देविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)

देविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे 

देविका सत्यजित घोरपडेगजेंद्रगडकर हिला फलटणची सुवर्णकन्या असे म्हणतात. तिने बॉक्सिंग खेळण्यास 2016 साली सुरुवात केली आणि ती पाच वर्षांत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे ! ती मुलगी इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांच्या वंशातील आहे. संताजी घोरपडे यांचे पराक्रमी बंधू बहिर्जी हिंदुराव यांची ती वंशज. त्यामुळे देविका प्रत्येक सामन्याच्या व स्पर्धेआधी कारखेल (तालुका माण, जिल्हा सातारा) या ठिकाणी असलेल्या संताजी यांच्या समाधीच्या दर्शनाला जाऊन त्यांना अभिवादन करते.

देविकाचे वडील सत्यजित यांना खेळांची आवड. देविकाच्या घरात सर्वांनाच खेळ आवडतात. ते राजकारणमनोरंजन यांपेक्षा खेळाला अधिक महत्त्व देतात. देविकाच्या मनात मैदानी खेळांची आवड तशा वातावरणात निर्माण झाली. देविकाचा खेळकरपणा, तिचे धाडस, मेहनत घेण्याची वृत्ती हे सारे पाहून विविध विचार देविकाच्या घरच्या मंडळींच्या मनात असत. तिचे शरीर लहानपणी लावलेल्या डान्स क्लासमुळे लवचीक होतेतिची उंचीही चांगली आहे. परंतु डान्समध्ये स्पर्धा खूप असते आणि म्हणावे तसे यश मिळत नाही. त्या उलट, खेळामध्ये स्पर्धक कमी असतातसांघिक खेळापेक्षा वैयक्तिक खेळांत कौशल्य दाखवण्यास जास्त वाव असतो. सत्यजित यांना वाटे, की देविकाने तिचे कर्तृत्व खेळात गाजवत घराण्याचे नाव उज्वल करावे !

देविकाला बॉक्सिंग आणि रेसलिंग या दोन्ही खेळांची आवड होती, पण तिने बॉक्सिंग क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. तिला पहिली संधी ऑलिम्पिक खेळाडू बॉक्सर मनोज पिंगळे यांच्या अॅकॅडमीत प्रशिक्षणासाठी मिळाली आणि तिचा यशाच्या दिशेने खडतर प्रवास सुरू झाला.

देविकाने सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या ज्युनियर मुलींच्या गटाच्या चौथ्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ते तिचे पहिले लक्षणीय यश. तिने त्या स्पर्धेत मुलींच्या अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवताना त्या पदकाबरोबर ‘उत्कृष्ट उदयोन्मुख मुष्टियोद्धा’ हा मानही मिळवला. ती अल्पावधीतच सराईत खेळाडू झाली.

देविका संधीचे सोने करते अशी तिची ख्याती आहे. सुवर्णपदक हेच तिचे स्वप्न असते. देविकाने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत आठ वेळा, तर राष्ट्रीय स्तरावर तीन वेळा सुवर्णपदके मिळवली आहेत. त्या खेरीज तिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदकावर तीन वेळा समाधान मानावे लागले आहे.

देविकाने भारताचे प्रतिनिधित्व दुबई येथे ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या एशियन युथ ऑफ बॉक्सिंग स्पर्धेत केले. तिला तेथे आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळाले. ती केंद्र सरकार संचालितस्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (SAI) या संस्थेत बॉक्सिंगचे धडे घेत आहे. ती बावन्न किलो वजनी गटात खेळते. तिचे स्वप्न ऑलिम्पिक खेळात कमीत कमी तीन वेळा सलग सुवर्णपदक मिळवण्याचे आहे. त्यासाठी ती सराव करते. बॉक्सिंग हा मानसिक आणि शारीरिक ताकदीचा खेळ आहे अशी तिची धारणा आहे.

देविका पुणे येथील बीएमसी कॉलेजमध्ये बारावीला कॉमर्स शाखेतून शिक्षण घेत आहे. ती आई धनश्री, वडील सत्यजित, बहीण दिव्या व आजीआजोबा यांच्याबरोबर राहते. तिचे आजोबा शिवाजीराव घोरपडे हे फलटण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आहेत.   

सत्यजित घोरपडे 9763717504

– मंगेश गावडे पाटील 9421901928 mangeshgvd1928@gmail.com

———————————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here