कथा कोल्हापूरातील पोलिश आश्रितांची – गांधी नगरची (Polish migrants during II world war in Kolhapur Gandhinagar)

0
310

ठिकाणामागे ठिकाणे बदलणे, एका मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामावर… पोलिश आश्रितांची अशी किती तरी स्थित्यंतरे घडत होती. ते कितवे स्थित्यंतर होते हे मोजण्याची ताकद सुद्धा उरली नव्हती. ती स्थित्यंतरे केव्हा थांबणार? कोल्हापूरचा वळिवडे हॉल्ट हे तरी त्यांचे शेवटचे स्थलांतर ठरणार होते का? त्यांची तेथे वसाहत दुसऱ्या महायुद्धकाळात करण्यात आली होती; तेथूनही त्यांना हलावे लागणारच होते… पण सुखद गोष्ट अशी की हे त्यांचे शेवटचे स्थलांतर ठरले. पोलिश आश्रित त्यांच्या मायदेशी परत पाच-सात वर्षांनी तेथून निघून गेले ! हिटलरचा महायुद्धात पराभव झाला, दोस्त राष्ट्रे जिंकली व मुख्यत: पूर्व युरोपातील जे निर्वासित देशोदेशी पांगले होते, ते परतू लागले. कोल्हापूरला आलेले पोलिश निर्वासित तसेच पोलंडला परत गेले. त्यांचा जवळ जवळ दहा वर्षांचा वनवास संपला !

वळिवडे कॅम्पचे छायाचित्र

हिटलरचा प्रभाव पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे देशांत वाढू लागला तसतसे तेथील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थलांतरित झाले व दोस्त राष्ट्रांच्या आश्रयाला आले. इंग्लंडच्या आश्रयास आलेल्या पोलिश लोकांना भारतात आणून त्यांची व्यवस्था कोल्हापूरजवळ वळिवडे कँपात केली गेली. जो परिसर आता गांधीनगर म्हणून ओळखला जातो.

वळिवडे हॉल्ट… हे पोलिश आश्रित तेथे येण्यापूर्वी एक जंगलच होते. कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती राजाराम महाराज पाच-सहा महिन्यांतून कधी तरी तेथे येत. राजाराम महाराज लव्याजम्यासह तेथे तीन-चार तास शिकारीसाठी थांबायचे. छत्रपतींनी वळिवडे हॉल्ट हे राखीव जंगल म्हणूनच घोषित केले होते. शेजारीच वळिवडे गाव होते, चारशे ते पाचशे लोकवस्तीचे. म्हणून त्याला वळिवडे हॉल्ट म्हणत. वळिवडे हॉल्ट हे पोलिश निर्वासित तेथे आले तेव्हा अगदी निर्मनुष्य, चिडीचूप ठिकाण होते. घरे नाहीत, दुकाने नाहीत, मनुष्यवस्तीच्या अस्तित्वाचे कसलेही चिन्ह तेथे नव्हते. तेथे होती फक्त झाडेझुडपे आणि पाण्याची तळी. त्याला असलेले एकुलते एक गेट तेच तेवढे काय ते मानवी बांधकामाचे प्रतीक.

दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते… मोठमोठाल्या राजकीय उलथापालथी घडत होत्या. भीतीचे सावट सगळीकडे होते. ब्रिटिश सरकारचे फर्मान एके दिवशी आले, की पोलंडमधील निराश्रित भारतात काही ठिकाणी लवकरच धाडण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील निवडक ठिकाणी आश्रितांच्या वसाहती उभारण्यात येणार आहेत. त्या निवडक वसाहतींपैकी एक होता वळिवडे हॉल्ट कँप.

वळिवडे कॅम्पमधील मुख्य रस्ता

कँपच्या उभारणीच्या कामाला सुरुवात सरकारमार्फत झाली. कॅनी नावाचा युरोपीयन इंजिनीयर तेथे दाखल झाला. हिंदुस्थान कंपनीला वसाहतीच्या उभारणीचे कंत्राट दिले गेले. कोल्हापूर संस्थानात मजुरांची आयात बाहेरूनही केली गेली. त्यांची प्रत्येकी मजुरी तीन आण्यांपासून सहा आण्यांपर्यंत होती. कॅनी हा चतुर व कार्यतत्पर अधिकारी होता. तो चाळिशीचा असेल. उंच, देखणा… तो बऱ्यापैकी मराठीही बोलायचा. तो कोल्हापूर संस्थानातील मजुरांना पान-विडी मळताना बघितल्यावर त्यांना गंमतीखातर म्हणत असे, ‘काय तमाशा लावलाय रे?’ आणि ते मजूर झटकन कामाला लागत. त्यामुळेच कँपची उभारणी अवघ्या दीड वर्षांत होऊ शकली !

एकेचाळिसावे साल संपत आले. पोलिश निराश्रितांनी भरलेल्या स्पेशल रेल्वे गाड्या वळिवडे हॉल्टवर थांबू लागल्या. माणसे गोरीगोमटी, उंच, धिप्पाड अशी होती. पाच-सहा स्पेशल रेल्वे आल्या. पोरेटोरे, म्हातारी-कोतारी आणि विधवा बाया यांचा त्यांच्यात प्रामुख्याने समावेश होता आणि त्यांच्या मागोमाग होती अपंग माणसे. त्या साऱ्यांचा अवतार मात्र साहेबी थाटातील होता. ती माणसे वेगळी आहेत हे तेथील मजुरांना जाणवले. ती सारी रंगीबेरंगी कपड्यालत्त्यांत खुलून दिसत. झग्यातील सहा-सहा फुटी उंचीच्या बायका. तर, बुश शर्ट, फुल पँट, हॅटमधील माणसे… त्यांचे रूपच न्यारे होते. दादू लोखंड्या, मारुती भोसल्या, शिवा गवळी, बंडू आवळे, शिवाप्पा आणि गुंडाप्पा, साधू गवळी या स्थानिक मजुरांची कुटुंबे वसाहतीचे बांधकाम खतम होऊनही तेथे राहिली होती. दादू आणि शिवा स्पेशल गाडी आली, की पोलिश आश्रितांचे सामान उचलण्यासाठी पुढे धावत. गाडीतून उतरणारे सगळेजण एकाच रंगाचे होते आणि त्यांच्या चेहऱ्यांवरील छटा होत्या दुःखाच्या, यातनेच्या, वेदनेच्या. त्यांच्या डोळ्यांमधून करूणा ओसंडत होती. लहान बालकांचे निरागस चेहरे बावरल्यासारखे वाटत होते, तर म्हाताऱ्या बाया गोंधळून गेल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धाने त्या लोकांना देशोधडीला लावले होते.

वळिवडे हॉल्ट म्हणजे नवीन वसवण्यात आलेले, साऱ्या सुखसोयी असलेले एक छोटेसे शहरच. एकूण एकशेपंच्याऐशी बराकी उभारल्या गेल्या होत्या. प्रत्येक बराकीमध्ये बारा ब्लॉक्स होते. त्यांना सिंगल रूम, डबल रूम असे संबोधले जाई. त्या ब्लॉक्सच्या रूमचे बांधकाम चौथऱ्यापर्यंत पक्के आणि मजबूत असे होते. चौथऱ्यावर तट्ट्याच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. कौलारू छप्पर बंगलोरी खापऱ्यांचे होते. दोन्ही बराकींमध्ये दहा फुटांचे अंतर होते आणि दोन बराकींमधील रस्ता चौदा फूट रुंद असा होता.

वळिवडे येथील पोस्ट कार्यालय

पुढे-मागे व्हरांडा, झोपण्याची व बैठकीची खोली होती. त्यांच्या स्वयंपाकघरात मोरी होती. त्या वसाहतीत शाळा होत्या. पाच मुख्य सरकारी बंगले होते. एक सायन्स कॉलेजही होते. भाजी मार्केट कॅम्प कमांडरच्या ऑफिसच्या शेजारच्या मोकळ्या जागेत भरत होते. कमांडरच्या ऑफिससमोर गोडाऊन होते. त्यात आश्रितांना पुरवली जाणारी साहित्यसामग्री साठवली होती. त्यांच्या जन्म-मृत्यू नोंदणीचे कार्यालयही तेथे होते. स्मशानभूमीच्या वाटेवर एक कैदखाना होता. त्याच्या शेजारी त्यांची एक बाग होती. तेथे मधमाशा पाळल्या जात. कॅम्प कमांडरचे ऑफिस पहिल्या बराकीतील एक नंबरच्या रूममध्ये होते, तर पैशांचा खजिना (ट्रेझरी) त्याला लागून असलेल्या दोन नंबरच्या रूममध्ये होता. पन्नाशीतील पानीप्रव्यानका नावाच्या पोलिश बार्इंची ट्रेझरर म्हणून खजिन्याची देखभाल करण्याकरता नेमणूक केली गेली होती. कॅम्पमध्ये सोयी-सुविधा दैनंदिन दिमतीला होत्या – अँब्युलन्स, फायर ब्रिगेड जीप, कचऱ्यासाठी ट्रक, माल वाहतुकीसाठी टँकर आणि कॅम्प कमांडरसाठी जीप वगैरे. एक तळघर उत्तरेला रेल्वे लाईनला लागून होते. तेथे रॉकेलचा डेपो होता. सुरुवातीला असलेला कॅम्प कमांडर फार काळ राहिला नाही. त्याच्या जागी बर्टन नावाची पन्नाशीतील इंग्लिश बाई आली होती. बाई शिस्तीची भोक्ती होती अन् स्वभावाने एकदम कडक. उंची साडेसहा फुटांच्या जवळपास होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा कॅम्पमध्ये होता. त्यांचा मुक्काम कोल्हापुरात कसबा बावड्याजवळ असलेल्या तळ्यासमोरच्या रेसिडेन्सी बंगल्यात होता. बर्टनबाई कॅम्पमध्ये रोज जीपमधून येत. तेथील पोलिश निराश्रितांचे पुनर्वसन करण्याबाबत सूचना जातीने देत व निघून जात.

रेकॉर्ड ऑफिस

पोलिश लोकांना निरनिराळ्या बराकींमधील निरनिराळे ब्लॉक्स देण्यात आले. कमांडर ऑफिसकडून जीवनोपयोगी साहित्य दिले गेले. प्रत्येक माणशी खाट, गादी, चादर, थाळी वगैरे साहित्य मिळत होते. एके काळी ओकेबोके वाटणारे ते राखीव जंगल माणसांच्या गजबजाटाने जिवंत झाले होते. दुकाने सुरू झाली. सोडा वॉटरची, पावाची; तसेच, खानावळही.

तेथील चलन कूपनांचे होते. रुपया, बारा आणे, आठ आणे आणि चार आणे अशी छापील कूपने व्यवहारात होती. दोन आणे, एक आणा, दोन पैसे, एक पैसा यांचीही वेगवेगळी कूपने होती. ती फक्त कॅम्पात चालत. मात्र ती कूपनपद्धत फार काळ टिकली नाही. भारतीय चलनी नाणी तेथे नऊ महिन्यांनी वापरात आली.

फायर ब्रिगेडची व्यवस्था अफलातून होती. बराकीच्या कोपऱ्यावर लोखंडी अँगल टांगलेला होता. आग लागल्याची सूचना फायर ब्रिगेडला देण्याची झाल्यास तो अँगल बडवला जाई. तो आवाज पुढील बराकीमधील लोकांच्या कानावर आदळत असे. त्या बराकीमधील लोक मग त्यांच्या बराकीमध्ये लोखंडी अँगल वाजवत… अशा तर्‍हेने एकामागून दुसरा, दुसऱ्यामागून तिसरा, तिसऱ्यामागून चौथा या क्रमाने बराकींमधील लोखंडी अँगलचा वापर करून फायर ब्रिगेडला आगीची सूचना दिली जाई. एक पोलिस टेहळणीसाठी वस्तीच्या मध्यभागी असलेल्या उंच टेकडीवर दीडशे फूट उंचीच्या लाकडी मनोऱ्यासारख्या शेडवर चोवीस तास बसून असे. ती व्यवस्था अर्थातच पहाऱ्याने असे. तेथून त्या पोलिसाची नजर कोठे आग लागली ते टिपत असे. आगीचे ठिकाण आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या यांच्यामधील अंतराइतपत लांबीचा अखंड पाईप त्यावेळी नव्हता. त्यामुळे पायपांचे तुकडे एकामागून एक जोडले जात व पाण्याचा प्रचंड मारा आगीला आटोक्यात आणी. वसाहतीला पाणीपुरवठा करण्याकरता वसाहतीच्या दक्षिणेला भलीमोठी टाकी बांधली होती. पाणीपुरवठा नळांमधून होई. एका पाईपला कमीत कमी सहा, जास्तीत जास्त बारा नळ जोडलेले होते. त्यांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्याकरता केला जाई. पाण्याच्या टाकीच्या पूर्वेला बंदिस्त अशी स्नानगृहे होती. एक पुरुषांकरता, दुसरे स्त्रियांकरता. विशेष म्हणजे सामुदायिक स्नानघरात शॉवरची सोय होती. किमान अडीचशे ते तीनशे स्त्री-पुरुषांच्या अंघोळीची सोय स्नानगृहांत होती. कपडे धुण्याकरता बाहेरच्या बाजूस वेगळे नळ होते. कपडे-भांडी धुण्याकरता स्वयंपाक कट्ट्याप्रमाणे सार्वजनिक कट्टे होते.

पोलिश रहिवासी राहण्यास आल्यानंतर तट्ट्याची घरे आतून झकास सजवली जाऊ लागली. प्रत्येक घराबाहेर दोन फूट अंतरामध्ये बागा फुलू लागल्या. गारवेल, फड यांसारखी फुले त्यात बहरत. प्रत्येकाच्या घरात एक भाला, दोन बादल्या आणि आगीपासून बचावासाठी एक स्प्रे-पंप ह्या वस्तू हमखास ठेवल्या जात होत्या. दोन बादल्या पाण्याने नेहमी भरून ठेवल्या गेल्या पाहिजेत हा नियम करण्यात आला होता. प्रत्येक पोलिश कुटुंबाला सात रुपये भत्ता दररोज सरकारकडून कमांडर ऑफिसमार्फत मिळे. सुरुवातीला, जेवणाची व्यवस्था हॉस्टेलवर होती. त्याची व्यवस्था मॅनेजर म्हणून पन्नाशीतील पान-पॉचा आणि साठी ओलांडलेला ओकिबिन्नसी ही दोघे रहिवासी पाहत. पोलिश लोक सूप आणि ब्रेड जास्त खात असत. दिवसातून दोनदा कॉफी, आठवड्यातून एकदा भात असे.

नऊ वर्षांचा दादू लोखंडे पानक्लेन्वीकडे दहा रुपये पगारावर ऑफिसबॉय म्हणून कामाला लागला, तर अठरा-एकोणीस वर्षांचा मारुती दशरथ भोसले वर्कर म्हणून एकशेचौदाव्या बराकीतील हॉस्टेलमध्ये नोकरीला लागला. शिवा, साधू गवळी, हेगडे हेदेखील वर्कर म्हणून आरोग्य विभागात रुजू झाले. मारुती भोसले यांचे वडील अनाथ बालकाश्रमात ‘कूक’ होते. त्यांच्या हाताखाली पोलिश बायका चार-पाच होत्या. सुमारे चारशे मुले वळिवडे रोडवर असलेल्या अनाथालयात होती. सारी चार वर्षांच्या पुढील होती. त्यांचे हगणे-मुतणे त्यांचे तीच करत. त्यांना परिस्थितीमुळे तेवढी समज होती. आई-बापाविना जगणाऱ्या त्या निष्पाप बालकांकडे पाहिल्यावर कालवाकालव होत होती मनात… कोणी त्यांना प्रेमाने, मांडीवर बसवणारे नव्हते, मायेने मिठी मारणारे नव्हते, त्यांच्या गालांचा गोड मुका घेणारे नव्हते. पोलंडचा युद्धात ‘हिरोशिमा’ झाला असता तर त्यांचे बागडणेच दिसले नसते. पोलंड ते हिंदुस्थान, हा बोटीचा प्रवास, मग पुन्हा वळिवडे हॉल्ट नावाचा पार्क… त्यांना हा  इतका मोठा हजारो मैलांचा फेरा वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी आईबापांविना घडला होता. कॅम्पातील किंवा अनाथालयातील जी थोडी मोठी पोरे टारगटपणा करू लागली, त्यांची रवानगी सरळ बोर्स्टल स्कूलसारख्या त्यांच्यासाठी बनवलेल्या ‘कैदखान्या’त केली जाई.

बर्टनबार्इंचा धाक आख्ख्या छावणीत होता. छावणीत पोलिशांखेरीज कोणालाच प्रवेश नव्हता. भोसले, गवळी, हेगडे यांच्यासारख्या कामगारांना दंडावर ओळखीकरता फिती बांधलेल्या असत. रहिवाशांना ते परवानगी काढून बाहेर गेलेच तरी संध्याकाळी आठ वाजेपर्यत कॅम्पमध्ये परतलेच पाहिजे असा दंडक होता. उशिरा येणाऱ्यांना एक-दोनदा ताकीद देऊन, सुधारणा न झाल्यास कैदखान्याची भीती घातली जाई. वात्रट पोरांबरोबर त्यात उनाड बायांचादेखील समावेश होता. बरेच जण कोल्हापूर रस्त्यावरील श्रीक्षेत्र जगद्गुरूंच्या मठात फिरण्यास जाऊ लागली. काही जण रेल्वेने कोल्हापूरला जाऊ लागली. बहुतांश वस्तू कॅम्पमध्ये मिळत. काही पोलिशांनी कॅम्पमध्ये दुकानेही थाटली. पंचेचाळीस वर्षांच्या पानपिरकोस्कीने सोडावॉटर-कोल्ड्रिंकचे दुकान चालू केले होते. पंचावन्न वर्षांच्या पानसुस्ताकने लॉजिंग सुरू केले होते. तो केकसुद्धा विकू लागला होता. काही पोलिशांनी मिळून बिस्किटे-केक तयार करण्याची ‘स्पुजल्या’ नावाची को-ऑपरेटिव्ह संस्था सुरू केली होती. त्या सोसायटीमार्फत साऱ्या वसाहतीला केक-बिस्किटांचा पुरवठा होऊ लागला. वळिवडे, चिंचवाड वगैरे जवळपासच्या खेड्यांतून बायका भाजी घेऊन येत. त्यांना कॅम्पच्या कुंपणाबाहेरूनच भाजी विकता येई. त्यांना भाषेच्या अडचणीमुळे एक आणा किंमतीच्या भाजीला रुपयासुद्धा मिळून जाई. कधी कधी एक बोट वर केले, की एक आणा किंवा एक रुपया पोलिश रहिवाशाच्या ध्यानात येत नसे. कॅम्पमध्ये कलकल सारखी सुरू असे, कारण एवढी मोठी रहिवासी कुटुंबे मर्यादित जागेत राहत होती.

त्यांच्या दुःखाची तीव्रता हळुहळू कमी कमी होऊ लागली, ती त्यांच्या खेळकर वृत्तीमुळे. तेविसाव्या बराकीतील पानलिपिस्की आख्ख्या छावणीत गमत्या म्हणून ओळखला जाई. त्याचे वय सत्तेचाळीस- अठ्ठेचाळीसच्या आसपास असावे. तो सेनेत अधिकारी होता. उंची साडेसहा फुटांहूनही जास्त. अंगाने धिप्पाड होता. तो त्याच्या दोन्ही हातांनी मारुती भोसले आणि दादोबा लोखंडे यांना एकाच वेळी किती तरी वेळ उचलून धरू शकत असे. त्याच्या गळ्याला भोक पडले होते. त्या भोकात त्याने कायम रबरी पाईप लावून ठेवला होता. त्या नळीचे भोक त्याच्या हाताच्या बोटाने बंद केल्यानंतरच तो बोलू शकत होता. तो दीड-दीड मणाचे पोते उचलून एक सेकंदाच्या आत पाठीला लावत असे.

त्यांच्या करमणुकीचे दुसरे साधन होते, निरनिराळे खेळ. मैदानात दर रविवारी फुटबॉल सामने खेळले जाऊ लागले. वडगावच्या टीमने पोलिश संघाला दोनदा हरवले होते. एकशेअठ्ठावन्नाव्या बराकीत चर्च उभारण्यात आले होते. त्याच्या जवळपास छोटासा हॉल होता. तेथे नृत्यगायनाचा कार्यक्रम अधुनमधून होत असे. कॅम्पमध्ये सिनेमाचासुद्धा शिरकाव झाला. कोल्हापूरच्या परदेशी यांचा एक तंबू तेथेही लागला. ‘थीफ ऑफ बगदाद’, ‘टारझन’ यांसारखे इंग्रजी चित्रपट दाखवले जाऊ लागले. महिन्या-दोन महिन्यांतून एकदा ‘संत ज्ञानेश्‍वर’, ‘शेजारी’, ‘संत तुकाराम’, ‘खजांची’ यांसारखे हिंदी-मराठी सिनेमे दाखवले जात होते. कुतूहलापोटी पोलिश लोक हिंदी-मराठी पिक्चर पाहू लागले होते. स्थानिक काही लोकांशी त्यांचे संबंध दृढावले होते. कोल्हापूरकडील काही मंडळी तेथे येत होती. त्यांच्यातील काहींचे तेथील पोलिश पोरींशी लागेबांधे निर्माण झाले होते. सूत जमले होते. काशीकर, परदेशी यांनी पोलिश तरुणींशी लग्ने करून टाकली.

काही पोलिशांचे प्राण रात्री बारानंतर कानात आलेले असत. कारण, त्या वेळेला बी.बी.सी. रेडिओवरून बातम्या दिल्या जात. ते त्या बातम्यांमध्ये त्यांच्या भवितव्याचा वेध घेत. त्यांना भारतात येऊन पाच-सहा वर्षें झाली, त्यानंतर तर त्यांची अस्वस्थता फार वाढली व त्यांना त्यांची मायभूमी खुणावी लागली.

दुसरे महायुद्ध अखेरच्या टप्प्यात आले तेव्हा त्यांच्या मायदेशी रवानगीचे सरकारी फर्मान निघाले. त्यांना मुंबईहून विमानाने मायदेशी पाठवण्यात येणार होते. लांब प्रवासाचे साधन म्हणून सागरी जहाजांऐवजी विमाने रूळावली होती. पोलिश निर्वासित मायदेशी परतण्याच्या तयारीला लागले. सामानाची बांधाबांध झाली. साऱ्यांची आवराआवर झाली. जाण्यापूर्वी ते स्थानिक लोकांचा निरोप घेऊ लागले. पानक्लेक्चीने दादूला बोलावले, ‘कच तुतया’ (इकडे ये). दादूने त्याला नमस्कार केला. जिन्दॉब्रे (नमस्कार) दादू. सॉतिकसेस? (काय पाहिजे तुला?) दादू काहीच बोलला नाही. चूपचाप उभा राहिला. पानक्लेक्चीने स्वत:च्या मनगटावर बांधलेले घड्याळ दादूला भेट दिले. दादूला गहिवरून आले. पानक्लेक्ची म्हणाला, ‘पमेनाताच लामने’ (मला विसरू नकोस). वसाहतीतील बराकी ओस पडू लागल्या. लोकांचे थवे टोळीटोळीने बराकी सोडू लागल्या. पानीयान्काचे कोणीच नव्हते. तिचे सामान दशरथने त्याच्या डोक्यावर घेतले. पानीयान्का आणि त्याने रेल्वे स्टेशनची वाट धरली होती. “बेगाखोखाम, च्या बार्ज जिमेन्चो तू तै.” (देवाशपथ, मी फार हाल सोसलेत. खरेच आता कंटाळलेय मी.) पानीयान्का म्हणत होती. त्यावर दशरथ म्हणाला, ‘पानबोगा नेवेम सोज रॉबिश’ (परमेश्‍वरी इच्छेपुढे काय करणार?) तेवढ्यात पाठीमागून दशरथचा सर्वात धाकटा मुलगा वशा पळत आला. दशरथाने त्याला बार्इंना नमस्कार करण्यास सांगितले. त्याने हात जोडले. त्याबरोबर तो म्हणाला – अरे लेका, हो ब्रॅवॅचुर म्हण. मुलगा काहीच बोलला नाही. ती तिच्या हातातील स्वेटर मुलास देत दशरथला म्हणाली, ‘तेन खॉपची गेस्त यदामू ती बार्ज उचिच ऑन बार्ज मोन्द्री येस्त’ (ह्या मुलाला तू चांगले शिक्षण दे हो. फार हुशार आहे). पानसुस्तॉकने लॉजिंगमधील टेबल-खुर्ची देऊन टाकली आणि जास्त दारू न पिण्याचा सल्ला दिला. ‘ती ऊ वा गाय दॉबजे’ (तू व्यवस्थित वाग.) तो वरमला.

रेल्वे स्पेशल वळिवडे हॉल्ट स्टेशनवर लागली होती. ती शेवटची स्पेशल होती. अगोदरच्या स्पेशलमधून बहुतांश लोक निघून गेले होते. पोलिश लोकांच्या चेहऱ्यावर ते त्यांच्या मायदेशी परतत आहेत याचा आनंद दिसण्यापेक्षा त्यांना निर्वासित म्हणून काही वर्षें जगावे लागले याची खंत होती. त्यांना त्यांच्या भूमीत जाऊन पुन्हा नव्याने संसार त्यांच्या देशाच्या मातीवर उभे करायचे होते. त्यांना भवितव्याच्या काळजीने ग्रासून टाकले होते. मायभूमीची ओढ हे त्यांच्या दुःखातील सुख होते.

ते सारे पोलिश रेल्वेगाडीत जाऊन बसले. तेथील मजुरांना दिसणारे नेहमीचे चेहरे पुन्हा कधीच दिसणार नव्हते. सोडावॉटरवाला पानपिरकोस्की, कमांडंट ऑफिसमधील क्लार्क पानलिपिस्की, पानीआन्का, पानसुस्ता, सदैव दिलखुलास, प्रेम करणारा पानलिपिस्की, पानीआन्का, पानीहेला, पानीसाशा…  सारे सारे चेहरे त्या कॅम्पच्या आकाशातून लुप्त होणार होते. रेल्वेच्या फलाटावर त्या मजुरांखेरीज दुसरे कोणी उरले नव्हते. डब्यातून लिपिस्की जोरात ओरडला. त्याने बंडू आवळेला हाक मारली, तेवढ्यात रेल्वेची शिट्टी वाजली. गाडी हलली. त्याने त्याच्याकडील त्याचा कोट बंडू आवळेच्या दिशेने फेकला. बंडूने तो अलगद झेलला !

लिपिस्कीचे तोंड वाजत होते – च्या तेरास स्वुई मैस्ता पुईजे’ (मी आता माझ्या मायभूमीकडे जातोय.) पानीआशाही खिडकीतून हात हलवत म्हणत होती. दोब्रानेस… दोब्रानेस… दोब्रानेस… (आम्ही चाललो… आम्ही चाललो…)

पोलिश लोकांची त्यांच्या मायदेशी रवानगी 1948-49 मध्ये करण्यात आली. पोलिश लोक गेल्यानंतर वळिवडे पोलिश वसाहतीत सिंधी निर्वासितांना स्थानापन्न करण्यात आले. आता ती सिंधी निर्वासितांची वस्ती कोल्हापूरचे गांधीनगर म्हणून ओळखण्यात येते. तेथील एकेकाळचे सिंधी निर्वासित कोल्हापूरच्या लोकजीवनाचा भाग बनून गेले आहेत.

सुशील गजवानी 9823667789 milliondollarconfidence@gmail.com

छायाचित्रे – www.polishexilesofww2.org वरून साभार.

——————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here