अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी नजीक आढळून आल्या आहेत. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी येते. पुरातत्त्व संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. पण तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत.
धारूळ हे मोर्शी तालुक्यातील आदिवासीबहुल गाव आहे. त्या गावाजवळ या अश्मयुगीन चित्रगुहा आहेत. चित्रगुहांचा शोध अमरावतीच्या सहा निसर्गप्रेमींना भटकंतीदरम्यान 2007 मध्ये लागला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवरील इसवी सनपूर्व पस्तीस हजार वर्षांपूर्वीचे हे अश्मयुगीन मानवी वसतिस्थान आहे.
चमूने ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध कार्याचे सादरीकरण केले. चमूचे शोधलेख ‘पुराकला’ आणि ‘पुरातत्त्व’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयातील एक पथक काही वर्षांपूर्वी चित्रगुहा पर्यंत पोचले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या चमूने या चित्रगुहांचे निरीक्षण करून काही निष्कर्ष काढले आहेत.
गुहांचा शोध घेणाऱ्यांमध्ये डॉ. विजय इंगोले, प्र.सु. हिरूरकर, पद्माकर लाड, मनोहर खाडे, ज्ञानेश्वर दमाहे, शिरीषकुमार पाटील यांचा समावेश आहे. त्यांची ही शोधमोहीम 2018 पर्यंत सुरू होती. त्यांनी बरेच तपशील गोळा केले. त्यानुसार मध्यप्रदेशातील भीमबेटका हे आशिया खंडातील सर्वात जुने मानवी वसतिस्थान दहा हजार वर्षांपूर्वीचे असून त्यानंतर शोध लागलेले हे मानवी वसतिस्थान त्याहूनही जुने आहे असा संशोधकांचा दावा आहे. येथे तीनशेहून अधिक शैलगृहे आणि हजाराहून जास्त शैलचित्रे व कोरीव चित्रे आहेत. लोहयुगातील भैरव किंवा भूतनाथ; तसेच, काही युद्धचित्रांचाही तेथील संपदेत समावेश आहे. आदिमानवाने या भागात चौतीस हजार वर्षे वास्तव्य केले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.
मोर्शीच्या या चित्र गुहांना जागतिक नकाशात स्थान मिळालेही, पण त्याकरता जागतिक पातळीवरील संशोधन पत्रांचे सादरीकरण आणि पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार सतत करावा लागला. दरम्यान, त्यांना या अतिप्राचीन मानवी वसतिस्थानाला ‘अंबादेवी रॉक शेल्टर’ हे नाव मिळवून देण्यातही यश आले आहे.
या चित्रगुहा भीमबेटकाच्या आग्नेय दिशेला दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत, तर अमरावतीपासून उत्तरेकडे सुमारे पंच्याऐंशी किलोमीटरवर आहेत. चित्रगुहांचा आकार तीस मीटर रुंद, दहा मीटर उंच आणि आतील भाग दहा मीटरपर्यंत आहे. या चित्रगुहांना ‘आर्ट गॅलरी’सारखे स्वरूप देण्यात आले आहे.
हा परिसर भीमबेटकापेक्षाही मोठा आहे. प्राण्यांची चित्रे गुहांमध्ये चितारण्यात आली आहेत. अमरावतीच्या चमूला सुरुवातीला अकरा गुहा गवसल्या. नंतरच्या काळात त्यांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. या चित्र गुहांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रा, वाघ, बिबट्या या प्राण्यांसह जिराफ यासारख्या प्राण्यांची चित्रे काढलेली आढळून येतात. आदिमानवांनी निवाऱ्यासाठी या गुहांचा वापर करताना ही चित्रे रेखाटली आहेत. अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा या चित्रांच्या माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. शिवाय, या गुहा मानवी समूहांच्या स्थलांतराच्या इतिहास संशोधनात मोलाच्या ठरू शकतात. हे दालन पुरातत्त्व विषयाची आवड असणाऱ्या लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असताना पुरातत्त्व विभागाने केवळ संशोधनाचे श्रेय घेतले अशी टीका त्या विभागावर झाली. पुरातत्त्व खात्याच्या प्रागैतिहासिक विभागाने स्वत: अन्वेषण करून या गुहा शोधल्याचा दावा केल्यावर तर या गुहा शोधून काढणारे निसर्गप्रेमी अवाक झाले !
तज्ज्ञांनी या परिसरामध्ये कुकडसा देव येथे नऊ, गायमुख परिसरात दोन चित्रित गुहा, कोसुंभ येथे दोन गुहा, अंबादेवी परिसरात दोन प्राण्यांच्या चित्रांव्यतिरिक्त या ठिकाणी लहान मुलाचे व आईचे चित्रसुद्धा सापडले आहे. ते चित्र त्या काळातील कुटुंब संस्थेशी निगडित आहे. त्यांना अभ्यास करताना पुराणकालीन, पाषाण युगातील दगडी अवजारे सापडली आहेत. त्यामध्ये छिद्र करण्याचे हत्यार, टोचण पाती, खुरचण असे नमुने आहेत. ही अवजारे तुटक्या अवस्थेत असून अवजारांचे अवशेष आहेत. त्या युगातील मानवांनी याच अवजारांचा वापर गुहा खोदून त्या पूर्णपणे तयार करण्यासाठी केला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला.
ही शैलचित्रे पाहण्यासाठी भारतातील अनेक शास्त्रज्ञ आणि इतर लोक येत आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग अमरावती जिल्ह्यातून आहे. तो परिसर पाहण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात, मात्र त्या ठिकाणी निवासाची सोय नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पुरातत्त्व हा विषय समाविष्ट करण्यास हवा, जेणेकरून या भागात अधिक संशोधन होऊ शकेल.
विजय इंगोले, संशोधक, अमरावती. 9049844964 vtingale@gmail.com
– मोहन अटाळकर 9422157478 mohan.atalkar@gmail.com
———————————————————————————————————————————————–