Home गावगाथा पिंपळगाव – विदर्भातील पंढरपूर ! (Pimpalgaon – Saintly town in Vidarbha)

पिंपळगाव – विदर्भातील पंढरपूर ! (Pimpalgaon – Saintly town in Vidarbha)

 

पिंपळगाव (भोसले) हे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले समृद्ध गाव आहे. परिसरात पाणी मुबलक आहे. शेतजमीनही सुपीक आहे. धान हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्या सोबत एरंडी, पोपट (वालासारखे कडधान्य – पावटा), मूग, उडीद, तूर, सोयाबीन आणि फळभाज्या व पालेभाज्या यांचेदेखील उत्पन्न भरपूर होते. तो परिसर अन्नधान्याने जसा समृद्ध आहे तसाच संतसहवासानेही संपन्न आहे. पिंपळगाव या गावाची माती पंढरपूरएवढीच पवित्र आहे असे म्हणतात. कवी सेलोकर गावाचे वर्णन तसेच करतात पिंपळगाव पंढरपूर, साधू-संतांचे माहेर. गावात वर्षभर भजनपूजनाचे सूर ऐकू येतात. भक्त त्या तालावर डोलतात, गातात, नाचतात व तल्लीन होतात.

पांजीबाबा देवस्थानचे अध्यक्ष कवी सेलोकर गुरुजी आणि लेखक रोशनकुमार पिलेवान

 

पिंपळगाव हे गाव दोन किलोमीटर लांब असे पूर्व-पश्चिम दिशांना विस्तारले आहे. गावाची रूंदी लांबीपेक्षा फार कमी आहे. गावातील मोहल्ले खालचा, मधला, पेठ आणि प्लाट अशा चार नावांनी ओळखले जातात. गावाची लोकसंख्या चार हजार सातशेअकरा आहे. गावाला ऐतिहासिक वारसा आहे. गावात नागपूरचे राजे रघुजी भोसले यांची वतनदारी होती. त्यामुळे गावाला पिंपळगाव(भोसले) या नावाने ओळखले जाते. भोसलेकालीन बुरूज गावाच्या मधील मोहल्ल्यातील उत्तरेकडील भागात आहेत. भोसले यांची सरदार वगैरे मंडळी त्या बुरूजांवर देखरेख करण्यास येत. अलिकडे बुरूज पूर परिस्थिती, बांधकामासाठी लागणारी माती खोदून नेल्यामुळे ढासळलेले आहेत. काही लोकांनी बुरूजावरील जागेवर कब्जा केल्याचे दिसते.

 

खालील मोहल्ल्यात पांजीबाबा देवस्थान आहे. त्यात रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे. मधील मोहल्ल्यात आडकुजी महाराज देवस्थान आहे. त्यातही रामाची मूर्ती आहे. तर पेठ मोहल्ल्यात हनुमान मंदिर आहे. प्लाट मोहल्ल्यातदेखील मंदिरांची नव्याने स्थापना केलेली दिसून येते. त्याशिवाय गावात काळा मारोती, दुर्गामाता, हनुमान, माराई अशी मंदिरे आहेत. गावात रामजन्माच्या निमित्ताने भव्य जत्रा भरते. पांजीबाबा, आडकुजीबाबा आणि हनुमान मंदिरांत भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. रामनवमीच्या रात्री गावातील मध्यवर्ती मोकळ्या ठिकाणी गावागावातील मंडळांची भजने; तसेच, कीर्तनकार मंडळींची कीर्तने असे कार्यक्रम रात्रभर चालू असतात. गावागावातील लोक त्या कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी येतात. तो कार्यक्रम रामनवमीला रात्रभर चालू असतो. वाशिमचे चव्हाण महाराज पांजीबाबा देवस्थानात सातत्याने सोळा वर्षे भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून आमंत्रित असत. ते हयात नाहीत. परंतु त्यांच्या स्मृती मात्र भक्तांच्या मनात कायम आहेत. ते हाकेच्या अंतरावर असलेल्या सोंद्री गावात पहिल्यांदा कार्तिक काल्याच्या निमित्ताने आयोजित सप्ताहासाठी आले होते. त्यावेळी कीर्तन श्रवणासाठी गेलेल्या पिंपळगावातील जनतेला त्यांचे आध्यात्मिक, वैचारिक तत्त्वज्ञान पसंत पडले. त्यांना पांजीबाबा देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी रामनवमीच्या कीर्तन सप्ताहाचे निमंत्रण स्वीकारण्याचा आग्रह धरला. ते निमंत्रण त्यांनी “बघू. पुढचं पुढं.म्हणत अधांतरी ठेवले. तत्पूर्वी त्यांना पिंपळगावाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. तथापि “कीर्तन सप्ताह संपल्याशिवाय महाराज गावाची शिव ओलांडत नाही.” या सबबीखाली सोंद्री येथील आयोजकांकडून आमंत्रण परतून लावण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण महाराज गावात आले नाहीत. पण रामनवमीच्या सप्ताहासाठी मात्र चव्हाण महाराज प्रगटले. अगदी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना. कोठलाही संपर्क किंवा पत्र व्यवहार नसताना. तेव्हापासून दरवर्षी रामनवमी सप्ताहासाठी ते न चुकता यायचे असे आयोजक समितीचे अध्यक्ष सेलोकर गुरूजी सांगतात. चव्हाण महाराजांची गायन शैली भक्तांच्या हृदयाचा ठाव घेणारी, अभिनयपूर्ण कीर्तन विवेचन शैली वाखाणण्याजोगी होती. ते गौतम बुद्ध, ज्ञानोबा-तुकोबा ते गाडगेबाबा यांचे विज्ञानवादी विचार, अभंग, आध्यात्मिक दाखले तर शिवाजी महाराजांपासून आंबेडकरांपर्यंत सुधारणावादी दृष्टिकोन भक्तांसमोर अभ्यासपूर्ण विवेचनातून मांडायचे. चव्हाण महाराज वासिममध्ये एका शाळेत शिक्षकदेखील होते. 

जेठूजी महाराजांचा पुतळा

 

जेठुजी महाराज हे गावातील महत्त्वाचे संत होते. त्यांचा देमाई आणि नकटूजी सोनवाने यांच्या पोटी जन्म झाला. ते ढिवर (कोळी) समाजाचे होते. त्यांनी वडिलांच्या मासेमारीचा व्यवसाय पुढे चालवला नाही. ते मनिराम बाबांच्या कृपाप्रसादाने आध्यात्माकडे वळले. ते समाजबांधवांना शिका, मास्यांचा जीव घेऊ नका” असा संदेश देत. गावातील वारकरी मंडळी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीच्या आषाढवारीसाठी पायी दिंडी-भजनासह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत. पायी जाणे आणि परत येणे यासाठी महिना-दीड महिन्यांचा वारीचा कार्यक्रम दरवर्षी नित्य नियमाने चाले. जेठुजी महाराज हे संसारातून विरक्ती घेतल्यानंतर रानावनात झाडपाला खाऊन ध्यान, साधना करत. त्यांचा पुतळा गावाच्या मध्यभागी- रामनवमीच्या जत्रेच्या ठिकाणी उभारण्यात आला आहे.

आडकोजी महाराज देवस्थान

 

आडकूजी बाबा हा महान अवलिया माणूस. गावकरी त्यांच्याबद्दल अनेक कथा सांगतात. आडकू हा शेतकरी कुटुंबात जन्माला आला. जातीने कुणबी. त्यांचे आडनाव राऊत. आडकूचे आईवडील त्याला ज्वारीच्या कणसांची राखण करण्यासाठी शेतात पाठवत. तो पाखरांना गोफणीने दूर हाकलण्याचे सोडून त्यांना दाणे खाण्यास बोलवायचा- येवा रे पाकरायवा …खावा दाने !शेजारी शेतकरी आडकूची तक्रार त्याच्या आईवडिलांकडे करत. तुमचा आळक्या नाईका पाकरायलं खेदं नाई, निस्ता चरू देते. त्याचे आईवडील रागावत. उलट, तो त्यांना सांगे, कीकाही होत नाही, देव देते.आणि चमत्कारच जणू, दरवर्षी मुबलक पिक येई ! आडकुजींना कीर्तन-भजनाचा नाद होता. ते एकटेच दहा किलोमीटर दूर असलेल्या ब्रह्मपुरीच्या विठ्ठलरूक्मिणी मंदिरात आषाढीचे कीर्तन ऐकण्यास जात. भर पावसात, ब्रह्मपुरीजवळच्या भूती नाल्यात पूर असे. तरीही आडकू कीर्तन ऐकण्यासाठी जाई. मग बालकृष्णाला यमुनेच्या महापुरातून वासुदेव डोक्यावरून वाहून नेताना पायांचा स्पर्श होताच नदीच्या पाण्यातून जशी वाट तयार झाली तशा कथा प्रसृत होत; असा तो अवलिया. त्याचे मंदिर ब्रह्मपुरीतील भांडारकर यांनी गावात बांधले. त्यांची शेतजमिनीची मिळकत मंदिराच्या उद्धारासाठी, भागवत सप्ताह-काल्याच्या कार्यक्रमासाठी उपयोगात आणली जाते.

काळा मारोती देवस्थान

 

गाडगेबाबा आणि तुकडोजी पिंपळगाव येथे आले होते. त्या महात्म्यांनी गावातील घाण हातात खराटा घेऊन साफ केली. गाडगेबाबांच्या कार्याचा वसा घेण्यासाठी वडिलांच्या आज्ञेला अनुसरून चरणदास बनकर बालवयात त्यांच्या सोबत गेले. गाडगेबाबांचे अनुयायी बनले. त्यांनी बनकरहे आडनाव त्यागून उजेडे हे आडनाव धारण केले. बनकर या आडनावाची अंधारे बनकर आणि उजेडे बनकर अशी दोन कुळे आहेत. चरणदास यांचा जन्म त्यांतील उजेडे कुळात झाला होता. त्यांना गाडगे महाराजांच्या सहवासात जणू नवा जन्म मिळाला ! चरणदास उजेडे महाराज यांनी अनेक ठिकाणी कीर्तने आणि प्रबोधनपर कार्यक्रम केले. त्यांनी ब्रह्मपुरी येथे गाडगे महाराज ट्रस्टची स्थापना केली; स्वतःला आयुष्यभर गाडगेबाबांच्या कार्यात वाहून घेतले.

त्या शिवाय गावात हरी भक्त परायण हरिभाऊ नाकतोडे महाराज, त्यांच्या सहचारिणी (ह.भ.प.) निर्मला नाकतोडे महाराज आणि (ह.भ.प.) मुखरू सेलोकर महाराज आदी महत्त्वाचे कीर्तनकार झाले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात जनजागृती केली. नव्याने एका मंदिराची स्थापना प्लाट मोहल्ल्यात करण्यात आली आहे. भागवत सप्ताहात कार्तिकाच्या काल्याचे भव्य आयोजन त्या मंदिरात केले जाते. गावात भक्तीमय वातावरणाचे सूर निनादतात. गाव भक्तीरसात न्हाऊन निघतो. दिंडी भजन, टाळ, मृदंग, झांज, चिपड्यांच्या तालात वारकरी ठेका धरतो.

गावात आठवडी बाजार दर बुधवारी भरतो. शेतकरी स्वत: शेतात पिकलेला भाजीपाला विकण्यास आणतात. काही व्यापारी कपडे, मसाले यांचे गाळे, जिलेबी-भजी यांचे हॉटेल मांडतात. खेळणी, मणेरी चप्पल विकणारे व्यापारीसुद्धा असतात. गावात बैलपोळा, दसरा, दिवाळी, गणपती, दुर्गोत्सव, रामनवमी उत्सव, बुद्धपौर्णिमा, आंबेडकर जयंती, फुले जयंती असे सण आणि जयंती उत्सव साजरे होत असतात. 

महात्मा ज्योतिबा फुले स्मारक

 

गावात महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आहे. गावकरी प्रामुख्याने मराठी भाषा बोलतात. झाडी ही गावातील लोकांची बोलीभाषा आहे. शिकलेली माणसे हिंदी आणि इंग्रजीसुद्धा बोलतात. मक्करधरा नावाचा लांब कालवा नदीसारखा गावाजवळून वाहतो. राजे रघुजी यांच्या पत्नी महाराणी यांनी रघुजींकडे आग्रह केला, “मी नागपूरचा सक्करधरा पाहिला. पण पिंपळगावचा मक्करधरा पाहिला नाही.राजांनी मक्करधरा बघण्याची राणीची इच्छा पूर्ण केली अशी दंतकथा गावकऱ्यांकडून ऐकण्यास मिळते. पिंपळगावच्या शेजारी सोनी चप्राड या गावाजवळ वैनगंगा नदीला फाटा फुटून लाडज नावाचे बेट तयार झाले आहे. वैनगंगेच्या पुराचा फटका लाडज या गावाला दरवर्षी बसतो.

महाराष्ट्र विद्यालय

 

पिंपळगाव येथे पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावात चार अंगणवाडी केंद्रे आहेत. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे महाराष्ट्र विद्यालयही आहे. त्यात विद्यार्थी इयत्ता पाचवी ते बारावीचे शिक्षण घेतात. तेथे कला, वाणिज्य व विज्ञान शाखासुद्धा उपलब्ध आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तालुक्याचे शहर ब्रह्मपुरी येथील महाविद्यालयात प्रवेश घेतात. पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची भूक तेथील बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत भागवतात. आयटीआय पॉलिटेक्निक, ग्रामसेवक प्रशिक्षण, फार्मसी प्रशिक्षणाची दालने ब्रह्मपुरीत व आजुबाजूच्या परिसरात उपलब्ध आहेत.

फर्निचर कारागीर

 

पिंपळगाव (भोसले) गावाला दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पिंपळगाव जवळच तपाळ गावात वाघोबादेवाचे तीर्थक्षेत्र आहे. त्या स्थळी महाराष्ट्रभरातून भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. वाघोबा देवाला बकरे, कोंबडे कापून नवस केले जातात. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतमजुरी हा आहे. बांधकाम मिस्त्री, त्यावर आधारित मजुरी, धान्यखरेदी व विक्री व्यवसाय असे व्यवसायही गावात केले जातात.

गावापर्यंत पोचण्यासाठी ब्रह्मपुरीहून सकाळी-सायंकाळी दोन वेळा बस किंवा दिवसभरात ऑटो रिक्षा उपलब्ध असतात. ब्रह्मपुरीहून अऱ्हेरनवरगाव मार्गे, कोथुळणमार्गे किंवा नांदगाव जाणी मार्गे ये-जा करता येते. त्या रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. तसेच,सोंद्री सुरबोडी मार्गानेसुद्धा पिंपळगावला पोचता येते.

 

– रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com

रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते  विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ठिगळ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘आक्रीत’, ‘पाऊसपाणी’ आणि ‘हा जीव तुझ्यावर जडला’ या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात.

———————————————————————————————————————————————————-

लेखकाचे इतर लेख

अनिल नाकतोडे – झाडीवूडचा खलनायक (The Villain of the Jhadistage)

वडसा (देसाईगंज) – द झाडीवूड! (WADSA – The Jhadistage)

झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)

———————————————————————————————————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here