुरूप असे.त्यांची हातोटी विचार मुद्देसूद आणि सूत्रबद्ध मांडण्यात होती. त्यामुळे ते श्रोत्यांची मने जिंकत. अर्थसंकल्प हाही त्यांचा आवडता विषय. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला, की ते त्याचा अभ्यास करून विश्लेषण मांडत असत. त्यामुळे त्यांना ‘नवी मुंबईचे नानी पालखीवाला’ असे म्हटले जात असे. त्यांची जीवनशैली शिस्तबद्ध होती. ते पहाटे साडेचार वाजता उठत. त्यानंतर योग, प्राणायाम आणि व्यायाम करत, सहा ते सात फिरण्यास जात. येताना दूध आणि पेपर घेऊन घरी आल्यावर आंघोळ-पांघोळ उरकून त्यांच्या कामकाजाला सुरुवात होई. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते त्यांच्या ऑफिसचे काम करण्यात व्यस्त असत. त्यांचे जेवण-खाणे मोजके आणि संतुलित असे.
त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांचे 4 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. मुलगा अश्विनीकुमार, त्याची पत्नी ऐश्वर्या व त्यांची दोन मुले; तसेच मुलगी मनीषा, तिचे पती, मुलगा, मुलगी असा परिवार त्यांच्या मागे आहे. त्यांची एक खासीयत येथे नमूद करणे आवश्यक आहे. ते स्वतः वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीसुद्धा दररोज दूध गरम करून, त्याचे दही लावून लोणी काढून तूप कढवत असत. त्यांची सून व मुलगी त्यांना बेसन लाडू त्या तुपाचा उपयोग करून बनवून देत असत व ही गोष्ट ते अभिमानाने इतरांना सांगून बेसन लाडू खाण्यास देत.स्वावलंबन हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यामुळे ते पत्नीच्या मृत्यूनंतर एकटे घरी राहत. स्वतः सर्व कामे करत असत.
– सुभाष कुळकर्णी 9820570294 sahitya.mandir@yahoo.in
———————————————————————————————-